Wednesday, December 31, 2014

Fitness:The Joy of Laziness:हसत खेळत जगण्याचा मंत्र "द जॉय ऑफ लेझीनेस"

हसत खेळत जगण्याचा मंत्र :"द जॉय ऑफ लेझीनेस"
-रश्मी घटवाई 


उद्यमेन हि सिध्यन्ति कार्यणि  मनोरथै: /न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा://
झोपलेल्या किंवा नुसतं बसून असलेल्या सिंहाच्या तोंडात हरीण काही आपणहून प्रवेश करणार नाही की बाबा रे तुला भूक लागली असेल,तेव्हा आता मला खा!भूक लागल्यावर अगदी वनराज का असेना,त्याला शिकार हेरून तिच्यापाठीमागे धावावेच लागणार,शिकार करावी लागणार...तद्वतच सिंह शिकार करण्यासाठी जर का हरणाच्या मागे लागला असेल,तर आपला जीव वाचवण्यासाठी हरणाला जिवाच्या करारानं धावावं लागणार...जीवो जीवस्य जीवनम हा जसा जंगलाचा कायदा आहे,तसंच थांबला तो संपला हा पण जंगलाचा नियम आहे.त्यामुळे की काय,जंगलात राहणाऱ्या प्राण्यांना आळस काही  परवडणारा नाही.ती मनुष्य प्राण्याची मक्तेदारी! "आलस्य हि मनुष्याणां शरीरस्थो महारिपु:"माणसाच्या शरीरात भिनलेला आळस हाच माणसाचा सगळ्यात मोठ्ठा शत्रू आहे असं आळस ह्या दुर्गुणाबाबतचं एका संस्कृत सुभाषितातलं स्पष्ट मत आहे.
अलसस्य कुतो विद्या,अविद्यस्य कुत: धनं /
अधनस्य कुतो मित्र:,अमित्रस्य कुत: सुखम् //
म्हणजे  आळशी मनुष्याला विद्या कुठून मिळणार,विद्या नसलेल्याला धन कसे मिळणार,धनाचा अभाव असेल,तर त्याला मित्र नसेल आणि ज्याला मित्र नाही,त्याला सुख कसे मिळणार बरे!असं आणखी दुसरं  संस्कृत सुभाषित सांगतं.थोडक्यात काय तर आळस ह्या महाभयंकर दुर्गुणाचा आपण तत्काळ त्याग केला पाहिजे.

एकदा म्हणे एका गावात सगळ्यात आळशी कोण ही स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धकांनी आपणच कसे सर्वात अधिक आळशी हे बसल्या जागेवरून नं हलता,जांभया देत देत पटवून सांगितलं. सरतेशेवटी पारितोषिक घोषित होणार तेवढ्यात कुणीतरी सांगितलं की आंब्याच्या झाडावर झोपलेले म्हातारेबुवाच त्या पारितोषिकाचे योग्य मानकरी ठरतील.लोकांनी त्यावर आक्षेप घेतला,की ज्याअर्थी ते या वयात एवढ्या उंच,डेरेदार आंब्याच्या झाडावर चढून झोपलेत त्याअर्थी ते आळशी नाहीत.त्यावर खुलासा करण्यात आला की त्या माळरानावर आंब्याची कोय पडली होती,तेव्हा त्यावर एक छोटं बाळ झोपलं होतं,पुढे त्या कोयीचा डेरेदार वृक्ष झाला नी ते छोटं बाळ म्हणजेच हे म्हातारेबुवा हे सुज्ञांस सांगणे नं लगे!असो.
आळस झटका हे उपदेश चहूकडून आपल्या कानी आदळत असता जर का "द जॉय ऑफ लेझीनेस"हे एक अतिशय सुंदर पुस्तक पुढ्यात आलं तर काय होईल?समोरच्या उपदेशपांडे यांच्याकडे साफ दुर्लक्ष करून मस्तपैकी रजईत लोळत मनुष्य ते एका बैठकीत-आपलं एका ऐसपैस लोळण्यात वाचून काढेल. 
"The Joy Of Laziness"-द जॉय ऑफ लेझीनेस-हे पुस्तक Peter Axt,PhD -पीटर एक्स्ट व  Michaela Axt-Gadrmann,M.D. -मिशेला एक्स्ट-गाडरमन या दोघांनी लिहिलंय.जर्मनीत राहणारे पीटर एक्स्ट हे हेल्थ सायन्टीस्ट आणि मिशेला एक्स्ट-गाडरमन ह्या मेडीकल डॉक्टर.दोघांनी अनेक  पुस्तके  लिहिली आहेत."Doing nothing actually does a whole lot of good." असं ह्या दोघांनी मेटाबोलिक थिअरी ह्या शास्त्रीय संशोधनावर आधारीत  द जॉय ऑफ लेझीनेस ह्या पुस्तकात म्हटलंय.त्यामुळे 'भेटला बुवा कुणी आपल्या पंथाचा' अशी प्रतिक्रिया सलामीलाच वाचकाच्या मनात येते आणि वाचक पांघरुण आणखी घट्ट गुंडाळून मोठ्या चवीने पुस्तक वाचू लागतो.घरातले अन्य सदस्य त्रासिक चेहऱ्याने त्याच्याकडे बघू लागलेच तर पुस्तकाचे शीर्षक त्यांना दिसेल अशा पद्धतीने पुस्तक धरले की काम भागते.
"ठणठणीत प्रकृती साधे सर्दी पडसे सुद्धा नाही केवळ दोन वेळा जेवायचे,भुकेपेक्षा दोन घास कमीच खावयाचे, मध्ये-अधे चरायचे नाही",असे पाऊणशे वयमानाच्या आजोबांनी नातवंडांना सांगायला सुरुवात केल्यावर काय होईल हे वेगळे सांगायला नको.दीर्घायुष्यासाठी भरपूर व्यायाम करायला हवा,लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे अशी आपल्याकडची शिकवण.ह्या पार्श्वभूमीवर लेखकद्वयी चक्क सांगते की "यू मस्ट डू "नथिंग" इन ऑर्डर टू स्टे हेल्दी अ‍ॅण्ड​ फिट".१९०८ मध्ये जर्मन फिजियोलॉजिस्ट मॅक्स रबनर  यांनी प्रतिपादन केलं की प्रत्येक प्राणीमात्राला विवक्षीत प्रमाणात प्राणशक्ती अथवा  जीव उर्जा(Life Energy )  मिळालेली असते.नंतर विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात रोलंड  प्रिन्झींजर यांनी जीव उर्जा संकल्पनेवर (Life Energy Theory)- या विषयावर संशोधन करून - त्याचंच अधिकृत नाव मेटाबोलिक थिअरी -सांगितलं की सर्व प्राणीमात्रांना त्याच्या शरीराच्या वजनाच्या प्रमाणात एकाच मापात ही प्राणशक्ती वा जीव उर्जा मिळालेली असते-अगदी एका उंदराला ही  एका हत्ती एवढीच जीव उर्जा(प्राणशक्ती) मिळालेली असते.सर्वांना एकसारख्या प्रमाणात मिळालेली ही जीव उर्जा(वा प्राणशक्ती) असते आणि कुठलाही सजीव प्राणी  त्याच्या शरीराच्या वजनाच्या प्रत्येक ग्रॅम मागे २५०० किलोज्युल्स जीव उर्जा (प्राणशक्ती) वापरू  शकतो. तर रॉय वालफोर्ड या अमेरिकन संशोधकाच्या मते इतर प्राण्यांच्या तुलनेत मनुष्यात ही जीव उर्जा दुप्पट असते. लेखकद्वयीच्या मते चयापचयाच्या गतीवर -मेटाबोलिझमच्या स्पीडवर आपली वृद्ध होण्याची,वय वाढण्याची (Ageing) प्रक्रिया अवलंबून असते.जर का आपण चयापचयाची गती कमी करू शकलो,तर आपण सावकाश वृद्ध होऊ.अनेक  anti -aging  तज्ञांच्या मते अनुकूल परिस्थितीत माणसाच्या आयुष्याची आयुर्मर्यादा १२० ते १३० वर्षे आहे.
"Extreme sports,excessive eating  and false ambition  are factors that can steal our energy,cause us to age faster and shorten our lives." असं लेखक लिहितात. एनर्जी कन्झम्प्शन  -उर्जेचा वापर हा मुख्यत्वे आपल्या लाईफ स्टाईलवर -जीवनशैलीवर अवलंबून आहे.वयाच्या  पंचविशीनंतर स्नायूंची प्रतिसाद देण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते,तिशीनंतर एजिंगची-वय वाढण्याची पहिली खूण  डोळ्यांभोवती  दिसू लागते. पस्तीशी, चाळिशी,पंचेचाळिशी,पन्नाशी या टप्प्यांवर काय काय बदल घडून येतात,तसंच ६० ते ७० या वयाच्या टप्प्यात काय काय बदल तीव्रपणे घडून येतात यावर त्यात विस्तृत विवेचन केलंय. "शाळेत शिकलेली कविता तुम्हाला जशीच्या तशी पाठ म्हणून दाखवता येते,मात्र आत्ता आपण गाडीच्या किल्ल्या कुठे ठेवल्यात,हेच बरेचदा विसरायला होतं."ते लिहितात. 

लेखक पेट्रोलवर आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांशी ,फॉर्मुला-१ गाड्यांशी मनुष्याच्या  शरीराची तुलना करतात. फॉर्मुला-१ शर्यतीत अतर्क्य वेगानं धावणाऱ्या गाड्या अवघे दीडशे किलोमीटर अंतर कापल्यावर त्यांच्या सर्व पार्टसची संपूर्ण दुरुस्ती करावी लागते अथवा ते बदलावे लागतात अथवा त्यांना मोडीत काढलं जातं. .काही माणसे  फॉर्मुला-१ शर्यतीत  असल्यासारखी विलक्षण गतीनं आपलं आयुष्य जगतात, त्याबद्दल त्यांचं समाजात कौतुक होतं,कामाच्या झपाट्यानं ते आर्थिक सुबत्ताही मिळवतात.हल्ली लहान मुले ही अशीच  फॉर्मुला-१ शर्यतीत असल्यासारखी विलक्षण गतीनं पळतात.त्यांच्या संपूर्ण दिवसाचं वेळापत्रक कामांनी गच्च भरलेलं असतं. फॉर्मुला-१ शर्यतीत असल्याप्रमाणे पळणाऱ्या  त्यांना कामाच्या ठिकाणी काय किंवा अन्य आघाड्यांवर काय,कायम पहिलं यायचं असतं.कुटुंबीय अथवा मित्रांपेक्षा आपल्या  प्रोफेशनल यशाला ते अधिक महत्व देतात.त्यांना नेहमी अचूकच असायचं  असतं, इतरांना काम विभागून देण्यापेक्षा सगळ्यावर त्यांचंच नियंत्रण असलं पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो.दिवसातला प्रत्येक क्षण हा कामात सत्कारणी लागला पाहिजे,वेळ रिकामा  दवडण्यात हशील नाही असं त्यांना वाटत असतं,त्यांच्याजवळ मुळी रिकामा वेळ नसतो.आपण आपली प्राणशक्ती-life  energy - stress -चिंता,काळजी करण्यात वाया घालवत असतो. मेन्टल स्ट्रेस मुळे फिजिकल  स्ट्रेस निर्माण होतो. लेखकांनी यावर खूप विस्तृत विवेचन दिलंय.प्राणशक्तीचा ऱ्हास करणाऱ्या energy thieves पासून कसं दूर राहता येईल,यावर ते सांगतात.उच्च रक्तदाब, मधुमेह याबद्दल त्यांनी खूपच सोप्या शब्दांत वैद्यकीय ज्ञान दिलंय पण ते इतकं सोप्पं आहे,की डॉक्टर नव्हे,आपला जवळचा मित्रच ते समजावून सांगतोय, असं वाटतं.  
हसत खेळत जगण्याचा मंत्र देणाऱ्या  "द जॉय ऑफ लेझीनेस"पुस्तकाबद्दल "द टाईम्स" नं  आपल्या रिव्ह्यू मध्ये म्हटलं आहे,की डॉक्टर एक्स्ट यांनी आजवर प्रचलित असलेल्या फिटनेस एथिक्सनाच आव्हान दिलंय.हे फिटनेस एथिक्स एका प्रचंड मोठ्या  Service Industry - सेवा उद्योगाचा आत्मा आहेत,ज्याचा प्रभाव व्यायामप्रकारांवर तर दिसतोच दिसतो पण fashion  वर पण दिसतो. धावण्याचे जोडे इत्यादींचा पुरस्कार करण्यासाठी त्यांच्या जाहिरातींवर पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो मात्र hammock (दोरखंडांपासून बनवलेला झुला ज्याच्यात आरामात तासनतास पहुडता येतं.)च्या जाहिरातींवर मात्र काहीच खर्च केला जात नाही.खरं  म्हणजे hammock -  झुला ही दीर्घ आणि निरोगी आयुष्याची  गुरुकिल्ली असू शकते. फिटनेसबद्दलच्या अनेक प्रस्थापित कल्पनांना लेखकद्वयीनं "द जॉय ऑफ लेझीनेस" मध्ये धक्के दिलेले आहेत.Pheidippides हा ग्रीक दूत ख्रिस्तपूर्व  ४०० वर्षे Marathon पासून अथेन्स पर्यंत २६.१६ मैलांचे (४१.८५ किलोमीटर)अंतर धावत गेला आणि तिथे शिरताच अतीव थकव्याने बाजारात कोसळला,गतप्राण झाला.या excessive athleticism वर बरीच चर्चा आतापावेतो झाली,अद्यापही सुरू आहे."Excercise is clearly no guarantee of good health and a long life." असं लेखक अनेक क्रीडापटुंची उदाहरणे आणि  दाखले  देऊन  सांगतात ,
Brisk Walking-धावण्यापेक्षा जलद चालण्याचा व्यायाम  आणि walking meditation
( Peripatetic  meditation )याचा ते पुरस्कार करतात.आहार ,झोप याबद्दलही सांगतात. अनेक प्रस्थापित कल्पनांना धक्का  देणारे भाष्य  करत,आस्वाद घेत,हसत खेळत,मजेत आयुष्य कसं जगायचं याचा मंत्र  "द जॉय ऑफ लेझीनेस" हे पुस्तक देतं.

Sunday, October 12, 2014

Dr.Kailash Satyarthi:त्यांचं हरवलेलं शैशव जपण्यासाठी ...Pl.find my cover story below,on Dr.Kailash Satyarthi ji,published in Tarun Bharat(akaksha suppl.)dated 28th May 2011.

Pl.find my cover story below,on Dr.Kailash Satyarthi ji,published in Tarun Bharat(akaksha suppl.)dated 28th May 2011.
The article:
त्यांचं हरवलेलं शैशव जपण्यासाठी ...
-रश्मी घटवाई
एवढ्यात दिल्लीत एका बालमजुरावर अत्याचार होऊन त्याला आपले प्राण गमवावे लागले.त्यामुळे राजधानी दिल्लीतसुद्धा बालमजुरी,बालशोषण मोठ्या प्रमाणात होत असल्याचं आपोआप सिद्ध झालं. 
मुले ही 'देवाघरची फुले'असं आपण किती ही म्हटलं,तरी त्यांना पायदळी तुडवणारेही कमी नाहीत.आजही खूप कमी पैशात उपलब्ध होतात म्हणून, अतिशय घातक(hazardous ) अशा उद्योगांत,पुरेशा अन्न-पाण्याविना, अस्वच्छ ठिकाणी लहान मुलांना कामाला जुंपले जाते. गालिचे विणणे, जरीवर्क, ज्वेलरी,वस्त्र उद्योग अशा ठिकाणी मुलगे नी धुणी-भांडी-घरकाम,मुले सांभाळणे वगैरेसाठी मुली आपलं कोवळं वय विसरून राबत राहतात. त्यांना वेश्याव्यवसायात जबरदस्तीनं धाडलं जातं.बालमजुरी,बाल-लैंगिक शोषण ह्यांनी लाखो-करोडो बालकांच लहानपणच कुस्करून टाकलं आहे.ह्या लहानग्यांना वाचवण्यासाठी,त्यांचं हरवलेलं शैशव जपण्यासाठी काही जणांनी आपले प्रयत्न सुरु ठेवले आहेत, त्यापैकी एक मोठी व्यक्ती म्हणजे डॉ.कैलाश सत्यार्थी! बालमजुरांच्या छळाबद्दलच्या विरोधात ,बाल-लैंगिक शोषणाच्या विरोधात राष्ट्रीय नी आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवणाऱ्या 'बचपन बचाव आंदोलन'चे सर्वेसर्वा डॉ.कैलाश सत्यार्थी यांच्याशी मी मनमोकळी बातचीत केली.
डॉ.कैलाश सत्यार्थी हे मध्यप्रदेशातल्या विदिशाचे, शिक्षणानं इलेक्ट्रीकल इंजिनीअर. चांगली नोकरी सोडून देऊन त्यांनी 'बचपन बचाव आंदोलन' ही सेवाभावी संस्था सुरु केली, बाल मजुरीच्या, बाल-लैंगिक शोषणाच्या विरोधात झोकून देऊन काम करायला सुरुवात केली,त्यामागची प्रेरणा काय होती,ह्या माझ्या प्रश्नावर ते सांगतात-"मुळात माझ्या शाळेचा पहिला दिवस हाच माझ्या या कार्याचा प्रेरणास्त्रोत आहे.मी पहिल्या दिवशी शाळेत गेलो,तेव्हा शाळेजवळच एक लहानसा मुलगा आपल्या वडिलांसमवेत उन्हात बसून जोड्यांना पॉलिश करत होता. त्याची नी माझी नजरानजर झाली.आम्ही सगळी मुलं चांगले कपडे घालून, व्यवस्थित तयार होऊन शाळेत गेलो होतो.तो मुलगा एकटक आमच्याचकडे बघत होता.आम्ही तसेच वर्गात गेलो.शिक्षकांना विचारलं तो मुलगा बाहेर का उभा आहे म्हणून,तर त्यांनी मला नवीन मित्रांमध्ये रमायला सांगितलं." ते सांगतात.तेव्हा मग सत्यार्थी हेडमास्तरांकडे गेले.त्यांचा त्यांच्याशी कौटुंबिक परिचय होता.त्यांना त्यांनी त्या मुलाबद्दल सांगितलं.'त्याचे आई-वडील गरीब आहेत'असं सांगून हेडमास्तरांनी त्यांची समजूत घातली.तरी हा विषय त्यांच्या डोक्यातून जाईना! तो गरीब मुलगा त्यांना रोज भेटायचा.त्याचे वडीलही दिसायचे.शेवटी नं राहवून, धीर एकवटून सत्यार्थी ह्यांनी एक दिवस थेट त्याच्या वडिलांनाच विचारलं-"इसे स्कूल क्यो नही भेजते?"त्यावर तो गरीब माणूस काही क्षण बोलूच शकला नाही.त्याच्या तोंडून शब्दच फुटेना! थोड्या वेळानं तो म्हणाला,"बाबूजी हम तो काम करने के लिये ही पैदा हुए हैं. मैं ही नही,मेरे पिता, दादाजी..सारे यही काम करते आये हैं.अब आगे मेरा बेटा भी यही काम करेगा !" त्याच्या ह्या उत्तरामुळे सत्यार्थी गहन विचारात पडले."कुछ लोग काम करने के लिये ही पैदा होते हैं.कुछ लोग उपभोग के लिये पैदा होते हैं."हा विचार त्यांची पाठ सोडेना त्यांचे अनेक सहाध्यायी गरिबीपायी पुढे शिकू शकले नाहीत,तर पुस्तकांअभावी काहींना शाळा सोडावी लागत होती. हे सर्व बघून त्यांची अस्वस्थता वाढत गेली.ह्यांच्यासाठी आपण काय बरं करू शकू,हा विचार वयाच्या अकराव्या वर्षी त्यांच्या डोक्यात फिरू लागला. त्यांची स्वत:ची सहावीची परीक्षा होऊन,उत्तम निकाल लागून ते उत्तीर्ण झाले होते.त्याबाबत बक्षीस म्हणून घरच्यांनी त्यांना रोख रक्कम दिली होती.आणखी रमेश नावाचा त्यांचा एक मित्र ही चांगला उत्तीर्ण झाला होता.दोघांनी मिळून बक्षिसाच्या रकमेतून एक हातठेला भाड्यानं घेतला आणि घरापासून दूर असलेल्या कॉलनीत जाऊन जाऊन जोरजोरात ओरडून आपली नको असलेली शालेय पुस्तके देण्याबाबत दोघेहीजण लोकांना विनंती करू लागले.बघता-बघता दोन हजार पुस्तके जमली.त्यांत अगदी सर्व वर्गांची,अगदी मेडिकल नी इंजिनीअरिंगचीही पुस्तके जमली. मित्राचे वडील स्टेशन-मास्तर होते,त्यांच्याकडे त्यांनी ही पुस्तके ठेवली.हेड-मास्तरांच्या नी शिक्षकांच्या कानावर त्यांनी हा प्रकार घातला,तर ते खूपच भारावले,प्रभावित झाले.मग त्यांनी 'शंकराचार्य पुस्तकपेढी 'सुरु केली.त्यात खूप लोक उत्साहानं सामील झाले.जवळ-जवळ सहा हजार पुस्तके त्यात होती.विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी ती पुस्तके विनामुल्य वापरण्यासाठी दिली जात.त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला.
पुढे ते इलेक्ट्रीकल इंजिनीअर झाले.त्याच कॉलेजमध्ये त्यांनी शिकवलंही. High Voltage Transformer Design हा त्यांचा स्पेशलायझेशनचा विषय होता.सुमेधाजींशी विवाह होऊन पुढे ते दिल्लीला आले.इथे त्यांनी 'संघर्ष जारी रहेगा'नावाचं मासिक काढलं."समाज के हाशिये के तबके के बाहर के लोगोंपर-जैसे रिक्षावाले,कपडे प्रेस करनेवाले, कचरा बीननेवालोंपर,उन समुदायोन के इंटरव्यू करके मै लिखता था. अनेक जण समाज-परिवर्तन करीत होते.अशा नि:स्वार्थ भावनेनं कार्य करणाऱ्यांविषयीही मी लिहिलं."ते सांगतात.
हे सगळं कार्य १९८१ च्या सुमारास ते करीत होते.एक दिवस बासलखान नावाचा गरीब मजूर त्यांना शोधत-शोधत आला नि कार्यालयात पोहोचताच चक्कर येऊन खाली कोसळला. शुद्धीवर आल्यावर तो सांगू लागला की सतरा वर्षांपूर्वी काही लोकांनी गोड बोलून त्याला,त्याच्या परिवाराला नि आणखी काही जणांना वीटभटटयांमध्ये ' बॉन्डेड लेबर' म्हणून काम करायला जालंधर -लुधियानाच्या मध्ये असलेल्या 'सरहिंद'ह्या ठिकाणी नेलं.त्याची मुलगी कालांतरानं चौदा वर्षांची झाली. वीटभट्टीचा मालक तिला दलालाला विकण्यासाठी सौदा करू लागला.दलाल आणि मालक त्या मुलीच्या अंगावरून हात फिरवून तिची किंमत ठरवत होते.दलाल चौदा हजार देऊ करत होता,तर वीटभट्टीचा मालक सतरा हजार मागत होता.त्यामुळे सौदा काही ठरत नव्हता.मुलीवर होणारा तो अत्याचार बघून तिची आई आक्रंदत होती.बापही मनातल्या मनात आक्रोशत होता.
रात्री ट्रकमध्ये विटा चढवून झाल्यावर,हा बासलखान मदत मागण्यासाठी म्हणून ट्रक जिथे जाईल,तिथे जाण्यासाठी जिवावर उदार होऊन ट्रक मध्ये लपून बसला.ट्रक चंदिगढला पोहोचला.हा कसाबसा धक्के खात एका वकिलाकडे पोहोचला.ते वकील सुस्वभावी होते,सत्यार्थींच्या मासिकाचे वाचक नि वर्गणीदार होते.त्यांनी त्याला सत्यार्थींकडे जाण्यास सुचवलं. पैसे नसतानाही मदतीची याचना करण्यासाठी बासलखान सत्यार्थींकडे येऊन पोहोचला.
मग कैलाश सत्यार्थी त्यांच्या एका फोटोग्राफर मित्राला घेऊन त्या वीटभट्टीवर थडकले.वीटभट्टीच्या मालकानं बाकीच्या मजुरांना बरीच मारहाण, शिवीगाळ केली,ते सर्व सत्यार्थींनी कॅमेऱ्यात बंदिस्त केलं.ही सगळी स्टोरी त्यांनी इंडियन एक्सप्रेस मध्ये प्रकाशित केली.त्यांच्याकडे एव्हिडन्स होताच. त्यांनी या प्रकरणी कोर्टात हबीअस कॉरपस Habeas corpus याचिका दाखल केली. जज्जनीसुद्धा त्यांची ती स्टोरी वाचली होती.त्यांनी तुरंत ह्या सर्व बॉन्डेड लेबर्स ना ७२ तासांच्या आत मुक्त करण्याचे आदेश दिले.तर पंजाब पोलीस दुसऱ्याच दिवशी सर्व बॉन्डेड लेबर्सना घेऊन आले व त्यांना मुक्त केलं.
सत्यार्थींनी केलेली ही स्टोरी बॉन्डेड लेबर्स,गुलामगिरीवरची पहिलीवहिली खबर होती.त्यामुळे समाजात एकच खळबळ माजली.मग लोक त्यांना अशा प्रसंगी बोलवू लागले.एक आंदोलन उभं झालं.
"भारतात आज साडेपाच ते सहा करोड मुलं मजुरी करताहेत.अन सहा करोड बेरोजगार आहेत,तर जगात अठरा करोड बालमजूर आहेत,नी साडे अठरा करोड बेरोजगार आहेत. ह्याचाच अर्थ हे बेरोजगार लोक तेव्हढ्या मुलांना कामाला जुंपून त्यांच्या जीवावर आयतं बसून खातात." ते सांगतात.
" सिग्नलवर फुगे,मासिके विकणारी मुलं असतात.त्यांच्या करवी दुसराच कोणी ती विकत असतो.सिग्नलवर हातात तान्हे मूल,दुधाची बाटली घेऊन एखादी भिकारीण पैशासाठी दयायाचना करीत असते,ते मूल तिचं नसतंच! मानवीय करूणा को exploit एकस्प्लोईट करके वे पैसे कमाते हैं.त्यांच्यावर नजर ठेऊन मागे त्यांचे एजंट बसलेले असतात. या दलालांचे अड्डे असतात.त्यांच्या टोळ्या ठरलेल्या असतात.त्यांचा एरिया ठरलेला असतो.त्या प्रत्येकाची बोली लागते.एखादा उठून दुसऱ्याच्या हद्दीत शिरकाव नाही करू शकत.सारी 'मिलीभगत' होती है.दिल्ली से हर दिन छ:बच्चे चोरी होते हैं," ते सांगतात.
१९८० सालापासून आजतागायत 'बचपन बचाव आंदोलन' नी डॉ.कैलाश सत्यार्थी ह्यांनी सुमारे ७८ हजार बालकांना बालमजुरी, बाल-शोषण ह्यांच्या विळख्यातून मुक्त केलंय.ह्या मुक्त केलेल्या बालकांचं पुनर्वसन मुक्ती आश्रम,शिक्षण बालाश्रम इथे ते करतात...हरवलेलं त्यांचं शैशव पुन्हा जमेल तेव्हढ मिळवून देतात.
rashmighatwai12@gmail.com

