Thursday, May 17, 2012


तो आला...त्यानं पाहिलं...त्यानं जिंकलं.
                                     
                                                                             -रश्मी घटवाई 

चित्रपट समजायला भाषेचे अडसर नसतात,ते किती खरं आहे,हे अनेक अमराठी प्रेक्षकांनी  दिल्लीमध्ये २०११ सालच्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात,पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपटांना हजेरी लावून आणि त्या चित्रपटांचं रसास्वादन करून सिद्ध केलं.
दिल्लीमध्ये काही महिन्यांपूर्वी  २०११ सालचा राष्ट्रीय चित्रपट महोत्सव-National Film Festival झाला होता. भारत सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधीनस्थ  डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिवल्सनं  आयोजित केलेल्या या चित्रपट महोत्सवात  २०१० चे पुरस्कारप्राप्त चित्रपट दाखवण्यात आले होते.२०१० सालच्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणाही मे महिन्यात करण्यात आली होती.या महोत्सवात जे पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपट  दाखवण्यात आले,त्यातले दोन मराठी चित्रपट अमराठी व्यक्तींनी दिग्दर्शित केले होते आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे मराठी चित्रपटांना अमराठी प्रेक्षक बहुसंख्येनं उपस्थित होते. 

चित्रपट हा माझा प्रांत नाही.पण मराठी चित्रपट एरवी दिल्लीत बघायला मिळत नाहीत म्हणून मग मी तिथे गेले होते.राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवले जाणारे चित्रपटही हृदयाला भिडणाऱ्या आणि विचारमंथनाला प्रवृत्त करणाऱ्या विषयाभोवती केंद्रित असल्यामुळे तिथल्या सुजाण,दर्दी प्रेक्षकांनी चित्रपट संपताच घरची वाट धरली नाही,तर उलट आपसात चर्चा केली,आपापल्या परीनं चित्रपटाची समीक्षा केली,"बाबू बॅंड बाजा " ह्या चित्रपटानंतर तर अनेक प्रेक्षकांनी आपापले अनुभव सांगत,त्यातल्या व्यक्तिरेखांमध्ये नी प्रसंगांमध्ये आपल्या जीवनातल्या व्यक्तींशी नी प्रसंगांशी साम्य शोधत,आवर्जून उपस्थित असलेल्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांशी जाहीर संवाद साधला.तो इतका हृद्य होता की त्याचं रसास्वादन दूरस्थ वाचकांना घडावं,म्हणून हा लेख प्रपंच.
  
जग्गू ह्या बॅंड पार्टीच्या मालकाला परिस्थितीपायी आपला बॅंड नी इतर वाद्ये गहाण टाकावी लागली आहेत,हाती हलगी धरावी लागली आहे.गावात  जन्म-मृत्यू घडल्यावर हलगी वाजवून कसाबसा आपला उदरनिर्वाह करण्यात त्याचं मन रमत नाहीये.त्याला आस लागलीय,ती आपली ती वाद्ये सोडवून पुन्हा एकदा  दमदार बॅंड पार्टी स्थापन करायची.तिचं नावही त्यानं ठरवून ठेवलंय- बाबू बॅंड बाजा ! बाबू ह्या आपल्या लेकानं शिक्षणाच्या मागे जाण्याऐवजी आपल्याबरोबर खुळखुळा वाजवावा नी चार पैसे मिळवायला लागावे असा त्याचा आग्रह आहे,तर त्याच्या बायकोला-शिरमीला- बाबूनं खूप शिकावं अशी तळमळ लागलीय.ती लेकाच्या शिक्षणासाठी यथाशक्ती तजवीज करण्यासाठी जिवाचं रान करतेय,पडतील ते कष्ट झेलतेय.जणू लेकाच्या रूपानं तिची अतृप्त राहिलेली शिकायची इच्छा ती पुरी करतेय.मात्र गरीब असले तरी ते लाचार नाहीयेत.गरीबीतही माणुसकी जपत,जे काही हाती आहे त्या बळावर नाकाच्या सरळ रेषेत चालत,इतरांच्या लेखी नगण्य असू शकेल इतकं अतिसामान्य आयुष्य ते सारे जगताहेत.त्या अतिसामान्य जीवनातला त्यांचा तो संघर्ष नी परिस्थितीशी जुळवून घेत केलेली वाटचाल मात्र मुळीच क्षुद्र नाहीये.मुळात जग्गूचं नी त्याच्या कुटुंबाचं विश्व ते केवढं !परीघ तो केवढा!पण संकटांची छोटी-छोटी वर्तूळं त्यांच्याभोवती सदोदित मोठं रिंगण धरतात. जग्गूच्या नी त्या सर्वांच्या आयुष्याच्या इवल्या-इवल्याश्या डोहांत अडचणींचे अनंत छोटे छोटे भोवरे कमालीची उलथापालथ घडवतात.पुढे जे जे घडत जातं,ते सारं बघताना प्रेक्षक कमालीचा सुन्न होतो.बॅंड किंवा हलगी वाजवणारा, त्याचं कुटुंब ह्या साऱ्या व्यक्तिरेखा तशा प्रातिनिधिक.त्यांच्या माध्यमातून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतल्या- कुठलंही अन्य छोटं-मोठं काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या अतिसामान्य व्यक्तीसमूहाच्या असामान्य जीवनसंघर्षाचं आणि भावविश्वाचं  अत्यंत हृदयस्पर्शी चित्रण 'बाबू बॅंड बाजा' या चित्रपटात घडलंय. बँड वाजवण्याचं काम पारंपारिकपणे ज्या समाजात केलं जातं,त्याचं जातीनिहाय चित्रण-एवढच काय-उल्लेख ही नं करता हा व्यक्तिनिहाय जीवनसंघर्ष चित्रपटाला आगळं-वेगळं परिमाण देतो,माणूस म्हणून त्या बँडवाल्याकडे बघण्याचं,त्याचं जीवन जवळून बघण्याचं परिप्रेक्ष्य (perspective )देतो.चित्रपटात घडणाऱ्या सगळ्या घटना इतक्या परिचयाच्या आणि अवतीभवती सहज घडणाऱ्या असतात,की त्या सगळ्याचा आपणही एक घटक होतो.चित्रपट आणि प्रेक्षक ह्या दोन वेगळ्या वेगळ्या entities च उरत नाहीत.तो  द्वैतभाव नष्ट होतो नी दोन्ही एकाकार होतात.   
 
चित्रपट संपल्यावर दिग्दर्शक आणि प्रेक्षक यांच्यांतल्या जाहीर संवादात भाग घेताना प्रेक्षकांतला एक युवक सांगू लागला- त्याचं आयुष्य मुंबईतल्या लोखंडवाला या उच्चभ्रूंच्या वस्तीत गेलं, तरीही बाबूच्या व्यक्तिरेखेत त्याला स्वत: तो कुठेतरी दिसला.एवढ्यातच तो दिल्लीतल्या मेडिकल कॉलेजमधून पदवीधर झाला,(हेसुद्धा त्यानं कमालीच्या विनयानं सांगितलं.)आपल्याजवळ असलेलं  हे backpack हे आयुष्यात पहिल्यांदाच नवंकोरं मिळालंय,तेही आत्ता मिळालेल्या स्टायपेंडच्या पैशातून विकत घेतलंय.अन्यथा आतापावेतो सगळ्या गोष्टी इतरांनी वापर्लेल्याच वापरलेल्या आहेत.त्यामुळे बाबूशी तो चटकन 'कनेक्ट'झाला असल्याचं त्यानं सांगितलं. इतर अनेक प्रेक्षकांचं  मनोगतसुद्धा भावपूर्ण होतं.चित्रपट समजायला भाषेची अडचण येत नाही असं एकजात साऱ्या अमराठी प्रेक्षकांनी सांगितलं.चित्रपट हा स्वत:च भाषा होतो! 

मुळात हे सगळं इतकं तरलपणे नी प्रभावीपणे मांडणारे दिग्दर्शक राजेश पिंजानी हे सिंधी आहेत.त्यातून 'बाबू बँड बाजा' हा त्यांचा पहिलाच चित्रपट.त्यांच्या चित्रपट पदार्पणाला राष्ट्रीय पुरस्कार(Best Debut Film) , सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- Best Actress आणि सर्वोत्कृष्ट बालकलाकार- Best Child Artist  असे तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळालेत.त्यांतून प्रेक्षकांशी संवाद साधताना त्यांच्यातला विनम्रपणा,सुसंस्कृतपणा दृगोचर होत होता-तो असा मारून मुटकून वा कृत्रिमपणे आणता येत नाही.शिवाय काय,की अवघ्या एकदोन वाक्यांच्या संभाषणावरून समोरची व्यक्ती अंतर्बाह्य कळते.त्याची प्रगल्भता,बहुश्रुतता,परिपक्वता,आचार-विचारांची खोली,जीवनातल्या मूल्यांकडे त्याचा बघण्याचा दृष्टीकोन सारं सारं त्याच्याही नकळत ठसठशीतपणे समोर येतं.जाहीर संवादानंतर मी त्यांच्याशी ऐसपैस संवाद साधला. 
"मी नागपूरजवळच्या कामठीचा.आता तीन वर्षांपूर्वी मी पुण्याला आलो असलो तरी माझं कुटुंब नागपूरलाच आहे. तीन भाऊ आणि चार बहिणी अशा सिंधी परिवारातला मी आहे.मी एवढ्यात मराठी शिकलो."राजेश पिंजानी सांगतात, "नागपूरला मी जरी लोकल टीव्ही साठी जाहिराती करत असलो,तरी चित्रपटाशी माझा दूरान्वयेही संबंध नव्हता.चित्रपटाशी संबंधित शिक्षण वा प्रशिक्षणही मी घेतलं नाहीये.किंबहुना 'स्टोरी टेलिंग' ही मी कधी केलेलं नाहीये.हा चित्रपट मी करीत असताना माझा स्वत:चाच ह्यावर विश्वास बसत नव्हता की आपण  चित्रपट करतोय!" ते गजानन महाराजांचे भक्त आहेत,त्यांच्या निर्मितीसंस्थेचं नाव जय गजानन productions  आहे.हा चित्रपट मराठीतच का करावासा वाटला,ह्यावर ते सांगतात,की हा चित्रपट केवळ मराठीतच होऊ शकेल, अन्य कुठल्याही भाषेत नाही,कारण त्या कथेचा परिवेश नी पार्श्वभूमी वैदर्भीय आहे, घटनांचे संदर्भ वैदर्भीय आहेत.ती कथा ह्या पद्धतीने केवळ मराठीतूनच सांगितली जाऊ शकते.

चित्रपटात वैदर्भीय ग्रामीण बोलीभाषा व्यक्तिरेखेचा भाग बनून आलीय.आणि एक! मराठी चित्रपटानं तमाशापटाचा मुखवटा उतरवला,जिभेवर विसावलेल्या केवळ ग्रामीण कोल्हापुरी बोलीभाषेला अंमळ उतरवून इतर बोलीभाषाही आत्मसात केल्या,म्हणू नये,पण हिणकस मानून महाराष्ट्रात जिची कायम खिल्ली उडवली जाते,ती वैदर्भीय ग्रामीण बोलीभाषाही ह्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या तीन मराठी चित्रपटांतून त्यांतल्या संवादातून कानी आली, हेही नसे थोडके !

" पुण्यालगत,भोरलगतच्या एका गावात सलग २०-२५ दिवस ह्या चित्रपटाचं शूटिंग झालं.आमचं सगळं युनिट एखाद्या मोठ्या कुटुंबासारखं होतं,अगदी घरच्यासारखं वातावरण होतं.सगळे कलाकार प्रोफेशनल होते.अगदी आमच्या स्पॉटबॉयनं सुद्धा सहा चित्रपट केलेले होते.मीच काय तो नवखा होतो." राजेश पिंजानी चित्रपट करताना आलेले अनुभव सांगतात.

ही काल्पनिक गोष्ट असूनही खरीखुरी असल्याचा प्रत्यय प्रेक्षकांना येतो,ते त्यामागे त्यांचे परिश्रम आहेत,म्हणून. दीड-दोन वर्षे त्यांनी बँडवाल्याचं जीवन  जवळून अभ्यासलं,हे नंतर जग्गू साकारणाऱ्या मिलिंद शिंदे यांच्याशी फोनवर नोएडाहून फोनवर विस्तृत बातचीत केली,तेव्हा कळलं.

मिलिंद शिंदे यांनी जग्गू जिवंत केलाय.त्यांनी अभिनय केलेला नाहीच,तर ती भूमिका ते जगलेत. "मी मूळचा अहमदनगरचा!दिल्लीत राष्ट्रीय नाट्य विद्यालयात १९९५ ते १९९८ मध्ये मी तीन वर्षांचा अभिनयाचा कोर्स केला, नंतर पुण्याला एक वर्ष  फिल्म इनस्टीट्यूट मध्ये कोर्स केलं.त्यानंतर मी व्यावसायिक नाटकांकडे वळलो."ती फुलराणी" मध्ये वडिलांची भूमिका केली. त्या पहिल्याच भूमिकेसाठी मला पुरस्कार मिळाला.त्यामुळे माझी एक ओळख निर्माण झाली.सुदैवानं मला कधी माझा पोर्टफोलियो अथवा फोटो घेऊन फिरावं लागलं नाही.माझी ती भूमिका गजेंद्र अहिरे यांनी पहिली होती. त्यांनी मला म्हटलं,जेव्हा केव्हा मी सिनेमा करीन,त्यात तुझी भूमिका असेल.ती फुलराणी नंतर तीन वर्षांनी मी त्यांचा " नॉट ओन्ली मिसेस राऊत" हा सिनेमा केला.पुढे अग्निहोत्र, लक्ष्मणरेखा वगैरे सिरियल्स केल्या. "नटरंग" मध्ये खलनायक साकारला.पिंजानी यांनी जेव्हा ह्या सिनेमासाठी फोन केला,तेव्हा मी काही त्यांना गंभीरपणे घेतलंच नाही.लोक सिनेमासाठी विचारणा करणारे फोन करत असतात,ते पुढे जातातच असं नाही.त्यामुळे मी त्या फोनचा गंभीरपणे विचार केलाच नाही.मात्र त्यांनी म्हटलंच आहे,तर भेटू,असा विचार करून मी नगरहून मुंबईला गेलो.त्यांनी narration उत्तम दिलं.आमची केमेस्ट्री जुळली. दोन वर्षे त्यांनी परभणीला बँडवाल्यांचा बारकाईनं अभ्यास केला.मात्र पिंजानी यांनी चित्रपटात जातीय रंग येऊ दिला नाही.मीही त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास केला.बँड वाजवताना तो पाय कसा वाकडा करतो, हलगी कशी वाजवतो...मी हलगी घेतली,वैदर्भीय बोलीची कॅसेट ऐकून ऐकून ती बोलीभाषा आत्मसात केली.तुमचा अनुभव,निरीक्षण या सगळ्या आधीच्या गोष्टींचा परिपाक आणि अभ्यास असा दोन्हींचा समन्वय व्यक्तिरेखा रंगवताना  साधला जातो.स्क्रिप्ट आपलंसं केलं,की आपोआप व्यक्तिरेखा जिवंत होते. हा अभिनेता अमुक एका व्यक्तिरेखेचा अभिनय करतोय असं प्रेक्षकांना जाणवता कामा नये,ते प्रयत्न दिसता कामा नयेत.तो अभिनय सहज घडला पाहिजे. म्हणजे कसं,प्रेक्षकांना रंगमंचावरचं नेपथ्य दिसतं, backstage च्या बांधलेल्या दोऱ्या,फळ्या असल्या त्यामागच्या गोष्टी दिसत नाहीत.तसंच अभिनय जाणवला पाहिजे, त्यामागचं तंत्र नाही,असं मला वाटतं, म्हणजे कसंय पहा-माधुरी  सहज नाचते,पण ऐश्वर्या म्हणते -पहा,मलाही तसंच छान नाचता येतं.माधुरी सहजपणे नाचते,ऐश्वर्याला प्रयत्न करावा लागतो. हा प्रयत्न,effort दिसला की अभिनय natural ,सहज घडलेला वाटत नाही." मिलिंद शिंदे त्यातला तपशील उलगडून सांगतात.ते आता स्वत:एक चित्रपट दिग्दर्शित करताहेत,पण त्यात कुठेही  कमर्शियल angle  नाही,व्यावसायिक नफ्या-तोट्याचा दृष्टीकोन नाही, असं ते सांगतात.
"पुणे फेस्टिवलमध्ये ह्या चित्रपटाचा शो होता,त्यावेळी मी तिथे उपस्थित होतो. खेळ संपल्यानंतर प्रेक्षकांनी मला गराडा घातला.त्यात वयस्कर मंडळीही होती. साठ वर्षाचे प्रेक्षक मोठ्या आत्मीयतेनं माझ्या गालावरून हात फिरवत होते. त्यांचं म्हणणं असं,की मिलिंद शिंदे आहेत,तेव्हा त्यांची भूमिका,अभिनय चांगला असणारच. त्यांच्या अपेक्षांमुळे माझ्यावरची जबाबदारी वाढते.जग्गूनं त्यांच्या हृदयात स्थान मिळवलं,मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो,याचा मला अतिशय आनंद आहे,"मिलिंद शिंदे प्रेक्षकांबद्दलच्या कृतज्ञतेनं नी आपुलकीनं त्यांच्या आयुष्यातला हा अविस्मरणीय प्रसंग सांगतात.

अगदी असाच अनुभव बाबू बँड बाजा चित्रपटात शिरमी साकारणाऱ्या नी त्यासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेल्या मिताली जगताप- वराडकर हिलाही आला.मिताली शिरमीची व्यक्तिरेखा जगलीय.मितालीशी नोएडाहून दूरध्वनीवर विस्तृत बातचीत केली,तेव्हा ती भरभरून ह्या अनुभवाबद्दल सांगू लागली. 
"हा चित्रपट हाच मुळी माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.पुणे फेस्टिवलमध्ये ह्या चित्रपटाचा शो होता,त्यावेळी मी तिथे उपस्थित होते.चित्रपट संपल्यावर हजारेक प्रेक्षक जवळ आले.प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू होते.एक पंच्याऐंशी वर्षांचे कोट्याधीश डॉक्टर आले.ते माझ्या खांद्यावर डोके ठेवून ढसाढसा रडत होते.ते म्हणाले,माझ्या आईनं माझ्यासाठी जे कष्ट घेतलेत ते मला आठवले. सर्वच प्रेक्षकांनी मोठ्या आत्मीयतेनं माझ्याजवळ येऊन सांगितलं की माझ्यामुळे  त्यांना आज त्यांची आई आठवली.त्या सगळ्यांचे हे उद्गार,त्यांच्या डोळ्यातले ते अश्रू नी प्रेक्षकांनी केलेलं कौतुक हे माझ्यासाठी कुठल्याही पुरस्काराहून अधिक मोलाचे आहेत."मिताली सांगते." माझ्या आई -वडीलांची इच्छा होती की मी स्मिता पाटीलसारखं काम करावं.'स्मिता पाटीलसारखं काम कर बुवा!' असं ते सारखं म्हणत.कसंय पहा- स्मिता पाटील ही अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी पहिली मराठीभाषिक अभिनेत्री,पण तिला तो हिंदी चित्रपटासाठी मिळालाय.अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेली मी पहिली मराठीभाषिक अभिनेत्री आहे,जिला मराठी चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालाय," मिताली अगदी सहजपणे सांगते.तिच्या आवाजात कुठे गर्वाचा लवलेश नसतो."अर्थात स्मिता पाटील हे खूप उत्तुंग व्यक्तिमत्व होतं.थोडीशी का होईना,तिच्या कुठेतरी जवळपास मी जाऊ शकले,याचा मला आनंद आहे." 

 "मी औरंगाबादची आहे.माझे वडील साहित्यिक आहेत,समाजकार्य करणारे आहेत आणि आई शिक्षिका आहे.चित्रपटाची कुठली पार्श्वभूमी नव्हती.आईला मात्र कलेची खूप आवड होती.मुलगी व्हावी,तिला आपण शास्त्रीय नृत्य शिकवावं हे आईचं स्वप्न माझ्या रूपानं पूर्ण झालं.मी बारा वर्षं भरतनाट्यम शिकले.त्यात नृत्याबरोबर अभिनयसुद्धा आहे.हे मला आवडू लागलं,परदेशांत डान्स फेस्टिवल्सना गेले.औरंगाबादमध्ये नाटकांत अभिनय केला,त्यात 
बक्षिसं मिळाली.मात्र दरवर्षी पुढे तेच तेच घडत होतं,मुंबईशिवाय पर्याय नव्हता.खरं तर दिल्लीत NSD -राष्ट्रीय नाट्य विद्यालयात जाण्याचं माझं स्वप्न होतं,पण दिल्ली आवाक्याबाहेर होती.औरंगाबादहून मुंबई जवळ होती. पहिल्यांदा मुंबईत आले,वडिलांनी एके ठिकाणी पेइंग गेस्ट म्हणून मला जागा शोधून दिली.मात्र आई वडिलांवर आपला आर्थिक बोजा टाकायचा नाही,त्यांना त्रास होऊ द्यायचा नाही असं मी ठरवलं होतं.मुळात मुंबईचं राहणीमान,तिथला चकचकाट,तिथला प्रोफेशनल approach  ह्या सगळ्याशी जुळवून घ्यायलाच मला दीड एक वर्ष  लागलं.कुणाची ओळख नाही,रस्ते माहीत नाहीत,पैसे नाहीत,अशा परिस्थितीत वडापावावर,प्रसंगी उपाशी राहून मी स्ट्रगल केला. मात्र त्या आर्थिक संकटातून खूप शिकायला मिळालं.उपाशी राहिले;त्यामुळे यशाची चव चांगली चाखता आली .मुंबईत पुढे नाटकांत अभिनय केला,हिंदी सिरियल्समधून सुरुवात केली.पण तो कारखाना होता,ते एकसाची काम करण्यात मला स्वारस्य नव्हतं. मग मी मराठीत आले.२-३ वर्ष काम केलं.  सिरियल्स,दोन-तीन चित्रपट केले.कॅमेरामन संदीप वराडकर यांच्याशी दरम्यान माझं लग्न झालं.मुलगी झाली.तेव्हा मात्र मी ब्रेक घेतला.मी माझ्या आई-वडिलांना सोडून दूर आले होते.आता मुलगी झाल्यावर तिला मी पूर्ण वेळ द्यायचं ठरवलं.नवव्या दिवसापासून मी माझ्या बाळाला आंघोळ घातली.आज माझी मुलगी चार वर्षांची आहे."मिताली सांगते. 

"बहुधा माझ्यातली हीच छटा पिंजानी यांना दिसली असावी.ते जेव्हा भूमिकेबाबत विचारणा करायला आले,तेव्हा ओवीशी- माझ्या मुलीशी माझी जी जवळीक आहे,ती त्यांना भावली.मातृत्वाचा,मायेचा हा पदर त्यांना शिरमीच्या भूमिकेसाठी अभिप्रेत होता,तो त्यांना गवसला.ही भूमिका तूच करशील,असं त्यांनी सांगितलं.मला आश्चर्य वाटलं, कारण मुलीकडे लक्ष देण्यासाठी मी जवळ जवळ २-३ वर्षे ब्रेक घेतला होता.मात्र मला माझ्या नणंदेचा खूप मोठा आधार होता.तिनंच मला ब्रेकनंतर काम करायला प्रोत्साहन दिलं.लेकीला सांभाळलं. तिच्यामुळे मी निर्धास्त होऊन चित्रपट केला.शिरमीचं तिच्या मुलाशी असलेलं जीवाभावाचं नातं हे आतून आलं.मुळात जमिनीशी माझं नातं आहे.वडील मला चपला काढून काळ्या ढेकळावरून चालायला लावायचे.मात्र भूमिकेसाठी मी अभ्यास केला नाही.भरतनाट्यममध्ये,परात डान्स मध्ये balance -तोल सांभाळायची सवय होती.मात्र डोक्यावर टोपली घेऊन चालायचा सराव वगैरे केला नाही.प्रसंगानुसार चुंबळ वेगवेगळी तसंच प्रसंगानुसार टोपलीतली भांडी नी कपडे कमी-अधिक असल्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं तोल सांभाळायचा असायचा.ते सर्व तिथल्या तिथे उत्स्फूर्तपणे घडत गेलं.सगळी दृश्यही कुठल्याही रिटेकविना चित्रित झालीत.सबंध चित्रपटाच्या चित्रीकरणात मोजून एक वा दोन रिटेक झाले असतील.सबंध चित्रपटात, लेकाला कागदांची वही शिवून देतानाचा प्रसंग अभिनयाच्या दृष्टीकोनातून माझ्यालेखी खूप भावस्पर्शी होता.दिग्दर्शकांनी 'कट 'म्हटल्यावर मी पाहिलं तर सगळे रडत होते.प्रत्येकाला आपली आई आठवत होती."मिताली सांगते.

एकूणच,राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो आला,त्यानं पाहिलं,त्यानं जिंकलं,असं "बाबू  बँड बाजा" चित्रपटाच्या बाबतीत झालं होतं.आता पुन्हा एकवार त्यानं कोल्हापूरला झालेल्या थर्ड आय एशियन चित्रपट महोत्सवात, मराठी सिनेमाच्या कॅटेगरीत सर्वोत्कृष्ट फिल्म,सर्वोत्कृष्ट डायरेक्टर,र्वोत्कृष्ट अभिनेता,सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट बालकलाकार यासाठीचे एकूण पाच पुरस्कार मिळवून ते सिद्ध केलं.
    
चित्रपटाला भाषेचे अडसर नसतात,कुठल्याही भाषेतला चांगला चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो,असं अमराठी प्रेक्षकांनी सांगितल्यामुळे त्याचा प्रत्यय घेण्यासाठी आणि आडुकलम(Adukalam )ह्या तमिळ चित्रपटाला दिग्दर्शन,अभिनेता, पटकथा,संकलन,कोरिओग्राफी ह्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेत,तेव्हा तो नक्की बघा,इथे पाय ठेवायला जागा नसेल,एवढी गर्दी असेल असे लोकांच्या  आग्रहपूर्वक सांगण्यावरून तमिळ कळत नसताना आडुकलम हा तमिळ चित्रपट बघायला गेले.कोंबड्यांच्या झुंजी हा तमिळनाडूच्या खेड्यातला लोकप्रिय क्रीडाप्रकार.त्यात प्रवीण असलेल्या आता वयस्कर झालेल्या पेट्टईकारन आणि पोलीस अधिकारी रत्नस्वामी ह्या प्रतिस्पर्ध्यांतल्या लढतीत करुप्पुमुळे पेट्टईचा विजय होतो.करुप्पू पेट्टईला गुरूस्थानी मानत असला तरी पेट्टईच्या मनात करुप्पुबद्दल आकस असतो.....तमिळ चित्रपटाच्या परंपरेला साजेसाच तो चित्रपट होता.करुप्पुचीभूमिका धनुष ह्या अभिनेत्यानं चांगलीच केली आहे.त्याचा इनोसन्स हा त्याचा प्राण आहे.हा धनुष म्हणजे वेंकटेश प्रभू कस्तुरी राजा हा सुपरस्टार रजनीकांतचा जावई.आता त्यानं " व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी?"म्हणत काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंतच्या तरुणाईला वेड लावलंय. पेट्टईची भूमिका जयबालन ह्या अभिनेत्यानं फारच प्रभावीपणे केलीये...(श्रेयनामावलीत कलानिधी मारन वगैरे नावे वाचली.)चित्रपट समजायला भाषेचे अडसर नसतात,ह्याचं प्रत्यंतर आलं.  
                            
---------------------------------------------------------------------------------------
रश्मी  घटवाई 
डी-१/७०१,
भारत पेट्रोलियम हाऊसिंग कॉम्प्लेक्स,
सेक्टर- ५६,नोएडा -२०१३०१
दूरध्वनी क्र:०१२०-२४९०१९०
मोबाईल:०९८७१२४९०४७