Monday, September 19, 2016

पाहुणे येता घरां ... 
-रश्मी घटवाई

घरी पाहुणे येणं किंवा आपण कुणाकडे पाहुणे म्हणून जाणं ही आपल्या देशात तरी नित्य घडणारी आणि सर्वांच्या अंगवळणी पडलेली गोष्ट आहे."अतिथी देवो भव "असं भारतीय संस्कृती मानते.अतिथी म्हणजे पाहुणा,हा देवासमान मानून त्याचे आगतस्वागत करण्याची आपली परंपरा आहे.आपल्या महाराष्ट्रात "साधू-संत येती घरां,तोचि दिवाळी दसरा " म्हणजे साधुसंतांची पायधूळ घरात झडणे,हे सण-उत्सवासमान मानले गेले आहे!त्याही पलीकडे जाऊन बघितलं,तर एकूणच आपल्या देशात पाहुणे म्हणून जाण्याची नाहीतर पाहुणे म्हणून आलेल्यांचे यथायोग्य आदरातिथ्य करण्याची प्रथा आहे. खेडी,गावं,शहरं,यांपैकी कुठेही रहाणाऱ्या,कुठल्याही धर्म,जात या प्रकारात मोडणाऱ्या मनुष्य नावाच्या प्राण्याला"मेहमान नवाज़ी" हा प्रकार तितकाच प्रिय आहे ."ते ?ते आमचे कुणीही नव्हेत !"असे झुरळ झटकून टाकल्यागत वागणारी जमात सोडल्यास सर्वसामान्यांना "आऊचा काऊ ,तो आमचा भाऊ"याच न्यायानं वागायला आवडतं. "अमुक अमुक प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे आमच्या आतेभावाच्या चुलतभावाचा मावसभाऊ"किंवा " ही शारदा म्हणजे कमल ताईंच्या नणंदेच्या नणंदेची नणंद "असे उल्लेख झाले की लांबची नातीपण जवळची वाटू लागतात."आपण जेवूनच आला असाल ,पुढच्या वेळी आलात की चहा घेऊनच जा!बसा!मी हा आलोच!"असे म्हणत पाहुण्यांना दिवाणखान्यात बसवून आत जाऊन चहा पिऊन येणाऱ्या मंडळींची अन्यत्र कोठेही शाखा नसते.उर्वरित जनसामान्यांना असल्या तऱ्हेवाईक स्वागताची परंपरा लाभली नसल्याने आलेल्या पाहुण्यांना चहा देण्यात कुणालाच वावगे वाटत नाही;मग भले तो पाहुण्यांचा दिवसभरातला चवथा-पाचवा आणि यजमानाचा तिसरा -चवथा चहा का असेना !"इथे जोशी राहत नाहीत.वेळी-अवेळी दारावरची घंटी वाजवून चौकशी करू  नये",अशी दटावणी असलेल्या पाट्या नं लावता उर्वरित जनसामान्यांना जोशी कुठे रहातात याची चौकशी करीत आलेल्या त्यांच्या प्रत्येक पाहुण्याला यथायोग्य मार्गदर्शन करण्याची नैतिक जबाबदारी आपली असल्याचे वाटत असल्याने वेळप्रसंगी पाहुण्याला जोशींच्या घरापर्यंत सोडून यायलापण आवडते."जोशी ना ....पयले एक बड़ा पेड़ गिरेंगा ..फिर एक बड़ी बिल्डिंग गिरेंगी,उसके बाद एक फ्लायओव्हर गिरेंगा,उसके पयलेकाच मकान !"असे अगदी मोटरसायकलवरचा मराठी स्वारसुद्धा थांबून,वाकडी मान करून  मान आणि उजवा खांदा यात धरलेल्या मोबाईलवरचे बोलणे थांबवून मराठी पाहुण्यांना हिंदीत नेमके दिशादर्शन करतो,तर  "उंह जोशीजी अब उंहा नहीं रहते हैं.उंहा तो बहुतेही तकलीफ थी ,तो  उंह परली गली में ,जो है ,चले गए हैं !"असे बिहारी लहेज्यात ऐकवत एखादा कोपऱ्यावरचा रामसरन कपड्यांना इस्त्री करता करता मौलिक माहिती पुरवत जोश्यांकडच्या पाहुण्यांना नेमके ठिकाण समजावून सांगतो.

गावाकडे वगैरे,घराच्या छपरावर  कावळा ओरडू लागला की पाहुणे येण्याचा शकुन तो सांगतोय,असं मानलं जातं.कोणे एके काळी,एकत्र कुटुंब असण्याच्या काळात वेळी अवेळी कितीही पाहुणे आले,तरी त्यांचे उत्तम स्वागत होत असे!.किंबहुना पूर्वी घरात केव्हाही बघा,एक-दोन पाहुणे असत!तिथी नं सांगता येतो , तो अतिथी!पण हे तिथी नं सांगता कुणाकडे अचानक जाणं वगैरे सगळं गावांत,लहान शहरातच आता शक्य होऊ शकतं,जिथे  यजमानांच्या घरापासून ते ऑफिस वा कामाच्या ठिकाणापर्यंतचं अंतर कमी असतं,घरच्या गृहिणीला घरकाम,स्वयंपाक इत्यादी गोष्टींत मदत करण्यासाठी हाताखाली नोकर वा कुटुंबातले इतर सदस्य असतात. 

महानगरांचं तसं नाही!इथल्या गृहिणीला गाव अथवा लहान  शहरातल्याप्रमाणे  घरकाम,स्वयंपाक इत्यादी गोष्टींत मदत करण्यासाठी हाताखाली नोकर वा कुटुंबातले इतर सदस्य उपलब्ध असतील असे नाही.तिथी नं सांगता येतो,तो अतिथी,हे समीकरण महानगरांत चालू शकत नाही .महानगरं घड्याळाच्या काट्यांवर धावतांत,भावनांवर नाही,तर प्रोफेशनलिझम- व्यावसायिक दृष्टिकोनावर चालतात.गॅस,वीज जाणं ,परिणामी त्यांवर चालणारी उपकरणं नं चालल्यामुळे रोजचं काम आणि जगणं कष्टप्रद होतं,अंतरं खूप असल्यामुळे साध्यासाध्या गोष्टी पण कठीण वाटतात.महानगरांमधल्या नवीन वस्त्यांमध्ये जीवनावश्यक गोष्टीसुद्धा जवळ मिळत नसल्यानं शारीरिक,मानसिक त्रास होतो,त्यामुळे पाहुण्यांच्या सरबराईची,पाहुणचाराची पद्धत सुद्धा बदलू शकते.घरचं सर्व आवरून स्वयंपाक,नवऱ्याचा,स्वतःचा नि मुलांचे डबे भरून, तयार होऊन, इतके वाजून इतकं मिनिटं आणि इतके सेकंदांची लोकल ट्रेन पकडून ऑफिसमध्ये जायचं ,अशी दुहेरी कसरत करणाऱ्या महिलांच्या वेळापत्रकात इच्छा असली तरी पाहुण्यांची सरबराई त्या कशा बसवू शकतील ! मुंबईत काही वर्षांपूर्वी लग्नाच्या रिसेप्शनला केवळ आईस्क्रीम असायचं! वेळेचा,जागेचा अभाव;त्याचमुळे या मॅग्झीमम् सिटीच्या शिष्टाचारात पाहुणचार मिनिमम,आवश्यक तेव्हढा असतो.                  
 
बिरबलाच्या दिल्लीत तर कावळेही पाहुणे म्हणून येतात किंवा जातात,असं बिरबलानीच अकबर बादशहाला सांगितलं होतं,त्या महानगरात "पाहुणे येता घरां,तोचि दिवाळी  दसरा "असे नवे समीकरण झाले आहे.तर महानगरांत सुद्धा गोडाचे पदार्थ,नवे कपडे हे आता केव्हाही उपलब्ध असल्याने  दसरा दिवाळी तर आता रोजच साजरी केली जाऊ लागलीये.अगदी ऋण काढूनसुद्धा सण साजरे केले जाताहेत!फार कशाला,उच्चभ्रू लोकांच्या वर्तुळात छोटंसंही निमित्त झालं की ते साजरं करण्यासाठी नित्य सोहोळे आयोजित केले जाताहेत,त्याला आमंत्रित केल्या जाणाऱ्या पाहुण्यांची यादीही अर्थात भलीमोठी !पाहुणचाराची  रीतही तितकीच भपकेबाज!मुळातच उत्तर भारतात आग्रह करकरून पाहुणचार केला जातो  !

मुंबई आणि दिल्ली ही दोन्ही सर्वस्वी भिन्न प्रकृती असलेली शहरं.आहेत.दोन्ही ठिकाणच्या लोकांची मानसिकता,आचार-विचार,रहनसहन,खाणेपिणे पार वेगळे आहेत.आगत-स्वागताच्या पद्धतीत जमीन-आसमानाचा फरक आहे.दिल्लीत अभ्यागताला आत बसवून प्रथम पाणी दिलं जातं-मग तो सर्वस्वी अनोळखी का असेना! कुणाला आल्यावर पाणीही नं विचारणे हा उत्तर भारताचा धर्म नाहीं. पाठोपाठ चाय-नाश्ता-त्यात किमान नमकीन व बिस्किटे -विपन्नावस्थेतला मनुष्य सुद्धा किमान एवढे आदरातिथ्य करतोच करतोआणि घरी आलेल्याला आग्रह करकरून जेवायला घालायची उत्तर भारताची पद्धत आहे-जेवायला नं घालता सहसा कोणाला पाठवलं जात नाहीं. "आता जेवूनच आला असाल...पुढच्या वेळी आलात की चहा घेऊनच जा" असला दळभद्री क्षुद्रपणा इथे नसतो.किंबहुना असल्या विचारांच्या नरपुंगवांना इथे कायमचं वाळीत टाकलं जाईल.अगदी आजच्या काळातही चारसहा शेजाऱ्यांचे एकमेकांकडे अघलपघळ बोलणे-जाणेयेणे,घरात काही चांगला पदार्थ केल्यावर शेजार-पाजारच्या दोन-तीन घरांत तो देणे वगैरे इथे सुखेनैव चालते.हिंदी सिनेमातली त्यागमूर्ती आई क्लास/युनिव्हर्सिटी इथे पहिल्या आलेल्या आपल्या मुलाला जो पदार्थ मोठ्या कौतुकाने  आणि प्रेमभराने खाऊ घालते तो गाजराचा हलवा हा उत्तर भारतात मोठ्या अपूर्वाईनं करायचा पदार्थ आहे.तो खूप करायचा,आणि शेजारी-पाजारी,अभ्यागतांना सगळ्यांना द्यायचा !तीच गोष्ट थंडीच्या दिवसांत केल्या जाणाऱ्या 'सरसोंका साग-मक्के की रोटी ' या पदार्थाची !तो एव्हढासाच करायचा प्रकार नोहे!    

अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट!पर्यावरण दिन आणि  वटपौर्णिमा एकाच दिवशी आल्याचे औचित्य साधून महाराष्ट्रातल्या एका लहान गावात पर्यावरणावर प्रबोधनपर कार्यक्रम करायला म्हणून मी एका स्नेह्यांबरोबर गेले होते,तेव्हा गावातल्या एका माऊलीनं,त्यांच्या  शेतातली वांगी तोडून छान चुलीवरची गरमगरम भाजी-भाकरी खाऊ घातली होती.आम्ही बरेच लोक होतो,तरीही काही शेजारणींच्या मदतीनं त्या माऊलीनं सहज इतक्या जणांचा स्वयंपाक केला होता.बोलता बोलता गावातल्या एका तरुणानं सांगितलं ,की तो अशाच एका प्रबोधनपर कार्यक्रमाच्या निमीत्तानं मुंबईला कुणा बाईंकडे गेला होता , तेव्हा त्यांच्याकडे पाहुणचार झाला तो कपभर चहा आणि चार बिस्किटं असा!तेव्हा पाहुणचार हा व्यक्तिसापेक्ष असण्यापेक्षा स्थलसापेक्ष आहे,हे मला उमगलं !मला आठवला एक प्रसंग ,जेव्हा दिल्लीत माझ्या लेखाच्या खालचा माझा पत्ता वाचून महाराष्ट्रातल्या एक तरुण कलाकार बाई आपल्या सातवी आठवीतल्या मुलाला घेऊन अवचित माझ्याकडे आल्या आणि मी तुमच्याकडे आठ दिवस राहिले तर चालेल ना,विचारू लागल्या.!त्यांच्या आंघोळी,नाश्ते सगळं झकास विलम्बलयीत सुरू होतं ,आम्ही आणि आमचं महानगर अतिद्रुतलयीत धावत होतं. त्यांचं सर्व  नीट आटोपल्यावर सन्मानानं मी त्यांना अन्यत्र पोहोचतं केलं !त्यांच्या प्रश्नावर माझी मान होकारार्थी हलतेय की  नकारार्थी  हे मला तेव्हा कळलं नव्हतं !आताही नाही!पाहुणचार हा व्यक्तिसापेक्ष असण्यापेक्षा स्थलसापेक्ष आहे हे मात्र महानगर निवासी म्हणून मला पुरतं आकळलं आहे!
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------रश्मी घटवाई 
०९८७१२४९०४७

No comments: