Monday, January 12, 2015

अब दिल्ली दूर नही
- रश्मी घटवाई 

नवी दिल्ली ही देशाची राजधानी भलेही असेल;पण हिंदी सिनेसाम्राज्याची राजधानी अर्थातच मुंबई आहे.हिंदी सिनेसृष्टीनं "ये है बॉम्बे मेरी जान " म्हणत तिला मोठं मानाचं स्थान गाण्यांतून... अगदी चित्रपटांतूनही दिलंय."ई है बम्बई नगरिया,सोनेचांदी की डगरिया..."वगैरे तिची स्तुतीस्तोत्रे अगणित नी त्यांचं  नित्यनेमानं  पठण करणारेही अगणित!बम्बईचं स्थानमहात्म्य काय वर्णावं?बम्बईसे आलेल्या दोस्तालासुद्धा सामान्यजनांनी सलाम करावा, इतकी तिची राजमान्यता!सलाम बॉम्बे...दिल्लीला कोण पुसतं?दिल्ली का ठग...मात्र बम्बई का बाबू!बॉम्बे टू  गोवा काय, बॉम्बे टू बँकॉक काय !इथे दिल्लीतून एकदाच कधी नव्हे ते चांदनी चौक टू चायना गेले,खूप झालं! हिंदी सिनेसृष्टीत दिल्ली बिचारी  गाण्यांतूनही उपेक्षित राहिली. दिल्ली का कुतुबमिनार बघण्याचा सल्ला देणारा गीतकार लगोलग बम्बई शहर की बहार बघण्याचा आग्रह धरतो,म्हणजे बघा!
नाही म्हणायला दिल्ली का कुतुबमिनार आपल्याला प्रथम भेटतो,तो प्रेमातली आर्तता, शुचिता, पवित्रता, सहजसुंदरता,अवखळपणा,माधुर्य आणि संयम व्यक्त करीत दिल का भंवर प्यार का राग आळवतो,तेव्हा!इतके बहारदार गाणे दुसरे नसावे!सोज्वळ नूतन आणि देव आनंद,नितांतसुंदर Black &White चित्रण-देव करो नी कुणाला त्याला रंगीत करायची दुर्बुद्धी नं होवो!आणि साक्षीला कुतुबुद्दीन ऐबक आणि नंतर इल्तुत्मिश ह्यानं बांधलेला कुतुबमिनार! ४ डिसेंबर १९८१ रोजी ४५ शाळकरी विद्यार्थी त्या अरुंद पायऱ्या  उतरताना चेंगराचेंगरीत चिरडून मृत्युमुखी पडल्यानं नंतर पर्यटकांसाठी कुतुबमिनार मध्ये आत पायऱ्या चढून वर जाण्यावर प्रतिबंध घालण्यात आला.(जामा मस्जिद च्या पायऱ्याही अर्थात अशाच पद्धतीच्या आहेत.)पण ते कालसाक्षेपी गाणे त्या वास्तूचे सोने करीत त्यातले सौंदर्य उलगडून दाखवते.कुतुबमिनारा जवळचा-वर गरुड असलेला, ब्राम्ही लिपीत संस्कृत वचने कोरलेला विष्णूध्वज हा  लोहस्तंभ धातुशास्त्रातला (Metallurgy ) चमत्कार आहे.त्या लोह्स्तंभाला दोन्ही हात पाठीमागे करून विळखा घालू शकलेल्याची मनोकामना पूरी होत असल्याचा प्रवाद  जनमानसात इतकं बिंबला की घामामुळे चवथ्या शतकातल्या त्या लोह्स्तंभाला धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली, तिथे शेवटी संरक्षक चबुतरा उभारून तो वाचवण्याची खबरदारी घेतली जातेय.
तसं बघितलं तर आताआतापावेतो हिंदी सिनेमांतून जरा बेताबेतानंच  दिल्लीदर्शन घडत होतं.मात्र अचानक,जणू हिंदी चित्रपटसृष्टीला ' अब दिल्ली दूर नहीं ' असा साक्षात्कार झाला, बघताबघता अनेक हिंदी सिनेमांतून दिल्लीदर्शन  घडवण्याची लाटच आली.अलीकडच्या कितीएक सिनेमातून मग दिल्ली दिसू लागली.कुतुब मिनाराचं अल्पसं राजसदर्शन  'तेरे घर के सामने'नं  " दिल का भंवर" मध्ये घडवलं होतं ;'फना 'नं "चांद सिफारिश" गाण्यातून कुतुब मिनाराचं  समग्र दर्शन घडवलं ,कुतुब मिनाराजवळच्या त्या लोह्स्तंभाला दोन्ही हात पाठीमागे करून विळखा घालू शकलेल्याची मनोकामना पूरी होत असल्याच्या प्रवादाचा आधार घेत 'चीनी कम'नं आपला climax रंगवला.
 'अब दिल्ली दूर नहीं ' मध्ये,आईच्या खुनाबद्दल फाशीची शिक्षा झालेले  आपले वडील निर्दोष असल्याचं सांगण्यासाठी दिल्लीला थेट पंतप्रधानांकडे  निघालेला मुलगा...त्या काळच्या यमुना,दरियागंज,इंडियागेटच्या दृष्यांव्यतिरिक्त तीन मूर्ती भवनातून बाहेर निघालेले पंतप्रधान नेहरू हेही दृश्य त्यात होतं.मुलगा पंतप्रधानांना भेटतो,हा climax वास्तवदर्शी व्हावा म्हणून आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल नी त्यांच्या सरकारबद्दल लोकांच्या मनात आत्मीयता निर्माण होईल असं सांगून राज कपूरनी पंतप्रधान नेहरू ह्यांना प्रत्यक्ष काम करण्याची गळ घातली होती,त्यांनी त्याला होकार दिला होता,पण शेवटी ऐनवेळी तो योग आला नाही,असाही एक किस्सा ह्या चित्रपटाबाबत ऐकवला जातो.
देव आनंदच्या 'तेरे घर के सामने'ची स्टोरी लाईन दिल्लीतली होती.' नौ-दो-ग्यारह 'मधला देव आनंद दिल्लीत रहात असतो...तो आपला सरळ उठून ट्रक घेऊन "हम है राही प्यार के "गात इंडिया गेटवरून फतेहपुर सिक्री..आग्र्याचा ताजमहाल वगैरे गाठत मजल दरमजल करीत मुंबईत जातो.आता इंडिया गेट अनेक हिंदी सिनेमात बघायला मिळतं म्हणा!पहिल्या महायुद्धात ब्रिटीश इंडियन सैन्यातल्या ९० हजार सैनिकांनी भारतातल्या ब्रिटीश साम्राज्याच्या रक्षणासाठी आपले प्राण खर्ची घातले.त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ (Sir Edwin Lutyens ) सर एडविन ल्युटेन्सनी साकारलेलं ऑल इंडिया वॉर मेमोरियल म्हणजे इंडिया गेट.त्यावर  हौतात्म्य मिळालेल्या त्या सैनिकांची नावे कोरली आहेत. 'रंग दे बसंती' पासून  तर आता इंडिया गेटवर अन्यायाविरुद्ध 'कॅन्डल लाईट मार्च'सह मूक निदर्शने करण्याचा प्रघात पडला आहे.'नो वन किल्ड जेसिका' मध्येही असा कॅन्डल लाईट मार्च आहे. 'रंग दे बसंती'ची स्टोरीलाईन दिल्लीची होती,त्यातही एअरपोर्टवाल्या नव्या अजस्त्र फ्लायओव्हरपासून ते अनेक स्थलांचं दिल्लीदर्शन घडलं.तसंच अर्थात ओघानं 'नो वन किल्ड जेसिका' ला दिल्लीची पार्श्वभूमी होती,त्यामुळे त्यातही दिल्लीदर्शन घडलं.
.
मधल्या काळातल्या हिंदी सिनेमांपैकी बासू चटर्जी यांच्या रजनीगंधा मध्येही दिल्ली होती.(त्या सिनेमातही दिल्लीतली नायिकाही शेवटी मुंबईतच गेली. लोकांना दिल्लीत चैन पडत नव्हती की काय;कोण जाणे!) सई परांजपे यांच्या चष्मेबद्दूर सिनेमातून दिल्ली दिसली.त्याला स्टोरीलाईन दिल्लीची होती... लोधी गार्डन, बुद्ध जयंती पार्क,इंडिया गेट पण...SRCC  (श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स )चं jacket घालून फिरणारा जोमो.आताच्या बँड बाजा बारात मध्येही दिल्लीतली  कॉलेजेस आहेत...आणि हो दिल्लीतली  ही  कॉलेजेस म्हणजे मोठंच प्रस्थ आहे.म्हणजे काय,तर नाम ही काफी है!बँड बाजा बारात ह्या सिनेमाची कथाही दिल्लीत घडते आहे.
पुरानी दिल्ली-ही दिल्लीच्याच नव्हे,तर भारतभरातल्या व्यापारी जगताचा केंद्रबिंदू आहे...प्राण आहे.त्याचा पिनकोड आहे दिल्ली -६.ह्या नावाचा सिनेमा कसा त्या अजस्त्र व्यापारपेठेसारखा  भारदस्त असायला हवा होता.प्रत्यक्षात आला तो सुमार, टुक्कार चित्रपट.दिल्लीत काही वर्षांपूर्वी गूढ काला बंदर उत्पात घडवत  होता.त्याचं  रहस्य शेवटपर्यंत उलगडलं नाही,पण त्याच्यामुळे लोकांमध्ये कमालीची  घबराट पसरली होती. दिल्ली -६. नं तेही कथानक त्यात घुसडलं... कशाचाच कशाशी संबंध नाही...सुसंगत कथानकाचा पत्ता नाही.त्या दिल्ली -६ मध्ये हिंदू आणि मुस्लीम दोन्ही सुखनैव नांदतात.कहर म्हणजे,तो हिंदू-मुस्लीम सलोखा आणि सर्वधर्मसमभाव दाखवायला दिल्ली -६ च्या दिग्दर्शकानं त्यातल्या हिंदू आणि मुस्लीम पात्रांना शू करताना दाखवलं. हरे राम!दिल्ली -६ च्या दिग्दर्शकाचं धर्माबद्दलचं ते अचाट आकलन पाहून अख्खी दिल्ली-६ झीट येऊन कोसळली असेल.नंतर सावरल्यावर तिथल्याच मोठ्या कचराकुंडीत दिल्ली-६ तल्या लोकांनी ती सिनेकलाकृती टाकली असेल. अलीकडच्या सिनेमांत नाहीतरी युरीनल्स नी एकेकाला शू करताना दाखवायची नवीच प्रथा सुरु झालीये नाही?लगे रहो मुन्नाभाई असू दे,चीनी कम असू दे; नाही तर थ्री इडीयट्स...ज्याला बघावे तो आपला शू च करतोय..
   
जुन्या सिनेमांपैकी 'फिर वही दिल लाया हुं ' मध्ये दिल्ली होती.काही वर्षांपूर्वी आलेल्या ' अब आयेगा मजा' मध्ये गाण्यात दिल्लीतलं रेल म्युझियम होतं, 'मुझे कुछ कहना है'मध्ये  प्रगती मैदान होतं.पा मध्ये दिल्लीदर्शन होतं,थ्री इडीयट्स मध्ये दिल्लीदर्शन होतं.'चक दे इंडिया'लाही दिल्लीची स्टोरी लाईन असल्यानं मेजर ध्यानचंद स्टेडीयम, इंडिया गेट त्यात होतं. दिल से,दस कहानीयां,मॉन्सून वेडिंग, संडे,आहिस्ता-आहिस्ता,खोसला का घोसला , इतकंच काय,आताच्या 'दो दुनी चार','ये साली जिंदगी मध्ये दिल्लीदर्शन होतं.(गम्मत बघा -गाण्यांत म्हणू नका,सिनेमांच्या शीर्षकांमध्ये म्हणू नका... शिव्या च शिव्या ! प्रतिभा इतकी काळवंडू लागलीये?)किंबहुना, केवळ किरकोळ दृश्ये नव्हेत,वा केवळ दिल्लीचा उल्लेख,नी म्हणून त्या अनुषंगाने दिल्लीतली प्रख्यात ठिकाणे नव्हेत;तर हिंदी सिनेसृष्टीनं दिल्लीत घडणाऱ्या कथानकांना आपलंसं केलं.हिंदी सिनेमांमधून दिल्लीही आता राज्य करू लागलीये.
नावांत काय आहे म्हणता म्हणता दिल्ली का ठग अब दिल्ली दूर नहीं म्हणत न्यु देल्ही ला येऊन पोहोचला ,न्यु देल्ही टाईम्स वाचू लागला आणि बघता बघता दिल्लीची स्टोरीलाईन असलेल्या चित्रपटांना सुगीचे दिवस आले. 

बालसंगोपन:बाळाला वाढवताना … बाळाला घडवताना…

बाळाला वाढवताना … बाळाला घडवताना…  

​​(बालसंगोपनाविषयी मार्गदर्शन करणाऱ्या पुस्तकांची माहिती )  

​​-रश्मी घटवाई 
​​
आपलं बाळ सशक्त,निरोगी आणि सुंदर असावं,असं प्रत्येक आईला वाटतं.त्याला चांगला पौष्टिक आहार मिळावा,त्याची निकोप वाढ व्हावी,याची ती काळजी घेते.त्याला छान छान कपडे आणि खेळणी देऊन ती त्याचे लाड पुरवते.आपलं मूल शिकून मोठं व्हावं,त्यानं नावलौकिक मिळवावा आणि सुखी व्हावं म्हणून स्त्री आपल्या बाळासाठी खस्ता खाते,संसारातले कष्ट आनंदानं झेलते. 

जुन्या काळी एकत्र कुटुंबपद्धतीत एका घरात चार पिढ्या सहज रहात होत्या.आई -आजी -पणजी यांच्या कौतुकाच्या वर्षावात आणि संस्कारात नवी पिढी लहानाची मोठी व्हायची.त्या काळात, स्वत:च्या आणि इतरांच्या अनुभवांनी परिपक्व झालेल्या घरातल्या ज्येष्ठ स्त्रिया बाळ-बाळंतिणीच्या आरोग्याची काळजी घ्यायच्या.किरकोळ आजारांवरचे घरगुती उपचार त्यांना माहित असायचे.घराचं घरपण जपत, चांगल्या सवयींचे संस्कार घरातली वडिलधारी मंडळी घरातल्या लहान मुलांवर करीत असत . 

बघता बघता काळ बदलला.कुटुंब आकारानं लहान झालं.कुटुंबाची सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी बदलली.आज कुटुंबात एक किंवा फार तर दोन अपत्यं असतात.मुलींच्या शिक्षणालाही आता प्राधान्य मिळू लागलं आहे.स्त्री सुशिक्षित झाली की ते संपूर्ण घरच सुशिक्षित होतं. आपल्या शिक्षणाचा उपयोग करून स्त्री आता अर्थार्जन करू लागली आहे.कुटुंबाची आर्थिक जबाबदारीसुद्धा खंबीरपणे पेलू लागली आहे.त्याचप्रमाणे आपले निर्णय डोळसपणे घेऊ लागली आहे.साहजिकच आपली मुलं वाढवण्याच्या बाबतीत स्त्री आज अधिक जागरूक झाली आहे. 

पूर्वीच्या काळी बालसंगोपनशास्त्र नव्हतं आणि एक खूळ म्हणून आज ते अचानक अवतरलं आहे,असं नाही.एक तर घरात वडिलधारं कुणी नसतं!शिवाय शास्त्रीय आधार असलेल्या वैद्यकीय सल्ल्याचं पालन करणं केव्हाही चांगलं!त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं काटेकोर नियोजन करणारी आताची पिढी बालसंगोपना च्याबाबत गांभीर्यानं विचार करू लागली आहे.अपत्याच्या जन्माआधीपासून ते त्याच्या जन्मानंतरची पुढची काही वर्षं,इथपर्यंतचा बालसंगोपनाबाबत सखोल विचार करणं ही आता काळाची गरज झाली आहे.  

"दहा गुरूंपेक्षा एक आचार्य श्रेष्ठ,शंभर आचार्यांपेक्षा एक पिता श्रेष्ठ आणि हजार पित्यांपेक्षाही एक आई श्रेष्ठ",असं एक संस्कृत सुभाषित आहे.त्या आईला बालसंगोपनाविषयी सोप्या शब्दांत शास्त्रशुद्ध माहिती देणारी, नामवंत बालरोगतज्ज्ञांची अनेक पुस्तकं मराठीत उपलब्ध आहेत.आजच्या काळातल्या आधुनिक मातांनाही ही पुस्तकं मौलिक मार्गदर्शन करतात. 

शिशुसंगोपनात चिकाटी आणि संयम बाळगणं आवश्यक असतं.पण पूर्वग्रह, बालसंगोपनाविषयीचं अर्धवट पुस्तकी ज्ञान,मैत्रिणी,नातेवाईक यांचे अनुभव ऐकून मनाचा गोंधळ उडतो.तो सरावा,म्हणून 'बाळा,होऊ कशी उतराई' या पुस्तकात डॉ.संजीव कीर्तने यांनी खूप सोप्या भाषेत बालसंगोपनाचं मर्म समजावून सांगितलंय.विवाहाच्या वेळी स्त्रीचं वय १८ ते २७ वर्षं असावं,तर पुरुषाचं वय २४ ते ३० वर्षं असावं.लवकर विवाह झालेल्या जोडप्यानं बाळाचं आगमन लांबवावं;तर उशिरा विवाह झालेल्या जोडप्यानं बाळाच्या आगमनाचा निर्णय लवकर घ्यावा.पती-पत्नीचं रक्ताचं नातं नसावं.मावसभाऊ, मामेबहीण अशा रक्तानं जुळणाऱ्या नात्याच्या व्यक्तीशी लग्न झाल्यास होणाऱ्या बाळात अनुवंशिक रोग उतरण्याची शक्यता जास्त असते.गरोदरपणाचा शेवटचा महिना बाळाची उत्तम वाढ होण्याच्या दृष्टीनं महत्वाचा असतो.त्यात स्त्रीनं पूर्ण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य अनुभवलं,तर बाळ निरोगी आणि सुदृढ होतं. बाळाचं आगमन झाल्यावर त्याचा सुरुवातीचा आहार म्हणजे स्तनपान. यातून आईचं नी बाळाचं निकटचं नातं निर्माण होतं.अंगावरच्या दुधात लोहतत्वाचं प्रमाण जास्ती असतं.त्यात प्रतिकारद्रव्यं आणि 'क 'जीवनसत्त्व असतं,तसंच ते निसर्गत:च जंतुविरहीत असतं,असं त्यांनी त्यात सांगितलंय.बाळाला दूध कसं पाजावं,वरचं दूध का, कसं आणि कधी लावावं याबद्दलची माहितीपण त्यांनी खूप सोप्या शब्दांत सांगितली आहे.बाळाच्या डोळ्यांत काजळ घालू नये,कानात तेल घालू नये,बाळाला धुरी देऊ नये,या सर्वांमुळे अपायच जास्त होतो,असं त्यांनी त्यात सांगितलंय.

"अडगुलं मडगुलं,सोन्याचं कडगुलं,रुप्याचा वाळा,तान्ह्या बाळा,तीटी लावा!"असं बाळाला न्हाऊमाखू घालून झाल्यावर प्रत्येक आई कौतुकानं म्हणते. 'अडगुलं मडगुलं' हे डॉ.श्रीकांत चोरघडे यांनी लिहिलेलं पुस्तकसुद्धा अतिशय उपयुक्त माहिती देतं.अनेक सुशिक्षित मातासुद्धा नवजात शिशुला स्तनपाना ऐवजी बाटलीनं वरचं दूध देण्याचा अट्टाहास धरतात.त्याऐवजी नवजात बालकाला आईनं अंगावरचं दूध पाजणं का आवश्यक आहे हे सांगून त्यांनी त्यात स्तनपानाचं शास्त्रीय महत्व पटवून दिलं आहे.

'माझं बाळ ' या पुस्तकात डॉ.विठ्ठल प्रभू यांनी बाळाच्या जन्मापूर्वीपासून ते बाळाच्या जन्मा पर्यंतच्या घडामोडींबाबतची माहिती दिली आहे.आईचं दूध हे बाळासाठी अमृत असतं असं त्यांनी त्यात म्हटलंय.वरचं दूध,बाळाचा पूरक आहार,बाळाच्या विकासाचे टप्पे, लसीकरण, वजन,उंची, आरोग्य कार्ड या सगळ्यांची माहिती त्यांनी त्यात सोप्या शब्दांत दिली आहे.बाळाची आंघोळ, स्वच्छता,कपडे,जेवण, झोप,दांत येणे असे सगळे विषय त्यांनी त्यात सुसंगतपणे मांडले आहेत.

बारशाच्या दिवशी कौतुक,गर्दी,कुंकवाचे टिळे,नवे कपडे आणि नवजात बाळाचे घेतले जाणारे मुके या सर्वांच्या वर्षावात बाळाची आणि त्याच्या आईची विश्रांती होत नाही की धड जेवण होत नाही. हा  सोहळा शक्य तितक्या साधेपणानं करावा,असा त्यात त्यांनीमनापासून सल्ला दिला आहे.     

जेवण हादेखील बाळाचा एक खेळ असतो.जेवताना ताटलीभोवती शिते सांडल्याबद्दल बाळाला रागावू नये.बाळाला गरज असते ती प्रेमाची आणि सुरक्षिततेची.याला हात लावू नको,हे करू नको,ते करू नको,असं त्याला सतत टोकत राहू नये.बाळाच्या विकासाबाबत घाई करू नये.लहान मुलांना शिक्षा करू नये.फार तर ती सौम्य प्रकारची असावी,शारीरिक इजा होईल अशी नसावी.त्यांना शिक्षेचं कारण समजावून सांगावं. आपण चूक केली,काय चूक केली हे त्यांना त्यातून कळायला हवं.आजच्या चुकीसाठी उद्या शिक्षा करू नये.शिवाय,बाबांनी मुलाला रागवावं आणि आईनं चॉकलेट द्यावं,असं करू नये;तर आई-वडिलांच्या वागण्यात एकवाक्यता असावी. शिक्षेपेक्षा गोडीगुलाबीनं शिस्त लावता आली तर उत्तम,असं ते सांगतात.

अनेकदा मुलं आई-वडिलांना अडचणीत टाकणारे प्रश्न विचारतात आणि पालक 'मला माहीत नाही' वगैरे उत्तरं देतात. 'आई,मी कसा आलो?' वगैरे प्रश्नांवर 'देवानं दिला ' असं सांगण्याऐवजी त्यांना सोपी पण शास्त्रीय बैठक असलेली उत्तरं द्यावीत,असं ते सांगतात.व्यंग घेऊन जन्मलेल्या बाळांच्या आईवडिलांना त्या अपत्याची जबाबदारी आणि सामाजिक कुचेष्टा नी अनाहूत सल्ले अशा माऱ्याला तोंड द्यावं लागतं. त्यासाठीसुद्धा एका स्वतंत्र प्रकरणात 'माझं बाळ ' या पुस्तकात डॉ.विठ्ठल प्रभू यांनी मौलिक माहिती दिली आहे. 

पालकत्व ही प्रक्रिया डोळस असते याचा सुखद अनुभव घेणाऱ्या आईबाबांना 'आपली मुलं आणि आपण ' या पुस्तकात डॉ. मनोज भाटवडेकरांनी पालकत्वाबद्दल सोप्या शब्दांत मार्गदर्शन केलं आहे. मुलांच्या मानसिक समस्यांना 'पालक' नावाचं एक महत्वाचं परिमाण असतं.पालकांनी रंगवलेल्या समस्येच्या चित्रात एक गडद रंगाची छटा असते आणि ती असते त्यांच्या स्वत:च्या व्यक्तिमत्वाची आणि दृष्टीकोनाची.ही छटा अनेकदा मूळ समस्येच्या रंगाला झाकोळून टाकणारी असते.एकत्र कुटुंबाकडून विभक्त कुटुंबपद्धतीकडे वाटचाल करताना कुटुंबात एक दोनच मुलं असतात.ती साहजिकच पालकांच्या विश्वाच्या केंद्रस्थानी असतात.शिक्षण,नोकरी आणि त्यासाठीच्या जीवघेण्या स्पर्धेतून तावून-सुलाखून निघालेल्या दाम्पत्याला मूल पाळणाघरात किंवा नोकरांच्या भरवशावर ठेवावं लागतं , आपण आपल्या मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही ही खंत पालकांना वाटू लागते.त्या अपराधीपणाच्या भावनेतून त्या वेळेची भरपाई मग पालक मुलांना महागडी खेळणी खाऊ, कपडे वगैरे देऊन करतात.मुलांच्या वाढत्या वयाबरोबर पालकत्वही विकसित व्हायला हवं,यादृष्टीनं त्यांनी त्यात मोलाचं मार्गदर्शन केलं आहे.

'छकुलं छान गडे',हे नियती डॉ. नियती बडे-चितलीया यांचं पुस्तक,'जपणूक ' हे डॉ.उल्हास कशाळकर यांचं पुस्तक,'पान्हा' हे डॉ.सौ. सुप्रिया वसंत टिळक यांचं पुस्तक,'आपलं बाळ-बालविकासाचा ज्ञानकोश' हे प्रा. वा.शी.आपटे ,डॉ.शं.चिं.सारंगधर व डॉ.विनीता पाठक यांचं पुस्तक,ही बालसंगोपनाविषयी विस्तृत माहिती देणारी मराठीतली आणखी काही पुस्तकं.   
     
"जन्माला येणारं प्रत्येक मूल हाच संदेश घेऊन येतं की परमेश्वर अजून तरी माणसावर रुसलेला नाही. मूल म्हणजे माणसाला मिळालेली सर्वात सुंदर देणगी," असं रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटलंय.मुलं म्हणजे देवाघरची फुलं! त्या फुलांना तुम्हाला आणखी चांगलं फुलवता लं,तर तुमच्या अंगावर आनंदानी रोमांच फुलणार,की नाही!
--------------------------------------------------------------------------------------------------------
-रश्मी घटवाई