Wednesday, September 10, 2014

हिंदुत्व,वेद,वैदिक संस्कृती ह्यांच्याबद्दलचा लेख( (Proof of Vedic Culture's Global Existence -by Stephen Knapp)

उत्तिष्ठत,जाग्रत… 
-रश्मी घटवाई 

उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत ।
क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गं पथस्तत्कवयो वदन्ति ।। 
(कठोपनिषद्, अध्याय १, वल्ली ३, मंत्र १४)
​​उठा,जागे व्हा आणि श्रेष्ठ,ज्ञानी व्यक्तींच्या सान्निध्यात ज्ञान प्राप्त करा.ज्ञान प्राप्तीचा मार्ग सुरीच्या धारदार पात्यावरून चालण्याइतकाच दुर्गम आहे,असं (विद्वान )कवी सांगतात.  

"उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत"-उठा,जागे व्हा आणि लक्ष्यप्राप्ती होईतो थांबू नका, असा संदेश देणाऱ्या आणि प्रखर,जाज्ज्वल्य हिंदुत्व ही ज्यांची निजखूण,त्या स्वामी विवेकानंदांनी म्हटलं होतं 'अभिमानानं सांगा की मी भारतीय आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत.मात्र असेही काही लोक आपल्या देशात आहेत,जे भारतीय असूनही त्यांना भारतीय म्हणवून घ्यायची लाज वाटते,हिंदू असूनही हिंदू म्हणवून घ्यायची लाज वाटते.त्यांना हिंदू हा शब्द उच्चारलेला देखील खपत नाही आणि हिंदुस्तान असा भारताचा उल्लेख त्यांच्या लेखी घोर अपराध ठरतो . 

ह्या पार्श्वभूमीवर,अमेरिकन लेखक स्टीफन 
 ​
नॅप(Stephen Knapp)ह्यांनी आपल्या अनेक पुस्तकांतून,प्रारंभी सबंध जगात सनातन धर्म अनुसरला जात होता आणि सबंध जगात केवळ आणि केवळ वेदिक संस्कृती अनुसरली जात होती,असं अगदी शास्त्रीय कारणमीमांसा करून सप्रमाण सांगितलं आहे,ते अत्यंत मोलाचं ठरावं. अमेरिकेतल्या ख्रिश्चनधर्मीय कुटुंबात जन्मलेल्या स्टीफन 
 ​
नॅप ह्यांनी बायबलचा अभ्यास केला,पण त्यांना पडलेल्या अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरं त्यांना मिळाली नाहीत म्हणून त्यांनी हिंदू धर्म-खरे म्हणजे सनातन धर्म -आणि  वेद ,(वेदिक)वैदिक संस्कृती ह्यांचा चाळीस वर्षे दांडगा अभ्यास केला आणि प्रचंड ग्रंथसंपदा निर्माण केली.ख्रिश्चन धर्म त्यागून त्यांनी सनातन धर्म स्वीकारला.आपल्या पुस्तकांतून आणि जगभर दिलेल्या भाषणांतून, प्रवचनांतून ते हिंदुत्व,वेद,वैदिक संस्कृती ह्यांच्याबद्दल अधिकारवाणीनं बोलतात. भारतातला सनातन धर्म,वेद,वैदिक संस्कृती हेच आदि आणि शाश्वत आहे,असं त्यांनी पुराव्यांसकट सिद्ध केलंय.त्यामुळे ह्या सर्वांबद्दल आस्था असणाऱ्यांनी तर वाचावंच,पण हिंदू धर्म,हिंदुत्व,वेद ,ईश्वर ,आपली प्राचीन भारतीय संस्कृती वगैरेंबद्दल प्रचंड तिरस्कार असलेल्यांनी तर हातची सगळी कामं बाजूला सारून पहिले वाचावं ,असं हे " प्रूफ ऑफ वेदिक कल्चर'
 ​
स् ग्लोबल एग्झिस्टन्स "(Proof of Vedic Culture's Global Existence -by Stephen Knapp)पुस्तक आहे.त्यानंतर,अत्यंत अबोध असूनही सुबोध म्हणवणाऱ्या ह्या स्वयंघोषित विद्वानांनी आतापर्यंत जिवापाड बाळगलेल्या अज्ञानाबद्दल स्वत:ची कींव करत,पळीत गंगाजल घ्यावं,आणि … !
http://www.stephen-knapp.com ह्या संकेतस्थळावर यांच्या कार्याबद्दल अधिक जाणून घेता येईल. 
"इतिहासाचं कोडं सोडवताना 'जिग-सॉ पझल'चे सगळे तुकडे व्यवस्थित जोडले की आपल्याला भूतकाळातल्या सगळ्या गोष्टींमागचं सत्य उलगडता येतं.सबंध जगभरातच संस्कृत भाषा बोलली जात होती आणि (वेदिक कल्चर)वैदिक संस्कृती अनुसरली जात होती,ह्याचे भरपूर पुरावे अस्तित्वात आहेत आणि सबंध जगभर उपलब्ध आहेत. प्राचीन संस्कृत वैदिक साहित्यातवैदिक संस्कृतीची आणि जगाच्या प्राचीन इतिहासाची माहिती आहे. आर्य कुठून बाहेरून आलेले लोक नाहीत,तर भारतातले,आर्यावर्तातले लोक आहेत.आर्य बाहेरून आक्रमण करून इथे आले वगैरे अपप्रचार हेतुपुरस्सर केला गेला.१० एप्रिल १८६६ रोजी लंडनमध्ये झालेल्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या बैठकीत ती मनगढंत कहाणी रचली गेली आणि त्या तथाकथित शोधाचा उगम झाला. भारतावर कायमच बाहेरून आक्रमणे झालेली आहेत,ह्या देशातल्या लोकांवर बाहेरून आलेल्या लोकांनीच नेहमी राज्य केले आहे त्यामुळे ख्रिश्चन लोकांच्या अधिपत्याखाली ह्या देशानं गुलाम म्हणून रहावं,म्हणून ब्रिटीश सत्तेनं राजकीय खेळी खेळली आणि शाळा -कॉलेजांतून पद्धतशीरपणे तसा अपप्रचार केला.ऑक्सफर्ड विद्यापीठात संस्कृत शिक्षण सुरु करण्यात आलं,जेणेकरून नेटीव भारतीयांना ख्रिश्चनधर्मीय करणे ब्रिटिशांना सुकर होईल." असं स्टीफन 
 ​
नॅप प्रस्तुत पुस्तकात लिहितात.
संस्कृतचा  अभ्यासक 
 मॅक्स म्यूलर Max Mueller  ह्या जर्मन तत्ववेत्त्यानंसुद्धा पुराव्यासहित आर्यांच्या तथाकथित आक्रमणाचं खंडन केलंय.जर्मन विचारवंत Schopenhaurशॉपेनहॉअर यांनी आपल्या पुस्तकात लिहिलंय की उपनिषदांच्या अभ्यासाइतकं  अधिक लाभकारक आणि रोमहर्षक अन्य काहीच नाही.फार कशाला,इंग्लिश तत्त्ववेत्त्या डॉ.अ‍ॅनी बेझंट  यांनी लिहिलं,"सुमारे चाळीस वर्षांहून अधिक काळ जगातल्या सर्व धर्मांचा अभ्यास केल्यानंतर ,हिंदू आणि हिंदुत्व ह्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या  ह्या महान धर्मावाचून दुसरं काहीच इतकं अचूक, इतकं शास्त्रीय,इतकं तात्त्विक(फिलॉसॉफिक)आणि इतकं अध्यात्मिक असं मला आढळत नाही;हिंदू धर्माशिवाय भारताचं अस्तित्व नाही. मेक नो मिस्टेक ,विदाऊट हिंदुइझम , इंडिया 
 ​
हॅज नो फ्युचर.
हिंदुइझम इज  द सॉईल इनटू व्हिच इंडिया'ज् रूट्स आर स्ट्रक,
 ​​
अ‍ॅ
ण्ड टॉर्न ऑफ 
 ​
दॅट,शी विल इनएव्हीटेबली विदर,अ‍ॅ
 ​ज अ ट्री 
टॉर्न आऊट फ्रॉम इट्स प्लेस. … लेट हिंदुइझम व्ह्ॅनिश (vanish )अ‍ॅ
 ​
ण्ड व्हॉट इज शी ?… हर लिटरेचर,हर आर्ट,हर 
मॉन्युमेन्टस्,ऑल हॅव हिंदुडम रिटन अ‍ॅक्रॉस देम. अ‍ॅ
 ​
ण्ड इफ हिंदुज डू नॉट मेन्टेन हिंदुइझम,हू  शॅ​ल सेव्ह इट ?इंडिया अलोन कॅन सेव्ह इंडिया अ‍ॅ
 ​
ण्ड इंडिया अ‍ॅ
 ​
ण्ड हिंदुइझम आर वन !"
"हिंदुत्व वैदिक तत्त्वज्ञानाशी निगडीत आहे आणि ते अगदी हिंदु ,ख्रिश्चन,बौद्ध ,मुस्लिम ह्या   वरवरच्या केवळ संज्ञांपेक्षाही अधिक व्यापक,पलीकडचं आहे. हिंदू हा शब्द मूळ संस्कृत वैदिक वाङ्ग​मयात,साहित्यात नाही. हिंदू हा शब्द नंतर वापरात आला. ईसपूर्व ३२५ वर्षे आधी, जेव्हा अलेक्झांडरनं भारतावर स्वारी केली,तेव्हा सिंधू नदीला सिंधू मधला स वगळून इंडस नाव दिलं आणि इंडसच्या पूर्वेला असलेल्या भूमीला इंडिया,हे नामाभिदान ब्रिटिशांनीही वापरलं.मुस्लिम आक्रमणकर्ते सिंधूचा उच्च्चार हिंदू असा करीत आणि इथल्या लोकांचा आणि त्यांच्या धर्माचा उल्लेख त्यांनीच हिंदू असा केला. "ते लिहितात.  

समग्र सावरकर खंड १० वा ह्या  ग्रंथातही सावरकरांनी हिंदुत्व आणि हिंदुधर्म यातील शब्दार्थ भेद यावर विस्तृत विवेचन दिलं आहे.सप्तसिंधूविषयी आर्यांना कृतज्ञ भक्तिभाव होता कारण ते प्रामुख्यानं कृषि करून रहात ,यज्ञयाग करीत.संस्कृत मधील सिंधूचे प्राकृत मध्ये हिंदू असे रुपांतर झाले -जसे सप्ताहचे हप्ता .सरस्वती चे पर्शियन रुपांतर हरहवती असे होते.कदाचित प्राकृत 'हिंदु'चेच 'सिंधु ' हे नंतरचे रुपांतर असावे. 
                    आसिंधुसिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका 
                   पितृभू:पुण्याभूश्वैव व वै हिन्दुरितिस्मृत: ।। 
सिंधु नदीपासून ते सिंधु (समुद्र)पर्यंत पसरलेली ही भारतभूमी ज्याच्या पूर्वजांची भूमी आणि पुण्यभूमी,धर्मासह संस्कृतीची भूमी आहे,तो हिंदू !अशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदूची व्याख्या केली आहे. 

