Monday, September 19, 2016

सण
-रश्मी घटवाई

"सणावाराचं महत्व या पिढीला केव्हा कळणार कोण जाणे!"काळजीच्या सुरात स्वत:शी पुटपुटत देवबाईंनी रांगोळीचे ठिपके काढायला सुरुवात केली.ही कासवाच्या पाठीची नऊ ते एक ठिपक्यांची रांगोळी त्यांची अगदी आवडती होती.महालक्ष्मीची पूजा करायची असली की त्या ती आवर्जून काढत.त्यातला थ्री-डी इफेक्ट त्यांच्यातल्या रसिक कलाकाराला प्रत्येक वेळी खिवून ठेवत असे.
त्या विज्ञानाच्या शिक्षिका होत्या.कालच त्यांच्या शाळेत "इम्पाँर्टन्स आँफ फेस्टिवल्स इन इंडिया", "भारत में त्यौहारों का महत्व" या विषयावर  नववी -दहावीच्या विद्या्र्थ्यांसाठी वक्त्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती आणि त्या,त्या स्पर्धेच्या परीक्षिका होत्या.बहुतेक विद्या्र्थ्यांनी आंतरजालावरून माहिती घेऊन घोकंपट्टी करून जशीच्या तशी सादर केलेली जाणवत होती.काहींनी विषयाचा विपर्यास करून "इम्पाँर्टन्ट फेस्टिवल्स आँफ इंडिया" अशी भारतात साजरया् होणारया् प्रमुख सणांची जंत्रीच प्रस्तुत केली होती. सणाच्या मूळ संकल्पनेऐवजी तो सण साजरा करण्याच्या पद्धतीला,बाह्यरूपालाच ही पिढी सण मानते आहे ,हे क्षणोक्षणी जाणवत होतं॰ह्या पिढीला सण कसे साजरे केले जातात,हे सांगण्याची आणि सोदाहरण दाखवून देण्याची जबाबदारी सर्वस्वी मुलांच्या आईवड़िलांची,घरातल्या वडीलधारयांची आहे;पण कुठेतरी ते कमी पडताहेत,हे त्यांना  स्वच्छ दिसत होतं॰एकूणच तो वैचारिक उथपणा जाणवून त्यांचा जीव कासावीस होऊ लागला होता॰
महाराष्ट्रातल्या एका लहान शहरातून त्या अजस्त्र महानगरात देवबाई पंचवीस वर्षांपूर्वी लग्न होऊन आल्या होत्या॰ सणावाराचे लहानपणातले संस्कार त्यांच्यात रुजलेले होते॰या हिंदीभाषिक महानगराच्या चालीरीती वेगयाच होत्या॰तिथे मूठभर मराठी भाषिक होते;पण तेही विखुरलेले!देवबाईंनीच पुढाकार घेऊन चार-दोन मराठी कुटुंबांना एकत्र आणून गणेशोत्सव साजरा करायला,स्वत:च्या मुलांसकट त्या मराठी कुटुंबांतल्या लहान मुलांनासुद्धा किमान गणपतीची आरती आणि रामरक्षा यावी म्हणून संस्कारवर्ग चालवायला सुरुवात केली होती॰मात्र पंचाईत अशी होती,की या हिंदीभाषिक महानगरात कुठल्याच मराठी सणाच्या वेळी;फार काय,गणेशचतुर्थीचीही कुणालाच सुट्टी नसायची!इतकंच काय,ऐन गणेशोत्सवात या महानगरातल्या मुलांच्या परीक्षा सुरू असल्यानं मुलं नी त्यांचे पालक कालांतरानं येईनासे झाले होते आणि मग गणेशोत्सवाची जबाबदारी जणू काही त्यांची एकटीची होऊन बसली होती॰तरीही नं कुरकुरता नेटानं त्या इतकी वर्षं आपली आणि मुलांची शाला,नवरयाचं ऑफिस असं सर्व सांभालून ती जबाबदारी पार पाडत होत्या॰मुलं आता मोठी झाली होती॰मोठा मुलगा इंजीनियर होऊन दोन वर्षांपूर्वी अमेरिकेला नोकरीसाठी गेला होता॰धाकटी मुलगीही पदवीपर्यंतचं शिक्षण घेऊन नुकतीच नोकरीला लागलेली होती॰ 
”आता पुढच्या वर्षी दोघांचीही लग्न उरकून,शालेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन या व्यापांत मन अधिक गुंतवू,“देवबाईंनी विचार केला॰रांगोळी काढ़ता काढ़ता त्यांनी लेकीला हाक मारली॰आज अनायसे रविवारची सुट्टी होती,तेव्हा लेकीला हाताशी घेऊन,कुलाचार नसला तरी घरातल्या घरात महालक्ष्मीची पूजा करू,नैवेद्यासाठी पदार्थ करायला शिकवू,असा त्यांनी विचार केला॰इतकी वर्ष घरात नुसतं अभ्यासाचं वातावरण होतं,हे सर्व शिकवू म्हटलं,तरी लेकीला शिकायला वेच नव्हता॰”किती भर्र्कन मोठी झाली ही,आताआता पर्यंत वाटत होतं लहान आहे॰पण उद्या सासरी गेली की कसं होणार हिचं! म्हणतील;आईनं काहीच शिकवलं नाही,”देवबाईंना काजी वाटू लागली॰
“आई ,झोपू दे नं गं थोडावेळ!काल किती दमून आले होते मी,झोपायला उशीर नव्हता झाला का मला?”झोपेतच त्यांची लेक कुरकुरली आणि तोंडावर पांघरूण ओढून,कूस बदलून पुन्हा झोपी गेली॰काजी,नाराजी,सात्विक संताप सगळ मनातल्या मनात ठेवीत रांगोळी संपवून देवबाई दुसरया कामाला लागल्या... “तिचं पण काय चुकतंय म्हणा!ह्या महानगरात गलेकापू स्पर्धा आहे!अभ्यासाच्या स्पर्धेत बालपण सरलं आणि आता नोकरीच्या स्पर्धेत धावायला सक्षम करायच्या नादात आपणच तिला एमबीएची तयारी करायला म्हणून ऑफिस संपल्यावर कोचिंग क्लासला जाण्याचा पर्याय निवडायला लावला!झोप सुद्धा पूर्ण होत नाही बिचारीची!”देवबाईंच्या मनात लेकी बद्दल कणव दाटून आली॰”खरी चूक आपल्याच पिढ़ीची आहे... आपण ह्या वर्तमान पिढ़ीकडून भूत आणि भविष्य अशा दोन्हींची अपेक्षा करतो आहोत॰त्या आपल्याच मनाशी बोलू लागल्या॰
“आई,सरप्राईज़!”हॉल मधला घणघणत असलेला फोन त्यांनी कणिक भिजवता भिजवता उचलला,तेव्हा पलीकडून त्यांच्या मुलाचा उत्साहानं ओसंडून वाहणारा आवाज देवबाईंच्या कानी आला॰पाठोपाठ डोअरबेल वाजली॰”थांब,बाबा मॉर्निंग वॉक घेऊन आलेले दिसताहेत,मी जरा दार उघड़ते आणि मग तुझ्याशी बोलते!”त्यांनी फोनचा रिसीव्हर खाली ठेवला आणि  तसंच खरकटया हातांनी दार उघडलं॰दाराबाहेर त्यांचा मुलगा उभा होता॰त्याच्याबरोबर एक विदेशी मुलगीही उभी होती॰त्या बुचकयात पड्ल्या॰आत या असं म्हणण्याचंही त्यांना सुचलं नाही॰
“आई,ही अँजेलिना!तू तिला अंजली किंवा लीना म्हणू शकतेस!पण अशी बुचकयात पडू नकोस॰ती तुझी भावी सून आहे !” त्यांचा मुलगा त्याच उत्साहात म्हणाला॰”म्हणजे आपल्या मुलानं ह्या अमेरिकन मुलीशी लग्न करायचं ठरवलंय!आता हयांची प्रतिक्रिया काय असेल देव जाणे!आपण काय करावं?”निमिषार्धात त्यांच्या मनात शेकडो विचार आले॰
”आई,नमस्ते!” अमेरिकन उच्चारात अँजेलिनानं त्यांना हात जोडून आणि नंतर वाकून नमस्कार केला,तेव्हा देवबाई भानावर आल्या॰”मुलांच्या पंखात बयावं,त्यांनी आकाशात भरारी घ्यावी ,म्हणून आपण आयुष्यभर प्रयत्नशील राहिलो॰आता ते आकाशात स्वच्छंद विहार करायला तयार झाले असताना आपण त्यांचे पंख का छाटावेत?मन छोटं का करावंत्यांनी विचार केला॰
ये,आत ये!या” प्रसन्न चेहरयानं मोठ्या उत्साहानं देवबाईंनी दोघांचं स्वागत स्वागत केलं!
”आई छान रंगोली!” अमेरिकन उच्चारात अँजेलिना म्हणाली,“मला पण शिकवाल का?मला भारतीय सण खूप आवडतात,तो माझ्या अभ्यासाचा विषय आहे॰भारत में त्यौहारों का महत्व यह मेरे रिसर्च का विषय है।ती अस्खलित हिंदीत म्हणाली॰ देवबाईंच्या मनातलं उरलं सुरलं मभ दूर झालं॰पाठीमागे मॉर्निंग वॉक घेऊन आलेले त्यांचे पती उभे होते॰”अहो असे काय वेंधल्यासारखे उभे आहात!आपला लेक आणि सून आले आहेत!चला या,जोड़ीनं त्यांचं स्वागत करूया!”त्या त्यांना म्हणाल्या॰
रांगोळीचे रंग आता अधिक सुंदर दिसत होते आणि घरादारावर सणाच्या मंगल वातावरणाचा प्रसन्न शिडकावा झाला होता॰
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
-रश्मी घटवाई
09871249047  
पाहुणे येता घरां ... 
-रश्मी घटवाई

घरी पाहुणे येणं किंवा आपण कुणाकडे पाहुणे म्हणून जाणं ही आपल्या देशात तरी नित्य घडणारी आणि सर्वांच्या अंगवळणी पडलेली गोष्ट आहे."अतिथी देवो भव "असं भारतीय संस्कृती मानते.अतिथी म्हणजे पाहुणा,हा देवासमान मानून त्याचे आगतस्वागत करण्याची आपली परंपरा आहे.आपल्या महाराष्ट्रात "साधू-संत येती घरां,तोचि दिवाळी दसरा " म्हणजे साधुसंतांची पायधूळ घरात झडणे,हे सण-उत्सवासमान मानले गेले आहे!त्याही पलीकडे जाऊन बघितलं,तर एकूणच आपल्या देशात पाहुणे म्हणून जाण्याची नाहीतर पाहुणे म्हणून आलेल्यांचे यथायोग्य आदरातिथ्य करण्याची प्रथा आहे. खेडी,गावं,शहरं,यांपैकी कुठेही रहाणाऱ्या,कुठल्याही धर्म,जात या प्रकारात मोडणाऱ्या मनुष्य नावाच्या प्राण्याला"मेहमान नवाज़ी" हा प्रकार तितकाच प्रिय आहे ."ते ?ते आमचे कुणीही नव्हेत !"असे झुरळ झटकून टाकल्यागत वागणारी जमात सोडल्यास सर्वसामान्यांना "आऊचा काऊ ,तो आमचा भाऊ"याच न्यायानं वागायला आवडतं. "अमुक अमुक प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे आमच्या आतेभावाच्या चुलतभावाचा मावसभाऊ"किंवा " ही शारदा म्हणजे कमल ताईंच्या नणंदेच्या नणंदेची नणंद "असे उल्लेख झाले की लांबची नातीपण जवळची वाटू लागतात."आपण जेवूनच आला असाल ,पुढच्या वेळी आलात की चहा घेऊनच जा!बसा!मी हा आलोच!"असे म्हणत पाहुण्यांना दिवाणखान्यात बसवून आत जाऊन चहा पिऊन येणाऱ्या मंडळींची अन्यत्र कोठेही शाखा नसते.उर्वरित जनसामान्यांना असल्या तऱ्हेवाईक स्वागताची परंपरा लाभली नसल्याने आलेल्या पाहुण्यांना चहा देण्यात कुणालाच वावगे वाटत नाही;मग भले तो पाहुण्यांचा दिवसभरातला चवथा-पाचवा आणि यजमानाचा तिसरा -चवथा चहा का असेना !"इथे जोशी राहत नाहीत.वेळी-अवेळी दारावरची घंटी वाजवून चौकशी करू  नये",अशी दटावणी असलेल्या पाट्या नं लावता उर्वरित जनसामान्यांना जोशी कुठे रहातात याची चौकशी करीत आलेल्या त्यांच्या प्रत्येक पाहुण्याला यथायोग्य मार्गदर्शन करण्याची नैतिक जबाबदारी आपली असल्याचे वाटत असल्याने वेळप्रसंगी पाहुण्याला जोशींच्या घरापर्यंत सोडून यायलापण आवडते."जोशी ना ....पयले एक बड़ा पेड़ गिरेंगा ..फिर एक बड़ी बिल्डिंग गिरेंगी,उसके बाद एक फ्लायओव्हर गिरेंगा,उसके पयलेकाच मकान !"असे अगदी मोटरसायकलवरचा मराठी स्वारसुद्धा थांबून,वाकडी मान करून  मान आणि उजवा खांदा यात धरलेल्या मोबाईलवरचे बोलणे थांबवून मराठी पाहुण्यांना हिंदीत नेमके दिशादर्शन करतो,तर  "उंह जोशीजी अब उंहा नहीं रहते हैं.उंहा तो बहुतेही तकलीफ थी ,तो  उंह परली गली में ,जो है ,चले गए हैं !"असे बिहारी लहेज्यात ऐकवत एखादा कोपऱ्यावरचा रामसरन कपड्यांना इस्त्री करता करता मौलिक माहिती पुरवत जोश्यांकडच्या पाहुण्यांना नेमके ठिकाण समजावून सांगतो.

गावाकडे वगैरे,घराच्या छपरावर  कावळा ओरडू लागला की पाहुणे येण्याचा शकुन तो सांगतोय,असं मानलं जातं.कोणे एके काळी,एकत्र कुटुंब असण्याच्या काळात वेळी अवेळी कितीही पाहुणे आले,तरी त्यांचे उत्तम स्वागत होत असे!.किंबहुना पूर्वी घरात केव्हाही बघा,एक-दोन पाहुणे असत!तिथी नं सांगता येतो , तो अतिथी!पण हे तिथी नं सांगता कुणाकडे अचानक जाणं वगैरे सगळं गावांत,लहान शहरातच आता शक्य होऊ शकतं,जिथे  यजमानांच्या घरापासून ते ऑफिस वा कामाच्या ठिकाणापर्यंतचं अंतर कमी असतं,घरच्या गृहिणीला घरकाम,स्वयंपाक इत्यादी गोष्टींत मदत करण्यासाठी हाताखाली नोकर वा कुटुंबातले इतर सदस्य असतात. 

महानगरांचं तसं नाही!इथल्या गृहिणीला गाव अथवा लहान  शहरातल्याप्रमाणे  घरकाम,स्वयंपाक इत्यादी गोष्टींत मदत करण्यासाठी हाताखाली नोकर वा कुटुंबातले इतर सदस्य उपलब्ध असतील असे नाही.तिथी नं सांगता येतो,तो अतिथी,हे समीकरण महानगरांत चालू शकत नाही .महानगरं घड्याळाच्या काट्यांवर धावतांत,भावनांवर नाही,तर प्रोफेशनलिझम- व्यावसायिक दृष्टिकोनावर चालतात.गॅस,वीज जाणं ,परिणामी त्यांवर चालणारी उपकरणं नं चालल्यामुळे रोजचं काम आणि जगणं कष्टप्रद होतं,अंतरं खूप असल्यामुळे साध्यासाध्या गोष्टी पण कठीण वाटतात.महानगरांमधल्या नवीन वस्त्यांमध्ये जीवनावश्यक गोष्टीसुद्धा जवळ मिळत नसल्यानं शारीरिक,मानसिक त्रास होतो,त्यामुळे पाहुण्यांच्या सरबराईची,पाहुणचाराची पद्धत सुद्धा बदलू शकते.घरचं सर्व आवरून स्वयंपाक,नवऱ्याचा,स्वतःचा नि मुलांचे डबे भरून, तयार होऊन, इतके वाजून इतकं मिनिटं आणि इतके सेकंदांची लोकल ट्रेन पकडून ऑफिसमध्ये जायचं ,अशी दुहेरी कसरत करणाऱ्या महिलांच्या वेळापत्रकात इच्छा असली तरी पाहुण्यांची सरबराई त्या कशा बसवू शकतील ! मुंबईत काही वर्षांपूर्वी लग्नाच्या रिसेप्शनला केवळ आईस्क्रीम असायचं! वेळेचा,जागेचा अभाव;त्याचमुळे या मॅग्झीमम् सिटीच्या शिष्टाचारात पाहुणचार मिनिमम,आवश्यक तेव्हढा असतो.                  
 
बिरबलाच्या दिल्लीत तर कावळेही पाहुणे म्हणून येतात किंवा जातात,असं बिरबलानीच अकबर बादशहाला सांगितलं होतं,त्या महानगरात "पाहुणे येता घरां,तोचि दिवाळी  दसरा "असे नवे समीकरण झाले आहे.तर महानगरांत सुद्धा गोडाचे पदार्थ,नवे कपडे हे आता केव्हाही उपलब्ध असल्याने  दसरा दिवाळी तर आता रोजच साजरी केली जाऊ लागलीये.अगदी ऋण काढूनसुद्धा सण साजरे केले जाताहेत!फार कशाला,उच्चभ्रू लोकांच्या वर्तुळात छोटंसंही निमित्त झालं की ते साजरं करण्यासाठी नित्य सोहोळे आयोजित केले जाताहेत,त्याला आमंत्रित केल्या जाणाऱ्या पाहुण्यांची यादीही अर्थात भलीमोठी !पाहुणचाराची  रीतही तितकीच भपकेबाज!मुळातच उत्तर भारतात आग्रह करकरून पाहुणचार केला जातो  !

मुंबई आणि दिल्ली ही दोन्ही सर्वस्वी भिन्न प्रकृती असलेली शहरं.आहेत.दोन्ही ठिकाणच्या लोकांची मानसिकता,आचार-विचार,रहनसहन,खाणेपिणे पार वेगळे आहेत.आगत-स्वागताच्या पद्धतीत जमीन-आसमानाचा फरक आहे.दिल्लीत अभ्यागताला आत बसवून प्रथम पाणी दिलं जातं-मग तो सर्वस्वी अनोळखी का असेना! कुणाला आल्यावर पाणीही नं विचारणे हा उत्तर भारताचा धर्म नाहीं. पाठोपाठ चाय-नाश्ता-त्यात किमान नमकीन व बिस्किटे -विपन्नावस्थेतला मनुष्य सुद्धा किमान एवढे आदरातिथ्य करतोच करतोआणि घरी आलेल्याला आग्रह करकरून जेवायला घालायची उत्तर भारताची पद्धत आहे-जेवायला नं घालता सहसा कोणाला पाठवलं जात नाहीं. "आता जेवूनच आला असाल...पुढच्या वेळी आलात की चहा घेऊनच जा" असला दळभद्री क्षुद्रपणा इथे नसतो.किंबहुना असल्या विचारांच्या नरपुंगवांना इथे कायमचं वाळीत टाकलं जाईल.अगदी आजच्या काळातही चारसहा शेजाऱ्यांचे एकमेकांकडे अघलपघळ बोलणे-जाणेयेणे,घरात काही चांगला पदार्थ केल्यावर शेजार-पाजारच्या दोन-तीन घरांत तो देणे वगैरे इथे सुखेनैव चालते.हिंदी सिनेमातली त्यागमूर्ती आई क्लास/युनिव्हर्सिटी इथे पहिल्या आलेल्या आपल्या मुलाला जो पदार्थ मोठ्या कौतुकाने  आणि प्रेमभराने खाऊ घालते तो गाजराचा हलवा हा उत्तर भारतात मोठ्या अपूर्वाईनं करायचा पदार्थ आहे.तो खूप करायचा,आणि शेजारी-पाजारी,अभ्यागतांना सगळ्यांना द्यायचा !तीच गोष्ट थंडीच्या दिवसांत केल्या जाणाऱ्या 'सरसोंका साग-मक्के की रोटी ' या पदार्थाची !तो एव्हढासाच करायचा प्रकार नोहे!    

अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट!पर्यावरण दिन आणि  वटपौर्णिमा एकाच दिवशी आल्याचे औचित्य साधून महाराष्ट्रातल्या एका लहान गावात पर्यावरणावर प्रबोधनपर कार्यक्रम करायला म्हणून मी एका स्नेह्यांबरोबर गेले होते,तेव्हा गावातल्या एका माऊलीनं,त्यांच्या  शेतातली वांगी तोडून छान चुलीवरची गरमगरम भाजी-भाकरी खाऊ घातली होती.आम्ही बरेच लोक होतो,तरीही काही शेजारणींच्या मदतीनं त्या माऊलीनं सहज इतक्या जणांचा स्वयंपाक केला होता.बोलता बोलता गावातल्या एका तरुणानं सांगितलं ,की तो अशाच एका प्रबोधनपर कार्यक्रमाच्या निमीत्तानं मुंबईला कुणा बाईंकडे गेला होता , तेव्हा त्यांच्याकडे पाहुणचार झाला तो कपभर चहा आणि चार बिस्किटं असा!तेव्हा पाहुणचार हा व्यक्तिसापेक्ष असण्यापेक्षा स्थलसापेक्ष आहे,हे मला उमगलं !मला आठवला एक प्रसंग ,जेव्हा दिल्लीत माझ्या लेखाच्या खालचा माझा पत्ता वाचून महाराष्ट्रातल्या एक तरुण कलाकार बाई आपल्या सातवी आठवीतल्या मुलाला घेऊन अवचित माझ्याकडे आल्या आणि मी तुमच्याकडे आठ दिवस राहिले तर चालेल ना,विचारू लागल्या.!त्यांच्या आंघोळी,नाश्ते सगळं झकास विलम्बलयीत सुरू होतं ,आम्ही आणि आमचं महानगर अतिद्रुतलयीत धावत होतं. त्यांचं सर्व  नीट आटोपल्यावर सन्मानानं मी त्यांना अन्यत्र पोहोचतं केलं !त्यांच्या प्रश्नावर माझी मान होकारार्थी हलतेय की  नकारार्थी  हे मला तेव्हा कळलं नव्हतं !आताही नाही!पाहुणचार हा व्यक्तिसापेक्ष असण्यापेक्षा स्थलसापेक्ष आहे हे मात्र महानगर निवासी म्हणून मला पुरतं आकळलं आहे!
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------रश्मी घटवाई 
०९८७१२४९०४७

Thursday, May 26, 2016

Ill EFFECTS of SMOKING:जळो मेली ती सिगरेट!

जळो मेली ती सिगरेट!

