Saturday, June 7, 2014

काश्मीर समस्या : मंथन 
 -रश्मी घटवाई 

काश्मीर हे भारताचं नंदनवन आहे.विधात्यानं ह्या भूभागाला सृष्टीसौंदर्य भरभरून दिलं आहे.मात्र ह्या वैभवाला दहशतवादाचं गालबोट लागलं आहे. काश्मीरमध्ये उघड आणि छुपी युद्धं तसेच रक्तरंजित दहशतवादी कारवायांनी शत्रूनं भारतमातेच्या देहावर केलेली जखम भळाभळा वाहताना उघड्या डोळ्यांनी तिच्या लेकरांना बघावी लागते आहे,नव्हे,हेतुत: ती जखम भळभळती रहावी म्हणूनही अनेक जण प्रयत्नशील आहेत;म्हणून भारतमातेची लेकरं कासावीस आहेत.

भारतमातेच्या अशाच काही सुपुत्रांनी काश्मीरवर आणि काश्मीर समस्येवर अत्यंत तळमळीने लेखन केले आहे.'जंग-ए- काश्मीर 'ह्या पुस्तकाचे लेखक कर्नल श्याम चव्हाण त्यांपैकीच एक. १९४८,१९६२ १९६५,१९७१ सालीं जी युद्धे काश्मीरमध्ये लढली गेली, लेखक स्वत: १९६२ १९६५,१९७१ च्या तिन्ही युद्धांत एक अधिकारी म्हणून लढले.त्यामुळेच 'जंग-ए- काश्मीर ' काश्मीर ह्या विषयावरचंसंस्मरणीय,संग्रहणीय लेखन म्हणून ओळखलं जावं.काश्मीरच्या प्राचीन इतिहासाबद्दल कर्नल श्याम चव्हाण पुस्तकात लिहितात-
"काश्मीरमध्ये असलेल्या सतीसर नावाच्या सरोवरात पार्वती नौकाविहार करीत असल्याची नीलमत पुराणातली आख्यायिका आहे. या सरोवराच्या काठावर नाग लोक राहत असत सरोवरातला जलोद्भव नावाचा राक्षस ह्या नाग लोकांना त्रास देत असे.या त्रासातून मुक्तता करण्याची नाग लोकांनी काश्यप मुनींना विनंती केली.त्यांनी वराहमुलम्(बारामुल्ला)येथे पर्वत फोडून सरोवर रिते केले.पाणी वाहून गेल्याने राक्षस मरण पावला.काश्यप मुनींनी सरोवर आटवून निर्माण केलेली भूमी म्हणून ह्या प्रदेशाला 'काश्यपमीर' असे नाव पडले.काश्यपमीरचे अपभ्रंशित रूप काश्मीर झाले.महाभारतात कश्मीरमंडल या भूमीचा उल्लेख आढळतो.प्राचीन काळी आर्यांपैकी, देखणे,गोरेपान व रेखीव चेहऱ्याचे,मजबूत शरीराचे  'खासास ' जातीचे लोक  काश्मीरच्या प्रदेशात रहात असल्याचे मानले जाते .चौदाव्या शतकापर्यंत काश्मीरमध्ये बुद्ध किंवा हिंदू राजांच्या राजवटी होत्या.त्या राजवटींचे वर्णन कल्हण पंडिताच्या 'राजतरंगिणी' ह्या संस्कृत ग्रंथात आढळते.कल्हणने अगदी प्राचीन काळापासून  ते इ. स. ११४८ (अकराशे अठ्ठेचाळीस)पर्यंतचा इतिहास लिहून ठेवला आहे. कल्हणाची परंपरा काही इतर कवींनी चालू ठेवली.अशांपैकी जीनाराजा याने इ. स.१४२०(चवदाशे वीस),श्रीधराने इ. स.१४८६ (चवदाशे शह्याऐंशी) आणि प्रज्ञा भटाने इ. स.१५८८(पंधराशे अठ्ठ्याऐंशी)पर्यंतचा इतिहास लिहून ठेवला आहे . 