" मेहेरगढ ह्या मोहेंजदरोपासून उत्तरेला १५० मैल  असलेल्या स्थानी ख्रिस्तपूर्व ६५०० वर्षे या काळात अस्तित्वात असलेल्या संस्कृतीचे पुरावे आहेत",वेदांचा अभ्यास केलेले स्टीफन 
 ​
नॅप आपल्या पुस्तकात पुढे लिहितात,"सरस्वती नदीचा ऋग्वेदात उल्लेख आहे,ऋग्वेदात सरस्वती नदीची प्रशंसा आहे आणि तिच्या पर्वतीय उगमापासून ते समुद्रापर्यंतच्या तिच्या प्रवाहाचं वर्णन आहे,की ती यमुना आणि शुतुद्री (सतलज) यांच्या मध्ये वाह्ते.अथर्ववेदात सरस्वती नदीच्या काठावर जव (बार्ली)पेरल्या-उगवल्याचा उल्लेख आहे,तर यजुर्वेदात पाच नद्या सरस्वती नदीत येउन मिळतात आणि ती खूप मोठी नदी म्हणून वहाते असा उल्लेख आहे .अलीकडच्या शास्त्रीय संशोधनावरून सिद्ध झालंय की सरस्वती नदीचा प्रवाह ख्रिस्तपूर्व ८००० वर्षे लुप्त झाला. जर का वैदिक काळातले लोक सिंधुसंस्कृतीनंतर आलेले असते,तर त्यांना सरस्वती नदीबद्दल माहिती कशी असती?ऋग्वेद ख्रिस्तपूर्व १०००० वर्षे आधी अस्तित्वात आला,"असे ते लिहितात. 

"मनु बद्दल ऋग्वेदात माहिती आहे.महापुरानंतर त्याची नाव मनालीला पोहोचल्याचा उल्लेख अथर्व-वेदात आहे .पौरव,आयु,नहुष,ययाती हे त्याचे वंशज.ययातीच्या दोन पत्नी - देवयानी आणि शर्मिष्ठा .ययातीला देवयानीपासून यदु आणि तुर्वसु हे दोन पुत्र होते आणि यदु पासून यदुवंश ,यादव निर्माण झाले,तर तुर्वसू पासून यवन किंवा तुर्क वंश . शार्मिष्ठे पासून ययातीला दृह्य,अनु आणि पुरू असे तीन पुत्र प्राप्त झाले. दृह्य-ज्याच्या वंशात पुढे भोज राजा आला,अनु-ज्यानं म्लेंछ वा ग्रीक वंश ( dynasty )निर्माण केला आणि पुरुनं पौरव वंश स्थापन केला,जो रावी नदीच्या, काठी आणि नंतर सरस्वतीच्या काठी वास्तव्य करू लागला.काहींच्या मते ह्या वंशाचा विस्तार होऊन पुढे ते इजिप्त मध्ये गेले,फरोह  pharoh ह्या नावानं ओळखले जाऊ लागले. महाभारतात पुलिंद (ग्रीस)साम्राज्य भीम आणि सह्देव यांनी जिंकल्याचा उल्लेख आहे. ग्रीस,तुर्कस्थान हे सगळे एकेकाळी वैदिक संस्कृतीचे आणि साम्राज्याचे घटक होते. "

"संस्कृत ही सोलोमनच्या काळात इसवीसनपूर्व १०१५ वर्षे या काळात जगभर बोलली जाणारी भाषा होती,त्याचप्रमाणे अलेक्झांडरच्या काळात इसवीसनपूर्व ३२४ वर्षे या  काळात जगभर बोलली जाणारी भाषा होती. संस्कृतमधला  ऋग्वेद हेच जगातलं सर्वात प्राचीन वैदिक साहित्य आहे.वैदिक साहित्यात आयुर्वेद हे धन्वंतरीचं औषधशास्त्र ,महर्षी भृगुंचा धनुर्वेद भारत मुनींचा गांधर्ववेद,स्थापत्यवेद यांचा समावेश होतो तसंच शुल्बसूत्र ह्या वैदिक गणिताचा समावेश होतो.वेदिक गणित हे 
 ​​
बॅबिलोन मध्ये  इसवीसनपूर्व  १७०० मध्ये उगम पावलेल्या गणिताचा आधार घेऊन अस्तित्वात आलेलं नाही,तर ह्या वेदिक गणिताचा आधार घेऊन बॅबिलोन मध्ये गणिताचा अविष्कार झाला आणि ग्रीक आणि पायथागोरस  यांच्या गणिताचं मूळ  वेदिक गणित हे
 च आहे. " 
इंग्रजी महिन्यांची,व्यक्तीची,देशांची नावं  ही सगळी मूळ संस्कृत शब्दांपासून आलेली व अपभ्रंशीत रूपातली आहेत,असे ते विस्तृतपणे सांगतात.जगभर कशी केवळ संस्कृत भाषा आणि वैदिक संस्कृती अस्तित्वात होती हे त्या  चारशे पानी  पुस्तकात शास्त्रशुद्धपणे उलगडलं  जातं  आणि आपण त्या महान संस्कृतीचं संचित जाणून कृतकृत्य होतो.  
-----------------------------------------
-रश्मी घटवाई 
मोबाईल :०९८७१२४९०४७     

Thursday, August 14, 2014

Whirlpool...Whirlpool...We are sick with the service standard of Whirlpool...

We are sick with the service standard of Whirlpool...

I have heard that the companies strive hard to retain and further grow their customer base,whereas here,I am seeing a company,which is hellbent upon losing its customers.I have already decided that in future I am not going to buy any Whirlpool product and have advised my relatives and friends for the same,which they have promptly acted upon.I would be very soon writing an extensive article,on how the customer-though deemed as king,is actually being treated as a beggar by the companies and that they forget that their very existence depends upon the customers.

Tuesday, August 12, 2014

भारताच्या स्वातंत्र्यदिना निमित्त लेख:​​भळभळणाऱ्या जखमा,ठसठसणारी वेदना…

भळभळणाऱ्या जखमा,ठसठसणारी वेदना… 
​​
विद्यार्थीदशेत असताना रुक्ष भासणारे विषय व्यवहार्य जगात पाऊल ठेवल्यावरच खऱ्या अर्थानं आपल्याला कळतात. इतिहासातल्या घटनांमध्ये त्यावेळी आपल्याला भले स्वारस्य वाटलं नसलं, तरी इतिहासानं घडवलेला भूगोल नंतर अनेकविध माध्यमातून कल्पनेपलिकडचं भीषण वास्तव आपल्याला उलगडून दाखवतो,त्यावेळी मनाला विलक्षण चटका बसतो. 

ईस्ट इंडिया कंपनीनं व्यापार -उदिमाच्या मिषानं इ.स.१६०० मध्ये भारताच्या भूमीवर ठेवलेलं पाऊल शतक-दर शतक घट्ट रोवत गेलं आणि साम्राज्यावरचा सूर्य नं ढळणाऱ्या ब्रिटीश राजसत्तेनं आपली पकड आणखी मजबूत करत ह्या देशाचं वैभव,अस्मिता,स्वातंत्र्य हिरावून घेत त्याला हीन-दीन अशा भुकेकंगाल अवस्थेप्रत आणून ठेवलं. 'डिव्हाइड अ‍ॅण्ड रूल'- दोन धर्मांमध्ये वैमनस्य आणि तेढ उत्पन्न करून राज्य करण्याचं तंत्र अवलंबित अखेरीस देशाचे तुकडे केले.हा इतिहास आपल्या मनावर कायमचा कोरला गेला आहे .
भारताला स्वातंत्र्य मिळून बघता-बघता ६७ वर्षे झाली. आपल्या देशानं स्वातंत्र्याची फार मोठी किंमत फाळणीच्या आणि फाळणीदरम्यान झालेल्या नरसंहाराच्या रुपानं चुकवली.स्वातंत्र्य मिळवताना देशाचे तुकडे होणं,अपिरिमित नरसंहार होणं आवश्यक होतं का हा प्रश्न आजही प्रत्येकाला पडतो. त्यावेळच्या अपिरिमित नरसंहाराबद्दल आणि अत्याचारांबद्दल कुणाही संवेदनाशील व्यक्तीच्या मनात कालवाकालव व्हावी!फाळणी टाळता आली असती,अशा अर्थाची विधानं फाळणीला जबाबदार असलेल्यांनी स्वत: केली आहेत. फाळणी टाळता आली असती का,ह्यावर अनेक विचारवंतांनी अनेक पुस्तकांतून विचारमंथन केलं आहे.
""If British governments had been prepared to grant in 1900 what they refused in 1900 but granted in 1920,or to grant in 1920 what they refused in 1920 but granted in 1940;or to grant in 1940,what they refused in 1940 but granted in 1947-then nine tenths of the misery,hatred and violence,the imprisonings and terrorism, the murders,flogging,shootings,assassinations,even the racial massacres would have been avoided;the transference of power might well have been accomplished peacefully,even possibly without Partition.भारतीयांनी सन १९०० मध्ये जी मागणी केली,ती ब्रिटीश सरकारनं तेव्हा नाकारली आणि जे मागितलं ते सन १९०० ऐवजी १९२० सालीं देऊ केलं,१९२० सालीं जी मागणी केली,ती तेव्हा धुडकावून ते १९४० सालीं देऊ केलं आणि १९४० सालीं मध्ये केलेली मागणी फेटाळून ते १९४७ सालीं भारतीयांना देऊ केलं. ब्रिटीश सरकारनं भारतीयांची मागणी तेव्हाच पूरी केली असती तर दु:ख,द्वेष,हिंसा, हत्या, अत्याचार, कारावास, दहशतवाद, खूनखराबा,गोळीबार,एवढंच काय धर्मांधतेतून झालेला नरसंहार,हे सगळं टळलं असतं.सत्तेचं हस्तांतरण शांततापूर्वक आणि कदाचित फाळणी नं होतासुद्धा झालं असतं," असं प्रशासकीय अधिकारी आणि लेखक लिओनार्ड वूल्फ (लेखिका व्हर्जिनिया वूल्फ यांचे पती )यांनी लिहिलंय.  

ते अर्थातच अगदी खरं आहे.कारण इतिहासाच्या पुस्तकांचा मागोवा घेतला तर दिसतं,की  फाळणी होण्यामागे केवळ एका व्यक्तीचा अहंकार आणि आडमुठेपणा होता.'द मॅन हू डिव्हायडेड इंडिया 'हे रफ़िक झकारिया यांचं पुस्तक ह्यावर सखोल विवेचन करतं.फाळणी झाली;ती महंमद अली जिन्ना यांच्या दुराग्रहामुळे! 'भला तेरी कमीज मेरी कमीज से सफ़ेद कैसी ?'ह्या ईर्षेतून, महात्मा गांधींवर कुरघोडी करण्याच्या आणि स्वत:चं राजकीय महात्म्य रुजवण्याच्या दुर्दम्य लालसेपोटी जिन्नांनी आपली आधीची भूमिका पूर्णपणे बदलली आणि द्विराष्ट्रवादाचा हट्ट धरला.भारतीय राजकीय आणि सामाजिक पटलावर महात्मा गांधींच्या तोडीचं स्थान आणि आदर मिळवण्यासाठी त्यांनी जिवाचं रान केलं.त्यांनी पद्धतशीरपणे हिंदू आणि मुस्लिम धर्मियांमध्ये दरी निर्माण केली आणि रूढार्थानं धर्माचं पालन न करूनसुद्धा आपणच मुस्लिम धर्मियांचे एकुलते एक तारणहार अशी आपली प्रतिमा निर्माण केली.हिंदू आणि मुस्लिम धर्मियांमध्ये काहीच साम्य नाही,वस्तुत: ती दोन भिन्न  राष्ट्रे आहेत,अशा प्रकारे प्रचार करून त्यांनी वातावरण कलुषित करून हटवादीपणे भारताच्या फाळणीची मागणी लावून  धरली. गांधी ट्राइड टु विन ओव्हर जिन्ना सेव्हरल टाईम्स…सिन्स द अ‍ॅडव्हेन्ट ऑफ गांधी,जिन्ना स्ट्रगल्ड हार्ड टु  अ‍ॅव्हेन्ज हिज ह्युमिलियेशन अ‍ॅन्ड सक्सीड इन अ‍ॅक्वायरिंगअ पोझिशन व्हिच इक्वलड्  दॅट ऑफ गांधी…ही सक्सेसफुली इनक्रीजड् द रिफ्ट बिटवीन द टू कम्युनिटीज,कन्व्हिन्सड् द वर्ल्ड  दॅट हिंदूज  अ‍ॅन्ड मुस्लिमस् हॅ नथिंग इन कॉमन बिटवीन देम…दॅट हिंदूज अ‍ॅन्ड मुस्लिम वेअर टू डिफरन्ट नेशन्स…हॅविंग विलफुली पॉइझनड् द अ‍ॅटमॉस्फिअर ऑफ युनिटी ,ही पुट फोर्थ हिज डिमांड  फॉर द पार्टिशन ऑफ इंडिया". फाळणीची मागणी करणारा हा माथेफिरू आणि फाळणी ही मोठीच आपत्ती असेल असं ठाम मत असणाऱ्या लॉर्ड माऊंबॅटननं मात्र फाळणीला मूर्तस्वरूप का द्यावं, असा सवाल करीत झकारियांनी कुठलीही भीडभाड नं ठेवता जिन्नांचा ताळेबंद मांडला आहे.    
मात्र ज्यांनी भारताची फाळणी केली ,दस्तुरखुद्द त्यांनीच त्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त केल्याबद्दल, नवी दिल्लीत ऑस्ट्रेलिया चे राष्ट्रदूत -हाय कमिशनर म्हणून काम केलेले आणि नेहरूंचे परिचित वॉल्टर क्रॉकर यांनी 'नेहरू,-अ कन्टेम्पररी'ज एस्टीमेट'ह्या आपल्या पुस्तकात  नेहरू ह्या आपल्या समकालीनाचा लेखाजोखा मांडताना उल्लेख केलेला आहे. पाकिस्तानची निर्मिती करणं ही चूक झाली आणि पाकिस्तानच्या निर्मितीपेक्षा स्वातंत्र्य उशिरा मिळालं असतं ,तर ते अधिक योग्य झालं असतं,असं जिन्ना म्हणाल्याचं जिन्नांच्या जीवनाच्या अखेरच्या कालावधीत,त्यांच्या आजाराच्या शेवटच्या टप्प्यात त्यांच्यावर  उपचार करणाऱ्या भारतीय डॉक्टरांनी म्हटलं होतं . "According to one of the Indian Doctors attending Jinnah in the later part of his fatal illness Jinnah said that the creation of Pakistan was a mistake and that rather than create it the better course would have been to delay independence."'(Nehru -A Contemporary's Estimate'-by Walter Crocker) 

'फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट ' हे डॉमिनिक लापियर आणि लॅरी कॉलिनस् (Freedom at Midnight -Dominique Lapierre , Larry Collins )या लेखकद्वयीचं अत्यंत गाजलेलं पुस्तक. भारतात ब्रिटीश राज्यसत्तेची सुरुवात कशी झाली,इथल्या राजघराण्यांचा राजेशाही थाट आणि कारभार कसा चालत होता, ब्रिटन मध्ये काय घडत होतं इथपासून ते  स्वातंत्र्यप्राप्तीचा संघर्ष, प्रत्यक्ष स्वातंत्र्यप्राप्ती, फाळणी  आणि त्यापायी  झालेला नृशंस नरसंहार हे आपल्यासमोर जणू दृश्य रूपात ते उभं करतात. 
जिन्ना यांना टीबी झालेला असून जिन्ना केवळ सहा महिन्याचेच सोबती असल्याचं निदान डॉक्टरांनी केल्याची अत्यंत महत्वाची माहिती  १९४७ सालीं माउंटबॅटन यांच्यापासूनलपवून ठेवण्यात आली होती. जर  ही बातमी  माउंटबॅटन यांना कळली असती,तर माउंटबॅटन यांनी वेगळा निर्णय घेतला असता,वा  जिन्नांच्या  मृत्यूपश्चात निर्णय घेतला असता;कदाचित पाकिस्तान अस्तित्वातच आलं नसतं .  
'देअर वॉज वन व्हायटल पीस ऑफ नॉलेज डिनाइड टू माऊंबॅटन इन द समर ऑफ १९४७… दॅट जिन्ना वॉज डाइंग ऑफ टी.बी. अ‍ॅन्ड दॅट ही हॅड लेस दॅन सिक्स मंथस् टु लिव्ह.हॅड ही नोन दॅट,ही वुड हॅव अ‍ॅक्टेड क्वाइट डिफरन्टली…माऊंबॅटन वुड हॅव बीन सोअरली टेम्प्टेड टु अवेट हिज डेथ.देन , परहॅप्स, पाकिस्तान वुड नेव्हर हॅव कम इनटु बीईंग!' लेखकद्वयी लिहिते.
मजूर पक्षाचे  ब्रिटनचे पंतप्रधान क्लीमंट अ‍ॅटलींनी सहा फूट उंची आणि प्रभावी व्यक्तिमत्व असलेल्या,४६ वर्षीय माऊंबॅटनना भारताचे व्हॉईसरॉय  म्हणून भारतात पाठवलं. माऊंबॅटन व्हिक्टोरिया राणीचे पणतू होते. माऊंबॅटननी  भारताला तडकाफडकी स्वातंत्र्य देऊ केलं आणि घाईघाईनं सत्तांतरण केलं , तसंच नरसंहार होऊ नये म्हणून त्यांनी काहीच काहीच केलं नाही,असा माऊंबॅटन यांच्यावर आरोप केला जातो. 
लाहोरमध्ये काँग्रेसनं  पूर्ण स्वराज्याचा प्रस्ताव मांडून १९३० सालच्या  जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी,म्हणजे २६ जानेवारी १९३० हा स्वातंत्र्यदिन म्हणून  मुक्रर करून दरवर्षी साजरा करण्याचं ठरवलं . अखेरात अखेर ३० जून १९४८ रोजी भारताला स्वातंत्र्य देण्याचं ब्रिटीशांनी निश्चित केलं होतं .  मात्र अधिक उशीर केला तर भारतीय उपखंडात सिव्हिल वॉर -जनक्षोभ उसळेल असं माऊंबॅटन यांना वाटत होतं .माऊंबॅटन यांचा नवा मसूदा तयारच होता,त्यावर ३ जून १९४७ रोजीच्या अत्यंत महत्वाच्या,ऐतिहासिक  बैठकीत मोठ्या चतुराईनं आणि नाटकीय पद्धतीनं माउंटबॅटन यांनी जवाहरलाल नेहरू,वल्लभभाई पटेल,जे.बी.कृपलानी हे काँग्रेसचे नेते,महम्मद अली जिन्ना,लियाकत अली खान,अब्दुर रब निश्तर हे मुस्लिम लीगचे नेते आणि शिखांचा प्रतिनिधी म्हणून सरदार बलदेव सिंह अशा ७ नेत्यांची स्वीकृती मिळवली. माऊंबॅटन प्लान प्रमाणे देशाची -भूभागाची फाळणी तर  होणारच होती;स्थावर जंगमाची ,पैशा -अडक्याची,साहित्य सामुग्रीची ,कैद्यांची,सैन्याची -साऱ्या -साऱ्याची वाटणी होणार होती.त्या दिवशी संध्याकाळी ऑल इंडिया रेडियोवरून माउंटबॅटन,जवाहरलाल नेहरू, महम्मद अली जिन्ना यांनी,फाळणी होऊन दोन स्वतंत्र,सार्वभौम राष्ट्रे निर्माण होण्यास त्यांची स्वीकृती असल्याची अधिकृतरीत्या घोषणा केली. 

व्हॉईसरॉय  माऊंबॅटन यांनी फाळणीच्या घोषणेबद्दल घेतलेल्या पत्रकार परिषदेला जगभरातले ३०० पत्रकार उपस्थित होते. सत्तांतरणासाठी तुम्ही तारीख निश्चित केलीच असेल ना,असे एका पत्रकाराने विचारले,त्यावर  माऊंबॅटन यांनी होकार दिला.मग ती तारीख कोणती अशी त्या पत्रकारानं पृच्छा केली.खरं तर  माउंटबॅटन यांनी अशी कोणतीच तारीख वगैरे मनात ठरवली नव्हती .मात्र आपण जिवंत ज्वालामुखीवर बसलो आहोत,त्या ज्वालामुखीचा कधीही उद्रेक होईल,कधीही जनक्षोभ उसळू शकेल , याची त्यांना जाणीव होती. "सत्तांतरणासाठी तारीख निश्चित केली आहे",त्यांनी घोषणा केली.वेगानं त्यांच्या डोक्यात चक्रं फिरू लागली.कुठली बरं तारीख सांगावी?क्षणभर ते विचार करू लागले आणि एका तारखेपाशी येऊन थांबले.त्यांच्यालेखी यापेक्षा अधिक सयुक्तिक तारीख दुसरी नव्हती,कारण दोन वर्षांपूर्वी त्या दिवशी बर्मामध्ये त्यांना विजयश्री मिळाली होती,जपाननं दुसऱ्या महायुद्धात अलाईड फोर्सेस-ब्रिटनच्या संयुक्त फौजांसमोर शरणागती पत्करली होती.त्या विजयाचा उद्गाता भारताच्या पारतंत्र्यातून होणाऱ्या मुक्तीचाही उद्गाता ठरणार होता.माऊंबॅटन यांनी घोषणा केली,"भारताच्या हातात सत्तेची सारी सूत्रे १५ ऑगस्ट १९४७ रोजी सोपवण्यात येतील!"अशा प्रकारे आधी काहीही नं ठरवता त्यांनी उत्स्फुरपणे तारीख घोषित करून टाकली.मात्र तो दिवस ज्योतिष्यांच्या मते अत्यंत अशुभ होता आणि त्या दिवशी स्वातंत्र्य मिळाल्यास त्याचे भयंकर आणि दूरगामी परिणाम होतील , मोठा विध्वंस होईल,असं सगळ्या ज्योतिष्यांनी भाकीत वर्तवलं होतं.  
आणि तसंच झालं.सिरिल रॅडक्लिफ यांनी आखलेल्या रेषांवरून देशाचं द्विभाजन झालं आणि देशात संतापाचा आगडोंब उसळला.विद्वेषाच्या त्या अग्नीत पंचवीस तीस लाख लोकांचे प्राण गेले,स्त्रियांची अब्रू गेली आणि लाखो संसार उध्वस्त झाले .देशाची शकलं झाली.            
"भारताची फाळणी का झाली ?आणि फाळणी अपरिहार्यच होती,तर त्यात एवढा नरसंहार का व्हावा?" लेखक रामचंद्र गुहा " इंडिया आफ्टर गांधी" ह्या आपल्या पुस्तकात प्रश्न करतात. ह्या नऊशे पानी पुस्तकात त्यांनी सखोलपणे आणि अत्यंत अभ्यासू वृत्तीनी गांधींच्या आधीच्या आणि नंतरच्या भारताच्या इतिहासाचा मागोवा घेतला आहे. त्या नृशंस नरसंहाराचं वर्णन फाळणीच्या भळभळणाऱ्या जखमा मनात ठसठसणारी वेदना जागवतात.नियतीशी झालेल्या त्या कराराचं दु:ख मनात कायमचं व्यापून उरतं .
--------------------------------------------------------------------------------------------
रश्मी घटवाई 
०९८७१२४९०४७