तारीख: 19 May 2016 23:22:18

परवा सहज म्हणून टीव्हीवर चित्रपट लावला तर क्षणोक्षणी धूम्रपान स्वास्थ्य के लिये हानिकारक है, धूम्रपान से कॅन्सर होता है हा संदेश झळकू लागला. काही वेळानं तर त्या दृश्याचं प्रमाण इतकं वाढलं की सिनेमा आहे की धूम्रपानाविषयीची डॉक्युमेंटरी ह्याबद्दल मनात संभ्रम उत्पन्न झाला. कोणे एके काळी, चांगल्या सुसंस्कृत घरातली मुले माणसे व्यसनांपासून चार हात लांब असायची. सुसंस्कृत नसलेल्यांसाठीही धूम्रपान ही चोरून, लपून छपून करण्याची गोष्ट होती आणि धूम्रपान करणार्‍याच्या मनात ही अपराधी भाव असायचे. शिवाय त्याच्यावर बिघडला, वाया गेला, म्हणून संस्कारशून्यतेचा शिक्का बसायचा. विशुद्ध शाकाहारी, सुपारीच्या खांडाचेही व्यसन नसलेली सुसंस्कारी पिढी बघता बघता लुप्त झाली आणि आता हाताच्या बोटांवर मोजता येतील, असे सन्माननीय अपवाद वगळले, तर पौगंडावस्थेत असलेली मुले म्हणू नका, मोठी माणसे म्हणू नका, श्रीमंत म्हणू नका, गरीब म्हणू नका -ज्याला बघावे तो आणि तोच काय, मोठ्या संख्येत ती सुद्धा -उच्चभ्रूपणाच्या खोट्या कल्पनेच्या आहारी जाऊन सिगरेटच्या धुराची वर्तुळं सोडण्यात स्वत:ला धन्य -धन्य मानताना दिसताहेत, स्मोकिेग ऍण्ड ड्रिंकिंग हे तथाकथित स्टेटस् सिम्बॉल, उच्चभ्रू राहणीमानाचा मापदंड आणि मानदंड असल्याच्या भ्रामक समजुतीत नवतरुणाई अलगद व्यसनांच्या विळख्यात सापडली आहे. इतकी की आज शाकाहारी, सुसंस्कृत उपवर मुलींसाठी लग्नासाठी शाकाहारी, दारू-सिगरेटचं व्यसन नसलेला मुलगा शोधणं त्यांच्या पालकांसाठी अवघड झालेलं आहे आणि त्याप्रमाणे सन्माननीय अपवाद असलेले सुशिक्षित, शाकाहारी आणि निर्व्यसनी तरुण मुलांचे आईवडील, मुलांसाठी सुशिक्षित, शाकाहारी आणि निर्व्यसनी मुलीच मिळत नाहीयेत म्हणून व्यथित आहेत. पण हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाला बंदी आहे खरी; पण ती असून नसल्यासारखीच!
गुलजार यांची ‘दिल से ’ क्षमा मागून म्हणेन की जिया जले जान जले, नैनोंतले धुआ चले, धुआ चले, रातभर धुआ चले, या वर्णनाला चपखल बसेल असे वर्तन करीत, क्या कूल हैं हम या भ्रमात सिगरेटच्या धुराची वलयं हवेत उडवणार्‍या समस्त तरुणाईला कदाचित हे ठावूक नाहीये की त्या व्यसनाची परिणती अंग अंग में जलती है दर्द की चिंगारीयॉं अनुभवण्यात होईल! सिगरेट ओढण्यापायी दौलत और जवानी इक दिन खो जाती है याचा प्रत्यय येईल! हर फिक्र को धुए में उडाता चला गया, असे म्हणत बेफिकीरीने वागणार्‍याला पुढे त्याच्याच बर्बादीयोंका जश्‍न मनवावा लागेल!
३१ मे रोजी जगभर नो टोबॅको डे साजरा केला जातो. ओरल हेल्थ हे इंडियन डेण्टल असोसिएशन प्रकाशित करीत असलेलं नियतकालिक. त्यांचा मे २०१५ चा विशेषांक ह्याच विषयाला वाहिलेला असल्यानं अर्थातच सिगरेट ओढण्यापायी होणारे दुष्परिणाम, तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम यावर त्यात विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे. त्यांच्या मते जगात आज ११० करोड (१.१  billion ) लोक सिगरेट ओढ्तात, २०२५ साली ही संख्या १६० करोड (१.६ billion )झालेली असेल. एकट्या चीनमध्ये ३० करोड लोक दर मिनिटाला ३० लाख, वर्षाला (१.७ trillion ) (एकावर बारा शून्य)- एवढ्या सिगरेटी ओढतात. सबंध जगात दर मिनिटाला एक करोड तर दररोज १५ अब्ज सिगरेटी ओढल्या जातात. आकडेवारी किती किळसवाणी आणि लाजिरवाणी आहे बघा! कारण कॅन्सर आणि मृत्यू ही त्याची निश्‍चित परिणती आहे! शिकलेली माणसेही धूम्रपान करतात, मग त्यांना शिक्षित तरी का आणि कशाच्या आधारावर मानायचं? सिगरेटच्या धुरामध्ये निकोटिन, टार, फॉर्मल्डीहाईड, बेन्झिन, आर्सेनिक, कॅडमियम, पोलोनियम, क्रोमियम, कार्बन मोनॉक्साइड ही, ज्यांच्यामुळे कॅन्सर होतो, अशी ६९ घातक रसायने आणि त्याशिवाय आणखी, अशी एकूण ४००० पेक्षाही घातक रसायने असतात. निकोटिनमुळे addiction-सिगरेटची सवय लागते. एका सिगरेटमध्ये ८ ते ९ मिलीग्राम निकोटिन असतं. (सिगार मध्ये १०० ते २०० मिलीग्राम, काहींमध्ये चक्क ४०० मिलीग्राम ) एकत्रितपणे ४-५ सिगरेट मधलं निकोटिन मनुष्याला यमसदनी धाडण्यास पुरेसं असतं. बेन्झिनमुळेacute myeloid  luekemia होतो. तंबाखू सेवनामुळे आणि धूम्रपानामुळे कॅन्सर होतो. जगात तंबाखू सेवनामुळे वा धूम्रपानामुळे दर आठव्या सेकंदाला एक आणि वर्षाला ५० लाख लोक मृत्युमुखी पडतात. भारतात ४० टक्के कॅन्सर तंबाखू सेवनामुळे आणि धूम्रपानामुळे होतो. भारतात दरवर्षी १० लाख लोकांना कॅन्सर असल्याचं निदान होतं -अधिकतम आकडा २५ लाख आहे, त्यापैकी सहा ते सात लाख कॅन्सरग्रस्त लोक दरवर्षी मृत्युमुखी पडतात. मोठ्या माणसांच्या मृत्यूच्या आकडेवारीकडे पाहिलं, तर ६ टक्के मृत्यू कॅन्सरमुळे होतात, तेही ३० ते ६९ या वयात. त्यातही पुरुषांमध्ये फुफ्फुसाचा आणि तोंडाचा कॅन्सर होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे, तर स्त्रियांमध्ये स्तनांचा कर्करोग आणि गर्भाशय-ग्रीवेचा कर्करोग होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे, असं ते जर्नल सांगतं.