"काश्मीरवर बौद्ध धर्माचे प्रभुत्व आले ते सम्राट अशोकाच्या कारकीर्दीत.काहींच्या मताप्रमाणे श्रीनगरची स्थापना सम्राट अशोकानेच केली(श्रीनगरी).इ. स.४० नंतर बौद्ध धर्माचा प्रसार चीन मध्ये वाढत गेला पण काश्मीरमध्ये त्याचा प्रभाव कमी होऊन तिथे पुन्हा ब्राम्हणी धर्म स्थापन झाला. पाचशे वर्षांनी हूणवंशीय मिहिरकुल हा काश्मीरचा सम्राट बनला."कर्नल चव्हाण लिहितात. 

http://gadyakosh.org ह्या संकेत स्थळावर भारत के इतिहास में हूण ह्यामध्ये रामचन्द्र शुक्ल ह्यांनी दिलेल्या विस्तारपूर्ण विवेचनात उल्लेख आहे-'भारतीय इतिहास में दो हूण राजाओंके  नाम आते हैं-तोरमाण और उसका पुत्र मिहिरगुल -अथवा संस्कृत लेखकोंके अनुसार मिहिरकुल.इसी मिहिरगुल का नाम एक रोमन लेखक ने गोलस लिखा है.'त्याच्या क्रौर्याबद्दल पण शुक्ल ह्यांनी विस्तृतपणे लिहिलंय. 

"मिहिरकुल अतिशय क्रूर आणि अत्याचारी होता.परंतु श्रीनगरच्या सिंहासनावर बसलेला पहिला काश्मीरी राजा म्हणून ओळखल्या जातो,तो ललितादित्य. त्याने इ.स.७२४ ते ७६० पर्यंत राज्य केले. काश्मीरच्या इतिहासातला हा सुवर्णकाळ मानला जातो.त्यानंतरचा राजा अवंतीवर्मा.त्याने इ. स .८५५ ते८८३ पर्यंत राज्य केले.तो पराक्रमी होता.आजचे अवंतीपूर त्यानेच वसवले. प्राचीन उपलब्ध इतिहासावरून कळते की एकंदरीत प्राचीन हिंदू राज्यांच्या काळात भरभराट होती आणि राज्यातील प्रजा समृद्ध जीवन जगत होती. इ.स.१३३९ मध्ये स्वातच्या (स्वात आता उत्तर पाकिस्तानात)शहामीरने काश्मीरवर स्वारी करून राज्य बळकावले.काश्मीरचा हा पहिला सुलतान.त्याच्या नंतर आलेल्या सिकंदरनं काश्मीरमधल्या हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले.पुढे चाक टोळ्यांनी काश्मीरमधल्या लोकांवर अनन्वित अत्याचार केले.या टोळ्यांपासून प्रजेची मुक्तता झाली,ती इ.स. १५८६ मध्ये अकबराची सेना तिथे पोहोचली,तेव्हा!इ.स. १७५२ मध्ये अहमदशहा अब्दालीने काश्मीरवर स्वारी केली आणि काश्मीरमधल्या हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. शिखांना मुस्लिमांच्या तावडीतून मुक्त करणाऱ्या महाराजा रणजीतसिंहानी इ.स. १८१९ काश्मिरी प्रजेलाही मुक्त केले,पण तोपर्यंत हजारो काश्मीरी हिंदूंना बाटवण्यात आले होते. महाराजा रणजीतसिंहानी  जम्मूच्या एका डोग्रा वारसदाराला -गुलाबसिंहाला जम्मूच्या गादीवर बसवले.गुलाबसिंहाने लदाख,स्कर्दू जिंकले,बाल्टीस्तान वर कब्जा मिळवला आणि गिलगीतही जिंकले.शीख सत्तेशी एकनिष्ठ नाही,म्हणून शिखांनी त्याला दंड केला, म्हणून त्याने इंग्रजांना मदत करायचे ठरवले. जबरदस्तीने बाटवण्यात आलेल्या त्याच्या मुस्लिम प्रजेनी इच्छा व्यक्त केल्यावर त्याने त्यांना पुन्हा हिंदू करण्याचे ठरवले ,पण कर्मठ धर्ममार्तंड त्याला कडाडून विरोध करू लागले.गुलाबसिंहाच्या पश्चात राजा हरीसिंह,त्याच्यानंतर राजा प्रतापसिंह, त्याच्यानंतर  १९१५ सालीं राजा हरीसिंह जम्मू-काश्मीर संस्थानाच्या गादीवर आला." 

काश्मीरचा पुढचा साद्यंत इतिहास आणि युद्धांबद्दल कर्नल चव्हाण पुढे लिहितात,
" १९४७ च्या ऑक्टोबर महिन्यात पाच हजार पाकिस्तानी घुसखोर महाराजा हरीसिंहाच्या काश्मीर संस्थानात घुसले.द्विराष्ट्र तत्वावर निर्माण झालेल्या पाकिस्तानला काश्मीरमध्ये मुस्लिम बहुसंख्य आहेत म्हणून काश्मीरची भूमी बळकवायची होती.या घुसखोरांनी प्रथम मुझफराबाद,डोमेल,उरी व शेवटी बारामुल्ला शहर लुटले,मदांध घुसखोर गावातल्या हिंदूंच्याच नव्हे तर मुस्लिमांच्या मालमत्ता पण लुटू लागले,सरसकट सर्वच स्त्रियांवर अत्याचार होऊ लागले तेव्हा सारी काश्मीरी जनता घुसखोरांविरुद्ध उभी राहिली.राजा हरीसिंहाने काश्मीर संस्थान भारतात विलीन करण्याची मागणी केली.…काश्मीरमधली बहुसंख्य जनता मुस्लिम असताना ते संस्थान पाकिस्तानमध्ये विलीन व्हायला राजी नाही ही गोष्ट महंमद अली जीनांना अजिबात रुचणारी नव्हती.धार्मिक तत्वावर दोन राष्ट्रांची मागणी करणाऱ्या जीनांचा हा धडधडीत अपमान ठरणार होता त्यात आता ते पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर  जनरल होते.तेव्हा काहीही करून काश्मीर बळकावलेच पाहिजे असा अट्टाहास त्यांनी धरला आणि कारवाया सुरू केल्या.  
  
 "४७ साली हजारो काश्मिरी मुसलमान आपण होऊन पाकिस्तानात गेले.शेख अब्दुल्ला ह्यांनी एक कायदा  करून त्यांना परत बोलावले व जम्मूमध्ये त्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था केली,सर्वांना त्वरीत नागरिकत्व बहाल करण्यात आले.मात्र फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांपैकी जे २५ हजार हिंदू जम्मूत येउन राहिले,त्यांना चाळीस वर्षांनंतरही काश्मीरचे नागरिकत्व मिळालेले नाही. हे हिंदू लोकसभेसाठी मतदान करू शकतात,पण काश्मीर विधानसभा किंवा स्थानिक नगरपालिका यांसाठी त्यांना मतदानाचा हक्क नाही."  

'शूर सैनिकांनी युद्धात जिंकले पण नेत्यानी शांततेत गमावले', याबद्दल त्यांना खंत वाटते ."दुर्दैवाने भारतावर संयुक्त राष्ट्रातर्फे बरेच दडपण येउन डिसेंबर १९४८ ला युद्धतहकुबी जाहीर झाली.काश्मीरचा पश्चिमे कडचा काही भाग आणि गिलगीत ,हुंझा ,स्कर्दू वगैरे भाग मुक्त करण्याचे राहून गेले.(पुढाऱ्यांना )आपल्या मातृभूमीचा भूभाग शत्रू बळकावून बसला आहे याचे शल्य कुठे टोचतच नाही !शांतिदूताचा जगात बोलबाला झाला पाहिजे हा हव्यास !… म्हणूनच घसा फुटेपर्यंत ओरडून सांगावेसे वाटते -मुझफराबाद,डोमेल,हुंझा,गिलगीत,स्कर्दू ,सियाचेन आणि अक्साय चीन हा सारा आमचा भाग आहे. पाकिस्तान व चीनने तो बळकावला आहे .…२००,००० हिंदूंचे 'छंब' गावतिथल्या अत्यंत सुपीक जमिनीसह भारताने गमावले. १९७१ च्या सिमला कराराप्रमाणे काश्मीरमध्ये जिंकलेली भूमी परत करण्याचे बंधन नसल्यामुळे छंब भारताला परत मिळाले नाही. १७ डिसेंबर १९७१ रोजी भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी एकतर्फी युद्धविराम जाहीर केला.युद्धविराम  झाल्यानंतर छंब चे कित्येक हिंदू रहिवासी नदीच्या पूर्व किनाऱ्यावर बसून आपल्या गावाकडे अश्रूपूर्ण डोळ्यांनी पहात होते.पाकिस्तानी सैन्याने त्यांच्या गावातल्या सर्वात उंच घरावर पाकिस्तानचा झेंडा लावलेला होता व त्या गावाचे नाव ठेवलेले होते -इफ्तिकाराबाद !… पुढे झालेल्या सिमला कराराप्रमाणे ,काश्मीरचा काही भाग वगळल्यास पश्चिम आघाडीवर जिंकलेला सारा प्रदेश भारत सरकारने पाकिस्तानला परत देऊन टाकला. सीमेवरील एकेक इंच जागा लढवणाऱ्या  सैनिकांना तेव्हा काय वाटले असेल याची कुणी पर्वाही केली नाही. युद्धात,जी भूमी जिंकण्यासाठी आमच्या असंख्य सैनिक बंधूंना स्वत:चे बलिदान द्यावे लागले,ती भूमी ,युद्ध संपता क्षणीच राजकीय नेत्यांनी सहजतेने शत्रूला परत देऊन टाकली . राजकीय पुढाऱ्यांना भारतीय जवानांच्या  बलिदानाची किंचितही कदर नाही ही संतापजनक बाब दुर्दैवाने वारंवार अनुभवास आलेली आहे." 'जंग-ए- काश्मीर 'ह्या पुस्तकात लेखक कर्नल श्याम चव्हाण लिहितात .                    

त्रेचाळीस वर्षे दिल्लीत पत्रकारिता केलेले सव्यसाची पत्रकार मो.ग. तपस्वी "नियतीशी करार "ह्या आपल्या पुस्तकात  लिहितात,"वल्लभभाई (पटेल )यांचे नेहरूंशी बिनसण्याचे कारण वैयक्तिक मुळीच नव्हते.काश्मीरचा प्रश्न हे त्यांच्यातील वितुष्टाचे कारण होते.वल्लभभाईंनी साधार दाखवून दिले होते की काश्मीर प्रश्न नेहरू चुकीच्या मार्गाने हाताळत आहेत. काश्मीर प्रश्नावरून वल्लभभाई  आणि नेहरू  यांच्यात तीव्र मतभेद होताच नेहरूंनी पहिले काम कोणते केले असेल,तर त्यांनी काश्मीर प्रकरण गृहखात्याकडून म्हणजे वल्लभभाईंकडून काढून परराष्ट्रखात्याकडे सुपूर्द केले,म्हणजेच स्वत:कडे घेतले,कारण नेहरूच तेव्हा परराष्ट्रमंत्रीही होते.हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठीवल्लभभाईंनी सैनिकी कारवाई केली ही गोष्ट नेहरूंना रुचली नव्हती. म्हणूनच त्यांनी काश्मिरात जिंकत चाललेल्या आपल्या सैन्याला युद्धविराम करण्याचा आदेश दिलाइतकेच नव्हे तर माउंटबॅटन यांच्या दडपणाखाली येऊन त्यांनी काश्मीर- समस्या (संयुक्त) राष्ट्रसंघात दाखल केली. वल्लभभाई फक्त इतकेच म्हणाले -"जवाहरलाल इस भूल पर पछताएगा और रोयेगा." नेहरूंनी केलेल्या त्या घोडचुकीचेच दुष्परिणाम आज इतक्या वर्षांत आपण भोगत आहोत.… देशाची फाळणी पत्करताना नेहरूंनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कधी हे जाणून घेण्याचा आणि सरकारी दप्तरी तसे नोंदवून ठेवण्याचा प्रयत्नच केला नाही ,की भारताच्या सरहद्दी नेमक्या कुठे आणि कशा आहेत ?त्यांना कोणत्या मापाने वा मानदंडाने मोजायचे आहे ?आजदेखील ,पाकिस्तानशी तीनदा प्रत्यक्ष युद्धे होऊनसुद्धा आमची पश्चिम सरहद्द नेमकी आखलेली नाही.कारगिल युद्धाच्या वेळी याचा विदारक प्रत्यय पुन्हा आला.कोणत्या पर्वत शिखरावरून किंवा दरीमधून आपली सरहद्द  जाते,याचा नेमका नकाशा संरक्षण दलाजवळ नव्ह्तच.याचाच फायदा पाकिस्तान घेत होता." तपस्वी लिहितात. 

"इंडिया आफ्टर गांधी" हे लेखक रामचंद्र गुहा यांचं अद्वितीय पुस्तक आहे.जणू हे नऊशे पानी पुस्तक लिहिण्यासाठी रामचंद्र गुहा जन्माला आले असावेत!त्यात त्यांनी गांधी असतानापासूनच भारताच्या इतिहासाचा सखोल आढावा घेतला आहे.ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देऊ केले,तेव्हा भारतात ५५४ संस्थाने होती,वल्लभभाई पटेल ह्यांनी अपार परिश्रमाने व्ही पी मेनन ह्यांच्या मदतीने ती संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन केली.मात्र निझामाची सत्ता असलेलं हैद्राबाद संस्थान आणि ८४४७१ वर्ग मैल व्याप्ती असलेलं, हैद्राबाद संस्थानापेक्षाही मोठं असलेलं काश्मीर संस्थान,ही दोन संस्थाने काही त्यावेळी स्वतंत्र भारतात सामील होण्यास तयार नव्हती. 'On 12 October,the deputy prime minister  of Jammu and Kashmir said in Delhi that "We intend to keep friendly relations with both India and Pakistan...we have no intentions of joining either India or Pakistan...the only thing that will change our mind is if one side or the other decides to use force against us." Two weeks after these words were spoken ,a force of several thousand armed men invaded the state from the north.Most of the raiders were Pathans from what was now a province of Pakistan.That much is undisputed.What is not so certain is why they came and who was helping them.गुहा यांच्या मते,आज साठ वर्षांपेक्षाही अधिक काळ लोटूनही हे दोन प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत. 

२२ ऑक्टोबरला हे घुसखोर काश्मीर मध्ये घुसले,२४ ऑक्टोबरला राजा हरीसिंहाने भारत सरकारला सैनिकी मदतीसाठी तार पाठवली,२६ ऑक्टोबरला व्ही पी मेनन यांनी काश्मीरला त्याच्याकडे जाऊन त्याची स्वाक्षरी असलेला'Instrument of Accession ' भारतात विलीनीकरणाचा दस्तावेज आणला.२६ ऑक्टोबर १९४७ रोजी काश्मीर संस्थान भारतात विलीन झाल्यावर २७ ऑक्टोबर रोजी तडक सकाळच्या पहिल्या प्रहरी विमानांनी दिल्लीहून श्रीनगरकडे सशस्त्र सैनिकांच्या तुकडया रवाना झाल्या. ह्या सगळ्या घडामोडींचा तपशीलवार आढावा -अगदी त्यातल्या दृश्य-अदृश्य बारकाव्यांसकट रामचंद्र गुहा यांनी प्रस्तुत पुस्तकात घेतला आहे . 

११ नोव्हेंबरला नेहरूंनी हरीसिंह याला पत्र लिहून कळवलं की शेख अब्दुल्ला ह्यावर भिस्त ठेवावी,आता मेहरचंद महाजन यांच्याऐवजी शेख अब्दुल्लाला अधिकृतरीत्या पंतप्रधान नेमावं.त्याची अफाट तारीफ करत नेहरूंनी लिहिलं,"The only person who can deliver goods in Kashmir is Sheikh Abdulla." महात्मा गांधी तर आधीच भारावलेले,त्यांनी" Lion of Kashmir"-काश्मीरचा सिंह म्हणून त्याला नावाजित त्याच्यावर स्तुतिसुमने उधळलीत.
" In a letter to Maharaja Hari Singh ,the Indian prime minister outlined the various forms a settlement could take.There could be a plebiscite for the whole state,to decide which dominion it would join.Or the state could survive as an independent entity,with its defence guaranteed by both India and Pakistan.A third option was of partition,with Jammu going to India and the rest of the state to Pakistan.A fourth option had Jammu and the Valley staying with India,with Poonch and beyond being ceded to Pakistan. Nehru himself inclined to this last alternative.He saw that in Poonch 'the majority of the population is likely to be against the Indian Union'.But he was loath to give up the valley of Kashmir,a National Conference stronghold whose population seemed  to be inclined towards India....It shows that the Indian prime minister was quite prepared to compromise on Kasmir." "इंडिया आफ्टर गांधी" ह्या पुस्तकात लेखक रामचंद्र गुहा लिहितात. 
"१ जानेवारी १९४८ रोजी गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन याच्या सल्ल्यानुसार भारतानं काश्मीर समस्या  United Nations -संयुक्त राष्ट्रसंघाकडे नेली.तिथे ५ फेब्रुवारी १९४८ रोजी बोलताना शेख अब्दुल्लानं दर्पोक्ती केली ,"There is no power on earth which can displace me from the position which I have(in Kashmir)",he told the Security Council." As long as the people are behind me ,I will remain there."
आज इतक्या वर्षांनंतरसुद्धा काश्मीर प्रश्न धसाला लागलेला नाही. असे म्हणण्यापेक्षा हा गुंता सुटावा असे,अपवाद वगळता आतापर्यंतच्या सीमेअलीकडच्या नेत्यांना वाटले नाही,सीमेपलीकडच्या नेत्यांना तर वाटायचा प्रश्नच उद्भवत नाही. दरम्यान दहशतवादामुळे जम्मू काश्मीर मधले असंख्य काश्मीरी पंडित विस्थापित झाले.दिल्ली-नोएडा परिसरात अनेक काश्मीर पंडित कुटुंबीयांनी स्थानांतर केलं. त्यांच्याशी त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून संपर्कात आल्यावर त्यांच्याशी झालेल्या बातचितीवर आधारित अनेक लेख लिहिले.आता जेव्हा नरेंद्र मोदी ह्यांनी पंतप्रधानाची शपथ घेताना,शपथग्रहण समारंभाला पाकिस्तानसह ८ देशांच्या प्रमुखांना आमंत्रण दिलं ,२७ मे रोजी , सर्वांचे डोळे ज्या भेटीकडे लागले होते ती,नरेंद्र मोदी-पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ ही भेट घडली,त्यानंतर,पंतप्रधान कार्यालयाचे (PMO )नवनिर्वाचित MoS -राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह ह्यांनी कलम ३७० वर केलेले भाष्य -३७० कलमाचे तोटे, सहमत नसलेल्यांना पटवून देण्यासाठी परिचर्चा व्हावी"His (Mr Modi's) intention and that of the government is that we should have a debate so that we can convince the unconvinced about the disadvantages of Article 370," ह्यावर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री यांचं,'एक तर जम्मू काश्मीर तरी भारतात राहील नाही तर कलम ३७० तरी संविधानात कायम राहील',हे विधान,मेहबूबा मुफ्ती यांनी केलेली टीका,ह्या पार्श्वभूमीवर,ह्या काश्मीर पंडित कुटुंबीयांशी मी नव्यानी संवाद साधला आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.ही सगळी मंडळी कडवी हिंदू तर आहेतच,महाशिवरात्री हा त्यांचा मोठा उत्सव ते अत्यंत भक्तिभावानं साजरा करतात -पहाडांवर राहणारे सारे शिवाचे उपासक असतात - पण त्यांना आपल्या स्थानाहून विस्थापित होण्याचं दु:ख आहे.काश्मीर ही समस्या 'बनवण्या'चं,ती चिघळत ठेवण्याचं काम केलेल्या व्यक्तीबद्दल-नेहरूंबद्दल त्यांच्या मनात रोष आहे. त्यामुळेच,भले काश्मीरी असतील,देशाचे पहिले पंतप्रधान असतील-नेहरू ना रोया ना पछताया,असा ज्येष्ठ मंडळी नेहरूंचा उल्लेख एकेरी करतात -आणि हा सल आजही त्यांच्या मनात आहे.  
"जम्मू -काश्मीर मधल्या नेत्यांचा जनाधार कमी होत चालला आहे,म्हणून राजकीय फायदा मिळवण्यासाठी ही मंडळी तसं बोलताहेत.कलम ३७० वर चर्चा व्हावी,हरकत नाही!पण आजच्या घटकेला हा मुद्दा चर्चेचा नाही. तसं बघितलं तर कलम ३७० मुळे राज्यात आणीबाणी लागू व्हायला नको होती आणि राष्ट्रपती राजवटपण लागू व्हायला नको होती,पण जम्मू -काश्मीर मध्ये ह्या दोन्ही गोष्टी झाल्या."प्रकाशन क्षेत्रातलं प्रस्थापित नाव असलेले दिल्लीतले श्री.हांडू प्रदीर्घ बातचीतीदरम्यान सांगतात."म्हणजे हळूहळू  कलम ३७० निष्प्रभ होत चाललंय.आता मुद्दा सुरक्षेचा आहे. २५ वर्षांपूर्वी काश्मिरी हिंदू तिथून स्थलांतरित झाले.ती एक संपूर्ण पिढी आता नष्ट झाली आहे . जम्मू -काश्मीर मध्ये आता मुस्लिम लोक आहेत आणि २५ वर्षांत आता त्यांची मानसिकता पण अशीच झालीये की हे मुस्लिम राज्य आहे.काश्मीर मध्ये पर्यटक म्हणून ते तुमचं-आमचं स्वागत करतील पण जर का आम्ही राहायला गेलो,तर ते त्यांना खपणार नाही.मी जर त्या ठिकाणी सुरक्षित नसेन,तर मी तिथे राहायला कसा जाऊ शकेन?काश्मीर मध्ये ४-५ हजार हिंदू आहेत,पण त्यांची गत तिथे अक्षरश:बॉंण्डेड लेबर सारखी आहे.त्यांना पगार कमी आहेत,ते कुठे फटकू शकत नाहीत आणि त्यांच्यावर अनेक बंधनेही आहेत.उनकी मजबूरी का फायदा उठाया जा रहा है।फार कशाला,virtually,they are 'converted .' ते हिंदू म्हणून नावालाच आहेत,ही मंडळी जवळ जवळ मुस्लिम असल्यातच जमा आहेत!आणि काश्मीर मधले मुस्लिम आपल्या 'मिशन'मध्ये 'कामयाब 'होताहेत.त्यांना जे हवंय,ते साध्य होतंय!कुणाला  दहशतवादात सामील व्हायचं नसेलही तरी त्याला धाक-दपटशा करून त्यांच्या मताप्रमाणे चालण्यास बाध्य आणि उद्युक्त केलं जातं .तिथली परिस्थिती काही चांगली नाहीय.लोकांना सुरक्षिततेची हमी मिळणार असेल,तरच लोक तिथे परत जातील.'पनून कश्मीर 'ची मागणी आहे -जिथे हजार-दोन हजार हिंदू काश्मिरी पंडित कुटुंब राहतील,आम्ही आमचा लोकप्रतिनिधी निवडून देऊ शकू!" श्री.हांडू  सांगतात.त्यांच्या मते आता नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व खंबीर आणि कणखर असल्याचा संदेश गेला आहे. त्यामुळे अकारण कुरापती काढू बघणारे आता वचकून राहतील !श्री.हांडू यांच्या मते आता जम्मू काश्मीरमध्ये अतिशय चांगली स्वास्थ्य -सुविधा (medical facility ),इंडस्ट्री -कारखाने आणि उद्योग यांची नितांत आवश्यकता आहे .
     
"PANUN KASHMIR is an effort to Save Kashmiri Pandits to Save Kashmir to Save India." असं पनून कश्मीरचं संकेतस्थळ http://www.panunkashmir.org सांगतं.Why a separate portion as Homeland when whole of the valley belongs to us?असा प्रश्न करतं .पाच हजार वर्षांपासून काश्मीर मध्ये राहणारे आम्ही शैव मूळ लोक असताना आम्हाला धर्मांध दहशतवादानं हुसकावून लावलंच कसं अशी संतप्त पृच्छाही करतात.त्याचं उत्तर आपल्याला-अखंड भारताला -त्यांना द्यावंच लागणार आहे.    

No comments: