Monday, January 12, 2015

बालसंगोपन:बाळाला वाढवताना … बाळाला घडवताना…

बाळाला वाढवताना … बाळाला घडवताना…  

​​(बालसंगोपनाविषयी मार्गदर्शन करणाऱ्या पुस्तकांची माहिती )  

​​-रश्मी घटवाई 
​​
आपलं बाळ सशक्त,निरोगी आणि सुंदर असावं,असं प्रत्येक आईला वाटतं.त्याला चांगला पौष्टिक आहार मिळावा,त्याची निकोप वाढ व्हावी,याची ती काळजी घेते.त्याला छान छान कपडे आणि खेळणी देऊन ती त्याचे लाड पुरवते.आपलं मूल शिकून मोठं व्हावं,त्यानं नावलौकिक मिळवावा आणि सुखी व्हावं म्हणून स्त्री आपल्या बाळासाठी खस्ता खाते,संसारातले कष्ट आनंदानं झेलते. 

जुन्या काळी एकत्र कुटुंबपद्धतीत एका घरात चार पिढ्या सहज रहात होत्या.आई -आजी -पणजी यांच्या कौतुकाच्या वर्षावात आणि संस्कारात नवी पिढी लहानाची मोठी व्हायची.त्या काळात, स्वत:च्या आणि इतरांच्या अनुभवांनी परिपक्व झालेल्या घरातल्या ज्येष्ठ स्त्रिया बाळ-बाळंतिणीच्या आरोग्याची काळजी घ्यायच्या.किरकोळ आजारांवरचे घरगुती उपचार त्यांना माहित असायचे.घराचं घरपण जपत, चांगल्या सवयींचे संस्कार घरातली वडिलधारी मंडळी घरातल्या लहान मुलांवर करीत असत . 

बघता बघता काळ बदलला.कुटुंब आकारानं लहान झालं.कुटुंबाची सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी बदलली.आज कुटुंबात एक किंवा फार तर दोन अपत्यं असतात.मुलींच्या शिक्षणालाही आता प्राधान्य मिळू लागलं आहे.स्त्री सुशिक्षित झाली की ते संपूर्ण घरच सुशिक्षित होतं. आपल्या शिक्षणाचा उपयोग करून स्त्री आता अर्थार्जन करू लागली आहे.कुटुंबाची आर्थिक जबाबदारीसुद्धा खंबीरपणे पेलू लागली आहे.त्याचप्रमाणे आपले निर्णय डोळसपणे घेऊ लागली आहे.साहजिकच आपली मुलं वाढवण्याच्या बाबतीत स्त्री आज अधिक जागरूक झाली आहे. 

पूर्वीच्या काळी बालसंगोपनशास्त्र नव्हतं आणि एक खूळ म्हणून आज ते अचानक अवतरलं आहे,असं नाही.एक तर घरात वडिलधारं कुणी नसतं!शिवाय शास्त्रीय आधार असलेल्या वैद्यकीय सल्ल्याचं पालन करणं केव्हाही चांगलं!त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं काटेकोर नियोजन करणारी आताची पिढी बालसंगोपना च्याबाबत गांभीर्यानं विचार करू लागली आहे.अपत्याच्या जन्माआधीपासून ते त्याच्या जन्मानंतरची पुढची काही वर्षं,इथपर्यंतचा बालसंगोपनाबाबत सखोल विचार करणं ही आता काळाची गरज झाली आहे.  

"दहा गुरूंपेक्षा एक आचार्य श्रेष्ठ,शंभर आचार्यांपेक्षा एक पिता श्रेष्ठ आणि हजार पित्यांपेक्षाही एक आई श्रेष्ठ",असं एक संस्कृत सुभाषित आहे.त्या आईला बालसंगोपनाविषयी सोप्या शब्दांत शास्त्रशुद्ध माहिती देणारी, नामवंत बालरोगतज्ज्ञांची अनेक पुस्तकं मराठीत उपलब्ध आहेत.आजच्या काळातल्या आधुनिक मातांनाही ही पुस्तकं मौलिक मार्गदर्शन करतात. 

शिशुसंगोपनात चिकाटी आणि संयम बाळगणं आवश्यक असतं.पण पूर्वग्रह, बालसंगोपनाविषयीचं अर्धवट पुस्तकी ज्ञान,मैत्रिणी,नातेवाईक यांचे अनुभव ऐकून मनाचा गोंधळ उडतो.तो सरावा,म्हणून 'बाळा,होऊ कशी उतराई' या पुस्तकात डॉ.संजीव कीर्तने यांनी खूप सोप्या भाषेत बालसंगोपनाचं मर्म समजावून सांगितलंय.विवाहाच्या वेळी स्त्रीचं वय १८ ते २७ वर्षं असावं,तर पुरुषाचं वय २४ ते ३० वर्षं असावं.लवकर विवाह झालेल्या जोडप्यानं बाळाचं आगमन लांबवावं;तर उशिरा विवाह झालेल्या जोडप्यानं बाळाच्या आगमनाचा निर्णय लवकर घ्यावा.पती-पत्नीचं रक्ताचं नातं नसावं.मावसभाऊ, मामेबहीण अशा रक्तानं जुळणाऱ्या नात्याच्या व्यक्तीशी लग्न झाल्यास होणाऱ्या बाळात अनुवंशिक रोग उतरण्याची शक्यता जास्त असते.गरोदरपणाचा शेवटचा महिना बाळाची उत्तम वाढ होण्याच्या दृष्टीनं महत्वाचा असतो.त्यात स्त्रीनं पूर्ण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य अनुभवलं,तर बाळ निरोगी आणि सुदृढ होतं. बाळाचं आगमन झाल्यावर त्याचा सुरुवातीचा आहार म्हणजे स्तनपान. यातून आईचं नी बाळाचं निकटचं नातं निर्माण होतं.अंगावरच्या दुधात लोहतत्वाचं प्रमाण जास्ती असतं.त्यात प्रतिकारद्रव्यं आणि 'क 'जीवनसत्त्व असतं,तसंच ते निसर्गत:च जंतुविरहीत असतं,असं त्यांनी त्यात सांगितलंय.बाळाला दूध कसं पाजावं,वरचं दूध का, कसं आणि कधी लावावं याबद्दलची माहितीपण त्यांनी खूप सोप्या शब्दांत सांगितली आहे.बाळाच्या डोळ्यांत काजळ घालू नये,कानात तेल घालू नये,बाळाला धुरी देऊ नये,या सर्वांमुळे अपायच जास्त होतो,असं त्यांनी त्यात सांगितलंय.

"अडगुलं मडगुलं,सोन्याचं कडगुलं,रुप्याचा वाळा,तान्ह्या बाळा,तीटी लावा!"असं बाळाला न्हाऊमाखू घालून झाल्यावर प्रत्येक आई कौतुकानं म्हणते. 'अडगुलं मडगुलं' हे डॉ.श्रीकांत चोरघडे यांनी लिहिलेलं पुस्तकसुद्धा अतिशय उपयुक्त माहिती देतं.अनेक सुशिक्षित मातासुद्धा नवजात शिशुला स्तनपाना ऐवजी बाटलीनं वरचं दूध देण्याचा अट्टाहास धरतात.त्याऐवजी नवजात बालकाला आईनं अंगावरचं दूध पाजणं का आवश्यक आहे हे सांगून त्यांनी त्यात स्तनपानाचं शास्त्रीय महत्व पटवून दिलं आहे.

'माझं बाळ ' या पुस्तकात डॉ.विठ्ठल प्रभू यांनी बाळाच्या जन्मापूर्वीपासून ते बाळाच्या जन्मा पर्यंतच्या घडामोडींबाबतची माहिती दिली आहे.आईचं दूध हे बाळासाठी अमृत असतं असं त्यांनी त्यात म्हटलंय.वरचं दूध,बाळाचा पूरक आहार,बाळाच्या विकासाचे टप्पे, लसीकरण, वजन,उंची, आरोग्य कार्ड या सगळ्यांची माहिती त्यांनी त्यात सोप्या शब्दांत दिली आहे.बाळाची आंघोळ, स्वच्छता,कपडे,जेवण, झोप,दांत येणे असे सगळे विषय त्यांनी त्यात सुसंगतपणे मांडले आहेत.

बारशाच्या दिवशी कौतुक,गर्दी,कुंकवाचे टिळे,नवे कपडे आणि नवजात बाळाचे घेतले जाणारे मुके या सर्वांच्या वर्षावात बाळाची आणि त्याच्या आईची विश्रांती होत नाही की धड जेवण होत नाही. हा  सोहळा शक्य तितक्या साधेपणानं करावा,असा त्यात त्यांनीमनापासून सल्ला दिला आहे.     

जेवण हादेखील बाळाचा एक खेळ असतो.जेवताना ताटलीभोवती शिते सांडल्याबद्दल बाळाला रागावू नये.बाळाला गरज असते ती प्रेमाची आणि सुरक्षिततेची.याला हात लावू नको,हे करू नको,ते करू नको,असं त्याला सतत टोकत राहू नये.बाळाच्या विकासाबाबत घाई करू नये.लहान मुलांना शिक्षा करू नये.फार तर ती सौम्य प्रकारची असावी,शारीरिक इजा होईल अशी नसावी.त्यांना शिक्षेचं कारण समजावून सांगावं. आपण चूक केली,काय चूक केली हे त्यांना त्यातून कळायला हवं.आजच्या चुकीसाठी उद्या शिक्षा करू नये.शिवाय,बाबांनी मुलाला रागवावं आणि आईनं चॉकलेट द्यावं,असं करू नये;तर आई-वडिलांच्या वागण्यात एकवाक्यता असावी. शिक्षेपेक्षा गोडीगुलाबीनं शिस्त लावता आली तर उत्तम,असं ते सांगतात.

अनेकदा मुलं आई-वडिलांना अडचणीत टाकणारे प्रश्न विचारतात आणि पालक 'मला माहीत नाही' वगैरे उत्तरं देतात. 'आई,मी कसा आलो?' वगैरे प्रश्नांवर 'देवानं दिला ' असं सांगण्याऐवजी त्यांना सोपी पण शास्त्रीय बैठक असलेली उत्तरं द्यावीत,असं ते सांगतात.व्यंग घेऊन जन्मलेल्या बाळांच्या आईवडिलांना त्या अपत्याची जबाबदारी आणि सामाजिक कुचेष्टा नी अनाहूत सल्ले अशा माऱ्याला तोंड द्यावं लागतं. त्यासाठीसुद्धा एका स्वतंत्र प्रकरणात 'माझं बाळ ' या पुस्तकात डॉ.विठ्ठल प्रभू यांनी मौलिक माहिती दिली आहे. 

पालकत्व ही प्रक्रिया डोळस असते याचा सुखद अनुभव घेणाऱ्या आईबाबांना 'आपली मुलं आणि आपण ' या पुस्तकात डॉ. मनोज भाटवडेकरांनी पालकत्वाबद्दल सोप्या शब्दांत मार्गदर्शन केलं आहे. मुलांच्या मानसिक समस्यांना 'पालक' नावाचं एक महत्वाचं परिमाण असतं.पालकांनी रंगवलेल्या समस्येच्या चित्रात एक गडद रंगाची छटा असते आणि ती असते त्यांच्या स्वत:च्या व्यक्तिमत्वाची आणि दृष्टीकोनाची.ही छटा अनेकदा मूळ समस्येच्या रंगाला झाकोळून टाकणारी असते.एकत्र कुटुंबाकडून विभक्त कुटुंबपद्धतीकडे वाटचाल करताना कुटुंबात एक दोनच मुलं असतात.ती साहजिकच पालकांच्या विश्वाच्या केंद्रस्थानी असतात.शिक्षण,नोकरी आणि त्यासाठीच्या जीवघेण्या स्पर्धेतून तावून-सुलाखून निघालेल्या दाम्पत्याला मूल पाळणाघरात किंवा नोकरांच्या भरवशावर ठेवावं लागतं , आपण आपल्या मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही ही खंत पालकांना वाटू लागते.त्या अपराधीपणाच्या भावनेतून त्या वेळेची भरपाई मग पालक मुलांना महागडी खेळणी खाऊ, कपडे वगैरे देऊन करतात.मुलांच्या वाढत्या वयाबरोबर पालकत्वही विकसित व्हायला हवं,यादृष्टीनं त्यांनी त्यात मोलाचं मार्गदर्शन केलं आहे.

'छकुलं छान गडे',हे नियती डॉ. नियती बडे-चितलीया यांचं पुस्तक,'जपणूक ' हे डॉ.उल्हास कशाळकर यांचं पुस्तक,'पान्हा' हे डॉ.सौ. सुप्रिया वसंत टिळक यांचं पुस्तक,'आपलं बाळ-बालविकासाचा ज्ञानकोश' हे प्रा. वा.शी.आपटे ,डॉ.शं.चिं.सारंगधर व डॉ.विनीता पाठक यांचं पुस्तक,ही बालसंगोपनाविषयी विस्तृत माहिती देणारी मराठीतली आणखी काही पुस्तकं.   
     
"जन्माला येणारं प्रत्येक मूल हाच संदेश घेऊन येतं की परमेश्वर अजून तरी माणसावर रुसलेला नाही. मूल म्हणजे माणसाला मिळालेली सर्वात सुंदर देणगी," असं रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटलंय.मुलं म्हणजे देवाघरची फुलं! त्या फुलांना तुम्हाला आणखी चांगलं फुलवता लं,तर तुमच्या अंगावर आनंदानी रोमांच फुलणार,की नाही!
--------------------------------------------------------------------------------------------------------
-रश्मी घटवाई  

No comments: