Monday, April 16, 2012


अफगाणिस्तानातील अस्वस्थ वर्तमान :
                                                            कटी  पतंग
                                                                                                                                                                                                                                                            -रश्मी घटवाई 
"THE KITE RUNNER"-" द काईट रनर " हे खालिद होसैनी यांचे पहिले-वहिले  पुस्तक,पहिली -वहिली कादंबरी.  ती फिक्शन अथवा  काल्पनिक कथा आहे की आत्मकथन आहे, ह्याचे  जणू वाचकाला कोडे पडावे,एव्हढे त्यातले अक्षर नी अक्षर जितेजागते रूप घेऊन डोळ्यांसमोर साकारते.त्यातला प्रत्येक प्रसंग डोळ्यांसमोर प्रत्यक्ष उभा राहतो.वाचकाला साक्षीदार बनवतो.अफगाणिस्तानातली  पूर्वीची  शांत परिस्थिती,नंतर अफगाणिस्तानावर रशियानं केलेलं आक्रमण , रशियन सैन्याची जुलुम- जबरदस्ती , तालिबान राजवटीतली  क्रूर हुकुमशाही नी छळ-छावण्या, त्यांनी केलेलं स्त्री-पुरुषांचं  शिरकाण,अनाथ झालेल्या,दिवसचे दिवस उपाशी-तापाशी रहावे लागणाऱ्या मुलांना भोगावे लागणारे  लैंगिक अत्याचार, तालिबान्यांनी   बेचिराख केलेला अफगाणिस्तान त्यांनी शब्दश:   उभा करत वाचकाला नि:शब्द केलेलं आहे. खालिद होसैनी  ह्यांनी लिहिलेली  " A THOUSAND SPLENDID SUNS"  - "अ थाउजंड स्प्लेनडीड सनस"  ही दुसरी कादंबरीही खूप परिणामकारक  आहे.   
अफगाणिस्तानातली काबूलमधली वझीर  अकबरखान  जिल्ह्यातली आगासाहेब ही बडी असामी आहे. ते मोठे बिझनेसमन  आहेत. स्वभावानं ते अतिशय कनवाळू आहेत.   अनेक लोकांना त्यांनी निस्वार्थपणे   आर्थिक मदत केली आहे,खंबीर मानसिक आधार दिलेला आहे.रहिमखान हा लेखक त्यांचा सच्चा दोस्त आहे. आगासाहेबांची कवियत्री,प्रोफेसर पत्नी मुलाला जन्म देताच अल्लाला प्यारी झाली आहे.त्यामुळे अमीर ह्या मुलाला त्यांनी मातेचं नी पित्याचंही प्रेम दिलं आहे.  अली हा त्यांचा नोकर त्यांच्याच वयाचा नी त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या वडिलांनी त्यांच्या घरी आणलेला आहे.त्याला अंतर देणं त्यांना ह्या जन्मी तरी शक्य नाहीये. पोलियो झाल्यामुळे अलीचा पाय वेडावाकडा नी त्राणहीन  झाला आहे, त्यामुळे त्याला कसेबसे पाय ओढत चालावे लागते.त्याच्या डोळ्यात ही व्यंग आहे. ह्या सर्वांपायी गल्लीतली टवाळखोर पोरे त्याची सदोदित टर उडवतात.अलीचा मुलगा हसान जन्मत: दुभंगलेले  ओठ घेऊन जन्माला आला   आहे. तो एकट्या अलीचाच नव्हे,तर आगासाहेबांचाही जीव की प्राण आहे.हसानची आई सनोबर  विलक्षण देखणी होती,परंतू तिचे चालचलन नी लक्षण मुळीच चांगले नव्हते.हसानला जन्म देऊन त्याला टाकून देऊन ती पळून गेली होती.आई नसलेल्या हसानला नी अमीरला एकाच दाईने  दुध-आई बनून सांभाळले होते.म्हणून की काय,त्या दोघांचेही एकमेकांशिवाय पान  हलत नसे.मात्र अमीर शाळेत जाई नी हसान अलीबरोबर सर्व घरकाम करीत असे.  अली नी हसान हे 'हजारा ' जमातीचे-म्हणजे मंगोलियन वंशाचे ,चेंगीज खानाचे वंशज ,म्हणून समाजात त्यांच्या वाट्याला  सदैव हेटाळणी येत असे. आगासाहेबांचामात्र  हसानवर विशेष जीव होता. त्याच्या वाढदिवसाला ते नं चुकता महागडी खेळणी आणीत. एका वाढदिवसाला   त्यांनी त्याच्यासाठी  आगळे वेगळे प्रेझेंट  आणले.त्यांनी थेट भारतातून,नवी दिल्लीहून डॉ.कुमार या प्लास्टिक सर्जरी करणाऱ्या सर्जनना पाचारण केलं नी त्याचा वरचा फाटलेला  ओठ  शिवून घेतला.हे अनोखं  प्रेझेंट आजन्म हसान जवळ राहणार होतं.
 या अशिक्षित  हसानवर अमीर दादागिरीही करीत असे. आपल्याला येणारे शब्द, त्यांचे अर्थ ,वाक्यात उपयोग  वगैरे  सांगून हसानला अमिर  निरुत्तर करीत असे .आपल्या या वागणुकीबद्दल काही काळानंतर  त्याला वाईटसुद्धा  वाटत असे.त्याची भरपाई म्हणून   आपला जुना शर्ट,मोडकं खेळण  अमीर  हसानला देत असे. अमीर निरक्षर हसानला गोष्टीची पुस्तके वाचून दाखवत असे..दोघेही जण डाळींबांच्या  झाडाखाली बसून ही कथाकथन-श्रवण भक्ती नेमाने करीत.तो त्याला गोष्टी वाचून दाखवत असे.रुस्तम आणि सोहराब ही त्या दोघांची फार लाडकी, आवडती कथा होती.'रक्ष' ह्या  आपल्य  चपळ घोड्यासह लढणारा महान योद्धा  रुस्तम युद्धात सोहराबला प्राणांतिक जखमी करतो.मृत्युशय्येवरचा सोहराब हा अन्य कोणी नसून खूप पूर्वी हरवलेला आपला पोटचा पोरगाच आहे,हे   रुस्तमला उमगतं."If thou art indeed my father,then hast  thou stained thy sword in the life-blood of thy son.And thou didst it of thine obstinancy.For I sought to turn thee unto love ,and I implored of thee thy name ,for I thought to behold in thee the tokens recounted of my mother.But I appealed unto thy heart in vain,and now is the time gone for meeting...."हसानवर ह्या शब्दांचा विलक्षण परिणाम होई . तो अमीरला पुन्हा-पुन्हा ते शब्द वाचायला  लावीत  असे. अनेकदा ते ऐकून त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत.त्यानं नं पाहिलेल्या रुस्तम आणि सोहराब बद्दल वाटणारी प्रचंड आत्मियता  नी दु:ख त्याच्या डोळ्यातून आसवांच्या रूपानं झरू लागे.   तो रुस्तमसाठी रडतोय  की  सोहराबसाठी,हे आमिरला कळत नसे.
कधीकधीआमिर स्वत;च्याच मनानं  खोट्या कहाण्या रचून,त्या वाचल्याचा आव आणून हसानला सांगत असे.हसानला त्या खूप आवडत.एके  रात्री   आमिरनं आपली पहिली लघुकथा लिहिली.मग अगदी मध्यरात्री हसान गाढ झोपेत असताना त्याला उठवून त्याला स्वत:ची कथा ऐकवली.हसानला ती खूप आवडली.त्याची खूप प्रशंसा करीत हसान आमिरला म्हणाला,"इन्शाल्ला तू खूप मोठा नी प्रसिद्ध लेखक होशील.त्या कथेतल्या नायकाला आसवांचे मोती होतील,असा वर मिळालेला असतो.पण त्यासाठी त्याला आपल्या पत्नीला ठार मारायची गरज का भासावी?डोळ्यांत अश्रूच  आणायचे होते,तर कांदे चिरूनही डोळ्यांत पाणी आणता आले  असते," असं हसान म्हणतो,त्यावर अमीर निरुत्तर होतो.आमिरला वाटतं,आपण शाळेत जातो, पण खरी बुद्धी तर हसान जवळ आहे.आमिरच्या वडिलांचे मित्र रहीमखान आमिरच्या लेखनाचं खूप कौतुक करतात.
अफगाणिस्तानात पतंग उडवण्याच्या खेळाला अपार महत्व आहे. हिवाळ्यात कडक थंडीत ह्या स्पर्धा चालतात. आबाल-वृद्ध  सारेच पतंग उडवण्याचे शौकीन!कापलेली पतंग लुटण्यासाठी पळणारे-  "काइट रनर्स" जीव खाऊन पळत.एकदा अशाच प्रयत्नात काबुलमधला एक मुलगा  झाडावर  चढला, त्याच्या वजनानं झाडाची फांदी तुटली नी तो तीस फुटांवरून खाली कोसळला,नी पाठ मोडल्यानं कायमचा अंथरुणाला  खिळला. हिवाळ्यातल्या  स्पर्धेतली कापलेली शेवटची पतंग लुटून संग्रही ठेवणं म्हणजे एखादा मोठा  ऐवज प्राप्त होण्यासारखं, सन्मान मिळण्यासारखं होतं. आल्या-गेल्याकडून त्यासाठी शाबासकी नी कौतुकाची थाप  मिळाल्यानंतर त्या पतंग संग्रही ठेवणाऱ्याला स्वर्ग ठेंगणा वाटावा,एवढं महत्व त्याला  होतं.
अमीर आणि हसान दोघेही जण पतंग उडवण्यात प्रवीण होते.त्यातही,कापलेली पतंग लुटून आणण्यात हसानचा हात धरणारे कुणीही नव्हते. तो अद्वितीय " काईट रनर "होता.त्याला जणू ती अल्लाची देणगी होती. कापलेली पतंग भिरभिरत जाईल,त्या दिशेने मुलांचे लोंढे  जात, पण  हसान   जाईल,तिथे माहीत असल्यागत कापलेली पतंग त्याच्या हातात अलगद येऊन पडे. 
एकदा हिवाळ्यात  पतंग उडवण्याच्या एका स्थानिक स्पर्धेमध्ये कापलेली पतंग लुटण्यासाठी अमीर उघड्या गटारांना चुकवत ,कशाचीही पर्वा नं करता गल्ली-बोळातून धावत होता. मात्र संपूर्णपणे  विरूद्ध  दिशेनं धावणाऱ्या हसाननं  त्याला  आपल्या मागे येण्यास सांगितलं.मागून मुलांचा प्रचंड मोठा घोळका ती अतिशय  मौल्यवान  पतंग  लुटण्यासाठी जिवाच्या 
आकांतानं  धावत येत होता.आपण हरणार अशी अमीरची खात्री पटली. तो हसानच्या अंगावर ओरडला. तरीही हसान आपल्या निश्चयापासून ढळला नाही.तो त्या   विरूद्ध  दिशेनं गेला, आणि आश्चर्य म्हणजे ती अमूल्य पतंग अलगद हसानच्या हातात विराजमान झाली.

आमिरच्या वडिलांचे एअरलाईन  मध्ये पायलट असलेले दुसरे  मित्र महमूद यांचा मुलगा असिफ हा वझीर अकबरखान या श्रीमंतांच्या अतिउच्चभ्रू   वस्तीतला जरा गुंड प्रवृत्तीचा मुलगा हातात कायम पितळ नी पोलादापासून बनवलेला अंगुलीत्राणाचा पट्टा-knuckles -घालायचा .त्याच्या गुंडगिरीबद्दल तो कुख्यात होता. आजूबाजूच्या मुलांनी त्याला  असिफ गोश्खोर-कान खाणारा  अशी उपाधी दिली होती. हसान  नी त्याचे वडील अली यांना छळण्यात हा असिफ नेहेमीच  आघाडीवर असायचा. 
एके दिवशी असिफनं ऐन रस्त्यात हसान नी आमिरला एकट गाठलं . त्याच्यासमवेत त्याचे  अन्य टवाळखोर ,गुंड मित्र होते.अफगाणिस्तानात झहीरशाहाचं  ४७ वर्षांचं शासन त्याच्या चुलत भावानं -दाउदखानानं नुकतंच उलथून टाकलेलं  होतं.अफगाणिस्तानात तख्त-पालट करणारा दाउदखान आपल्या  वडिलांचा चांगला  परिचित असून घरी जेवायलाही आला होता,अश्या फुशारक्या असिफ मारू लागला.हिटलर आपल्याला पूजनीय असून त्यानं जे केलं ते योग्य असल्याचं ठासून सांगत असिफ म्हणाला-"अफगाणिस्तानची भूमी पश्तून लोकांची आहे. आम्ही पश्तून लोकच खरे, विशुद्ध  अफगाणी रक्ताचे आहोत ,हे चापट्या नाकाचे  हझारा लोक नव्हेत!हे लोक आमची भूमी प्रदूषित करतात . Afganistan is for Pashtuns!  अशुद्ध रक्ताच्या ह्या घाणेरड्या हझारांना अफगाणिस्तानातून  हाकलून द्यावं असं मी नव्या राष्ट्राध्यक्षांना सांगेन "असिफ गुरकावतो.
आपण काही तुला त्रास देत नाही,तेव्हा हसानला नी आपल्याला जाऊ द्यावं म्हणून अमिर  असिफला 
म्हणतो,तसा तो उसळून म्हणतो की "ह्या हझारा हसानपेक्षा  त्याच्याशी मैत्री करणारा तूच मला अधिक सलतो.हा तुझा मित्र असूच कसा शकतो?"अमिर  हा विलक्षण भित्रा नी मुखदुर्बळ मुलगा असतो."तो माझा नोकर आहे"तो असिफला सांगतो.त्याला  मित्र  म्हणायची सुद्धा त्याला लाज वाटत असते.    
"तू नी   तुझ्या वडिलांसारख्या मूर्ख  लोकांनी ह्या अपवित्र हझारांना आश्रय दिला नसता,तर ह्यांना केव्हाच हुसकावून लावता आले असते."असिफ गरजतो.आपले पितळ-पोलादाचे दणकट अन्गुलीत्राण- knuckles चढवतो.तेव्हढ्यात विजेच्या वेगानं  कसलीशी हालचाल होताना आमिरला  डोळ्याच्या  कोपऱ्यातून दिसते.असिफचे डोळे तर प्रचंड विस्फारतातच; त्याचे ते टारगट  मित्र ही आ वासून बघू लागतात. हसाननं आपला गुल्लेरीचा (गलोलीचा)पट्टा ताणून धरलेला असतो.त्याच्या बेचक्यात चांगला अक्रोडाएव्हढा दगड ठेवून त्यानं असिफच्या डोळ्याच्या  दिशेनं नेम धरलेला असतो."आम्हाला सोड,आमच्या वाट्याला जाऊ नकोस",हसान असिफला सांगतो."तुम्ही दोघेच आहात,आम्ही तिघे!" कुत्सितपणे  हसत असिफ बोलतो."तिघे असाल,पण माझ्याजवळ ताणलेली गोफण आहे.तू जागचा जरी हललास,तरी कानचाव्याअसिफ ऐवजी लोक तुला एक डोळा असलेला-काना असिफ म्हणू लागतील,हे विसरू नकोस.माझ्या गोफणीच्या दगडाचा नेम तुझ्या डाव्या डोळ्याच्या दिशेनं आहे.आवाजात कसल्याही चढ-उतराशिवाय, भावनाविरहित   आवाजात हसान म्हणाला.
"काही हरकत नाही.अमिर,आज तुझ्या ह्या हझारानं मोठी आगळीक केलीये.आज जरी मी तुम्हाला जाऊ देतोय तरी गाठ माझ्याशी आहे,हे  लक्षात ठेवा!"एक-एक पाऊल मागे सरकत असिफ गुरकावला.
अफगाणिस्तानात पतंगीच्या काटाकाटीला जणू युद्धाचं  स्वरूप प्राप्त होई.  अमिर नी हसान स्वत;च पतंग नी पतंगीचा   मांजा बनवत.पतंगीचा ताव,बांबू मांजासाठी धागा, गोंद  अथवा खळी  असं सगळं साहित्य विकत आणून तासन तास बांबू तासत बसत.काच बारीक कुटून कुटून बारीक पूड करून  खळीत घोटून धाग्यावर चढवत.झाडांना धागा बांधून ते मिश्रण सुकू देत.असा तयार केलेला मांजा मनासारखा झाला म्हणजे त्यांच्या आनंदाला पारावर उरत नसे.हसान हा अतिशय सच्च्या दिलाचा होता.आमिरसाठी तो काहीही करायला तयार असायचा.
हिवाळा आला.शाळांना सुट्या लागल्या.हिवाळ्यात शेकोटीच्या उबेत बसून  हसानबरोबर   बुद्धिबळ अथवा पत्ते खेळण हा आमिरचा छंद होता.  अमिरनं त्या हिवाळ्यातल्या  पतंगबाजीच्या  स्पर्धेत  भाग घेतला  होता. तसा त्याआधीही ती स्पर्धा तो जिंकता-जिंकता राहिला होता.शेवटच्या तिघांत येणं म्हणजे स्पर्धा जिंकण   नव्हे.अमिरच्या बाबांनीही त्यांच्या काळी त्या स्पर्धेत भाग घेऊन एकेका वेळी चौदा-चौदा पतंग कापले होते.  स्पर्धेचा दिवस उजाडला.आपल्याला पतंग उडवता येईल का या विचारानं आमिरला हुरहूर वाटू लागली.पोटात गोळा उठला.घरी पळून जावंसं  त्याला वाटू लागलं.
" मला नाही वाटत की मला आज पतंग उडवता येईल.जणू कुणी अक्राळ-विक्राळ राक्षस मला भीती दाखवतोय." अमिर हसानला म्हणाला."अमिर आगा, बाहेर  राक्षस वगैरे कुणीही नाही,बाहेर मस्त दिवस उजाडलाय." हसाननं आमिरला दिलासा दिला."चला पतंग उडवायला,"
पिवळ्या किनारीची लाल पतंग हसाननं हवेत उडवली.तिच्यात जणू वारा भरला. आमिरच्या हातातली चक्री नंतर हसाननं धरली.हळूहळू मांजाच्या धारीमुळे हसनचा हात रक्ताळला.त्यांची   पतंग मोठ्या दिमाखात आकाशात स्वच्छंद विहार करू लागली.इतर मुलांच्या पतंगीही  आकाशात त्यांच्याशी स्पर्धा करू लागला.पेच लढवल्या जाऊ लागले.लवकरच पहिली पतंग कापली गेली नी ती  लुटण्यासाठी मुलांच्या झुंडी एकामागोमाग  एक तिच्या मागून धावू लागल्या. पतंगीवरून  त्यांच्यात भांडणेही जुंपली.बघता बघता आकाशात पन्नास पतंगीऐवजी जेमतेम डझनभर पतंगी उरल्या.गच्चीत बसून आमिरचे बाबा नी त्यांचे मित्र रहीमखान कौतुकाने आमिरच्या पतंग उडवण्याच्या कौशल्याला दाद देत होते.इतरांना हुलकावण्या देत आमिरची पतंग सर्वात वर लहरत होती.बघता बघता आमिरच्या पतंगीसह अवघ्या  सहा,चार  नी नंतर तर केवळ  दोन पतंगी उरल्या-एक आमिरची नी दुसरी   निळी! आमिरच्या डोळ्यापुढे केवळ ती निळी पतंग  नाचू लागली.
सर्व प्रेक्षकांची उस्तुकता शिगेला पोहोचली होती.सर्व जण ओरडून अमिरला ती निळी पतंग कापून विजयी   होण्याबद्दल प्रोत्साहन देत होते.निळी पतंग उडवणारा सुद्धा जिवाच्या कराराने आमिरची पतंग कापण्यासाठी प्रयत्न करीत होता,त्याला अमिर हुलकावणी देत होता.त्याला झुलवत -झुलवत अखेरच्या क्षणी आमिरने कचकन ती निळी पतंग कापलीसुद्धा !प्रेक्षकांनी एकाच जल्लोष केला.काही कळायच्या आत हसान ती निळी पतंग मिळवायला जिवाच्या कराराने धावत निघाला. अमिरसाठी ती त्या स्पर्धेतली महत-सन्मानाची  नी मौलिक चीज होती.ती नसती,तर त्याच्या त्या स्पर्धा जिंकण्याला मुळीच महत्व उरलं नसतं." जा हसान,निळ्या पतंगीसहच परत ये."अमिर त्याला म्हणाला.
हसानची अमिरवर नितांत श्रद्धा,भक्ती होती.त्याच्यावर त्याचा   अपार विश्वास नी प्रेम होतं.हसानचं मन इतकं निरागस नी नितळ स्वचछ  होतं,की अमिर आगानं त्याच्यावर चिडचिड केली,त्याला तो टाकून बोलला,तरी तो मनाला लावून घेत नसे. अली आणि हसान या दोघा बाप-लेकांना तर त्यांचा  जन्मच जणू आगासाहेब आणि अमिरची सेवा करण्यासाठी झाला आहे,अशी खात्री असल्यागत ते दोघे अतीव निष्ठेनं नी आदरानं  त्यांच्यासाठी झिजत
बराच वेळ झाला ,तरी हसान पतंगीसह आला नाही,तेव्हा अमिर त्याला शोधायला गल्लीबोळांतून निघाला.निळी पतंग हाती असलेल्या एखाद्या लहान मुलाला पाहिलं का म्हणून लोकांना विचारू  लागला.अखेर एका वृद्ध इसमानं असा एक हझारा मुलगा त्या दिशेनं गेल्याचं नी त्याच्या मागे टवाळखोर तीन मुले गेल्याचं सांगितलं. त्यानं सांगितल्याप्रमाणे अमिर गेला नी त्याचे पाय जमिनीला खिळले.मुळात अमिर हा कमालीचा भित्रा नी मुखदुर्बळ.समोर असिफ नी त्याचे इतर दोघे गुंड साथीदार हसान च्या समोर उभे होते."आज तुझी गोफण कुठे आहे,"असे उपहासाने विचारात होते.ती निळी पतंग आम्हाला दिलीस तर आम्ही तुला सोडून देऊ असे ते कुत्सितपणे हसानला सांगत होते.पण ती अमूल्य चीज त्याच्या आमिरची आहे,स्पर्धेतली त्यानं कापलेली मौल्यवान शेवटची पतंग आहे,असे सांगून त्यानं ती देण्यास नकार दिला."ठीक आहे.ठेव ती निळी पतंग तुझ्याचजवळ.पण त्याची किंमत तुला चुकवावी लागेल...ती तुझ्या कायम स्मरणात राहील"असे म्हणत असिफ त्या कोवळ्य,निरागस हसानवर लैंगिक अत्याचार करून स्वत:ची वासना पुरी करतो..त्याविरुद्ध उभं ठाकायचं सोडून अमिर शुंभासारखा सर्व बघत राहतो.   त्या निळ्या पतंगीची  किंमत अशा रीतीनं हसान स्वत:वरचा बलात्कार झेलून चुकवतो. मात्र आमिरच्या ठायी असलेली त्याची निष्ठा काही ढळत नाही.  
हे सारं लेखक खालिद होसैनी यांनी अशा शब्दांत लिहिलंय की आपला जीव हसानसाठी कळवळत राहतो.  किंबहुना आमिरच्या ऐवजी आपण स्वत: जावं नी त्याच्यावर होणारा अत्याचार थांबवावा अशी अनिवार,प्रबळ उर्मी वाचकाच्या मनात दाटून येते.
हसानवर होत   असलेला  अत्याचार  पाहून  नंतर  तो  तिथून  पळाला होता.,त्याबद्दल अमिरला त्याचं  मन  सतत खात   रहातं. त्या प्रसंगानंतर हसान अमिरसमोर विशेष  येईनासा झाला.त्याच्यासमोर तो त्याचे इस्त्री केलेले कपडे सज्ज ठेवी,टेबलवर नाश्ता जय्यत तयार ठेवी.मात्र त्याच्या नजरेला नजर देणं तो टाळू लागला.हसान  विलक्षण चुपचाप राहू   लागला,एकलकोंडा झाला,पटापट कामे उरकून तो पांघरून ओढून झोपला राही,एरवीचा त्याचा उत्साह पार लोपला होता त्यामागचं कारण अली आमिरला खोदूनखोदून विचारीत असे.त्यावर अमिर त्याला ,आपल्याला काय माहीत,म्हणून चिडचिड करीत असे.खरी गोम अशी होती,की स्वत:च्या
पळपुटेपणाची  आमिरला चीड येत होती,त्यावर तो काही करू शकत नाही,याचीही त्याला जाणीव होती,ती चीड त्या बापलेकांवर निघत होती,इतकंच! "I saw Hassan get raped!" तो म्हणत राही.ते सत्य इतरांपासून दडवून ठेवताना  त्याला मात्र ते क्षणोक्षणी कुरतडत होतं. नकळत त्याच्यात नी हसानमध्ये एक दरी निर्माण होऊ लागली होती.
हसाननं मात्र धीरानं  त्या साऱ्या प्रसंगातून बाहेर यायचं ठरवलं. अमिर नी त्याच्यात निर्माण झालेली दरी बुजवून टाकण्यासाठी तो जाणीवपूर्वक प्रयत्न करू लागला.एक दिवस अमिर आपल्या खोलीत पुस्तक वाचत असताना  हसाननं दारावर टकटक केली.  "बेकरीत नान आणायला जातो आहे, चलतोस का ,बाहेर एकदम प्रसन्न वातावरण आहे,"त्यानं आमिरला विचारलं,त्यावर,तू एकटाच जा म्हणून त्यानं तुसडेपणानं  त्याला झटकून टाकलं."मला वाटलं तू येशील.मी असं काय केलंय अमिर आगा?माझं काय चुकलं?मला वाटला मला सांगशील तरी!मला माहीत नाही आजकाल तू माझ्याशी खेळत का नाहीस ते! तुला मी  काय करायला हवंय?तू मला सांग, मी तसं वागणार नाही! "हसान  कळवळून म्हणाला.त्यानं उदवेगानं दारावर डोकं आपटून घेतलं. अमिरनं गुढघ्यात डोकं खुपसलं.स्वत:चं डोकं गुढघ्यानं वेड्यासारखं दाबत तो हसानला म्हणाला-"मी सांगतो  -तू काय करू नकोस ते!माझा हा असा छळवाद करणं थांबव!जा,चालता हो!"तो खेकसला.थोड्या वेळानं अमिरनं बघितलं. हसान निघून गेलेला होता.
अमिरला हसान  डोळ्यांसमोर नकोसा झालेला होता."आपण नवीन नोकर ठेवूयात का?"त्यानं आपल्या वडिलांना एक दिवस सुचवलं." मला दिसतंय  तुझ्यात नी  हसान मध्ये काहीतरी बेबनाव झाला आहे.पण ते तुझं  तुलाच बघायचंय.मी स्वत:अलीबरोबर लहानाचा मोठा झालो.माझ्या वडिलांनी अलीला आणलं नी स्वत:च्यामुलासारखं  वाढवलं. हसान या  घरातून कुठेही जाणार नाही. पुन्हा  म्हणून त्याला बाहेर काढण्याबद्दल म्हणशील तर याद राख!" वडील कडक शब्दांत त्याला म्हणाले.
पतंगीच्या स्पर्धेतल्या आमिरच्या यशानंतर त्याच्या वडिलांनी त्याच्या वाढदिवसाची जंगी पार्टी दिली.अमिरनी  नी हसाननं त्याला नवंकोरं पुस्तक भेट दिलं.असिफ  त्या पार्टीला होता,दुसरा गुंड मित्र ही होता. हसान पेय सर्व्ह करीत असताना असिफनं त्याच्या  छातीवर आपल्या   अन्गुलीत्राणानं प्रहार केला.मात्र त्याच्या तोंडातून अन्यायाबद्दल एक शब्द सुद्धा आला नाही.
अमिरनं वाढदिवसाच्या भेटीदाखल मिळालेले पैसे असलेले लिफाफे नी नवं घड्याळ गुपचूप हसानच्या खोलीत  उशीखाली ठेवून दिलं.साळसूदपणे  त्यानं वडिलांना म्हटलं-नवीन घड्याळ दिसत नाही.हसानवर त्यानं  चोरीचा आळ घेतला.वडिलांनी हसानला विचारलं ,तर हसाननं गुन्हा कबूल केला.अली नी हसान आगसाहेबांचं  घर सोडून गेले.
एप्रिल १९७८,डिसेंबर १९७९ मध्ये रशियन रणगाडे अफगाणिस्तानच्या रस्त्यांवरून धावू लागले.अशांत   अफगाणिस्तानातून अमिर नी आगासाहेब पाकिस्तानात एका ट्रकमधून निघून जातात.इतरही अनेक जण असतात.त्यात एक स्त्री आपल्या तान्हुल्याबरोबर नी नवऱ्याबरोबर असते.रस्त्यात एक रशियन सैनिक ट्रक थांबवून लाच उकळतो.तेवढ्यात त्याचं  लक्ष त्या स्त्रीकडे जातं.तो निर्लज्जपणे तिच्याकडे  शरीरसुखाची मागणी करतो.ती स्त्री नी नवरा  दिन्ग्मूढ होतात. त्या अन्यायाविरुद्ध आगासाहेब उभे ठाकतात. रशियन सैनिक  त्यांच्या अंगावर बंदुकीच्या गोळ्या झाडण्याची धमकी देतो,त्यालाही ते धूप घालत नाहीत. तेवढ्यात एक वरिष्ठ अधिकारी येतो,नी त्या सर्वांची च्या प्रसंगातून सुटका होते.
अशांत   अफगाणिस्तानातून अमिर नी आगासाहेब पाकिस्तानात  नी नंतर अमेरिकेत कालीफोर्नियात  स्थायिक होतात.कालांतरानं अमिर आगाचा  विवाह अफगाणिस्तानातून आलेल्या आर्मीतल्या जनरल ताहेरी यांच्या मुलीशी -सोरेयाजानशी होतो.कालांतरानं आगासाहेबांचं   निधन होतं.
लेखक खालिद होसैनी यांनी हृदयभेदी शब्दांत   अफगाणिस्तानाची तबाही,विध्वंस मांडला आहे.ते वाचणेही अशक्य होते,तर ज्यांनी तो सारा छळवाद  नी अत्याचार सहन केला असेल,त्यांची गत काय झाली असेल,ह्या जाणीवेनं वाचकाच्या अंगावर शहारे येतात.
तालिबान्यांनी अफगाणिस्तानातल्या तरुण पुरुषांना वेचून वेचून ठार केलं. अफगाणिस्तानात उरल्या त्या केवळ त्यांच्या विधवा स्त्रिया नी लहान मुले.त्यांचे पालनपोषण करणेसुद्धा  त्या मातांना शक्य होत नाहीये.काहींच्या आई-वडिलांना दोघांनाही तालिबान्यांनी ठार केल्यामुळे   अफगाणिस्तानात नुसती अनाथ मुले उरली होती.त्यांना सामावून घ्यायला,त्यांचा प्रतिपाळ करायला अनाथालयेही  अपुरी पडत होती. 
रहीमखान ह्या आगासाहेबांच्या वृद्ध मित्राला भेटायला अमिर पाकिस्तानात जातो .तिथे त्याला एक नवं सत्य समजतं.  तिथून तो अफगाणिस्तानात जातो.तिथल्या त्या अनाथालयांमध्ये हसानच्या  अनाथ मुलाला शोधायला  अमिर  जंगजंग पछाडतो.तिथे  त्याला कळतं,  निर्दयी तालिबानी तिथल्या एकेका  कोवळ्या मुलाला घेऊन जाऊन आपली वासना पुरी करत.त्याबदल्यात  अनाथालयांना  थोडेफार अन्नधान्य  मिळत असे.अशा प्रकारे अनेक लहान बालकांना बलात्कार,लैंगिक अत्याचार झेलावे लागत होते. धास्तावून अमिर हसानच्या मुलाला-सोहराबला शोधून काढतो. त्याला   तालिबानी असिफनं आपल्या मनोरंजनासाठी स्त्रैण बनवलं होतं.त्याला वाचवायला गेलेल्या आमिरला असिफ ओळखतो.तो त्याला मारणार...एव्हढ्यात हसानचा  मुलगा सोहराब असिफवर गुल्लेर ताणून  नेम धरतो...डाव्या डोळ्यावर नेम धरून त्याचा डोळाच फोडतो!जणू असिफनं त्याच्या वडिलांवर केलेल्या  अत्याचारांचा  त्यानं बदला घेतला असतो .
ही कहाणी लहान मुलांवरच्या अत्याचाराची आहे,मनोव्यापाराची आहे.पतंगीच्या खेळानं वेडावलेल्या हसानच्या आयुष्याची   गतही  कापलेल्या,भिरभिरणाऱ्या  पतंगीसारखीच झाली होती.त्याची ती वेदनामय गाथा विलक्षण अस्वस्थ  करते.  अफगाणिस्तानातली परिस्थिती तर मनाला घायाळ करते.तरीही "काईट रनर" ह्या कादंबरीतला  एक सकारात्मक  धागा जगातल्या चांगुलपणाच्या पतंगाला आकाशात उंच उंच घेऊन जातो.

भविष्यातला भारत :इमॅजिनिंग इंडिया


                                 भविष्यातला भारत: Imagining India-इमॅजिनिंग इंडिया
श्री.नंदन निलेकणी यांच्याबद्दल 
आपण कसं असावं आणि कसं असू नये,हे आपल्या आचरणातून सांगणाऱ्या, स्वत:च्या तत्वांवर ठाम रहात,जितं-जागतं उदाहरण बनून समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या ज्या काही मोजक्या व्यक्ती आपल्या देशात आहेत,त्यांमध्ये नंदन निलेकणी आहेत.बंगलोर आणि धारवाड इथे शालेय शिक्षण घेतल्यानंतर मुंबई आयआयटीतून  १९७८ मध्ये त्यांनी  इलेक्ट्रीकल इंजिनीअरिंगची  पदवी संपादन केली. त्यानंतर पटनी कम्प्यूटर्समध्ये जॉब करू लागले.तिथे नारायण मूर्ती त्यांचे वरिष्ठ होते.  नारायण मूर्ती ह्यांचे पटनी  कम्प्यूटर्समध्ये मतभेद झाल्यावर त्यांच्यासह त्यांचे कनिष्ठ सहकारी-त्यात  नंदन निलेकणी सुद्धा  होते-बाहेर पडले आणि १९८१ मध्ये त्यांनी INFOSYS  - इन्फोसिसची स्थापना केली. पुढे मार्च २००२ ते एप्रिल २००७ ह्या काळात ते इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी झाले.जुलै २००९ पासून  "Unique Identification Authority of India" चे अध्यक्ष म्हणून  कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जाचे पद ते भूषवत आहेत. टाईम मॅगझिननं जगातल्या १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांची गणना केली आहे.
भारतातल्या अगदी नवजात तान्ह्या अर्भकापासून ते प्रत्येक निवासी, अनिवासी व्यक्तीला बारा आकडी  युनिक आयडेनटीफिकेशन नंबर-आधार- दिला जाणार आहे.प्रत्येक व्यक्तीला त्याचे बायोमेट्रिक(Iris -बुबुळा भोवतीचा डोळ्याचा  फोटोग्राफ,अंगठयाचा ठसा) आणि इतर माहितीसह हे आगळेवेगळे ओळखपत्र लवकरच प्राप्त होणार आहे.हा लेख  प्रसिद्ध होईतो हे ओळखपत्र लोकांना मिळायला सुरुवात झालेली असेल.ह्या अभिनव ओळखपत्राच्या  योजनेचे प्रणेते अर्थातच नंदन निलेकणी आहेत.
 पुस्तकाबद्दल 
आपला देश नक्की कसा आहे,त्याला भूतकाळात कुठल्या संकटांना नी गहन पेचांना सामोरं जावं लागलं,सद्यस्थितीत त्याच्यासमोर कुठली आव्हानं आहेत नी भविष्यात त्याला कुठले प्रश्न भेडसावतील,ह्याबद्दलचं  प्रखर चिंतन नंदन निलेकणी ह्यांनी लिहिलेल्या Imagining India -इमॅजिनिंग इंडियामध्ये आपल्याला वाचायला मिळतं.किंबहुना वाचकांच्या बुद्धीची भूक भागवणारं असं हे पुस्तक आहे.त्यात निलेकणी ह्यांनी लोकसंख्या,शिक्षण,तंत्रज्ञान, इंग्रजीवर  असलेलं आपलं भारतीय लोकांचं  प्रभुत्व,आरोग्य,आपली इकॉनॉमी,ह्या सर्वावर अतिशय विस्तृत नी सांगोपांग चर्चा केली आहे.
लोकसंख्या 
भारताची प्रचंड मोठी लोकसंख्या ही देशाला कमकुवत करणारीदेशाच्या विकासाला खीळ घालणारी आहे. लोकसंख्येचा विस्फोट ही भारताची मोठीच समस्या असल्याची सगळ्या जगाची आणि दस्तुरखुद्द आपल्या देशवासीयांची धारणा होती. Thomas Malthus  ह्या(economist ) अर्थशास्त्रज्ञाच्या सिद्धांतानुसार लोकसंख्येचा विस्फोट हा देशाला अपरिहार्यपणे  दुष्काळ  आणि असमानतेकडे घेऊन जातो, दुष्काळ,साथीचे रोग, यांचं दुष्टचक्र सुरू रहातं. त्याचं प्रत्यंतर भारताला येतच होतं.१७७० ते १९५० या काळात आपल्या देशात तब्बल ३० वेळा दुष्काळ पडला.प्लेगसारख्या महाभयंकर रोगाच्या साथीत त्या विवक्षित प्रदेशातली एक-तृतीयांश लोकसंख्या मृत्युमुखी पडली.
पन्नास-साठच्या काळात भारताची लोकसंख्या भरमसाठ वाढली.जन्मदर खूप अधिक होता,नी तुलनेनं बालमृत्यूचं प्रमाण घटलं होतं.भारतीयांना ऐसपैस कुटुंब हीच संकल्पना मान्य होती. Paul Enrich ह्या लेखकानं दिल्लीला भेट दिल्यानंतर The population Bomb ह्या आपल्या पुस्तकात लिहीलं- "People eating,People washing,People sleeping... People visiting, arguing and screaming... People clinging to buses... People, People, People."
विसाव्या शतकाच्या मध्यास भारत आणि चीन या दोन देशांतल्या लोकसंख्येच्या विस्फोटाचे परिणाम सबंध जगाला भोगावे लागतील, म्हणून संपूर्ण  जग चिंताक्रांत झालं. अपंग, जगण्यास लायक नसलेल्या जन्मलेल्या बालकांना ठार मारण्यापासून ते अशा प्रौढ व्यक्तींचे sterilization करण्यापर्यंतचे नवेनवे सिद्धांत मांडले जाऊ लागले. मग हळूहळू हम दो-हमारे दो ही कल्पना समाजमनावर बिंबवली जाऊ लागली.त्यासाठी नृशंस पद्धतीनं, सक्तीनं नसबंदी लादली जाऊ लागली.तळागाळातल्या जनतेनं ह्या साऱ्याचा धसका घेतला. भारताचा जन्मदर १९६० साली ६.५ होता,तो २००६ मध्ये २.७ झाला. १९५० ते २००० ह्या काळात दरहजारी १८१  बालमृत्यूचं प्रमाण घटून अवघ  ३४ वर आलं. अपत्यांवरून २ अपत्ये  एवढी  जन्मदरात  घट झाल्यावर  स्त्रिया  अधिक सुटसुटीत होऊन कामकाजासाठी  बाहेर पडू  लागल्या आणि  देशाच्या GDP मध्ये भर घालू लागल्या.
भारत आणि चीन या दोन देशांतल्या लोकसंख्येच्या विस्फोटाची चिंता  जगाला लागली असताना  त्याचवेळी १९८० च्या दशकात जन्मदर घटल्याने युरोप जवळजवळ संपतोय-तिथे केवळ जुन्या विचारांचे मंथन करणारी नी जुन्या घरांमध्ये राहणारी वयोवृद्ध मंडळी उरणार असल्याची साधार भीती व्यक्त केली जाऊ लागली.
प्रचंड लोकसंख्येचा ताण देशाच्या नैसर्गिक साधन संपत्तीवर,पर्यावरणावर, अन्नधान्याच्या उत्पादनावर पडतो. मध्यमवर्ग वाढतो. त्यांना लागणाऱ्या नित्य वापराच्या नी चैनीच्या वस्तूंच्या एकूण खपात वाढ होते, त्यामुळे उर्जेचा प्रतिमाणशी खप वाढतो.भारतात सध्या अस्तित्वात असलेल्या मध्यमवर्गाची एकूण संख्या ही अमेरिकेच्या सबंध लोकसंख्येपेक्षा अधिक आहे.किंबहुना म्हणूनच जगातल्या भल्या-भल्या उत्पादकांना भारतातली ही प्रचंड मोठी बाजारपेठ खुणावते आहे.आपली प्रचंड मोठी लोकसंख्या ही देशाच्या प्रगतीतला मोठा अडसर  ठरणारी गोष्ट असताना तीच आज ह्युमन कॅपिटल ह्या दृष्टीकोनातून मोठा ऐवज मानली जाते आहे.  भारतासाठी जमेची बाजू ठरते आहे. त्यावरचं त्यांचं मुद्देसूद  विवेचन थक्क करणारं आहे-
" २०२० मध्ये भारतात जवळजवळ सबंध जगाला पुरेल एवढा वर्कफोर्स-कामगार असतील, त्यावेळी भारतीय व्यक्तीचं सरासरी वय असेल अवघे २९ वर्षे;तेच चीनी व अमेरिकन माणसाचं सरासरी वय ३७ वर्षे असेल,तर युरोपमध्ये सरासरी वय ४५ वर्षे नी जपानमध्ये ते  ४७ वर्षे असेल. भारताचा  कुशल कामगारवर्ग आताच जगातल्या  सर्वाधिक  दुसऱ्या क्रमांकाच्या संख्येत येतो.दरवर्षी २० लाख इंग्रजी बोलू शकणारे पदवीधर,१५ हजार कायद्याचे पदवीधर,९ हजार PhD मिळवलेले विद्यार्थी इथे निर्माण होतात,सध्या करोड  १० लाख  इन्जीनिअर्स  असून दरवर्षी त्यात ३० हजार  इन्जीनिअर्सची भर पडते आहे." 
चीनशी तुलना
चीननं लोकसंख्येला  आळा  घालण्यासाठी जोडप्याला "एकच मूल"अशी  कडक उपाय योजना केली-त्यामुळे चीनमध्ये ४-२-१ असं चित्र आहे- ४ grandparents -आजी-आजोबा असे चौघेजण ,parents -आई-वडील असे दोघेजण आणि एक मूल.जवळजवळ कुठल्याच चीनी लोकांना आता भावंडे नसतात,त्यामुळे आत्या-मावश्या, काका-मामा नसतात.त्या एकुलत्या एका मुलाला भावंडे नसतात तसेच त्यामुळे त्याला नको इतके कोडकौतुक वाट्याला येते.त्यामुळे त्यांच्यात little emperor syndrome -आपण म्हणजे कुणी विशेष असा गंड निर्माण होतो.मी-माझे अशी स्वार्थी वृत्ती बळावते.
The country is becoming grey before it has become rich-२०४०  सालापावेतो जगातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्या  अब्ज चीनी सेवानिवृत्तांची असेल-असं निलेकणी सांगतात.
इंग्रजीवर असलेलं आपलं भारतीय लोकांचं  प्रभुत्व
आपल्या देशात इंग्रजीचा उदय,अस्त आणि पुन्हा उदय कसा झाला ते  सांगताना ते लिहितात,की भारतात २२ अधिकृत  भाषा (Official languages)आहेत,हा जगातला सर्वाधिक मोठा आकडा  आहे. सतराव्या नी अठराव्या शतकांत युरोपातल्या जहाजांबरोबर इंग्रजी भारतात आली.किंबहुना हिंदुस्तानी, पोर्तुगीज, फ्रेंच,डच,इंग्रजी अशा भाषांची सरमिसळ असलेली फिरंगी बोली बंदरावरच्या परदेशी व्यापारांशी बोलली जात असे.ब्रिटिशांनी  जर का भारतावर इंग्रजी लादली,तर अमेरिकेत झाली  तशी नामुष्की ओढवून  ब्रिटिशांना तीन महिन्यांत इथून गाशा गुंडाळावा लागायची त्यांना भीती वाटत होती 
पुढे १८३४ मध्ये Thomas  Macaulay मकाउलेनं भारतात येऊन शैक्षणिक धोरण ठरवलं.भारतीय लोकांना इंग्रजीचं शिक्षण देण्यामागे अर्थात हेतू हाच होता की ब्रिटीश लोकांना तिथून इथे आणून कारभार चालवणे महागडे पडत होते. त्याऐवजी  इंग्रजी येणारे स्वस्त भारतीय पदवीधर इथे तयार करणे किफायतशीर ठरणार होते.बहुतेक भारतीय भाषा प्राचीन असून अनेक शतकांपासून  बोलल्या जात होत्या.मात्र इंग्रजीचा ठसका, वरच्या वर्तुळात वावरायची नी अधिकार गाजवायची त्यामुळे आपसूक मिळणारी संधी हेरून अनेकांनी ती आत्मसात केली.पुढे १९५० मध्ये ती बहुभाषिक देशाची lingua franca -सरकारी कामकाजाची अधिकृत भाषा झाली.हा सन्मान हिंदीला मिळावा अशी हिंदीभाषिक नेत्यांची इच्छा होती,त्याला हिंदी आपल्यावर लादली जाते आहे ह्या भावनेतून  दक्षिणेतल्या-खास करून तामिळनाडू मधल्या नेत्यांनी कडाडून विरोध केला.पंतप्रधान नेहरूंनी १९५० ते १९६५ अशा १५ वर्षांच्या काळापुरती इंग्रजी सरकारी कामकाजाची अधिकृत भाषा घोषित केली.नंतर वातावरण निवळेल नी हिंदी सरकारी कामकाजाची अधिकृत भाषा करता येईल,हा सरकारचा कयास चुकला.हिंदीविरुद्ध दक्षिणेतल्या राज्यांनी चांगलीच आघाडी उघडली.तामिळनाडू मध्ये हिंदीविरोधाच्या लाटेवर स्वर होऊन कॉंग्रेसला हुसकावून लावत DMK -द्रमुक  पक्ष सत्तेवर आला.तामिळनाडू आणि पॉन्डिचेरी मधल्या शाळांत हिंदी शिकवण्याबाबत नकार  देण्यात आला. 
मात्र बहुतेक सर्व राज्यांत मातृभाषेला शिक्षणाचे माध्यम म्हणून सरकारी शाळांमध्ये महत्व मिळाले.तरीही उन्नती करण्यासाठी इंग्रजी येणे आणि इंग्रजी भाषेतून शिक्षण घेणे अत्यावश्यक असल्याचे अगदी खेड्यापाड्यातल्या, गरीब जनतेला वाटू लागले.त्यामुळे मान्यता नसलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा अगदी खेड्यापाड्यात,झोपडपट्टीत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या.चांगली नोकरी मिळवण्याच्या दृष्टीकोनातून इंग्रजीला आपल्या देशात खूप महत्व आले. इंग्रजी ही इंग्रजांची मक्तेदारी राहिली नाही.ती इथल्या लोकांनी फार चांगल्या पद्धतीनं आत्मसात केली.ती आंतरराष्ट्रीय महत्वाची भाषा असल्यानं भारतीयांनी BPO सारख्या ठिकाणी बाजी मारली.आता चीन,जपान,इंडोनेशिया, कोरिया सारख्या देशांनीही शाळांमध्ये इंग्रजी शिकवण्यास आरंभ केला आहे.इंग्रजी ही ब्रिटीशांची भाषा राहिली नाही.आज ३० करोड भारतीय लोकांनी ती आत्मसात केलीये आणि अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक भारतीय लोक इंग्रजी बोलतात.आपला देश हा सर्वाधिक संख्येत इंग्रजी बोलणाऱ्यांचा देश असून अमेरिका,ब्रिटन,ऑस्ट्रेलिया या देशांत इंग्रजी  शिकवण्यासाठी भारतातल्या  शिक्षकांना नियुक्त केले जात आहे.
थोडक्यात, इंग्रजीच्या शिडीनं आपण तंत्रज्ञानापर्यंत आयटीपर्यंत पोहोचतो आहोत आणि ह्यामुळे भारत जगातली महासत्ता होण्याच्या दिशेनं झेप घेत आहे,असं नक्की म्हणता येईल.
श शाळेचा  ...  शिक्षणाचा  
"भारतात जगात द्वितीय स्थानावरच्या संख्येत आपल्याकडे दरवर्षी इन्जीनीअर्स तयार होतात,तसंच दरवर्षी शाळा सोडून जाणारी मुले सर्वाधिक संख्येत आहेत,दिल्लीतल्या रामकृष्णपुरम ह्या उच्चभ्रु वस्तीत देशातली सर्वोत्तम अशी शाळा आहे,तिथल्याच झोपडपट्टीतल्या लोकांना जेमतेम दाटीवाटीने बसता येईल,इतपत,एका खोलीच्या सरकारी शाळेवर समाधान मानावे लागते.रस्त्या अलीकडच्या त्या उच्चभ्रु शाळेत फळा वेगळ्या कारणाने वापरला जात नाही;त्याऐवजी कॉम्प्युटर्स,व्हाईट बोर्ड, स्मार्ट बोर्ड तिथे वापरले जातात. रस्त्यापलीकडच्या गरीब शाळेत वेगळ्या कारणाने  फळा वापरला जात नाही,असा विरोधाभास पाहायला मिळतो.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या वर्षांत Defence expenditure -संरक्षणावरच्या खर्चासाठी बजेट मध्ये शिक्षणासाठीच्या खर्चापेक्षा अधिक तरतूद होती.आपले  शिक्षणविषयक धोरण असायला हवे,तसे नाही,ह्याचं भान आपल्याला रस्त्यावर चौकांत पुस्तके विकणारी मुलं, आई-वडिलांना मोलमजुरीच्या कामात मदत करताना दिसणारी मुलं दिसली,की येतं!कमावते हात असलेल्या आपल्या लहान मुलांना रोजगार सोडून शाळेत शिकायला पाठवण हातावर पोट असलेल्या गरीब पालकांना मंजूर नव्हतं.१९६० नी १९७० च्या काळात सरकार शालेय शिक्षणावर लक्ष देताना infrastructure -मुलभूत सोयीसुविधांवर ,इमारतींवर भर देत होतं. शिक्षकांचे ट्रेनिंग,शैक्षणिक अचीव्हमेंट्स,शिक्षणाचे मूल्यमापन वगैरेकडे अधिक लक्ष पुरवण्याची गरज खरं तर होती.
एम. जी.रामचंद्रन हे लोकप्रिय अभिनेते तामिळनाडू चे मुख्यमंत्री झाले,त्यावेळी त्यांनी राज्यातल्या शाळांत पोषक आहार- मिड-डे-मील योजना राबवली."आपण लहानपणी खूप गरिबी अनुभवली,भूक लागल्यावर केवळ रडणे एवढेच आपल्याला ठावूक होते"असे सांगताच त्यांच्या त्या भावनिक  वक्तव्याने शाळांत प्रवेश घेणाऱ्यांच्या संख्येत  १५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली.तरीही देशातली शिक्षणविषयक परिस्थिती भयावह होती." शिक्षणाबाबत निलेकणी फार जिव्हाळ्यानं लिहितात.
"मंत्र्यांनी आपापल्या परिसरात प्रामुख्याने  त्यांच्या-त्यांच्या जातीच्या लोकांच्या मुलांना जाता येईल अशा शाळा काढल्या. परिणामी मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशात अर्ध्याहून अधिक OBC ST खेड्यांमध्ये शाळाच नाहीयेत."ते अन्य कुणाचा दाखला देऊन सांगतात.
वाजपेयी सरकारनं कुठलंही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली.२००१ साली सहा ते चौदा  वर्षे वयाच्या मुलांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळाला.गम्मत पहा,प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत सरकारी शाळांमध्ये सगळा आनंद आहे,त्याउलट खाजगी शाळांमधून चांगलं प्राथमिक शिक्षण दिलं जातंतर उच्चशिक्षण देणारी सरकारी कॉलेजेस दर्जेदार शिक्षण देतात,खाजगी  कॉलेजेस मध्ये तेव्हढ्या चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलं जात नाही. "आपल्या सरकारी शाळा शिक्षणाची नी शिकू इच्छिणाऱ्यांची मागणी पुरवण्यास सपशेल पराभूत झाल्या.त्यामुळे गोरगरीब जनतासुद्धा आपल्या मुलांना शिकण्यासाठी खाजगी शाळांमध्ये धाडू लागली.सरकारी मान्यता नं मिळालेल्या शाळांच्या शिक्षणाच्या दर्जात नी मान्यता मिळालेल्या शाळांच्या शिक्षणाच्या दर्जात फारसा फरक नाही.ह्या शाळा अनधिकृत राहण्याचं कारण म्हणजे सरकारी यंत्रणेकडून येनकेन मार्गानं लायसन्स मिळवण्यासाठी 'जे काही' करावं लागतं,ते आहे. त्यातही केव्हढा वेळ लागतो. पंजाब,हरियाणा,केरळ,महाराष्ट्र ह्या राज्यांमध्ये सरकारी शाळा ओस पडल्या. एकट्या कर्नाटक  राज्यात ७००० पेक्षाही अधिक सरकारी शाळा रिकाम्या आहेत, तर  महाराष्ट्र राज्यात सरकारी शाळा सेवाभावी संस्थांना चालवण्यास दिल्या जात आहेत."निलेकणी तुली यांच्या संभाषणाचा दाखला देत सांगतात.  भारतातली निरक्षर,झोपडपट्टीत राहणारी  गोरगरीब जनताही शिकण्याची आस बाळगते आहे,मनापासून शिकू इच्छिते आहे, त्यासाठी आपल्या तुटपुंज्या मिळकतीतला ठराविक भाग प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन मुलांच्या  शिक्षणासाठी वेगळा ठेवते आहे. इन्फोसिसमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एक जण सायकलरिक्षा  चालवणारयाचा मुलगा आहे,तर एकीचा पती हातगाडीवर पाणीपुरी विकतो आणि त्या पैशातून पत्नीच्या शिक्षणाचा खर्च भागवतो.पुस्तकाच्या सबंध प्रकरणात आणि अन्यत्रही,निलेकणी यांनी शिक्षणावर खूप भर दिला आहे.  
"In the private sector,productivity is paramount and enterprise and intelligent risk- taking are encouraged.Investment and policy decisions are made and closely monitored by a  team of people who have similar values and the same goals.”ते लिहितात. सरकारी यंत्रणेवर भाष्  करताना निलेकणी कचरत नाही. “The bureaucrats I encouraged had learnt that protecting their turf and not rocking the boat were key to thriving in the government. I have seen enough enterprising bureacrats in Karnataka who, when they tried to implement  bold reforms in areas such as infrastructure or government transparency, found themselves transferred overnight to minor departments as punishment." ते लिहितात.

Information Technology -अर्थात आयटी
3E effect-equity, efficiency and effectiveness

१९८४ सालीही आयटीचे क्षेत्र  भारतासाठी नवेच होते. बाहेरून कॉम्प्युटरचे भाग,हार्डडिस्क वगैरे मागवायचे,तर मोठ्याच दिव्यातून पार पडावे लागे. कॉम्प्युटर आल्यावर खूप बेरोजगारी निर्माण होईल,म्हणून कॉम्प्युटरला बँका,अन्य कार्यालयांमध्ये प्रचंड विरोध झाला.१९९१ साली software Industry ला खऱ्या अर्थाने बरे दिवस आले.मात्र फार थोड्या अवधीत इन्फोसिस,विप्रो, TCS ह्या आयटी फर्म्स नी स्वत:ची  आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण केली.इथल्या तरुण वर्गाला खूप मोठ्या प्रमाणात भरभक्कम पगराच्या नोकऱ्या तर मिळाल्याचज्या जीवनशैलीची इथल्या तरुण वर्गानं कल्पनाही केली नव्हती,ती जीवनशैली तरुण वर्गाला नोकरीच्या सुरुवातीच्या काळातच लाभली. ह्या तरुण वर्गाच्या वडिलांना उच्च पदावरून निवृत्तीच्या वेळी जेवढे वेतन मिळत असे,तेवढे वेतन त्यांना नोकरीत रुजू होताना मिळू लागले.आयटीनं  जनमानसावर गरुड केलं.
१९९३ मध्ये देशात आयसीआयसीआयसारख्या खाजगी बँका आल्या. त्यांच्याकडे अद्ययावत सोयी नी तंत्रज्ञान  होतं.त्यांच्याशी स्पर्धा करायची तर भारतीय बँकांनाही अद्ययावत तंत्रज्ञान आणणे भाग होते.बघता बघता ATM एटीएम सारख्या तंत्रज्ञानानं बँकेच्या कामात आमुलाग्र बदल घडवून आणला.सर्वसामान्य माणसाला प्रत्येक वेळी पैसे काढायला,खात्यात किती रक्कम आहे,ते बघायला  
 बँकेत प्रत्यक्ष जाण्याची गरज उरली नाही,त्याचा वेळ वाचल्यानं खूप फायदा झाला.   
BSE ,NSE ह्या stock exchange मध्ये आयटीचा वापर करण्याला अर्थातच प्रचंड विरोध झाला.पूर्वी शेअर बाजारातले ब्रोकर सरकारला नी लोकांना वेठीस धरत,आयकर बुडवत, छापे घातले गेल्यास बंद पळून आंदोलने करत.मात्र
आयटीचा वापर ह्या क्षेत्रात होऊ लागताच शेअर बाजारातल्या साऱ्या गैरप्रकारांना 
आपसूकच आळा बसला.व्यवहारात पारदर्शकता आली.
आयटीचा वापर रेल्वे रिझर्वेशन करण्यासाठी होऊ लागला आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाला रेल्वेची तिकिटे काढण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहण्याची शिक्षा आणि कटकट कायमची संपली.आता यापुढे  तर आपल्या मोबाईल फोनवरून रेल्वेची तिकिटे काढणे शक्य होणार आहे.
आयटीचा वापर जमिनींच्या नोंदी ठेवण्यासाठी झाल्यानं भ्रष्टाचाराला आपसूक आळा बसणार आहे.कर्नाटक राज्यात दरवर्षी शेतकऱ्याला शेतजमिनीची नोंद  अद्ययावत करावी लागते.१२ हजार कारकून ह्या नोंदी करतात,तेव्हा त्यात बेसुमार भ्रष्टाचार होतो,अनेकदा अशिक्षित शेतकऱ्यांच्या जमिनी दुसऱ्याच कुणाच्या नावावर नोंदवल्या जातात,आणि गरीब बिचारा शेतकरी नाडला जातो.
कर्नाटक राज्यातल्या ७० हजार खेड्यांतल्या २ करोड नोंदी 'भूमी' नेटवर्क     
 नं जोडल्या गेल्या नी शेतकरी स्वत: येऊन आपापल्या शेतजमिनीची नोंद करू लागलेआणि तिचे दस्तावेज घेऊन जाऊ लागले.त्यामुळे भ्रष्टाचार नी कामचुकारपणा करणारयांना त्यात वाव उरला नाही.विजेची बिले,पाण्याची बिले, property tax, प्राप्तीकर सारे काही आयटी मुळे ऑनलाइन भरणे शक्य झाले,नी ह्या सर्वात होणारा गैरव्यवहार बंद झाला,लोकांचा विनाकारण वाया जाणारा वेळ वाचला.
आयटीमुळे ई-चौपालच्या माध्यमातून शेतकरी स्वत: येऊनकष्टानं पिकवलेलं धान्य रास्त भावात थेट ग्राहकाला विकतात.त्यांना त्यासाठी शहरापर्यंत धाव घ्यायची गरज उरली नाही.त्यांचा फळे.फुले,भाज्या यांसारखा नाशिवंत माल 
शहरापर्यंत जाईस्तो खराब व्हायचा नी शेतकऱ्यांचे अतोनात  नुकसान व्हायचे. 
ई-चौपालच्या माध्यमातून शेतकऱ्याला थेट शेतातून ग्राहकाला आपला माल विकता येऊ लागला.त्यांची पिळवणूक करणाऱ्यांना परस्पर वगळल्या गेल्यानं 
परिणामी त्यांचं आयुष्य सुखकर झालं.
 मोबाईल फोनच्या क्रांतीमुळे तर आपल्याकडच्या गरीबातल्या गरीब धडपड्या व्यक्तीजवळ फोन आला,त्याचं आयुष्य आमुलाग्र बदललं. 
"आयटीच्या क्षेत्रात आपण अनेक पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत ५-१० वर्षे पुढे आहोत." निलेकणी अन्य कुणाचे बोल लिहितात.आपली भारतीय मान हे सारे वाचून अभिमानानं उंचावते.कर्नाटक राज्याच्या संपूर्ण लोकसंख्येपेक्षा तिथल्या दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबियांची आणि रेशनकार्ड धारकांची संख्या कितीतरी अधिक आहे.आता युनिक आयडेनटीफिकेशन नंबरच्या माध्यमातून असल्या 
गैरव्यवहाराला आपसूक पायबंद बसणार ह्या कल्पनेनंच आपला जीव सुखावतो. हेल्थकेअर- आरोग्य   
आरोग्य,हेल्थकेअरबद्दल विस्तृत आढावा घेताना निलेकणी लिहितात-"आपल्याकडे अजूनही चांगल्या आरोग्यविषयक योजनांची वानवा आहे. आपल्याकडे खेड्यात कुपोषणामुळे  अतिशय रोड असलेली मुले दिसतात,तर शहरात लट्ठ, मधुमेहाने ग्रस्त असलेली मुले दिसतात.खेड्यात डॉक्टरांचे प्रमाण दरहजारी लोकांमागे केवळ ०.६ आहे,तर शहरी भागात तेच ३.९ आहे. The West made the connection between bad food and bad health. जीवनशैलीचाही परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो.अर्बन प्लानिंग -शहरांच्या आखणीशी आपलं जीवनमान निगडीत आहे.आपल्याकडे वाईट अर्बन प्लानिंगमुळे  रस्त्यांवरच्या अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या जगात सर्वाधिक आहे. 
आयटीचा वापर आरोग्याच्या क्षेत्रात करून दूरस्थ लोकांना बसल्या जागेवरून शहरातल्या निष्णात डॉक्टरांचे मार्गदर्शन त्याद्वारे घेता येईल,फार काय, किचकट शस्त्रक्रियाही करणे शक्य होईल,ह्यादृष्टीने टेली- मेडिसिन  ह्या क्षेत्रात काम केले जात आहे.Remote  Medical Diagnostics - ReMeDi -रेमेडी ह्या अभिनव तंत्राने रुग्णाच्या रोगाबद्दल ,रुग्णाची संपूर्ण माहिती त्याचे मेडिकल रेकॉर्ड्स वगैरे ऑनलाइन उपलब्ध असतील,त्यामुळे डॉक्टरांना निदान,मार्गदर्शन करणे सुलभ जाईल,बसल्या जागेवरून रुग्ण व्हिडियो कॉन्फरन्सिंग करून निष्णात डॉक्टरांशी लाइव्ह कन्सलट करू शकतील. ह्याबद्दल ते विस्तृत माहिती देतात.                
Imagining India -इमॅजिनिंग इंडिया या पुस्तकात नंदन निलेकणी यांनी पर्यावरण,उर्जेचा वापर यांसारख्या अनेक गोष्टी तपशीलवार चर्चिल्या आहेत. अनेक मुद्द्यांचा त्यांनी फार मौलिक आढावा घेतला आहे.त्यामुळे त्यांचे हे पुस्तक सर्वांगसुंदर आणि संग्राह्य तर झाले आहेच,पण त्यात निव्वळ जंत्री वा आकडेवारी नसून प्रत्येक बाबीचा सखोल विचार करणारे आणि वाचकाला प्रखर चिंतन करण्यास उद्युक्त करणारे नितांत सुंदर विवेचन आहेदस्तुरखुद्द लेखकात असलेला तंत्रज्ञान आणि तत्वज्ञान ह्यांचा सुरेख मिलाफ पुस्तकातही ठायीठायी उमटलेला दिसतो.त्यामुळे Imagining India -इमॅजिनिंग इंडिया हे नंदन निलेकणी यांचं पुस्तक वाचकाला अभूतपूर्व वाचनानंद देतं.
rashmighatwai12@gmail.com