अब दिल्ली दूर नही
- रश्मी घटवाई
- रश्मी घटवाई
नवी दिल्ली ही देशाची राजधानी भलेही असेल;पण हिंदी सिनेसाम्राज्याची राजधानी अर्थातच मुंबई आहे.हिंदी सिनेसृष्टीनं "ये है बॉम्बे मेरी जान " म्हणत तिला मोठं मानाचं स्थान गाण्यांतून... अगदी चित्रपटांतूनही दिलंय."ई है बम्बई नगरिया,सोनेचांदी की डगरिया..."वगैरे तिची स्तुतीस्तोत्रे अगणित नी त्यांचं नित्यनेमानं पठण करणारेही अगणित!बम्बईचं स्थानमहात्म्य काय वर्णावं?बम्बईसे आलेल्या दोस्तालासुद्धा सामान्यजनांनी सलाम करावा, इतकी तिची राजमान्यता!सलाम बॉम्बे...दिल्लीला कोण पुसतं?दिल्ली का ठग...मात्र बम्बई का बाबू!बॉम्बे टू गोवा काय, बॉम्बे टू बँकॉक काय !इथे दिल्लीतून एकदाच कधी नव्हे ते चांदनी चौक टू चायना गेले,खूप झालं! हिंदी सिनेसृष्टीत दिल्ली बिचारी गाण्यांतूनही उपेक्षित राहिली. दिल्ली का कुतुबमिनार बघण्याचा सल्ला देणारा गीतकार लगोलग बम्बई शहर की बहार बघण्याचा आग्रह धरतो,म्हणजे बघा!
नाही म्हणायला दिल्ली का कुतुबमिनार आपल्याला प्रथम भेटतो,तो प्रेमातली आर्तता, शुचिता, पवित्रता, सहजसुंदरता,अवखळपणा,माधुर्य आणि संयम व्यक्त करीत दिल का भंवर प्यार का राग आळवतो,तेव्हा!इतके बहारदार गाणे दुसरे नसावे!सोज्वळ नूतन आणि देव आनंद,नितांतसुंदर Black &White चित्रण-देव करो नी कुणाला त्याला रंगीत करायची दुर्बुद्धी नं होवो!आणि साक्षीला कुतुबुद्दीन ऐबक आणि नंतर इल्तुत्मिश ह्यानं बांधलेला कुतुबमिनार! ४ डिसेंबर १९८१ रोजी ४५ शाळकरी विद्यार्थी त्या अरुंद पायऱ्या उतरताना चेंगराचेंगरीत चिरडून मृत्युमुखी पडल्यानं नंतर पर्यटकांसाठी कुतुबमिनार मध्ये आत पायऱ्या चढून वर जाण्यावर प्रतिबंध घालण्यात आला.(जामा मस्जिद च्या पायऱ्याही अर्थात अशाच पद्धतीच्या आहेत.)पण ते कालसाक्षेपी गाणे त्या वास्तूचे सोने करीत त्यातले सौंदर्य उलगडून दाखवते.कुतुबमिनारा जवळचा-वर गरुड असलेला, ब्राम्ही लिपीत संस्कृत वचने कोरलेला विष्णूध्वज हा लोहस्तंभ धातुशास्त्रातला (Metallurgy ) चमत्कार आहे.त्या लोह्स्तंभाला दोन्ही हात पाठीमागे करून विळखा घालू शकलेल्याची मनोकामना पूरी होत असल्याचा प्रवाद जनमानसात इतकं बिंबला की घामामुळे चवथ्या शतकातल्या त्या लोह्स्तंभाला धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली, तिथे शेवटी संरक्षक चबुतरा उभारून तो वाचवण्याची खबरदारी घेतली जातेय.
तसं बघितलं तर आताआतापावेतो हिंदी सिनेमांतून जरा बेताबेतानंच दिल्लीदर्शन घडत होतं.मात्र अचानक,जणू हिंदी चित्रपटसृष्टीला ' अब दिल्ली दूर नहीं ' असा साक्षात्कार झाला, बघताबघता अनेक हिंदी सिनेमांतून दिल्लीदर्शन घडवण्याची लाटच आली.अलीकडच्या कितीएक सिनेमातून मग दिल्ली दिसू लागली.कुतुब मिनाराचं अल्पसं राजसदर्शन 'तेरे घर के सामने'नं " दिल का भंवर" मध्ये घडवलं होतं ;'फना 'नं "चांद सिफारिश" गाण्यातून कुतुब मिनाराचं समग्र दर्शन घडवलं ,कुतुब मिनाराजवळच्या त्या लोह्स्तंभाला दोन्ही हात पाठीमागे करून विळखा घालू शकलेल्याची मनोकामना पूरी होत असल्याच्या प्रवादाचा आधार घेत 'चीनी कम'नं आपला climax रंगवला.