काही दिवसांपूर्वी मी दिल्लीत दोन नाटकं लिहून दिग्दर्शित करून प्रस्तुत केली, त्यांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरने पीडित असलेल्या, औषधोपचार सुरू असलेल्या १५ रुग्ण स्त्रियांनी अभिनय केला. (अशा प्रकारचा हा कदाचित पहिलाच प्रयोग असावा! हा पुन्हा स्वतंत्र लेखाचा विषय!) त्यांच्या तालमी दरम्यान त्यांच्या व्यथा मी जवळून पहिल्या. त्या सर्वांच्या मते कॅन्सर हा रोग रुग्णाला आपलं तन-मन-धन अर्पण करायला लावतो- त्यातही धन अधिक!
म्हणजे बघा, तथाकथित उच्चभ्रू हे विशेषण मिरवण्यासाठी धूम्रपान करणारा आधी सिगरेटवर आपला पैसा उधळतो, सिगरेट बनवणार्‍या कंपन्यांना श्रीमंत करतो, नंतर कॅन्सर झाल्यावर लाखो रुपये औषधोपचारांवर, हॉस्पिटलवर उधळतो आणि हॉस्पिटल्सना, डॉक्टरांना श्रीमंत करतो! सारासार विवेकबुद्धी जागृत असलेला कुठला मनुष्य असले आतबट्‌ट्याचे व्यवहार करील?
सिगरेटच्या धुरामध्ये सिगरेट ओढणार्‍याच्या वाट्याला कॅन्सर येतो, अशी ६९ घातक रसायने येत असतील; तर सिगरेट न ओढताही त्याच्या बाजूला नुसते उभे राहूनसुद्धा, त्या धुरामध्ये, कॅन्सर होतो, अशी ५० घातक रसायने-त्यातली ११ ग्रूप १ कॅर्सिनोजेन-कॅन्सर होण्यास तीव्रपणे कारणीभूत ठरणारी - या सदरात मोडतात, वाट्याला येतील. ओढल्या जाणार्‍या सिगरेटपेक्षाही (Mainstream smoke ) अधिक प्रमाणात टॉक्झिन्स, विषारी द्रव्य जळत्या सिगरेटच्या धुरात असतात, तो धूर चौपट विषारी असतो. पावसाळ्या-हिवाळ्यात जेव्हा हवा स्थिर असते आणि तेव्हाच धूम्रपान करणारे खूप जास्त प्रमाणात धूम्रपान करीत असतात, अशा वेळी हवेत ही घातक रसायनं दीर्घकाळ राहातात, साहजिकच अनेकांना श्‍वसनाचे विकार जाणवतात. प्रखर उन्हात तर हवेतले अनेक प्रदूषणकारी घटक (Primary Pollutants)आपसांत संयोग पावून आणखी नवे विषारी पदार्थ Secondary Pollutants) निर्माण करतात. पर्यावरणाच्या दृष्टीने तर ते खूपच घातक आहे.
सिगरेट ओढणार्‍याच्या नुसते बाजूला अथवा जवळपास उभे राहणे -त्याला पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात -हे पॅसिव्ह स्मोकिंग किंवा अप्रत्यक्ष धूम्रपान तर भयंकर वाईट! प्रत्यक्ष सिगरेट ओढणार्‍याच्या आयुष्यातली दहा मिनिटं जर प्रत्येक सिगरेटगणिक कमी होत असतील, तर अप्रत्यक्ष धूम्रपानाचा त्रास सहन करणार्‍याच्या आयुष्यातली किमान पाच मिनिटं तरी कमी व्हावीत! धूम्रपान न करणार्‍या व्यक्तीलाही अप्रत्यक्ष धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचा धोका उदभवू शकतो, श्‍वसन मार्गाचे विकार, हृदयविकार आणि अन्य आजार होऊ शकतात. मोठ्यांची ही गत; तर घरातल्या पाळीव प्राण्यांना आणि लहान मुलांना सिगरेट ओढणार्‍या वडीलधार्‍यांमुळे अप्रत्यक्ष धूम्रपानाचा किती त्रास होत असेल, याची कल्पनाच केलेली बरी! त्यांना अस्थमा, श्‍वसन मार्गाचे विकार, अशा समस्यांना सामोरे जावे लागते, वाढीच्या काळात अनेक घातक रसायने अप्रत्यक्षरीत्या धुरातून शरीरात गेल्याने मेंदूची वाढ, शारीरिक वाढ खुंटते. न जन्मलेल्या बालकांवर तर कित्येक अधिक पटीने ह्या रसायनांचा घातक परिणाम होतो. आज स्ट्रेस, कामाचा ताण किंवा निव्वळ सवयीपोटी धूम्रपान करणारे भावी वडील, आपल्या पुढच्या पिढीनी थेट आयआयटीतच प्रवेश घेतला पाहिजे असं स्वप्न बघतात, तेव्हा आपण स्वत: त्यात अंशत: खोडा घालण्याचं महापातक आताच करतो आहे, हे त्यांच्या गावीही नसतं! भारतात आता तर मुलेच काय, मुलीही आपल्या प्रगत असण्याचं द्योतक मानून मोठ्या हौसेनी अपेयपान आणि धूम्रपान करू लागल्याहेत-कदाचित त्यांच्यालेखी स्त्रीमुक्ती, स्त्री पुरुष समानता वगैरे हेच (एकमेव) असावे! त्याची परिणती म्हणजे भारतात ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाचा कॅन्सर होण्याच्या प्रमाणामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी! बीजच जर खराब असेल तर त्यातून चांगले सकस वाण कसे निपजणार? आणि आई -वडील दोघेही अपेयपान आणि धूम्रपान करणारे म्हटल्यावर पुढच्या पिढ्या कशा असतील, संस्कारांची परिभाषा काय (उरलेली) असेल,याचा विचार न केलेलाच बरा!
समाजाच्या भल्याचे एक व्रत म्हणून, मी रिक्षा, ऑटोरिक्षा चालक जर धूम्रपान करीत असेल किंवा तंबाखू सेवन करीत असेल तर आवर्जून त्यांना त्याचे दुष्परिणाम समजवून सांगते आणि तेही प्रामाणिकपणे सांगतात, की आम्हाला हे माहीतच नव्हतं! आता यापुढे आम्ही नाही धूम्रपान करणार! जानेवारी महिन्यात नोएडामध्ये आमच्या भारत पेट्रोलियम हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये काम करणार्‍या सुमारे १५-२० सफाई कर्मचार्‍यांना मी धूम्रपान आणि मद्यपानाचे दुष्परिणाम समजावून सांगितले तेव्हा त्यांनी आपल्या मुलाबाळांची शपथ घेऊन धूम्रपान आणि मद्यपान सोडल्याचं जाहीर केलं. मग मी त्यांच्यासाठी एक नाटक लिहिलं, दिग्दर्शित केलं आणि त्यात त्या १५-२० सफाई कर्मचार्‍यांनी -ज्यांनी कधी नाटकात काम केलं नव्हतं, कित्येक तर अशिक्षित होते आणि निव्वळ ऐकूनच त्यांनी आपले संवाद पाठ केले होते, त्यांनी अतिशय सरस अभिनय करीत भारत पेट्रोलियमच्या चाळिसाव्या वर्धापन दिनानिमित्त नोएडामध्ये झालेल्या मोठ्या कार्यक्रमात प्रेक्षकांना धूम्रपान, तंबाखू सेवन, मद्यपान यांचे दुष्परिणाम सांगून व्यसनमुक्तीसाठी जहां चाह है, वहां राह है अशी ग्वाही दिली. आता आपापलं काम सांभाळून मी आणि आमचे हे सफाई कर्मचारी नोएडामध्ये धूम्रपान, तंबाखू सेवन, मद्यपान यांचे दुष्परिणाम समजावून सांगत ते नाटक प्रस्तुत करणार आहोत!
एवढे सगळे वाचून एखाद्याने (एखादीने पण ) जरी जळो मेली ती सिगरेट! (खरं म्हणजे न जळो ) म्हणत हातातली जळती सिगरेट विझवली आणि त्या विषापासून स्वत:ला नी इतरांना दूर ठेवण्याचा संकल्प केला, तरी भरून पावले, असं समजेन!
You Tube links:
जहां चाह है, वहां राह है नाटक सादर करताना सफाई कर्मचारी.
- रश्मी घटवाई