Thursday, May 26, 2016

Ill EFFECTS of SMOKING:जळो मेली ती सिगरेट!

जळो मेली ती सिगरेट!

तारीख: 19 May 2016 23:22:18

परवा सहज म्हणून टीव्हीवर चित्रपट लावला तर क्षणोक्षणी धूम्रपान स्वास्थ्य के लिये हानिकारक है, धूम्रपान से कॅन्सर होता है हा संदेश झळकू लागला. काही वेळानं तर त्या दृश्याचं प्रमाण इतकं वाढलं की सिनेमा आहे की धूम्रपानाविषयीची डॉक्युमेंटरी ह्याबद्दल मनात संभ्रम उत्पन्न झाला. कोणे एके काळी, चांगल्या सुसंस्कृत घरातली मुले माणसे व्यसनांपासून चार हात लांब असायची. सुसंस्कृत नसलेल्यांसाठीही धूम्रपान ही चोरून, लपून छपून करण्याची गोष्ट होती आणि धूम्रपान करणार्‍याच्या मनात ही अपराधी भाव असायचे. शिवाय त्याच्यावर बिघडला, वाया गेला, म्हणून संस्कारशून्यतेचा शिक्का बसायचा. विशुद्ध शाकाहारी, सुपारीच्या खांडाचेही व्यसन नसलेली सुसंस्कारी पिढी बघता बघता लुप्त झाली आणि आता हाताच्या बोटांवर मोजता येतील, असे सन्माननीय अपवाद वगळले, तर पौगंडावस्थेत असलेली मुले म्हणू नका, मोठी माणसे म्हणू नका, श्रीमंत म्हणू नका, गरीब म्हणू नका -ज्याला बघावे तो आणि तोच काय, मोठ्या संख्येत ती सुद्धा -उच्चभ्रूपणाच्या खोट्या कल्पनेच्या आहारी जाऊन सिगरेटच्या धुराची वर्तुळं सोडण्यात स्वत:ला धन्य -धन्य मानताना दिसताहेत, स्मोकिेग ऍण्ड ड्रिंकिंग हे तथाकथित स्टेटस् सिम्बॉल, उच्चभ्रू राहणीमानाचा मापदंड आणि मानदंड असल्याच्या भ्रामक समजुतीत नवतरुणाई अलगद व्यसनांच्या विळख्यात सापडली आहे. इतकी की आज शाकाहारी, सुसंस्कृत उपवर मुलींसाठी लग्नासाठी शाकाहारी, दारू-सिगरेटचं व्यसन नसलेला मुलगा शोधणं त्यांच्या पालकांसाठी अवघड झालेलं आहे आणि त्याप्रमाणे सन्माननीय अपवाद असलेले सुशिक्षित, शाकाहारी आणि निर्व्यसनी तरुण मुलांचे आईवडील, मुलांसाठी सुशिक्षित, शाकाहारी आणि निर्व्यसनी मुलीच मिळत नाहीयेत म्हणून व्यथित आहेत. पण हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाला बंदी आहे खरी; पण ती असून नसल्यासारखीच!
गुलजार यांची ‘दिल से ’ क्षमा मागून म्हणेन की जिया जले जान जले, नैनोंतले धुआ चले, धुआ चले, रातभर धुआ चले, या वर्णनाला चपखल बसेल असे वर्तन करीत, क्या कूल हैं हम या भ्रमात सिगरेटच्या धुराची वलयं हवेत उडवणार्‍या समस्त तरुणाईला कदाचित हे ठावूक नाहीये की त्या व्यसनाची परिणती अंग अंग में जलती है दर्द की चिंगारीयॉं अनुभवण्यात होईल! सिगरेट ओढण्यापायी दौलत और जवानी इक दिन खो जाती है याचा प्रत्यय येईल! हर फिक्र को धुए में उडाता चला गया, असे म्हणत बेफिकीरीने वागणार्‍याला पुढे त्याच्याच बर्बादीयोंका जश्‍न मनवावा लागेल!
३१ मे रोजी जगभर नो टोबॅको डे साजरा केला जातो. ओरल हेल्थ हे इंडियन डेण्टल असोसिएशन प्रकाशित करीत असलेलं नियतकालिक. त्यांचा मे २०१५ चा विशेषांक ह्याच विषयाला वाहिलेला असल्यानं अर्थातच सिगरेट ओढण्यापायी होणारे दुष्परिणाम, तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम यावर त्यात विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे. त्यांच्या मते जगात आज ११० करोड (१.१  billion ) लोक सिगरेट ओढ्तात, २०२५ साली ही संख्या १६० करोड (१.६ billion )झालेली असेल. एकट्या चीनमध्ये ३० करोड लोक दर मिनिटाला ३० लाख, वर्षाला (१.७ trillion ) (एकावर बारा शून्य)- एवढ्या सिगरेटी ओढतात. सबंध जगात दर मिनिटाला एक करोड तर दररोज १५ अब्ज सिगरेटी ओढल्या जातात. आकडेवारी किती किळसवाणी आणि लाजिरवाणी आहे बघा! कारण कॅन्सर आणि मृत्यू ही त्याची निश्‍चित परिणती आहे! शिकलेली माणसेही धूम्रपान करतात, मग त्यांना शिक्षित तरी का आणि कशाच्या आधारावर मानायचं? सिगरेटच्या धुरामध्ये निकोटिन, टार, फॉर्मल्डीहाईड, बेन्झिन, आर्सेनिक, कॅडमियम, पोलोनियम, क्रोमियम, कार्बन मोनॉक्साइड ही, ज्यांच्यामुळे कॅन्सर होतो, अशी ६९ घातक रसायने आणि त्याशिवाय आणखी, अशी एकूण ४००० पेक्षाही घातक रसायने असतात. निकोटिनमुळे addiction-सिगरेटची सवय लागते. एका सिगरेटमध्ये ८ ते ९ मिलीग्राम निकोटिन असतं. (सिगार मध्ये १०० ते २०० मिलीग्राम, काहींमध्ये चक्क ४०० मिलीग्राम ) एकत्रितपणे ४-५ सिगरेट मधलं निकोटिन मनुष्याला यमसदनी धाडण्यास पुरेसं असतं. बेन्झिनमुळेacute myeloid  luekemia होतो. तंबाखू सेवनामुळे आणि धूम्रपानामुळे कॅन्सर होतो. जगात तंबाखू सेवनामुळे वा धूम्रपानामुळे दर आठव्या सेकंदाला एक आणि वर्षाला ५० लाख लोक मृत्युमुखी पडतात. भारतात ४० टक्के कॅन्सर तंबाखू सेवनामुळे आणि धूम्रपानामुळे होतो. भारतात दरवर्षी १० लाख लोकांना कॅन्सर असल्याचं निदान होतं -अधिकतम आकडा २५ लाख आहे, त्यापैकी सहा ते सात लाख कॅन्सरग्रस्त लोक दरवर्षी मृत्युमुखी पडतात. मोठ्या माणसांच्या मृत्यूच्या आकडेवारीकडे पाहिलं, तर ६ टक्के मृत्यू कॅन्सरमुळे होतात, तेही ३० ते ६९ या वयात. त्यातही पुरुषांमध्ये फुफ्फुसाचा आणि तोंडाचा कॅन्सर होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे, तर स्त्रियांमध्ये स्तनांचा कर्करोग आणि गर्भाशय-ग्रीवेचा कर्करोग होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे, असं ते जर्नल सांगतं.
काही दिवसांपूर्वी मी दिल्लीत दोन नाटकं लिहून दिग्दर्शित करून प्रस्तुत केली, त्यांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरने पीडित असलेल्या, औषधोपचार सुरू असलेल्या १५ रुग्ण स्त्रियांनी अभिनय केला. (अशा प्रकारचा हा कदाचित पहिलाच प्रयोग असावा! हा पुन्हा स्वतंत्र लेखाचा विषय!) त्यांच्या तालमी दरम्यान त्यांच्या व्यथा मी जवळून पहिल्या. त्या सर्वांच्या मते कॅन्सर हा रोग रुग्णाला आपलं तन-मन-धन अर्पण करायला लावतो- त्यातही धन अधिक!
म्हणजे बघा, तथाकथित उच्चभ्रू हे विशेषण मिरवण्यासाठी धूम्रपान करणारा आधी सिगरेटवर आपला पैसा उधळतो, सिगरेट बनवणार्‍या कंपन्यांना श्रीमंत करतो, नंतर कॅन्सर झाल्यावर लाखो रुपये औषधोपचारांवर, हॉस्पिटलवर उधळतो आणि हॉस्पिटल्सना, डॉक्टरांना श्रीमंत करतो! सारासार विवेकबुद्धी जागृत असलेला कुठला मनुष्य असले आतबट्‌ट्याचे व्यवहार करील?
सिगरेटच्या धुरामध्ये सिगरेट ओढणार्‍याच्या वाट्याला कॅन्सर येतो, अशी ६९ घातक रसायने येत असतील; तर सिगरेट न ओढताही त्याच्या बाजूला नुसते उभे राहूनसुद्धा, त्या धुरामध्ये, कॅन्सर होतो, अशी ५० घातक रसायने-त्यातली ११ ग्रूप १ कॅर्सिनोजेन-कॅन्सर होण्यास तीव्रपणे कारणीभूत ठरणारी - या सदरात मोडतात, वाट्याला येतील. ओढल्या जाणार्‍या सिगरेटपेक्षाही (Mainstream smoke ) अधिक प्रमाणात टॉक्झिन्स, विषारी द्रव्य जळत्या सिगरेटच्या धुरात असतात, तो धूर चौपट विषारी असतो. पावसाळ्या-हिवाळ्यात जेव्हा हवा स्थिर असते आणि तेव्हाच धूम्रपान करणारे खूप जास्त प्रमाणात धूम्रपान करीत असतात, अशा वेळी हवेत ही घातक रसायनं दीर्घकाळ राहातात, साहजिकच अनेकांना श्‍वसनाचे विकार जाणवतात. प्रखर उन्हात तर हवेतले अनेक प्रदूषणकारी घटक (Primary Pollutants)आपसांत संयोग पावून आणखी नवे विषारी पदार्थ Secondary Pollutants) निर्माण करतात. पर्यावरणाच्या दृष्टीने तर ते खूपच घातक आहे.
सिगरेट ओढणार्‍याच्या नुसते बाजूला अथवा जवळपास उभे राहणे -त्याला पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात -हे पॅसिव्ह स्मोकिंग किंवा अप्रत्यक्ष धूम्रपान तर भयंकर वाईट! प्रत्यक्ष सिगरेट ओढणार्‍याच्या आयुष्यातली दहा मिनिटं जर प्रत्येक सिगरेटगणिक कमी होत असतील, तर अप्रत्यक्ष धूम्रपानाचा त्रास सहन करणार्‍याच्या आयुष्यातली किमान पाच मिनिटं तरी कमी व्हावीत! धूम्रपान न करणार्‍या व्यक्तीलाही अप्रत्यक्ष धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचा धोका उदभवू शकतो, श्‍वसन मार्गाचे विकार, हृदयविकार आणि अन्य आजार होऊ शकतात. मोठ्यांची ही गत; तर घरातल्या पाळीव प्राण्यांना आणि लहान मुलांना सिगरेट ओढणार्‍या वडीलधार्‍यांमुळे अप्रत्यक्ष धूम्रपानाचा किती त्रास होत असेल, याची कल्पनाच केलेली बरी! त्यांना अस्थमा, श्‍वसन मार्गाचे विकार, अशा समस्यांना सामोरे जावे लागते, वाढीच्या काळात अनेक घातक रसायने अप्रत्यक्षरीत्या धुरातून शरीरात गेल्याने मेंदूची वाढ, शारीरिक वाढ खुंटते. न जन्मलेल्या बालकांवर तर कित्येक अधिक पटीने ह्या रसायनांचा घातक परिणाम होतो. आज स्ट्रेस, कामाचा ताण किंवा निव्वळ सवयीपोटी धूम्रपान करणारे भावी वडील, आपल्या पुढच्या पिढीनी थेट आयआयटीतच प्रवेश घेतला पाहिजे असं स्वप्न बघतात, तेव्हा आपण स्वत: त्यात अंशत: खोडा घालण्याचं महापातक आताच करतो आहे, हे त्यांच्या गावीही नसतं! भारतात आता तर मुलेच काय, मुलीही आपल्या प्रगत असण्याचं द्योतक मानून मोठ्या हौसेनी अपेयपान आणि धूम्रपान करू लागल्याहेत-कदाचित त्यांच्यालेखी स्त्रीमुक्ती, स्त्री पुरुष समानता वगैरे हेच (एकमेव) असावे! त्याची परिणती म्हणजे भारतात ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाचा कॅन्सर होण्याच्या प्रमाणामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी! बीजच जर खराब असेल तर त्यातून चांगले सकस वाण कसे निपजणार? आणि आई -वडील दोघेही अपेयपान आणि धूम्रपान करणारे म्हटल्यावर पुढच्या पिढ्या कशा असतील, संस्कारांची परिभाषा काय (उरलेली) असेल,याचा विचार न केलेलाच बरा!
समाजाच्या भल्याचे एक व्रत म्हणून, मी रिक्षा, ऑटोरिक्षा चालक जर धूम्रपान करीत असेल किंवा तंबाखू सेवन करीत असेल तर आवर्जून त्यांना त्याचे दुष्परिणाम समजवून सांगते आणि तेही प्रामाणिकपणे सांगतात, की आम्हाला हे माहीतच नव्हतं! आता यापुढे आम्ही नाही धूम्रपान करणार! जानेवारी महिन्यात नोएडामध्ये आमच्या भारत पेट्रोलियम हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये काम करणार्‍या सुमारे १५-२० सफाई कर्मचार्‍यांना मी धूम्रपान आणि मद्यपानाचे दुष्परिणाम समजावून सांगितले तेव्हा त्यांनी आपल्या मुलाबाळांची शपथ घेऊन धूम्रपान आणि मद्यपान सोडल्याचं जाहीर केलं. मग मी त्यांच्यासाठी एक नाटक लिहिलं, दिग्दर्शित केलं आणि त्यात त्या १५-२० सफाई कर्मचार्‍यांनी -ज्यांनी कधी नाटकात काम केलं नव्हतं, कित्येक तर अशिक्षित होते आणि निव्वळ ऐकूनच त्यांनी आपले संवाद पाठ केले होते, त्यांनी अतिशय सरस अभिनय करीत भारत पेट्रोलियमच्या चाळिसाव्या वर्धापन दिनानिमित्त नोएडामध्ये झालेल्या मोठ्या कार्यक्रमात प्रेक्षकांना धूम्रपान, तंबाखू सेवन, मद्यपान यांचे दुष्परिणाम सांगून व्यसनमुक्तीसाठी जहां चाह है, वहां राह है अशी ग्वाही दिली. आता आपापलं काम सांभाळून मी आणि आमचे हे सफाई कर्मचारी नोएडामध्ये धूम्रपान, तंबाखू सेवन, मद्यपान यांचे दुष्परिणाम समजावून सांगत ते नाटक प्रस्तुत करणार आहोत!
एवढे सगळे वाचून एखाद्याने (एखादीने पण ) जरी जळो मेली ती सिगरेट! (खरं म्हणजे न जळो ) म्हणत हातातली जळती सिगरेट विझवली आणि त्या विषापासून स्वत:ला नी इतरांना दूर ठेवण्याचा संकल्प केला, तरी भरून पावले, असं समजेन!
You Tube links:
जहां चाह है, वहां राह है नाटक सादर करताना सफाई कर्मचारी.
- रश्मी घटवाई



No comments: