सण
-रश्मी घटवाई
"सणावाराचं महत्व या पिढीला केव्हा कळणार कोण जाणे!"काळजीच्या सुरात स्वत:शी पुटपुटत देवबाईंनी रांगोळीचे ठिपके काढायला सुरुवात केली.ही कासवाच्या पाठीची नऊ ते एक ठिपक्यांची रांगोळी त्यांची अगदी आवडती होती.महालक्ष्मीची पूजा करायची असली की त्या ती आवर्जून काढत.त्यातला थ्री-डी इफेक्ट त्यांच्यातल्या रसिक कलाकाराला प्रत्येक वेळी खिळवून ठेवत असे.
त्या विज्ञानाच्या शिक्षिका होत्या.कालच त्यांच्या शाळेत "इम्पाँर्टन्स आँफ फेस्टिवल्स इन इंडिया", "भारत में त्यौहारों का महत्व" या विषयावर नववी -दहावीच्या विद्या्र्थ्यांसाठी वक्त्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती आणि त्या,त्या स्पर्धेच्या परीक्षिका होत्या.बहुतेक विद्या्र्थ्यांनी आंतरजालावरून माहिती घेऊन घोकंपट्टी करून जशीच्या तशी सादर केलेली जाणवत होती.काहींनी विषयाचा विपर्यास करून "इम्पाँर्टन्ट फेस्टिवल्स आँफ इंडिया" अशी भारतात साजरया् होणारया् प्रमुख सणांची जंत्रीच प्रस्तुत केली होती. सणाच्या मूळ संकल्पनेऐवजी तो सण साजरा करण्याच्या पद्धतीला,बाह्यरूपालाच ही पिढी सण मानते आहे ,हे क्षणोक्षणी जाणवत होतं॰ह्या पिढीला सण कसे साजरे केले जातात,हे सांगण्याची आणि सोदाहरण दाखवून देण्याची जबाबदारी सर्वस्वी मुलांच्या आईवड़िलांची,घरातल्या वडीलधारयांची आहे;पण कुठेतरी ते कमी पडताहेत,हे त्यांना स्वच्छ दिसत होतं॰एकूणच तो वैचारिक उथळपणा जाणवून त्यांचा जीव कासावीस होऊ लागला होता॰
महाराष्ट्रातल्या एका लहान शहरातून त्या अजस्त्र महानगरात देवबाई पंचवीस वर्षांपूर्वी लग्न होऊन आल्या होत्या॰ सणावाराचे लहानपणातले संस्कार त्यांच्यात रुजलेले होते॰या हिंदीभाषिक महानगराच्या चालीरीती वेगळयाच होत्या॰तिथे मूठभर मराठी भाषिक होते;पण तेही विखुरलेले!देवबाईंनीच पुढाकार घेऊन चार-दोन मराठी कुटुंबांना एकत्र आणून गणेशोत्सव साजरा करायला,स्वत:च्या मुलांसकट त्या मराठी कुटुंबांतल्या लहान मुलांनासुद्धा किमान गणपतीची आरती आणि रामरक्षा यावी म्हणून संस्कारवर्ग चालवायला सुरुवात केली होती॰मात्र पंचाईत अशी होती,की या हिंदीभाषिक महानगरात कुठल्याच मराठी सणाच्या वेळी;फार काय,गणेशचतुर्थीचीही कुणालाच सुट्टी नसायची!इतकंच काय,ऐन गणेशोत्सवात या महानगरातल्या मुलांच्या परीक्षा सुरू असल्यानं मुलं नी त्यांचे पालक कालांतरानं येईनासे झाले होते आणि मग गणेशोत्सवाची जबाबदारी जणू काही त्यांची एकटीची होऊन बसली होती॰तरीही नं कुरकुरता नेटानं त्या इतकी वर्षं आपली आणि मुलांची शाला,नवरयाचं ऑफिस असं सर्व सांभालून ती जबाबदारी पार पाडत होत्या॰मुलं आता मोठी झाली होती॰मोठा मुलगा इंजीनियर होऊन दोन वर्षांपूर्वी अमेरिकेला नोकरीसाठी गेला होता॰धाकटी मुलगीही पदवीपर्यंतचं शिक्षण घेऊन नुकतीच नोकरीला लागलेली होती॰
”आता पुढच्या वर्षी दोघांचीही लग्न उरकून,शालेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन या व्यापांत मन अधिक गुंतवू,“देवबाईंनी विचार केला॰रांगोळी काढ़ता काढ़ता त्यांनी लेकीला हाक मारली॰आज अनायसे रविवारची सुट्टी होती,तेव्हा लेकीला हाताशी घेऊन,कुलाचार नसला तरी घरातल्या घरात महालक्ष्मीची पूजा करू,नैवेद्यासाठी पदार्थ करायला शिकवू,असा त्यांनी विचार केला॰इतकी वर्ष घरात नुसतं अभ्यासाचं वातावरण होतं,हे सर्व शिकवू म्हटलं,तरी लेकीला शिकायला वेळच नव्हता॰”किती भर्र्कन मोठी झाली ही,आताआता पर्यंत वाटत होतं लहान आहे॰पण उद्या सासरी गेली की कसं होणार हिचं! म्हणतील;आईनं काहीच शिकवलं नाही,”देवबाईंना काळजी वाटू लागली॰
“आई ,झोपू दे नं गं थोडावेळ!काल किती दमून आले होते मी,झोपायला उशीर नव्हता झाला का मला?”झोपेतच त्यांची लेक कुरकुरली आणि तोंडावर पांघरूण ओढून,कूस बदलून पुन्हा झोपी गेली॰काळजी,नाराजी,सात्विक संताप सगळ मनातल्या मनात ठेवीत रांगोळी संपवून देवबाई दुसरया कामाला लागल्या... “तिचं पण काय चुकतंय म्हणा!ह्या महानगरात गलेकापू स्पर्धा आहे!अभ्यासाच्या स्पर्धेत बालपण सरलं आणि आता नोकरीच्या स्पर्धेत धावायला सक्षम करायच्या नादात आपणच तिला एमबीएची तयारी करायला म्हणून ऑफिस संपल्यावर कोचिंग क्लासला जाण्याचा पर्याय निवडायला लावला!झोप सुद्धा पूर्ण होत नाही बिचारीची!”देवबाईंच्या मनात लेकी बद्दल कणव दाटून आली॰”खरी चूक आपल्याच पिढ़ीची आहे... आपण ह्या वर्तमान पिढ़ीकडून भूत आणि भविष्य अशा दोन्हींची अपेक्षा करतो आहोत॰त्या आपल्याच मनाशी बोलू लागल्या॰
“आई,सरप्राईज़!”हॉल मधला घणघणत असलेला फोन त्यांनी कणिक भिजवता भिजवता उचलला,तेव्हा पलीकडून त्यांच्या मुलाचा उत्साहानं ओसंडून वाहणारा आवाज देवबाईंच्या कानी आला॰पाठोपाठ डोअरबेल वाजली॰”थांब,बाबा मॉर्निंग वॉक घेऊन आलेले दिसताहेत,मी जरा दार उघड़ते आणि मग तुझ्याशी बोलते!”त्यांनी फोनचा रिसीव्हर खाली ठेवला आणि तसंच खरकटया हातांनी दार उघडलं॰दाराबाहेर त्यांचा मुलगा उभा होता॰त्याच्याबरोबर एक विदेशी मुलगीही उभी होती॰त्या बुचकळयात पड्ल्या॰आत या असं म्हणण्याचंही त्यांना सुचलं नाही॰
“आई,ही अँजेलिना!तू तिला अंजली किंवा लीना म्हणू शकतेस!पण अशी बुचकळयात पडू नकोस॰ती तुझी भावी सून आहे !” त्यांचा मुलगा त्याच उत्साहात म्हणाला॰”म्हणजे आपल्या मुलानं ह्या अमेरिकन मुलीशी लग्न करायचं ठरवलंय!आता हयांची प्रतिक्रिया काय असेल देव जाणे!आपण काय करावं?”निमिषार्धात त्यांच्या मनात शेकडो विचार आले॰
”आई,नमस्ते!” अमेरिकन उच्चारात अँजेलिनानं त्यांना हात जोडून आणि नंतर वाकून नमस्कार केला,तेव्हा देवबाई भानावर आल्या॰”मुलांच्या पंखात बळयावं,त्यांनी आकाशात भरारी घ्यावी ,म्हणून आपण आयुष्यभर प्रयत्नशील राहिलो॰आता ते आकाशात स्वच्छंद विहार करायला तयार झाले असताना आपण त्यांचे पंख का छाटावेत?मन छोटं का करावं”त्यांनी विचार केला॰
”ये,आत ये!या” प्रसन्न चेहरयानं मोठ्या उत्साहानं देवबाईंनी दोघांचं स्वागत स्वागत केलं!
”आई छान रंगोली!” अमेरिकन उच्चारात अँजेलिना म्हणाली,“मला पण शिकवाल का?मला भारतीय सण खूप आवडतात,तो माझ्या अभ्यासाचा विषय आहे॰’भारत में त्यौहारों का महत्व’ यह मेरे रिसर्च का विषय है।”ती अस्खलित हिंदीत म्हणाली॰ देवबाईंच्या मनातलं उरलं सुरलं मळभ दूर झालं॰पाठीमागे मॉर्निंग वॉक घेऊन आलेले त्यांचे पती उभे होते॰”अहो असे काय वेंधल्यासारखे उभे आहात!आपला लेक आणि सून आले आहेत!चला या,जोड़ीनं त्यांचं स्वागत करूया!”त्या त्यांना म्हणाल्या॰
रांगोळीचे रंग आता अधिक सुंदर दिसत होते आणि घरादारावर सणाच्या मंगल वातावरणाचा प्रसन्न शिडकावा झाला होता॰
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------
-रश्मी घटवाई
09871249047
No comments:
Post a Comment