Tuesday, June 5, 2012

"प्रॉब्लेम ऑफ प्लेन्टी" : आपण आणि पर्यावरण - रश्मी घटवाई

"प्रॉब्लेम ऑफ  प्लेन्टी" : आपण  आणि  पर्यावरण 
                                                                                - रश्मी घटवाई 
                                                                                      
५ जून रोजी दर वर्षी विश्व पर्यावरण दिवस साजरा केला जातो;वस्तुत:प्रत्येक दिवस हा पर्यावरण दिवस मानून आपण प्रत्येकानं अगदी आपल्यापुरती आणि आपल्या कुटुंबीयांपुरती म्हणजे आपापल्या पातळीवर जरी पर्यावरणाची काळजी घेतली,तरी खूप काही साध्य होण्यासारखे आहे.सुदैवाने आता समाजात पर्यावरण रक्षणाविषयी जागरुकता बऱ्यापैकी वाढीला लागलेली आहे.
                                                                    
१९७२ सालीं,५ जून ते  १६ जून या दरम्यान स्वीडनची राजधानी स्टॉकहोम(stockholm )इथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत ११३ (113 )देशांनी पर्यावरणाच्या संरक्षणार्थ, संवर्धनार्थ २६ principles -सव्वीस सूत्रांचा पुरस्कार केला.दर वर्षी ५ जून रोजी विश्व पर्यावरण दिवस साजरा करण्याचा निर्णयही याच बैठकीत झाला. वस्तुत:प्रत्येक दिवस हा पर्यावरण दिवस आहे.

आपले सगळे दैनंदिन व्यवहार पर्यावरणाला अनुकूल किंवा प्रतिकूल आकार देत असतात.किंबहुना आपल्या अस्तित्वाचा प्रत्येक भाग हा पर्यावरणाला समर्पित आहे,म्हटलं तर वावगं ठरू नये.असं असताना आपण जाणीवपूर्वक पर्यावरण रक्षणाविषयी किती विचार करतो,हा चिंतनाचा विषय आहे.मुळात पर्यावरणशास्त्राची व्याप्ती बघा केवढी मोठी आहे.अगदी भौतिकशास्त्र,जीवशास्त्र,रसायनशास्त्र, भूगोल, खगोलशास्त्र,एवढंच काय, कला,वाणिज्य अशा सगळ्या शाखा,सगळे सजीव आणि निर्जीव घटक पर्यावरणाच्या छत्राखाली येतात. मात्र पोल्युशन,कार्बन फूटप्रिंट्स,ग्लोबल वार्मिंग,ग्रीन हाउस gas एमिशन्स वगैरे भलेथोरले शब्द ऐकूनच बावचळून जाऊन अनेक व्यक्ती पर्यावरण हा आपला प्रांत नव्हे,असा समज करून घेतात.त्या शब्दांच्या पसाऱ्यात भांबावून नं जाता  आपली जीवनशैली पर्यावरणाला पूरक आहे की मारक आहे,एवढं चिंतन जरी प्रत्येकानं केलं नी ती  काही अंशी सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रत्येकानं केला तरी पुष्कळ काही साध्य होईल.

"ही पृथ्वी,ही जमीन,ही हवा,हे पाणी,हे आपल्या पूर्वजांनी आपल्याला वारसा म्हणून दिलेले नाही;तर आपल्याला आपल्या पुढच्या पिढीकडून मिळालेले ते ऋण आहे;त्यामुळे आपल्याला ज्या स्थितीत हे सारं मिळालं; किमान त्या स्थितीत ते पुढच्या पिढीच्या सुपूर्द करायचं आहे."गांधीजींच्या या वचनाची जाणीवही आपल्याला सतत व्हायला हवी."The earth does not belong to man;man belongs to the earth;"असं अमेरिकेतल्या सिएटलच्या रेड इंडियन आदिवासी जमातीच्या प्रमुखानं  अमेरिकेच्या राष्ट्रप्रमुखाला सन1800 च्या सुमारास लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.अमेरिकेच्या राष्ट्रप्रमुखानं त्यांची जमीन विकत घेण्याबद्दल त्याला पत्र लिहिलं होतं,त्याला उत्तर देताना त्यानं पुढे म्हटलं होतं,"कुणी आकाश किंवा जमीन कसं काय खरेदी करू शकतं किंवा विकू शकतं? ही पृथ्वी आमची माता आहे.तिच्यावर काही आपत्ती येणं म्हणजेच तिच्या मुलांवरही आपत्ती येणं! या नद्या आम्हाला बंधुतुल्य आहेत..."दोनशे वर्षांपूर्वीचं त्याचं ते सबंध विवेचन आजही तितकंच यथार्थ आहे.  त्याला तेव्हा जे कळलं,ते आज इतकी प्रगती होऊनही मनुष्याला उमगत नाहीये,ही खरी शोकांतिका आहे.
वायूप्रदूषण,पाण्याचे प्रदूषण,ध्वनी प्रदूषण,यांबरोबरच आजच्या घडीला पर्यावरण ऱ्हासासाठी "प्रॉब्लेम ऑफ  प्लेन्टी " सुद्धा तितकाच जबाबदार आहे.कसा तो बघा;आपल्या घरात दोन मुले असतात नी वीस मुलांना पुरतील, एवढे कपडे असतात.आज जवळ जवळ प्रत्येक मध्यमवर्गीय घरात,कपाटात मावणार नाहीत,एवढ्या साड्या असतात. प्रत्येक कार्य-प्रसंगाच्या वेळी ठेवायला जागा पुरत नसते,तरीही भेटवस्तू,साड्या ह्यांचे ढीग अहेर म्हणून येतात आणि कहर म्हणजे कुठल्या लग्नाला वगैरे जायचं असेल,तेव्हा तिथे घालण्यासाठी साजेशी साडीच आपल्याजवळ नसल्याचा साक्षात्कार बहुतेक वेळा बहुतेकींना होतो.कुणे एके काळी दोन घरातले नी दोन बाहेरचे आणि काहीच ठेवणीतले कपडे असायचे.लहान भावंडे मोठ्या भावंडांची दप्तरे,शालेय पुस्तके आणि इतर सामग्री वापरत.(अर्थात हा सगळा जमाना आमच्या आधीच्या पिढीचा होता.)पूर्वी दिवाळी वर्षातून एकदा यायची,आज वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस दिवाळी असते.कुठल्या वस्तूची गरज इतकीशी असली तरी -अन गरज नसली,तरीही ती कृत्रिमरीत्या निर्माण करून,ती पुरवायला हजार पर्याय उपलब्ध आहेत,वस्तू इवलीशी असली तरी तिचे वेष्टन भले थोरले...बहुतांश वेळा एखाद्या वस्तूचा पुरेसा वापर करून व्हायच्या आत ती टाकून देऊन तीच वस्तू नव्यानं  आणली जाते.लग्नाबिग्नांच्या पार्ट्यांत किंवा इतर पार्ट्यांत वाया जाणारे अन्न बघून, ह्या देशात दारिद्र्यरेषेखाली  असणारे किंवा ज्यांना दोन वेळचे अन्न मिळत नाही असेही लोक आहेत,ह्यावर विश्वास बसणार नाही.ह्यांतली कुठलीही गोष्ट आकाशातून तर टपकलेली नाही.ती निर्माण करायला साधनसामुग्री,मनुष्यबळ,उर्जा सगळं लागलेलं असताना तिचा पुरेसा वापर नं करताच जर ती टाकून दिली तर त्यासाठी लागलेला पैसा, सामुग्री, मनुष्यबळ,उर्जा तर वाया जातंच,पण त्याच नव्या वस्तूच्या निर्मितीसाठी -मागणी अधिक म्हणून  पुरवठा पण अधिक होऊन पर्यावरणावर अतिरिक्त ताण येतो.त्याची किंमत नंतर आपल्याला वा आपल्या नंतरच्या पिढ्यांना वेगळ्या प्रकारानं चुकती करावी लागेल,हे आपल्या मनातही येत नाही." 'Earth provides enough to satisfy every man's needs, but not every man's greed." असं गांधीजींनी अगदी समर्पक शब्दांत सांगितलं होतं. 

"अहिंसा,सत्य,अस्तेय,ब्रम्ह्चर्य,अपरिग्रह"या यम-नियमाला विसरून,पाश्चात्य जीवनशैलीला आपलेसे करून आपण आता कसे एकदम मॉडर्न झालो म्हणून स्वत:वरच खूष होतो आहोत.त्यांची 'यूज अ‍ॅन्ड थ्रो '-वापरा आणि फेका संस्कृती आपण चटकन आत्मसात केली.गेल्यावर्षी अमेरिकेतल्या आमच्या महिनाभरातल्या वास्तव्यात ठायी-ठायी त्यांचा ओव्हर कन्झ्युमेरीझम,पेपर प्लेट्स नी ग्लासेस,पेपर napkins यांचा नको इतका वापर प्रत्ययाला येत होता.(मात्र इतका कचरा निर्माण करूनही तो सगळा व्यवस्थित dustbims ,कचरा कुंडीत टाकलेला.इवला कागदाचा कपटा देखील अन्यत्र पडलेला नाही,मुलखाच्या स्वच्छतेबद्दल,नियम नं तोडण्याबद्दल    तर त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं!तेवढं आपण बरं नाही आचरणात आणलं!आपल्याकडे लोकांच्या सवयी ही घाणेरडया! आपल्या कुठल्याही शहरात,होय,इथे दिल्लीत तर खूपच- कित्येक असंस्कृत लोक भरधाव वेगानं, बेगुमानपणे गाड़ी चालवतानासुद्धा,मध्येच दार उघडून पचकन रस्त्यांवर थुंकताना दिसतात.बसच्या खिडकीतून डोके बाहेर काढून राजरोसपणे थुंकणारेही आहेत.कचरा कुठेही फेकावा हा अनेकांचा जणू जन्मसिद्ध हक्क असे ते वागतात. असो!) म्हणजे आधी तो भला थोरला कचरा-पक्षी पेपर प्लेट्स नी ग्लासेस,पेपर napkins वगैरे वस्तू-  निर्माण करायचा.त्यासाठी साधन सामुग्री,उर्जा वगैरे खर्ची घालायचं,लोकांनी त्या वस्तू पैसे खर्च करून विकत घ्यायच्या नी वापरून लगेच फेकून तो कचरा निर्माण करायचा आणि मग त्या कचऱ्याचं निर्मूलन करण्यासाठी, विल्हेवाट लावण्यासाठी करण्यासाठी पुन्हा साधन सामुग्री,उर्जा वगैरे खर्ची घालायचं.(आणि सशक्त अर्थव्यवस्थेच्या फुशारक्या मारायच्या!अमेरिकेत ट्वीन टॉवर वरच्या हल्ल्यानंतर लोक भीतीपोटी बाहेर पडेनासे झाले होते,वस्तू विकत घ्यायला,शॉपिंगसाठी  बाहेर पडत नव्हते,तेव्हा त्यांचे राष्ट्राध्यक्ष त्यांना मनात भीती 
बाळगू नका,बाहेर पडा,बाजारहाट करा,नाहीतर आपली इकॉनॉमी-अर्थव्यवस्था  कशी चालेल असं सांगत होते.) 

भल्या थोरल्या लोकसंख्येची भली थोरली बाजारपेठ म्हणून,ओव्हर कन्झ्युमेरीझमसाठी आता आपल्याला भलेही उद्युक्त केलं जात असलं तरी अमेरिकेसारखा ओव्हर कन्झ्युमेरीझम आपल्याला मुळीच परवडण्यासारखा नाही.अमेरिकेसारख्या प्रगत देशांच्या तुलनेत आपला उर्जेचा प्रतिमाणशी वापर भलेही कमी असेल.पण जो आहे तो निरर्थक गोष्टींसाठी व्हायला नको.जरा विचार करून पहा,आपली काही वर्षांपूर्वीची जीवनशैली काय टाकावू होती?आता मला वाटतं,अगदी लहानलहान मुलं सुद्धा पाटी-पेन्सिल वापरत  नसतील.खरं तर एवढ्या लहान मुलांना वह्यांची गरजच काय?यूज अ‍ॅन्ड थ्रो हवं तर थर्माकोलच्या वा पेपर प्लेट्स ना मजबूत पत्रावळीचा पर्याय अधिक पर्यावरण-स्नेही  नाही का?बुद्ध हा तर आद्य पर्यावरणवादी म्हणायला हवा.त्यानं यूज अ‍ॅन्ड थ्रो ऐवजी यूज अ‍ॅन्ड री-यूज ही संकल्पना तेव्हा दिली,आपल्या शिष्यांनी अंगावरची वस्त्रे जीर्ण झाल्यावर,त्यांचा अनेकवार वापर करून झाल्यावर त्यांची वात करून दिव्यात वापरण्याबद्दल त्याने सांगितले होते.

थोडक्यात, अनेक बाबतींत तर हा "प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी" टाळणं सर्वस्वी आपल्या हातात आहे.अजूनही वेळ गेलेली  नाही.पर्यावरणाच्या ऱ्हासाचा प्रश्न अधिक उग्र होऊन मानवाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होण्यापेक्षा आपल्या अति-चंगळवादाला मुरड घालणं केव्हाही अधिक श्रेयस्कर  ठरणार  नाही का?