'अब दिल्ली दूर नहीं ' मध्ये,आईच्या खुनाबद्दल फाशीची शिक्षा झालेले आपले वडील निर्दोष असल्याचं सांगण्यासाठी दिल्लीला थेट पंतप्रधानांकडे निघालेला मुलगा...त्या काळच्या यमुना,दरियागंज,इंडिया गेटच्या दृष्यांव्यतिरिक्त तीन मूर्ती भवनातून बाहेर निघालेले पंतप्रधान नेहरू हेही दृश्य त्यात होतं.मुलगा पंतप्रधानांना भेटतो,हा climax वास्तवदर्शी व्हावा म्हणून आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल नी त्यांच्या सरकारबद्दल लोकांच्या मनात आत्मीयता निर्माण होईल असं सांगून राज कपूरनी पंतप्रधान नेहरू ह्यांना प्रत्यक्ष काम करण्याची गळ घातली होती,त्यांनी त्याला होकार दिला होता,पण शेवटी ऐनवेळी तो योग आला नाही,असाही एक किस्सा ह्या चित्रपटाबाबत ऐकवला जातो.
देव आनंदच्या 'तेरे घर के सामने'ची स्टोरी लाईन दिल्लीतली होती.' नौ-दो-ग्यारह 'मधला देव आनंद दिल्लीत रहात असतो...तो आपला सरळ उठून ट्रक घेऊन "हम है राही प्यार के "गात इंडिया गेटवरून फतेहपुर सिक्री..आग्र्याचा ताजमहाल वगैरे गाठत मजल दरमजल करीत मुंबईत जातो.आता इंडिया गेट अनेक हिंदी सिनेमात बघायला मिळतं म्हणा!पहिल्या महायुद्धात ब्रिटीश इंडियन सैन्यातल्या ९० हजार सैनिकांनी भारतातल्या ब्रिटीश साम्राज्याच्या रक्षणासाठी आपले प्राण खर्ची घातले.त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ (Sir Edwin Lutyens ) सर एडविन ल्युटेन्सनी साकारलेलं ऑल इंडिया वॉर मेमोरियल म्हणजे इंडिया गेट.त्यावर हौतात्म्य मिळालेल्या त्या सैनिकांची नावे कोरली आहेत. 'रंग दे बसंती' पासून तर आता इंडिया गेटवर अन्यायाविरुद्ध 'कॅन्डल लाईट मार्च'सह मूक निदर्शने करण्याचा प्रघात पडला आहे.'नो वन किल्ड जेसिका' मध्येही असा कॅन्डल लाईट मार्च आहे. 'रंग दे बसंती'ची स्टोरीलाईन दिल्लीची होती,त्यातही एअरपोर्टवाल्या नव्या अजस्त्र फ्लायओव्हरपासून ते अनेक स्थलांचं दिल्लीदर्शन घडलं.तसंच अर्थात ओघानं 'नो वन किल्ड जेसिका' ला दिल्लीची पार्श्वभूमी होती,त्यामुळे त्यातही दिल्लीदर्शन घडलं.
.
मधल्या काळातल्या हिंदी सिनेमांपैकी बासू चटर्जी यांच्या रजनीगंधा मध्येही दिल्ली होती.(त्या सिनेमातही दिल्लीतली नायिकाही शेवटी मुंबईतच गेली. लोकांना दिल्लीत चैन पडत नव्हती की काय;कोण जाणे!) सई परांजपे यांच्या चष्मेबद्दूर सिनेमातून दिल्ली दिसली.त्याला स्टोरीलाईन दिल्लीची होती... लोधी गार्डन, बुद्ध जयंती पार्क,इंडिया गेट पण...SRCC (श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स )चं jacket घालून फिरणारा जोमो.आताच्या बँड बाजा बारात मध्येही दिल्लीतली कॉलेजेस आहेत...आणि हो दिल्लीतली ही कॉलेजेस म्हणजे मोठंच प्रस्थ आहे.म्हणजे काय,तर नाम ही काफी है!बँड बाजा बारात ह्या सिनेमाची कथाही दिल्लीत घडते आहे.
पुरानी दिल्ली-ही दिल्लीच्याच नव्हे,तर भारतभरातल्या व्यापारी जगताचा केंद्रबिंदू आहे...प्राण आहे.त्याचा पिनकोड आहे दिल्ली -६.ह्या नावाचा सिनेमा कसा त्या अजस्त्र व्यापारपेठेसारखा भारदस्त असायला हवा होता.प्रत्यक्षात आला तो सुमार, टुक्कार चित्रपट.दिल्लीत काही वर्षांपूर्वी गूढ काला बंदर उत्पात घडवत होता.त्याचं रहस्य शेवटपर्यंत उलगडलं नाही,पण त्याच्यामुळे लोकांमध्ये कमालीची घबराट पसरली होती. दिल्ली -६. नं तेही कथानक त्यात घुसडलं... कशाचाच कशाशी संबंध नाही...सुसंगत कथानकाचा पत्ता नाही.त्या दिल्ली -६ मध्ये हिंदू आणि मुस्लीम दोन्ही सुखनैव नांदतात.कहर म्हणजे,तो हिंदू-मुस्लीम सलोखा आणि सर्वधर्मसमभाव दाखवायला दिल्ली -६ च्या दिग्दर्शकानं त्यातल्या हिंदू आणि मुस्लीम पात्रांना शू करताना दाखवलं. हरे राम!दिल्ली -६ च्या दिग्दर्शकाचं धर्माबद्दलचं ते अचाट आकलन पाहून अख्खी दिल्ली-६ झीट येऊन कोसळली असेल.नंतर सावरल्यावर तिथल्याच मोठ्या कचराकुंडीत दिल्ली-६ तल्या लोकांनी ती सिनेकलाकृती टाकली असेल. अलीकडच्या सिनेमांत नाहीतरी युरीनल्स नी एकेकाला शू करताना दाखवायची नवीच प्रथा सुरु झालीये नाही?लगे रहो मुन्नाभाई असू दे,चीनी कम असू दे; नाही तर थ्री इडीयट्स...ज्याला बघावे तो आपला शू च करतोय..
जुन्या सिनेमांपैकी 'फिर वही दिल लाया हुं ' मध्ये दिल्ली होती.काही वर्षांपूर्वी आलेल्या ' अब आयेगा मजा' मध्ये गाण्यात दिल्लीतलं रेल म्युझियम होतं, 'मुझे कुछ कहना है'मध्ये प्रगती मैदान होतं.पा मध्ये दिल्लीदर्शन होतं,थ्री इडीयट्स मध्ये दिल्लीदर्शन होतं.'चक दे इंडिया'लाही दिल्लीची स्टोरी लाईन असल्यानं मेजर ध्यानचंद स्टेडीयम, इंडिया गेट त्यात होतं. दिल से,दस कहानीयां,मॉन्सून वेडिंग, संडे, आहिस्ता-आहिस्ता,खोसला का घोसला , इतकंच काय,आताच्या 'दो दुनी चार','ये साली जिंदगी मध्ये दिल्लीदर्शन होतं.(गम्मत बघा -गाण्यांत म्हणू नका,सिनेमांच्या शीर्षकांमध्ये म्हणू नका... शिव्या च शिव्या ! प्रतिभा इतकी काळवंडू लागलीये?)किंबहुना, केवळ किरकोळ दृश्ये नव्हेत,वा केवळ दिल्लीचा उल्लेख,नी म्हणून त्या अनुषंगाने दिल्लीतली प्रख्यात ठिकाणे नव्हेत;तर हिंदी सिनेसृष्टीनं दिल्लीत घडणाऱ्या कथानकांना आपलंसं केलंय.हिंदी सिनेमांमधून दिल्लीही आता राज्य करू लागलीये.
नावांत काय आहे म्हणता म्हणता दिल्ली का ठग अब दिल्ली दूर नहीं म्हणत न्यु देल्ही ला येऊन पोहोचला ,न्यु देल्ही टाईम्स वाचू लागला आणि बघता बघता दिल्लीची स्टोरीलाईन असलेल्या चित्रपटांना सुगीचे दिवस आले.
No comments:
Post a Comment