Wednesday, December 31, 2014

Fitness:The Joy of Laziness:हसत खेळत जगण्याचा मंत्र "द जॉय ऑफ लेझीनेस"

हसत खेळत जगण्याचा मंत्र :"द जॉय ऑफ लेझीनेस"
-रश्मी घटवाई 


उद्यमेन हि सिध्यन्ति कार्यणि  मनोरथै: /न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा://
झोपलेल्या किंवा नुसतं बसून असलेल्या सिंहाच्या तोंडात हरीण काही आपणहून प्रवेश करणार नाही की बाबा रे तुला भूक लागली असेल,तेव्हा आता मला खा!भूक लागल्यावर अगदी वनराज का असेना,त्याला शिकार हेरून तिच्यापाठीमागे धावावेच लागणार,शिकार करावी लागणार...तद्वतच सिंह शिकार करण्यासाठी जर का हरणाच्या मागे लागला असेल,तर आपला जीव वाचवण्यासाठी हरणाला जिवाच्या करारानं धावावं लागणार...जीवो जीवस्य जीवनम हा जसा जंगलाचा कायदा आहे,तसंच थांबला तो संपला हा पण जंगलाचा नियम आहे.त्यामुळे की काय,जंगलात राहणाऱ्या प्राण्यांना आळस काही  परवडणारा नाही.ती मनुष्य प्राण्याची मक्तेदारी! "आलस्य हि मनुष्याणां शरीरस्थो महारिपु:"माणसाच्या शरीरात भिनलेला आळस हाच माणसाचा सगळ्यात मोठ्ठा शत्रू आहे असं आळस ह्या दुर्गुणाबाबतचं एका संस्कृत सुभाषितातलं स्पष्ट मत आहे.
अलसस्य कुतो विद्या,अविद्यस्य कुत: धनं /
अधनस्य कुतो मित्र:,अमित्रस्य कुत: सुखम् //
म्हणजे  आळशी मनुष्याला विद्या कुठून मिळणार,विद्या नसलेल्याला धन कसे मिळणार,धनाचा अभाव असेल,तर त्याला मित्र नसेल आणि ज्याला मित्र नाही,त्याला सुख कसे मिळणार बरे!असं आणखी दुसरं  संस्कृत सुभाषित सांगतं.थोडक्यात काय तर आळस ह्या महाभयंकर दुर्गुणाचा आपण तत्काळ त्याग केला पाहिजे.

एकदा म्हणे एका गावात सगळ्यात आळशी कोण ही स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धकांनी आपणच कसे सर्वात अधिक आळशी हे बसल्या जागेवरून नं हलता,जांभया देत देत पटवून सांगितलं. सरतेशेवटी पारितोषिक घोषित होणार तेवढ्यात कुणीतरी सांगितलं की आंब्याच्या झाडावर झोपलेले म्हातारेबुवाच त्या पारितोषिकाचे योग्य मानकरी ठरतील.लोकांनी त्यावर आक्षेप घेतला,की ज्याअर्थी ते या वयात एवढ्या उंच,डेरेदार आंब्याच्या झाडावर चढून झोपलेत त्याअर्थी ते आळशी नाहीत.त्यावर खुलासा करण्यात आला की त्या माळरानावर आंब्याची कोय पडली होती,तेव्हा त्यावर एक छोटं बाळ झोपलं होतं,पुढे त्या कोयीचा डेरेदार वृक्ष झाला नी ते छोटं बाळ म्हणजेच हे म्हातारेबुवा हे सुज्ञांस सांगणे नं लगे!असो.
आळस झटका हे उपदेश चहूकडून आपल्या कानी आदळत असता जर का "द जॉय ऑफ लेझीनेस"हे एक अतिशय सुंदर पुस्तक पुढ्यात आलं तर काय होईल?समोरच्या उपदेशपांडे यांच्याकडे साफ दुर्लक्ष करून मस्तपैकी रजईत लोळत मनुष्य ते एका बैठकीत-आपलं एका ऐसपैस लोळण्यात वाचून काढेल. 
"The Joy Of Laziness"-द जॉय ऑफ लेझीनेस-हे पुस्तक Peter Axt,PhD -पीटर एक्स्ट व  Michaela Axt-Gadrmann,M.D. -मिशेला एक्स्ट-गाडरमन या दोघांनी लिहिलंय.जर्मनीत राहणारे पीटर एक्स्ट हे हेल्थ सायन्टीस्ट आणि मिशेला एक्स्ट-गाडरमन ह्या मेडीकल डॉक्टर.दोघांनी अनेक  पुस्तके  लिहिली आहेत."Doing nothing actually does a whole lot of good." असं ह्या दोघांनी मेटाबोलिक थिअरी ह्या शास्त्रीय संशोधनावर आधारीत  द जॉय ऑफ लेझीनेस ह्या पुस्तकात म्हटलंय.त्यामुळे 'भेटला बुवा कुणी आपल्या पंथाचा' अशी प्रतिक्रिया सलामीलाच वाचकाच्या मनात येते आणि वाचक पांघरुण आणखी घट्ट गुंडाळून मोठ्या चवीने पुस्तक वाचू लागतो.घरातले अन्य सदस्य त्रासिक चेहऱ्याने त्याच्याकडे बघू लागलेच तर पुस्तकाचे शीर्षक त्यांना दिसेल अशा पद्धतीने पुस्तक धरले की काम भागते.
"ठणठणीत प्रकृती साधे सर्दी पडसे सुद्धा नाही केवळ दोन वेळा जेवायचे,भुकेपेक्षा दोन घास कमीच खावयाचे, मध्ये-अधे चरायचे नाही",असे पाऊणशे वयमानाच्या आजोबांनी नातवंडांना सांगायला सुरुवात केल्यावर काय होईल हे वेगळे सांगायला नको.दीर्घायुष्यासाठी भरपूर व्यायाम करायला हवा,लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे अशी आपल्याकडची शिकवण.ह्या पार्श्वभूमीवर लेखकद्वयी चक्क सांगते की "यू मस्ट डू "नथिंग" इन ऑर्डर टू स्टे हेल्दी अ‍ॅण्ड​ फिट".१९०८ मध्ये जर्मन फिजियोलॉजिस्ट मॅक्स रबनर  यांनी प्रतिपादन केलं की प्रत्येक प्राणीमात्राला विवक्षीत प्रमाणात प्राणशक्ती अथवा  जीव उर्जा(Life Energy )  मिळालेली असते.नंतर विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात रोलंड  प्रिन्झींजर यांनी जीव उर्जा संकल्पनेवर (Life Energy Theory)- या विषयावर संशोधन करून - त्याचंच अधिकृत नाव मेटाबोलिक थिअरी -सांगितलं की सर्व प्राणीमात्रांना त्याच्या शरीराच्या वजनाच्या प्रमाणात एकाच मापात ही प्राणशक्ती वा जीव उर्जा मिळालेली असते-अगदी एका उंदराला ही  एका हत्ती एवढीच जीव उर्जा(प्राणशक्ती) मिळालेली असते.सर्वांना एकसारख्या प्रमाणात मिळालेली ही जीव उर्जा(वा प्राणशक्ती) असते आणि कुठलाही सजीव प्राणी  त्याच्या शरीराच्या वजनाच्या प्रत्येक ग्रॅम मागे २५०० किलोज्युल्स जीव उर्जा (प्राणशक्ती) वापरू  शकतो. तर रॉय वालफोर्ड या अमेरिकन संशोधकाच्या मते इतर प्राण्यांच्या तुलनेत मनुष्यात ही जीव उर्जा दुप्पट असते. लेखकद्वयीच्या मते चयापचयाच्या गतीवर -मेटाबोलिझमच्या स्पीडवर आपली वृद्ध होण्याची,वय वाढण्याची (Ageing) प्रक्रिया अवलंबून असते.जर का आपण चयापचयाची गती कमी करू शकलो,तर आपण सावकाश वृद्ध होऊ.अनेक  anti -aging  तज्ञांच्या मते अनुकूल परिस्थितीत माणसाच्या आयुष्याची आयुर्मर्यादा १२० ते १३० वर्षे आहे.
"Extreme sports,excessive eating  and false ambition  are factors that can steal our energy,cause us to age faster and shorten our lives." असं लेखक लिहितात. एनर्जी कन्झम्प्शन  -उर्जेचा वापर हा मुख्यत्वे आपल्या लाईफ स्टाईलवर -जीवनशैलीवर अवलंबून आहे.वयाच्या  पंचविशीनंतर स्नायूंची प्रतिसाद देण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते,तिशीनंतर एजिंगची-वय वाढण्याची पहिली खूण  डोळ्यांभोवती  दिसू लागते. पस्तीशी, चाळिशी,पंचेचाळिशी,पन्नाशी या टप्प्यांवर काय काय बदल घडून येतात,तसंच ६० ते ७० या वयाच्या टप्प्यात काय काय बदल तीव्रपणे घडून येतात यावर त्यात विस्तृत विवेचन केलंय. "शाळेत शिकलेली कविता तुम्हाला जशीच्या तशी पाठ म्हणून दाखवता येते,मात्र आत्ता आपण गाडीच्या किल्ल्या कुठे ठेवल्यात,हेच बरेचदा विसरायला होतं."ते लिहितात. 

लेखक पेट्रोलवर आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांशी ,फॉर्मुला-१ गाड्यांशी मनुष्याच्या  शरीराची तुलना करतात. फॉर्मुला-१ शर्यतीत अतर्क्य वेगानं धावणाऱ्या गाड्या अवघे दीडशे किलोमीटर अंतर कापल्यावर त्यांच्या सर्व पार्टसची संपूर्ण दुरुस्ती करावी लागते अथवा ते बदलावे लागतात अथवा त्यांना मोडीत काढलं जातं. .काही माणसे  फॉर्मुला-१ शर्यतीत  असल्यासारखी विलक्षण गतीनं आपलं आयुष्य जगतात, त्याबद्दल त्यांचं समाजात कौतुक होतं,कामाच्या झपाट्यानं ते आर्थिक सुबत्ताही मिळवतात.हल्ली लहान मुले ही अशीच  फॉर्मुला-१ शर्यतीत असल्यासारखी विलक्षण गतीनं पळतात.त्यांच्या संपूर्ण दिवसाचं वेळापत्रक कामांनी गच्च भरलेलं असतं. फॉर्मुला-१ शर्यतीत असल्याप्रमाणे पळणाऱ्या  त्यांना कामाच्या ठिकाणी काय किंवा अन्य आघाड्यांवर काय,कायम पहिलं यायचं असतं.कुटुंबीय अथवा मित्रांपेक्षा आपल्या  प्रोफेशनल यशाला ते अधिक महत्व देतात.त्यांना नेहमी अचूकच असायचं  असतं, इतरांना काम विभागून देण्यापेक्षा सगळ्यावर त्यांचंच नियंत्रण असलं पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो.दिवसातला प्रत्येक क्षण हा कामात सत्कारणी लागला पाहिजे,वेळ रिकामा  दवडण्यात हशील नाही असं त्यांना वाटत असतं,त्यांच्याजवळ मुळी रिकामा वेळ नसतो.आपण आपली प्राणशक्ती-life  energy - stress -चिंता,काळजी करण्यात वाया घालवत असतो. मेन्टल स्ट्रेस मुळे फिजिकल  स्ट्रेस निर्माण होतो. लेखकांनी यावर खूप विस्तृत विवेचन दिलंय.प्राणशक्तीचा ऱ्हास करणाऱ्या energy thieves पासून कसं दूर राहता येईल,यावर ते सांगतात.उच्च रक्तदाब, मधुमेह याबद्दल त्यांनी खूपच सोप्या शब्दांत वैद्यकीय ज्ञान दिलंय पण ते इतकं सोप्पं आहे,की डॉक्टर नव्हे,आपला जवळचा मित्रच ते समजावून सांगतोय, असं वाटतं.  
हसत खेळत जगण्याचा मंत्र देणाऱ्या  "द जॉय ऑफ लेझीनेस"पुस्तकाबद्दल "द टाईम्स" नं  आपल्या रिव्ह्यू मध्ये म्हटलं आहे,की डॉक्टर एक्स्ट यांनी आजवर प्रचलित असलेल्या फिटनेस एथिक्सनाच आव्हान दिलंय.हे फिटनेस एथिक्स एका प्रचंड मोठ्या  Service Industry - सेवा उद्योगाचा आत्मा आहेत,ज्याचा प्रभाव व्यायामप्रकारांवर तर दिसतोच दिसतो पण fashion  वर पण दिसतो. धावण्याचे जोडे इत्यादींचा पुरस्कार करण्यासाठी त्यांच्या जाहिरातींवर पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो मात्र hammock (दोरखंडांपासून बनवलेला झुला ज्याच्यात आरामात तासनतास पहुडता येतं.)च्या जाहिरातींवर मात्र काहीच खर्च केला जात नाही.खरं  म्हणजे hammock -  झुला ही दीर्घ आणि निरोगी आयुष्याची  गुरुकिल्ली असू शकते. फिटनेसबद्दलच्या अनेक प्रस्थापित कल्पनांना लेखकद्वयीनं "द जॉय ऑफ लेझीनेस" मध्ये धक्के दिलेले आहेत.Pheidippides हा ग्रीक दूत ख्रिस्तपूर्व  ४०० वर्षे Marathon पासून अथेन्स पर्यंत २६.१६ मैलांचे (४१.८५ किलोमीटर)अंतर धावत गेला आणि तिथे शिरताच अतीव थकव्याने बाजारात कोसळला,गतप्राण झाला.या excessive athleticism वर बरीच चर्चा आतापावेतो झाली,अद्यापही सुरू आहे."Excercise is clearly no guarantee of good health and a long life." असं लेखक अनेक क्रीडापटुंची उदाहरणे आणि  दाखले  देऊन  सांगतात ,
Brisk Walking-धावण्यापेक्षा जलद चालण्याचा व्यायाम  आणि walking meditation
( Peripatetic  meditation )याचा ते पुरस्कार करतात.आहार ,झोप याबद्दलही सांगतात. अनेक प्रस्थापित कल्पनांना धक्का  देणारे भाष्य  करत,आस्वाद घेत,हसत खेळत,मजेत आयुष्य कसं जगायचं याचा मंत्र  "द जॉय ऑफ लेझीनेस" हे पुस्तक देतं.