Monday, May 12, 2014

प्रबुद्ध हो
-रश्मी घटवाई 

ह्या संसारचक्रात गुरफटलेल्या जीवांना जरा-मरण, दु:खांपासून मुक्ती देण्यासाठीचं,संसार-तापांपासून मुक्ती मिळवण्यासाठीचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी,आपला नवजात शिशु राहुल आणि पत्नी यशोधरा ह्यांचा त्याग करून,सिंहासनाचा लोभ-मोह त्यागून राजपुत्र सिद्धार्थ तपश्चर्येसाठी जंगलात निघून गेला. शाक्य -नरेश शुद्धोधन आणि त्याला जन्म देऊन मृत्यू पावलेली त्याची माता महामाया ह्यांचं वैशाख पौर्णिमेच्या दिवशी जन्मलेलं अपत्य प्रबुद्ध साधू -परिव्राजक होईल असं भाकीतही त्याच्या नामकरणाच्या वेळी करण्यात आलं होतं.ज्ञान प्राप्त करण्यासाठी सिद्धार्थ गौतमानं कठोर तपश्चर्या केली. वैशाख पौर्णिमेच्या रात्री,वटवृक्षाखाली ध्यान लावून बसलेल्या सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्ती झाली,बोध प्राप्त झाला.बोध झालेला,म्हणून तो बुद्ध म्हणवला गेला. ज्या वृक्षाखाली त्याला बोध प्राप्त झाला,तो बोधी वृक्ष म्हणवला गेला.ज्या स्थानी त्याला बोध प्राप्त झाला,ते गया ह्या स्थानाच्या समीपवर्ती स्थान बोधगया म्हणून ओळखलं गेलं .शाक्यांची राजधानी कपिलवस्तूपासून जवळ असलेलं,इसवी सनपूर्व ५६३ वर्षे ते इसवी सनपूर्व ४८३ वर्षे ( 563 BCE- 483 BCE)-ह्याबद्दल मतभिन्नता आहे - ह्या काळात गौतम बुद्धाचा जन्म जिथे झाला ते स्थान लुम्बिनी (जे नेपाळमध्ये आहे ), ज्या स्थानी त्याला बोध प्राप्त झाला,ते स्थान बोधगया, बोधप्राप्ती नंतर गौतम बुद्धानं जिथे आपल्या पाच अनुयायांना धर्माची शिकवण दिली ,ते स्थान सारनाथ आणि इसवी सनपूर्व ४८३ वर्षे(483 BCE)  किंवाइसवी सनपूर्व ४११-४०० वर्षे -( 411 BCE  - 400 BCE )ह्याबद्दल मतभिन्नता आहे -ह्या काळात,ऐंशी वर्षे वयाच्या गौतम बुद्धाचं जिथे महानिर्वाण झालं,ते स्थान कुशीनगर ही चार ठिकाणं गौतम बुद्धाबद्दल,बुद्धाच्या शिकवणुकीबद्दल, बुद्धधर्माबद्दल आस्था असलेल्या जगभरातल्या लोकांसाठी परमश्रद्धेय आहेत.  

गौतम बुद्धानं बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त केल्यानंतर बोधीवृक्षाखाली चार आठवडे धर्माच्या स्वरूपाबद्दल चिंतन -मनन केल्यानंतर बुद्धधर्माच्या प्रचार-प्रसारार्थ प्रस्थान केलं.आषाढ पौर्णिमेला काशीनगरीजवळ मृगदाव(आताचं सारनाथ )ह्या स्थानी येऊन पोहोचल्यानंतर गौतम बुद्धानं तिथेच मृग उद्यानातल्या पिंपळाच्या झाडाखाली आपल्या पाच भिक्षु अनुयायांना धर्माची शिकवण दिली.त्यानंतरच्या काळात त्यांना धर्माच्या प्रचार-प्रसारार्थ पाठवलं.गौतम बुद्धाने दिलेला हा पहिला धर्मोपदेश म्हणूनच 'सारनाथ' ह्या स्थानानं जणू आजही निज हृदयी धारण केलेला आहे. 

मार्च महिन्यामध्ये मी वैयक्तिक कारणाने वाराणसीला गेले होते,तेव्हा सारनाथ मधल्या रिझॉर्टमध्ये पाच दिवस माझा मुक्काम होता.वाराणसी आणि सारनाथ म्हणजे दिल्ली आणि नोएडा अथवा हैद्राबाद आणि सिकंदराबाद सारखी जोड-शहरं(ट्विन सिटीज् )आहेत. अनंतहस्ते कमलाकराने देता किती घे घेशील दो करांनी तशी माझी गत झाली,इतकं काही वाराणसी आणि सारनाथ ह्या दोन ठिकाणांंजवळ आहे . दोन्ही स्थानांचं महात्म्य अपरंपार!

धर्मचक्र प्रवर्तन सूत्र (पाली मध्ये Dhammacakkappavattana Sutta- धम्मचक्क पवत्तन सुत्त) हा पूर्वी सोडून गेलेल्या आपल्या पाच सहयोगी संन्यासी अनुयायांना सारनाथ येथील इषिपतनच्या मृगदायवनात गौतम बुद्धाने दिलेला पहिला धर्मोपदेश!गौतम बुद्धाने त्या पाच परिव्राजकांना भिक्खु असं संबोधलं.जगामध्ये दु:ख आहे,हे दु:ख नाहीसे कसे होईल,ह्याचे विवेचन करताना गौतम बुद्धाने सदाचाराचा मार्ग अष्टांग मार्ग सांगितला. १. सम्यक दृष्टी २. सम्यक  संकल्प ३. सम्यक वाचा ४. सम्यक कर्म ५. सम्यक  आजीविका ६. सम्यक व्यायाम ७. सम्यक स्मृती व ८. सम्यक समाधी  ही ती  आठ सदाचाराची साधने.हा अष्टांग मार्ग म्हणजेच मध्यम मार्ग.आत्यंतिक सुखभोगाचे जीवन किंवा आत्यंतिक आत्म्क्लेशाचे जीवन अशी दोन्ही आत्यंतिक टोके नाकारून गौतम बुद्धाने मध्यम मार्ग अनुसरण्यास सांगितले.चांगल्या जीवनाचे  अनुसरण करण्यासाठी जीवनाची पाच तत्वे म्हणजे पंचशील अंगी बाणवली पाहिजेत,ती म्हणजे १. अहिंसा -कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा  न  करणे २. चोरी न करणे किंवा दुसरयाची वस्तू न बळकावणे ३. व्यभिचार न करणे ४. असत्य न बोलणे आणि ५. अपेयपान न करणे म्हणजे मादक पेय न ग्रहण करणे

गौतम बुद्धाने दिलेली ही शिकवण खरे म्हणजे बुद्धधर्माचा पाया आहे. काही सन्माननीय अपवाद वगळता बुद्धधर्माचे पाईक दुर्दैवानी ही शिकवण अंगी बाणवताना आढळत नाहीत. "यः धारयति , स: धर्म:।" धर्म हा अंगी बाणवण्याची,आचरणात आणण्याची गोष्ट आहे,एवढे जरी लक्षात आले, तरी मनुष्य प्रबुद्ध झाला,असे समजायला हरकत नसावी . 
---------------
रश्मी घटवाई
०९८७१२४९०४७ 




No comments: