Tuesday, April 29, 2014

"लम्हों ने ख़ता की थी,सदियों ने सज़ा पायी।"

मुखवटयाआडचा चेहरा  

-रश्मी घटवाई 

घर फिरलं;की घराचे वासेही फिरतात,ह्याचा अनुभव सध्या काँग्रेस पक्षाला येतो आहे .गेल्या दहा वर्षांत आणि त्यांतही गेल्या पाच वर्षांत तर जरा जास्तच -काँग्रेस प्रणित आघाडीनं लाखो करोडो रुपयांचे घोटाळे करून देशाचं अपिरीमित असं नुकसान करून ठेवलंय. या सगळ्या घोटाळ्यांचा बभ्रा होणार नाही ,ह्या भ्रमात काँग्रेस पक्ष आणि घोटाळ्यांत लिप्त नेते होते,पण म्हातारीने कोंबडा कितीही झाकला तरी सूर्य उगवायचा रहात नाही,त्याप्रमाणे काँग्रेस प्रणित आघाडीच्या कोळशासारख्या काळ्याकुट्ट कारकीर्दीतली एका मागोमाग एक घोटाळ्यांची प्रकरणं बाहेर येऊ लागल्यावर सर्वसामान्य माणसाची मती कुंठीत झाली पण निगरगट्ट काँग्रेसनं 'तो मी नव्हेच 'असा पवित्रा घेतला आणि आपणच आपली पाठ थोपटून घेतली.एरवी सर्वसामान्य माणसाच्या हातून यत्किंचितही चूक झाली आणि आर्थिक व्यवहारापायी त्याच्या चारित्र्यावर जरा जरी शिंतोडे उडले,तर त्याला धरणी पोटात घेईल तर बरं,असं होत असल्याचं आपल्याला दिसतं ;पण इथे लाखो करोडो रुपयांचे घोटाळे करून आणि देशात तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर अब्रूची लक्तरं टांगली जाऊन एवढी नाचक्की झाली,तरी आपण कसे 'आदर्श' आणि प्रामाणिक आहोत म्हणून काँग्रेस पक्ष स्वत:च स्वत:ला प्रमाणपत्र देत सुटला. आपण आपले कल्याण करायचे की अकल्याण, हे ठरवणे आपल्या हाती असते,असं भगवद्गीता सांगते.ह्यापासून अर्थबोध नं घेतलेला काँग्रेस पक्ष स्वत:च स्वत:च्या हातानं स्वत:चं अकल्याण करीत सुटला.बरं एवढं सगळं होऊनही मितभाषी पंतप्रधानांनी या सगळ्यांवर मौन बाळगल्यामुळे लोक अधिकच बुचकळ्यात पडले.

ह्या पार्श्वभूमीवर नुकतंच "द अ‍ॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर" हे संजय बारू यांनी लिहिलेलं पुस्तक प्रकाशित झालं.संजय बारू हे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांचे माजी मीडिया अ‍ॅडव्हायजर होते . पंतप्रधानपदाच्या खुर्चीत बसल्यावर बाहेरच्या जगापासून माझा संपर्क तुटेल,म्हणून तुम्ही माझे डोळे आणि कान व्हावं,'असे म्हणून पूर्व परिचय असलेल्या संजय बारुंना पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांनी आपला मीडिया अ‍ॅडव्हायजर म्हणून काम करायला बोलावून घेतलं होतं.

पंतप्रधानांचे प्रसारमाध्यम सल्लागार-मीडिया ‍ॅडव्हायजर-ह्या महत्वाच्या पदावर यूपीए -१च्या काळात कार्यरत असलेले तसंच पंतप्रधानांच्या विश्वासातले अधिकारी संजय बारू यांनी गेल्या दहा वर्षांत एकूणच देशातल्या सत्तेबद्दल आणि घडामोडींबद्दल सगळ्यांनाच ठाऊक असलेलं गुह्य पुस्तकात अधिकृतपणे उघड केलं आणि देशात एकच खळबळ माजली.ह्या पुस्तकानं ऐन सार्वत्रिक निवडणुकींच्या धुमाळीत अनेक कटु सत्यांना वाचा फोडली आहे,अनेकांच्या चेहऱ्यावरचे बुरखे टराटरा फाडले आहेत, अनेकांच्या रंगरंगोटी केलेल्या मुखवटयांआडचे खरे चेहरे उघड केले आहेत.त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यांवरचे रंग उडाले,तर अनेकांच्या हाती आयतं कोलीत सापडलं.ह्या पुस्तकानं राजकारणी नेत्यांचा, सत्ताकारणी प्रशासनकर्त्यांचा आणि सोशल इलाइटस् - सामाजिक उच्चभ्रू वर्तुळांत वावरणाऱ्यांचा आणि 'दिल्ली ते गल्ली' चालणाऱ्या राजकारणाचा धांडोळा घेतला आहे.यूपीए -१च्या काळात-खरं म्हणजे गेल्या दहा वर्षांत दिल्लीतल्या सत्तेच्या सारीपाटावर प्यादी कशी हलत,होती ,ती तशी का हलत होती आणि त्यामागचा खरा सूत्रधार कोण हे सगळं अगदी बारीक सारीक तपशिलांसह बारूंनी त्यात लिहिलंय . मीडिया अ‍ॅडव्हायजर आणि अर्थविषयक बलाढ्य वृत्तपत्रांचे माजी संपादक असल्यामुळे साहजिकच राजकारणातला प्रसारमाध्यमांचा वावर आणि वापर कसा होतो,ह्याचंही दृश्य-अदृश्य प्रतिबिंब त्यांच्या भाष्यात उमटलं आहे."धिस बुक विल हेल्प रीडर्स अंडरस्टॅण्ड द कॉम्प्लेक्स रिलेशनशिप  बिटवीन द पीएम अ‍ॅण्ड द पार्टी प्रेसिडेन्ट" असं बारू म्हणतात, त्याचं पानागणिक प्रत्यंतर पुस्तक वाचताना येऊ लागतं .  

डॉ.मनमोहन सिंह हे योगायोगानं सुद्धा नव्हेत;तर केवळ अपघातानंच झालेले पंतप्रधान आहेत,ह्याबद्दल दुमत असणार नाही.दस्तुरखुद्द डॉ.मनमोहन सिंह ह्यांना स्वत:लाही,आपण निव्वळ अपघातानंच झालेले पंतप्रधान आहोत,हे ठाऊक आहे.जर सोनिया गांधी जन्मानं इटालियन नसत्या(भारतीय असत्या )तर तथाकथित त्यागाबिगाच्या भानगडीत न पडता स्वत:च पंतप्रधान झाल्या असत्या.अंतर्नाद…आपला आतला आवाज वगैरेंचा पोकळ हवाला देत आपण विनम्रपणे पंतप्रधानपदाचा त्याग करीत असल्याचा आव आणायची त्यांना गरजच भासली नसती.हा सगळा इतिहास सगळ्यांनाच चांगला माहीत आहे. त्यामुळे पंतप्रधानपदावर एक आभासी प्रतिमा,जिच्याकडे पंतप्रधानपदाचे आभासी अधिकार असतील आणि खरं पंतप्रधानपद आणि पंतप्रधानपदाचे अधिकार सोनिया गांधी ह्यांच्याकडे असतील, अशी सोयीची उपाययोजना आखण्यात आली,सोनिया गांधींच्या त्याग -नाट्याच्या वेळी ज्याने जितके अधिक अश्रू गाळले,त्याला किंवा तिला त्या प्रमाणात मंत्रिपद प्राप्त झाले, हे सर्वज्ञात आहे. 

आपल्या शोभेच्या पदाच्या मर्यादा जाणून परीस्थितीशरण होत डॉ.मनमोहन सिंह ह्यांना काय काय 
मानापमान झेलावे लागले!'सम टाईम्स इन लाईफ ,इट इज वाईज टू बी फूलिश'असं सांगणाऱ्याडॉ.मनमोहन सिंह यांना अनेकदा त्याच वक्तव्याप्रमाणे वागावं लागलं. डॉ.मनमोहन सिंह ह्यांनी संसदेत आणि नंतर परवेझ मुशर्रफ यांना ऐकवलेल्या मुझफ्फर रझ्मी यांच्या उर्दू शायरीचाच आधार घेत सांगायचं झालं तर "लम्हों ने ख़ता की थी,सदियों ने सज़ा पायी।"  

"इन यूपीए-१,ही( डॉ.मनमोहन सिंह)वॉज इन ऑफिस,बट ही वॉज नॉट इन पॉवर...  डॉ.सिंह वुड हॅव बीन वेल अवेअर ऑफ द लिमिटस् टू द प्राईम मिनिस्टरियल अथॉरिटी अंडर सच अ डिस्पेन्सेशन. ही सॉ हिमसेल्फ अ‍ॅज द अ‍ॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर… काँग्रेस'स्  अलाईज (allies)इन यूपीए-१ नॉमिनेटेड देअर ओन मिनिस्टर्स अ‍ॅण्ड बार्गेन्ड फॉर देअर पोर्टफोलियोज विथ सोनिया ,नॉट विथ  डॉ.सिंह ..अ‍ॅज फॉर सिनियर काँग्रेस लीडर्स,दे ओवड् देअर कॅबिनेट पोस्टस्  ऑलमोस्ट एन्टायरली टू सोनिया गांधी …व्हेन द कौन्सिल ऑफ मिनिस्टर्स वॉज रीशफल्ड ड्युरिंग द टर्म ऑफ यूपीए-१, डॉ.सिंह डिड हॅव मोअर ऑफ अ से ,बट ईव्हन सो,फ्यू ऑफ इटस्  मेम्बर्स एव्हर बिहेवड् अ‍ॅज इफ दे ओवड् देअर मिनिस्टरियल पोझिशनस् टू पीएम.. ."बारू लिहितात. 

दिल्लीत दोन सत्ताकेंद्र असल्याचं अगदी सर्वसामान्य माणसाला जाणवत होतं. त्याबद्दल भाष्य करताना बारूंनी काँग्रेसच्या नेत्यांचे नावासकट आणि प्रसंगासकट तपशील देऊन लिहिलंय की राजकीय दृष्ट्या डॉ.सिंह हे अमुक अमुक ह्यांचे आश्रयदाते होते,पण सोनिया आणि राहुल गांधी यांच्या प्रती निष्ठा जाहीर करण्यानंच त्यांची राजकीय कारकीर्द टिकून राहणार होती. 

"… वॉज डॉ.सिंह'ज् प्रोटेजी(protege ), बट ही न्यू दॅट हिज पॉलिटिकल करीअर डिपेन्डेड ऑन डेमॉंंन्स्ट्रेटिंग लॉयल्टी टू सोनिया अ‍ॅण्ड राहुल." अन्य दुसऱ्या नेत्याबद्दल पंतप्रधानांनी बारूंना विचारलं तेव्हा,"आय रिप्लाईड दॅट … ऑट टू बी मोअर डेमॉंंन्स्ट्रेटिव्ह ऑफ हिज लॉयल्टी टू द पीएम इफ ही वॉन्टेड  अ बर्थ इन द मिनिस्ट्री ." बारू लिहितात. त्या नेत्याला डॉ.सिंह ह्यांनी मंत्रिमंडळात घेतलं. त्या नेत्यानं सोनिया गांधी यांच्या स्नेह्याला त्याबद्दल धन्यवाद दिल्याचं नंतर उभयतांना कळलं. "अ‍ॅट लीस्ट यंगर काँग्रेस एमपीज् शुड फील दे ओवड् देअर मिनिस्टरियल बर्थ टू द पीएम रादर दॅन टू जस्ट सोनिया."बारू लिहितात.
 
एकीकडे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह हे एकटे एकाकी असहाय असल्याचं चित्र लोकांपुढे येत होतं , त्याचवेळी देशाचे कणखर पंतप्रधान म्हणून जगापुढे आपली प्रतिमा निर्माण करणं हे त्यांच्यापुढे आव्हान होतं.    
"व्हॉट शुड डॉ.सिंह'ज् स्ट्रैटेजी बी ?शुड ही अझ्युम दॅट व्हाईल सोनिया वॉज द लीडर ऑफ द काँग्रेस ,ही वॉज द हेड ऑफ अ कोअलिशन गव्हर्नमेन्ट ,विथ नॉन - काँग्रेस कॉन्स्टिट्यूएन्ट्स ,इन्क्ल्युडिंग अ रिबेल लाईक … अ‍ॅण्ड कार्व्ह आउट हिज ओन पॉलिटिकल स्पेस अ‍ॅण्ड रिटेन अ‍ॅडमिनीस्ट्रेटिव्ह कंट्रोल ऑफ  गव्हर्नमेन्ट?ऑर शुड ही बी रनिंग एव्हरी डे टू  10 जनपथ ,सोनिया'ज् रेसिडन्स -कम -ऑफीस, टु टेक हर इंस्ट्रक्शन्स?हॅण्डलिंग द डेलिकेट इक्वेशन विथ सोनिया वॉज डॉ.सिंह'ज् फर्स्ट अ‍ॅण्ड बिगेस्टपॉलिटिकल चॅलेंज."बारू लिहितात. 
 
राजीव गांधींच्या निधनानंतर काँग्रेस पक्षात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती."विदाऊट अ नेहरू -गांधी फॅमिली मेंबर अ‍ॅट द टॉप, काँग्रेस पार्टी वुड स्प्लिन्टर अ‍ॅण्ड विदर अवे." बारू लिहितात. "द इनसायडर " लिहिणारे पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव हे पक्षाच्या आणि जी हुजुरी करणाऱ्या पक्षातल्या लोकांच्या दृष्टीने "आउटसायडर"च ठरले.इतका विद्वान माणूस ;पण त्यांच्या मृत्युनंतर काँग्रेस शीर्ष नेतृत्वानं त्यांचं पार्थिव सुद्धा काँग्रेसच्या मुख्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवू दिलं नाही.बारूंनी ह्यावर पोटतिडकीनं भाष्य करीत काँग्रेस शीर्ष नेतृत्वावर सपासप कोरडे ओढले आहेत. " नरसिंह राव'ज् चिल्ड्रेन वॉन्टेड द फॉर्मर पीएम टु बी क्रीमेटेड इन दिल्ली,लाईक अदर काँग्रेस प्राईम मिनिस्टर्स. इम्प्रेसिव्ह मेमोरियल्स हॅड बीन बिल्ट फॉर नेहरू ,इंदिरा अ‍ॅण्ड राजीव अ‍ॅट प्लेसेस व्हेअर दे  हॅड बीन क्रीमेटेड…  …  वॉन्टेड मी टु एन्करेज नरसिंह राव'ज् चिल्ड्रेन,टु टेक देअर फादर'स् बॉडी टू हैद्राबाद फॉर क्रीमेशन. … सोनिया डिड नॉट वॉन्ट अ मेमोरियल  फॉर राव एनीव्हेअर इन दिल्ली.द काँग्रेस पार्टी रिफ्युज्ड टु अलॉव  राव'ज् बॉडी टु बी ब्रॉट इन्टू द पार्टी'ज् हेडक्वार्टर ऑन इट्स वे टू एअरपोर्ट  अ‍ॅण्ड  सोनिया चोज नॉट टु बी प्रेझेन्ट अ‍ॅट द हैद्राबाद क्रीमेशन ," बारू लिहितात .     

अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवलेल्या,आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थशास्त्रातल्या ज्ञानाच्या बळावर सन्माननीय व्यक्ती म्हणून नावलौकिक मिळवलेल्या आणि खरं म्हणजे अजिबात धूर्त राजकारणी नसलेल्या एका विद्वान अर्थशास्त्रज्ञाची यूपीएच्या कारकीर्दीत किती आणि कशी घुसमट होत गेली ह्याचं साद्यंत वर्णन संजय बारूंनी केलं आहे-तेच त्यांचं उद्दिष्ट्यपण आहे,ते वाचून पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांची अगतिकता,कुचंबणा आणि त्यांचं मौनव्रत ह्याबद्दल वाचक हळहळू लागतो.अंतर्बाह्य साधे सज्जन असलेल्या पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह ह्यांच्या हाताखालच्या,त्यांच्या सरकारातल्या  मंत्र्यांसंत्र्यांनी लाखो करोडो रुपयांचा भ्रष्टाचार आणि अपहार केला,पण बहुधा त्यांना त्यावर मिठाची गुळणी धरण्यास बाध्य करण्यात आलं असावं .     

त्यांनी केलेल्या नरेगा (मनरेगा)कामाचं श्रेय राहुल गांधींना देण्यात आलं.मीडियात तशी पद्धतशीर बातमी पेरली गेली नि तिचा प्रचार-प्रसार करण्यात आला."वुई हॅव टु बिल्ड राहुल'स् इमेज"अशी त्याची भलामण करण्यात आली.त्यांनी केलेल्या कृषि-कर्जमाफीची योजना ह्या त्यांनी हृदयाशी बाळगलेल्या संकल्पनेचं श्रेयसुद्धा त्यांना नं देता सोनिया गांधींना देण्यात आलं. त्यावर पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांची प्रतिक्रिया होती-"लेट देम टेक ऑल द क्रेडिट.आय डू नॉट नीड इट.आय अ‍ॅम ओन्ली डूइंग माय वर्क. आय डू नॉट वॉन्ट एनी मीडिया प्रोजेक्शन."             
 
पक्षांतर्गत हेवे- दावे, ढवळाढवळ, शह-काटशह,एकमेकांवर कुरघोडी करू पहाणारे,अजिबात सहकार्य नं करणारे सरकारातले मंत्रीगण,पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाला 'अंतरीच्या गुढगर्भी एकदा जे वाटले, एकदा जे वाटले, ते प्रेम आता आटले' असा शीर्ष नेतृत्वाकडून येत असलेला अनुभव असं सगळं जिवंत चित्रण "द अ‍ॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर"ह्या पुस्तकात संजय बारू यांनी केलं आहे. हे पुस्तक वाचल्यावर अगदी अनभिज्ञ व्यक्तीलाही कळतं की कुण्या बाळ्या,बंड्या,बबड्या,छकुली यांच्यासाठी निर्माण करण्यात आलेलं पंतप्रधान हे पद नाही. पंतप्रधान हा काही पक्षाचा उरत नाही,तो देशाचा होतो; देशात आणि अंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला आपल्या देशाची आन -बान -शान उंचावण्याची जबाबदारी असते.जोवर त्याची प्रतिमा चांगली असते,तेव्हा त्याच्या सरकारची आणि देशाची प्रतिमा चांगली असते. पंतप्रधानाची प्रतिमा मलीन झाली;तर मात्र सरकारची आणि देशाची प्रतिमासुद्धा डागाळते!  

"लम्हों ने ख़ता की थी,सदियों ने सज़ा पायी।" 
The Accidental Prime Minister: The Making and Unmaking of Manmohan Singh

No comments: