Monday, February 16, 2015

Women power:देशातली स्त्री शक्ती:प्रबळ मनुष्यबळाचा स्त्रोत

देशातली स्त्री शक्ती:प्रबळ मनुष्यबळाचा स्त्रोत  
-रश्मी घटवाई 

एक काळ असा होता की कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अर्थार्जनाची जबाबदारी पुरुषाची तर घर सांभाळण्याची जबाबदारी स्त्रीची अशी वाटणी होती.घर हे स्त्रीचं कार्यक्षेत्र होतं आणि उत्तमरीत्या ती ते सांभाळीत होती.विस्तारणाऱ्या कुटुंबाच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी,वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी सुशिक्षित महिला अर्थार्जनासाठी बाहेर पडल्या आणि आज सर्वच क्षेत्रांत त्यांचा सन्माननीय वावर होताना दिसतो आहे.तरीही अनेकविध कारणांमुळे केवळ गृहिणी म्हणून पूर्णवेळ काम करणाऱ्या महिला आपल्या देशात खूप मोठ्या संख्येनं आहेत.गृहिणी म्हणून कार्य करणाऱ्या,घर सांभाळतानाच फावल्या वेळात काही ना काही काम करून अर्थार्जन करून संसाराला हातभार लावणाऱ्या महिलांचा एक मोठा वर्ग आपल्याकडे आहे. घरात राहूनही अनेक आघाड्या सांभाळणारी ही स्त्री शक्ती खरं म्हणजे ह्यूमन रिसोर्सेसच आहे.ह्या होम मेकर्स खरं म्हणजे नेशन मेकर्स आहेत.जीडीपीमध्ये ह्या एवढ्या मोठ्या वर्गाच्या श्रमांचा,परिश्रमांचा सहभागही धरला जात  नाही.त्यांच्याकडे आजही (तसं)उपेक्षेनी(च)पाहिल्या जात असल्यामुळे आणि गृहिणींच्या अनमोल कार्याचे नेमके मूल्यांकन,मूल्यमापन होऊ शकत नसल्यामुळे त्याचं घर उभारणीतलं,राष्ट्र उभारणीतलं योगदान अनुल्लेखित रहातं. आजारपणात लहानग्याची मायेनं शुश्रुषा करणाऱ्या आईच्या श्रमांना क्वांटीफाय कसं करता येईल?पैशांत त्याची किंमत कशी ठरवता येईल?(इथे प्र.के.अत्रे यांची 'दिनूचे बिल' ही  बालकथा आठवते.) मला काही काळापूर्वीचं एक व्यंगचित्र आठवतं.ग्रामीण भागातला एक माणूस हुक्क्याचा वगैरे आस्वाद घेत बाजेवर लोळत पडलेला त्यात दाखवला होता. त्याची बायको चूल फुंकताना दाखवली होती,स्वयंपाक रांधून आजूबाजूला असलेल्या बालगोपालांना खायला घालणे,बाजूला बांधलेल्या गायीगुरांना चारा-पाणी देणे इत्यादी कामे देखील तिची विनातक्रार सुरु होती,माझी बायको काहीच काम करीत नाही, ती केवळ दोनवेळ स्वयंपाक करते,मुलांना जेवायला घालते,त्यांना हवे-नको बघते,गायी गुरांकडे बघते,त्यांना चारापाणी देणे,चरायला नेणे,गोठा स्वच्छ करणे ,घरातले केरवारे करणे, सगळ्यांचे कपडे धुणे , नदीवरून पाणी आणणे वगैरे करते;पण काम म्हणून काहीच करीत नाही,असे तो पुरुष बाजेवर लोळतच कुणाला तरी सांगतोय,असं त्या व्यंगचित्रात दाखवलं होतं.        
काही महिन्यांपूर्वीपूर्वी  भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाचा 
​​
नॅ
​शनल 
सॅम्पल सर्व्हे रिपोर्ट प्रसिद्ध झाला होता.पार्टीसिपेशन ऑफ विमेन इन स्पेसिफाइड 
​​
​​
अ‍ॅ
​क्टिव्हिटीज् ह्या नावानं 
इंग्रजीत आणि घरेलू कार्यों के साथ-साथ विनिर्दिष्ट क्रियाकलापों में महिलाओं की भागीदारी ह्या नावानं हिंदीत प्रसिद्ध झालेला हा अहवाल सरकारी असला तरी त्यात माहिती रोचकपणे दिलेली असल्यामुळे कंटाळवाणा नं ठरता फार उपयुक्त  दस्तावेज ठरावा.अखिल भारतीय स्तरावर रोजगार आणि बेरोजगारी ह्याबाबतची  
​​
नॅ
​शनल 
सॅम्पल सर्व्हे ऑफिसद्वारे  सर्वेक्षण करून दिली गेलेली आकडेवारी सरकारी आणि अन्य संस्थांसाठी, धोरणे आखण्याच्या कामी महत्वाची भूमिका बजावते.जुलै २०११ ते जून २०१२ या काळात  'रोजगार आणि बेरोजगारी' या संदर्भात केल्या गेलेल्या पाहणीवर आधारित हा सर्व्हे रिपोर्ट नॅ
​शनल 
सॅम्पल सर्व्हे ऑफिसद्वारे सप्टेंबर २०१४ मध्ये प्रसिद्ध झाला,ज्यात गृहिणी म्हणून कार्य करणाऱ्या,घर सांभाळतानाच फावल्या वेळात काही ना काही काम करून अर्थार्जन करून संसाराला हातभार लावणाऱ्या महिलांचा,त्यांच्या ह्या परि-श्रमांचा आढावा घेऊन त्याबाबतची आकडेवारी विस्तृत विश्लेषणासह दिली आहे. ह्या अहवालानुसार शहरी भागातल्या ४८% स्त्रिया पूर्णवेळ गृहिणी होत्या,त्यांपैकी ३६% स्त्रिया निव्वळ घरकाम करणाऱ्या होत्या,तर ११.६ % स्त्रिया शिवण-विणकाम वगैरे कामे करून,घरचा कर्ता  पुरुष पीठ कमवत असेल तर आपण निदान मीठ कमवावं ह्या उद्देशानं संसाराला आर्थिक हातभार लावत होत्या.ग्रामीण भागातल्या पूर्णवेळ गृहिणी असणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण ४२ %होतं ,त्यांपैकी १८.५ % स्त्रिया निव्वळ घरकाम करणाऱ्या होत्या,मात्र घर सांभाळतानाच फावल्या वेळात शिवण-टिपण,विणकाम वगैरे काम करून संसाराला हातभार लावणाऱ्या महिलांची संख्या २३. ७ %होती. १५ वर्षे वयापेक्षा अधिक वय असलेल्या शहरी भागातल्या ६४ % स्त्रिया ह्या पूर्णवेळ गृहिणी असल्याचं आणि ग्रामीण भागातल्या ६० % स्त्रिया ह्या पूर्णवेळ गृहिणी असल्याचं,त्यापैकी १५-५९ वयोगटातल्या शहरी भागातल्या   ६५. १ % तर १५-६४ वयोगटातल्या  ६५. ३ %स्त्रिया असल्याचं त्यात म्हटलं आहे. ग्रामीण भागात ह्या दोन्ही वयोगटातल्या स्त्रियांची टक्केवारी अनुक्रमे ६१. ६ आणि ६१. ४ एवढी होती  आणि ६५ वर्षे अथवा त्याहून अधिक वय असलेल्या ४१. ५ %शहरी आणि ग्रामीण भागातल्या ३७. २ % स्त्रिया पूर्णवेळ गृहिणी म्हणून  काम करीत असल्याचं ह्या सरकारी अहवालानुसार म्हणणं होतं. ही आकडेवारी किती बोलकी आहे,पहा!
कुणी कितीही हिणवलं,तरी घरकाम ही एक कधीही नं संपणारी, पूर्ण वेळ द्यावा लागणारी गोष्ट आहे.सुगृहिणी केवळ घरकाम आणि बालसंगोपनच करीत नाही,तर मुलांचा  अभ्यास घेणं,मुलांच्या शाळा-कॉलेजांची वेळापत्रके सांभाळणं,पतिराजांच्या कार्यालयाचे वेळापत्रकसांभाळणं,घरात सासूसासरे वा इतर ज्येष्ठ सदस्य असतील तर त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांच्या औषध-पाण्याचं वेळापत्रक सांभाळणं,आला-गेला,पै-पाहुण्याचं आदरातिथ्य करणं, वीज-पाणी-टेलिफोन वगैरेंची बिलं भरणं,धान्य-किराणा,भाजी-पाला आणणं आणि त्या सगळ्याची व्यवस्था बघणं,बचत,आर्थिक नियोजन करणं,त्याची अंमलबजावणी करणं अशी अनंत कामं गृहिणीसाठी तयार असतात आणि ही सगळी जबाबदारी ती मोठ्या कुशलतेनं पार पाडत असते."मनी सेव्ह्ड इज मनी अर्न
ड्"असं म्हटलं जातं.भलेही रूढार्थानं  अशिक्षित अथवा अल्पशिक्षित असेल,पण भारतीय स्त्री ही जात्याच काटकसरी असते आणि हे वचन आचरणात आणत असते,यथाशक्ती कुटुंबासाठी 'थेंबे थेंबे तळे साचवत' असते.आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातल्या,कष्टकरी स्त्रिया आधीपासूनच संसार चालवण्यासाठी कार्यरत होत्याच; मध्यमवर्गीय घरातली सुगृहिणी अष्टभुजा होऊन हसतमुखानं चटाचट घरातली कामं उरकून ,आपले छंद जोपासून वर फावल्या वेळात संसारासाठी अधिकचे चार पैसे मिळवण्यासाठी झटते आहे,ही तिच्या उद्यमशीलतेची साक्ष देणारी गोष्ट आहे. 
अनेक सुशिक्षित,उच्च शिक्षित स्त्रियांनाही,कधी मुलांकडे बघायला कोणी नाही अथवा घरातल्या ज्येष्ठ कुटुंबियांकडे बघावे लागते म्हणून,तर कधी पतिराजांच्या फिरतीच्या नोकरीपायी,पूर्णवेळ गृहिणी म्हणून घर सांभाळावे  लागते.खरे तर ह्या सुशिक्षित गृहिणी हा एक फार मोठा मनुष्यबळाचा स्त्रोत आपल्याजवळ आहे आणि राष्ट्रनिर्मितीच्या कामी ह्या मनुष्यबळाचा वापर करून घेऊन देशाच्या नेतृत्वाला मोठी उद्दिष्ट्य साधता येऊ शकतील. उदाहरणार्थ ह्यांपैकी अनेक सुशिक्षित महिलांना शिक्षण व तत्सम अनेक उपक्रमात जोडल्या जाऊ शकतं.पूर्णवेळ गृहिणी म्हणून कार्यरत असलेल्या आणि आपल्या मुलाबाळांचे अभ्यास घेऊन आणि ते इंजिनिअर -मेडिकल सारख्या उच्चशिक्षणाच्या मार्गाला लागल्यावर हाती  अतिरिक्त वेळ असलेल्या अनेक सुशिक्षित गृहिणी शहरांत आहेत. ग्रामीण भागातल्या मुलांना शिकवायला चांगले शिक्षक उपलब्ध नाहीत.मात्र माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने, टीव्ही सारख्या दृक-श्राव्य माध्यमाच्या मदतीने अशा सुशिक्षित गृहिणींकडून ग्रामीण विद्यार्थ्यांना उत्तमरीत्या दूरस्थ शिक्षण देता येईल,अनेक प्रकारचा कौशल्य-विकास साधता येईल,ग्रामीण भागात आरोग्य,स्वच्छता-हेल्थ -हायजिनचं महत्व त्यांच्याकरवी पटवून देता येईल.शहरांत आज बालगुन्हेगारी वाढीला लागली आहे.अनेक सुशिक्षित गृहिणींकडून बाल-सुधारगृहांमधल्या मार्ग चुकलेल्या त्या लहानग्यांना चांगले वळण लावण्याचे काम करवून घेता येईल,ज्येष्ठ नागरिक,कुपोषित बालके,अपंग व्यक्ती ,समाजातल्या ह्या सर्व घटकांच्या कल्याणाचे उपक्रम राबवण्याच्या कामी ह्या गृहिणींना जोडल्या जाऊ शकतं. ही यादी नं संपणारी आहे.ह्याचा दुहेरी फायदा असा,की मुलेबाळे मोठी होऊन शिक्षण-नोकरी-लग्न ह्या निमित्ताने घरातून बाहेर पडल्यावर तोवर त्यांच्यासाठी खस्ता खाणाऱ्या गृहिणीला फार एकाकी वाटू लागतं -ह्या विमनस्क अवस्थेला एम्प्टी नेस्ट सिंड्रोम म्हणतात-तो ह्या नव्यानं व्यस्त झालेल्या गृहिणींना छळणार नाही.त्याचबरोबर,इतके दिवस आपल्या घरासाठी झटणाऱ्या ह्या स्त्री शक्तीला राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात योगदान दिल्याचे आगळेवेगळे समाधानही लाभेल. 
-------------------------------------------------------------------------------------------------------------रश्मी घटवाई 
M:09871249047

1 comment:

Milind said...

रश्मीताई फारच उद्बोधक लेख आहे. तुझ्या विचारांचे अभिनंदन.