अफगाणिस्तानातील अस्वस्थ वर्तमान :
कटी पतंग
"THE KITE RUNNER"-" द काईट रनर " हे खालिद होसैनी यांचे पहिले-वहिले पुस्तक,पहिली -वहि ली कादंबरी. ती फिक्शन अथवा काल्पनिक कथा आहे की आत्मकथन आहे, ह्याचे जणू वाचकाला कोडे पडावे,एव्हढे त्यातले अक्षर नी अक्षर जितेजागते रूप घेऊन डोळ्यांसमोर साकारते.त्यातला प्रत्येक प्रसंग डोळ्यांसमोर प्रत्यक्ष उभा राहतो.वाचकाला साक्षीदार बनवतो.अफगाणिस्तानातली पूर्वी ची शांत परिस्थिती,नंतर अफगाणिस्तानावर रशियानं केलेलं आक्रमण , रशियन सैन्याची जुलुम- जबरदस्ती , तालिबान राजवटीतली क्रूर हुकुमशाही नी छळ-छावण्या, त्यांनी केलेलं स्त्री-पुरुषांचं शिरकाण,अनाथ झालेल्या,दिवसचे दिवस उपाशी-तापाशी रहावे लागणाऱ्या मुलांना भोगावे लागणारे लैंगिक अत्याचार, तालिबान्यांनी बेचिराख केलेला अफगाणिस्तान त्यांनी शब्दश: उभा करत वाचकाला नि:शब्द केलेलं आहे. खालिद होसैनी ह्यांनी लिहिलेली " A THOUSAND SPLENDID SUNS" - "अ थाउजंड स्प्लेनडीड सनस" ही दुसरी कादंबरीही खूप परिणामकारक आहे.
अफगाणिस्तानातली काबूलमधली वझीर अकबरखान जिल्ह्यातली आगासाहेब ही बडी असामी आहे. ते मोठे बिझनेसमन आहेत. स्वभावानं ते अतिशय कनवाळू आहेत. अनेक लोकांना त्यांनी निस्वार्थपणे आर्थिक मदत केली आहे,खंबीर मानसिक आधार दिलेला आहे.रहिमखान हा लेखक त्यांचा सच्चा दोस्त आहे. आगासाहेबांची कवियत्री,प्रोफेसर पत्नी मुलाला जन्म देताच अल्लाला प्यारी झाली आहे.त्यामुळे अमीर ह्या मुलाला त्यांनी मातेचं नी पित्याचंही प्रेम दिलं आहे. अली हा त्यांचा नोकर त्यांच्याच वयाचा नी त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या वडिलांनी त्यांच्या घरी आणलेला आहे.त्याला अंतर देणं त्यांना ह्या जन्मी तरी शक्य नाहीये. पोलियो झाल्यामुळे अलीचा पाय वेडावाकडा नी त्राणहीन झाला आहे, त्यामुळे त्याला कसेबसे पाय ओढत चालावे लागते.त्याच्या डोळ्यात ही व्यंग आहे. ह्या सर्वांपायी गल्लीतली टवाळखोर पोरे त्याची सदोदित टर उडवतात.अलीचा मुलगा हसान जन्मत: दुभंगलेले ओठ घेऊन जन्माला आला आहे. तो एकट्या अलीचाच नव्हे,तर आगासाहेबांचाही जीव की प्राण आहे.हसानची आई सनोबर विलक्षण देखणी होती,परंतू तिचे चालचलन नी लक्षण मुळीच चांगले नव्हते.हसानला जन्म देऊन त्याला टाकून देऊन ती पळून गेली होती.आई नसलेल्या हसानला नी अमीरला एकाच दाईने दुध-आई बनून सांभाळले होते.म्हणून की काय,त्या दोघांचेही एकमेकांशिवाय पान हलत नसे.मात्र अमीर शाळेत जाई नी हसान अलीबरोबर सर्व घरकाम करीत असे. अली नी हसान हे 'हजारा ' जमातीचे-म्हणजे मंगोलियन वंशाचे ,चेंगीज खानाचे वंशज ,म्हणून समाजात त्यांच्या वाट्याला सदैव हेटाळणी येत असे. आगासाहेबांचामात्र हसानवर विशेष जीव होता. त्याच्या वाढदिवसाला ते नं चुकता महागडी खेळणी आणीत. एका वाढदिवसाला त्यांनी त्याच्यासाठी आगळे वेगळे प्रेझेंट आणले.त्यांनी थेट भारतातून,नवी दिल्लीहून डॉ.कुमार या प्लास्टिक सर्जरी करणाऱ्या सर्जनना पाचारण केलं नी त्याचा वरचा फाटलेला ओठ शिवून घेतला.हे अनोखं प्रेझेंट आजन्म हसान जवळ राहणार होतं.
या अशिक्षित हसानवर अमीर दादागिरीही करीत असे. आपल्याला येणारे शब्द, त्यांचे अर्थ ,वाक्यात उपयोग वगैरे सांगून हसानला अमिर निरुत्तर करीत असे .आपल्या या वागणुकीबद्दल काही काळानंतर त्याला वाईटसुद्धा वाटत असे.त्याची भरपाई म्हणून आपला जुना शर्ट,मोडकं खेळण अमीर हसानला देत असे. अमीर निरक्षर हसानला गोष्टीची पुस्तके वाचून दाखवत असे..दोघेही जण डाळींबांच्या झाडाखाली बसून ही कथाकथन-श्रवण भक्ती नेमाने करीत.तो त्याला गोष्टी वाचून दाखवत असे.रुस्तम आणि सोहराब ही त्या दोघांची फार लाडकी, आवडती कथा होती.'रक्ष' ह्या आपल्य चपळ घोड्यासह लढणारा महा न योद्धा रुस्तम युद्धात सोहराबला प्राणांतिक जखमी करतो.मृत्युशय्येवरचा सोहराब हा अन्य कोणी नसून खूप पूर्वी हरवलेला आपला पोटचा पो रगाच आहे,हे रुस्तमला उमगतं."If thou art indeed my father,then hast thou stained thy sword in the life-blood of thy son.And thou didst it of thine obstinancy.For I sought to turn thee unto love ,and I implored of thee thy name ,for I thought to behold in thee the tokens recounted of my mother.But I appealed unto thy heart in vain,and now is the time gone for meeting...."हसानवर ह्या शब्दांचा विलक्षण परिणाम होई . तो अमीरला पुन्हा-पुन्हा ते शब्द वाचायला लावीत असे. अनेकदा ते ऐकून त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत.त्यानं नं पाहिलेल्या रुस्तम आणि सोहराब बद्दल वाटणारी प्रचंड आत्मियता नी दु:ख त्याच्या डोळ्यातून आसवांच्या रूपानं झरू लागे. तो रुस्तमसाठी रडतोय की सोहराबसाठी,हे आमिरला कळत नसे.
कधीकधीआमिर स्वत;च्याच मनानं खोट्या कहाण्या रचून,त्या वाचल्याचा आव आणून हसानला सांगत असे.हसानला त्या खूप आवडत.एके रात्री आमिरनं आपली पहिली लघुकथा लिहिली.मग अगदी मध्यरात्री हसान गाढ झोपेत असताना त्याला उठवून त्याला स्वत:ची कथा ऐकवली.हसानला ती खूप आवडली.त्याची खूप प्रशंसा करीत हसान आमिरला म्हणाला,"इन्शाल्ला तू खूप मोठा नी प्रसिद्ध लेखक होशील.त्या कथेतल्या नायकाला आसवांचे मोती होतील,असा वर मिळालेला असतो.पण त्यासाठी त्याला आपल्या पत्नीला ठार मारायची गरज का भासावी?डोळ्यांत अश्रूच आणायचे होते,तर कांदे चिरूनही डोळ्यांत पाणी आणता आले असते," असं हसान म्हणतो,त्यावर अमीर निरुत्तर होतो.आमिरला वाटतं,आपण शाळेत जातो, पण खरी बुद्धी तर हसान जवळ आहे.आमिरच्या वडिलांचे मित्र रहीमखान आमिरच्या लेखनाचं खूप कौतुक करतात.
अफगाणिस्तानात पतंग उडवण्याच्या खेळाला अपार महत्व आहे. हिवाळ्यात कडक थंडीत ह्या स्पर्धा चालतात. आबाल-वृद्ध सा रेच पतंग उडवण्याचे शौकीन!कापलेली पतंग लुटण्यासाठी पळणारे- "काइट रनर्स" जीव खाऊन पळत.एकदा अशाच प्रयत्नात काबुलमधला एक मुलगा झाडावर चढला, त्याच्या वजनानं झाडाची फांदी तुटली नी तो तीस फुटांवरून खाली कोसळला,नी पाठ मोडल्यानं कायमचा अंथरुणाला खिळला. हिवाळ्यातल्या स्पर्धेतली कापलेली शेवटची पतंग लुटून संग्रही ठेवणं म्हणजे एखादा मोठा ऐवज प्राप्त होण्यासारखं, सन्मान मिळण्यासारखं होतं. आल्या-गेल्याकडून त्यासा ठी शाबासकी नी कौतुकाची थाप मिळाल्यानंतर त्या पतंग संग्रही ठेवणाऱ्याला स्वर्ग ठेंगणा वाटावा,एवढं महत्व त्याला होतं.
अमीर आणि हसान दोघेही जण पतंग उडवण्यात प्रवीण होते.त्यातही,कापलेली पतंग लुटून आणण्यात हसानचा हात धरणारे कुणीही नव्हते. तो अद्वितीय " काईट रनर "होता.त्याला जणू ती अल्लाची देणगी होती. का पलेली पतंग भिरभिरत जाईल,त्या दिशेने मुलांचे लोंढे जात, पण हसान जाईल,तिथे माहीत असल्यागत कापलेली पतंग त्याच्या हातात अलगद येऊन पडे.
एकदा हिवाळ्यात पतंग उडवण्याच्या एका स्थानिक स्पर्धेमध्ये कापलेली पतंग लुटण्यासाठी अमीर उघड्या गटारांना चुकवत ,कशाचीही
आकांतानं धावत येत होता.आपण हरणार अशी अमीरची खात्री पटली. तो हसानच्या अंगावर ओरडला. तरीही हसान आपल्या निश्चयापासून ढळला नाही.तो त्या विरूद्ध दिशेनं गेला, आणि आश्चर्य म्हणजे ती अमूल्य पतंग अलगद हसानच्या हातात विराजमान झाली.
आमिरच्या वडिलांचे एअरलाईन मध्ये पायलट असलेले दुसरे मित्र महमूद यांचा मुलगा असिफ हा वझीर अकबरखान या श्रीमंतांच्या अतिउच्चभ्रू वस्तीतला जरा गुंड प्रवृत्तीचा मुलगा हातात कायम पितळ नी पोलादापासून बनवलेला अंगुलीत्राणाचा पट्टा- knuckles -घालायचा .त्याच्या गुंडगिरीबद्दल तो कुख्यात होता. आजूबाजूच्या मुलांनी त्याला असिफ गोश्खोर-कान खाणारा अशी उपाधी दिली होती. हसान नी त्याचे वडील अली यांना छळण्यात हा असिफ नेहेमीच आघाडीवर असायचा.
एके दिवशी असिफनं ऐन रस्त्यात हसान नी आमिरला एकट गाठलं . त्याच्यासमवेत त्याचे अन्य टवाळखोर ,गुंड मित्र होते.अफगाणिस्तानात झहीरशाहाचं ४७ वर्षांचं शासन त्याच्या चुलत भावानं -दाउदखानानं नुकतंच उलथून टाकलेलं होतं. अफगाणिस्तानात तख्त-पालट करणारा दाउदखान आपल्या वडिलांचा चांगला परिचित असून घरी जेवायलाही आला होता,अश्या फुशारक्या असिफ मारू लागला.हिटलर आपल्याला पूजनीय असून त्यानं जे केलं ते योग्य असल्याचं ठासून सांगत असिफ म्हणाला-"अफगाणिस्तानची भूमी पश्तून लोकांची आहे. आम्ही पश्तून लोकच खरे, विशुद्ध अफगाणी रक्ताचे आहोत ,हे चापट्या नाकाचे हझारा लोक नव्हेत!हे लोक आमची भूमी प्रदूषित करतात . Afganistan is for Pashtuns! अशुद्ध रक्ताच्या ह्या घाणेरड्या हझारांना अफगाणिस्तानातून हाकलून द्यावं असं मी नव्या राष्ट्राध्यक्षांना सांगे न "असिफ गुरकावतो.
आपण काही तुला त्रास देत नाही,तेव्हा हसानला नी आपल्याला जाऊ द्यावं म्हणून अमिर असिफला
म्हणतो,तसा तो उसळून म्हणतो की "ह्या हझारा हसानपेक्षा त्याच्याशी मैत्री करणारा तूच मला अधिक सलतो.हा तुझा मित्र असूच कसा शकतो?"अमिर हा विलक्षण भित्रा नी मुखदुर्बळ मुलगा असतो."तो माझा नोकर आहे"तो असिफला सांगतो.त्याला मित्र म्हणायची सुद्धा त्याला लाज वाटत असते.
"तू नी तुझ्या वडिलांसारख्या मूर्ख लोकांनी ह्या अपवित्र हझारांना आश्रय दिला नसता,तर ह्यांना केव्हाच हुसकावून लावता आले असते."असिफ गरजतो.आपले पितळ-पोलादाचे दणकट अन्गुलीत्राण- knuckles चढवतो.तेव्हढ्यात विजेच्या वेगानं कसलीशी हालचाल होताना आमिरला डोळ्याच्या कोपऱ्यातून दिसते.असिफचे डोळे तर प्रचंड विस्फारतातच; त्याचे ते टारगट मित्र ही आ वासून बघू लागतात. हसाननं आपला गुल्लेरीचा (गलोलीचा)पट्टा ताणून धरलेला असतो.त्याच्या बेचक्यात चांगला अक्रोडाएव्हढा दगड ठेवून त्यानं असिफच्या डोळ्याच्या दिशेनं नेम धरलेला असतो."आम्हाला सोड,आमच्या वाट्याला जाऊ नकोस",हसान असिफला सांगतो."तुम्ही दोघेच आहात,आम्ही तिघे!" कुत्सितपणे हसत असिफ बोलतो."तिघे असाल,पण माझ्याजवळ ताणलेली गोफण आहे.तू जागचा जरी हललास,तरी कानचाव्याअसिफ ऐवजी लोक तुला एक डोळा असलेला-काना असिफ म्हणू लागतील,हे विसरू नकोस.माझ्या गोफणीच्या दगडाचा नेम तुझ्या डाव्या डोळ्याच्या दिशेनं आहे.आवाजात कसल्याही चढ-उतराशिवाय, भावनाविरहित आवाजात हसान म्हणाला.
"काही हरकत नाही.अमिर,आज तुझ्या ह्या हझारानं मोठी आगळीक केलीये.आज जरी मी तुम्हाला जाऊ देतोय तरी गाठ माझ्याशी आहे,हे लक्षात ठेवा!"एक-एक पाऊल मागे सरकत असिफ गुरकावला.
अफगाणिस्तानात पतंगीच्या काटाकाटीला जणू युद्धाचं स्वरूप प्राप्त होई. अमिर नी हसान स्वत;च पतंग नी पतंगीचा मांजा बनवत.पतंगीचा ताव,बांबू मांजासाठी धागा, गोंद अथवा खळी असं सगळं साहित्य विकत आणून तासन तास बांबू तासत बसत.काच बारीक कुटून कुटून बारीक पूड करून खळीत घोटून धाग्यावर चढवत.झाडांना धागा बांधून ते मिश्रण सुकू देत.असा तयार केलेला मांजा मनासारखा झाला म्हणजे त्यांच्या आनंदाला पारावर उरत नसे.हसान हा अतिशय सच्च्या दिलाचा होता.आमिरसाठी तो काहीही करायला तयार असायचा.
हिवाळा आला.शाळांना सुट्या लागल्या.हिवाळ्यात शेकोटीच्या उबेत बसून हसानबरोबर बुद्धिबळ अथवा पत्ते खेळण हा आमिरचा छंद होता. अमिरनं त्या हिवाळ्यातल्या पतंगबाजीच्या स्पर्धेत भाग घेतला होता. तसा त्याआधीही ती स्पर्धा तो जिंकता-जिंकता राहिला होता.शेवटच्या तिघांत येणं म्हणजे स्पर्धा जिंकण नव्हे.अमिरच्या बाबांनीही त्यांच्या काळी त्या स्पर्धेत भाग घेऊन एकेका वेळी चौदा-चौदा पतंग कापले होते. स्पर्धेचा दिवस उजाडला.आपल्याला पतंग उडवता येईल का या विचारानं आमिरला हुरहूर वाटू लागली.पोटात गोळा उठला.घरी पळून जावंसं त्याला वाटू लागलं.
" मला नाही वाटत की मला आज पतंग उडवता येईल.जणू कुणी अक्राळ-विक्राळ राक्षस मला भीती दाखवतोय." अमिर हसानला म्हणाला."अमिर आगा, बाहेर राक्षस वगैरे कुणीही नाही,बाहेर मस्त दिवस उजाडलाय." हसाननं आमिरला दिलासा दिला."चला पतंग उडवायला,"
पिवळ्या किनारीची लाल पतंग हसाननं हवेत उडवली.तिच्यात जणू वारा भरला. आमिरच्या हातातली चक्री नंतर हसाननं धरली.हळूहळू मांजाच्या धारीमुळे हसनचा हात रक्ताळला.त्यांची पतंग मोठ्या दिमाखात आकाशात स्वच्छंद विहार करू लागली.इतर मुलांच्या पतंगीही आकाशात त्यांच्याशी स्पर्धा करू लागला.पेच लढवल्या जाऊ लागले.लवकरच पहिली पतंग कापली गेली नी ती लुटण्यासाठी मुलांच्या झुंडी एकामागोमाग एक तिच्या मागून धावू लागल्या. पतंगीवरून त्यांच्यात भांडणेही जुंपली.बघता बघता आकाशात पन्नास पतंगीऐवजी जेमतेम डझनभर पतंगी उरल्या.गच्चीत बसून आमिरचे बाबा नी त्यांचे मित्र रहीमखान कौतुकाने आमिरच्या पतंग उडवण्याच्या कौशल्याला दाद देत होते.इतरांना हुलकावण्या देत आमिरची पतंग सर्वात वर लहरत होती.बघता बघता आमिरच्या पतंगीसह अवघ्या सहा,चार नी नंतर तर केवळ दोन पतंगी उरल्या-एक आमिरची नी दुसरी निळी! आमिरच्या डोळ्यापुढे केवळ ती निळी पतंग नाचू लागली.
सर्व प्रेक्षकांची उस्तुकता शिगेला पोहोचली होती.सर्व जण ओरडून अमिरला ती निळी पतंग कापून विजयी होण्याबद्दल प्रोत्साहन देत होते.निळी पतंग उडवणारा सुद्धा जिवाच्या कराराने आमिरची पतंग कापण्यासाठी प्रयत्न करीत होता,त्याला अमिर हुलकावणी देत होता.त्याला झुलवत -झुलवत अखेरच्या क्षणी आमिरने कचकन ती निळी पतंग कापलीसुद्धा !प्रेक्षकांनी एकाच जल्लोष केला.काही कळायच्या आत हसान ती निळी पतंग मिळवायला जिवाच्या कराराने धावत निघाला. अमिरसाठी ती त्या स्पर्धेतली महत-सन्मानाची नी मौलिक चीज होती.ती नसती,तर त्याच्या त्या स्पर्धा जिंकण्याला मुळीच महत्व उरलं नसतं." जा हसान,निळ्या पतंगीसहच परत ये."अमिर त्याला म्हणाला.
हसानची अमिरवर नितांत श्रद्धा,भक्ती होती.त्याच्यावर त्याचा अपार विश्वास नी प्रेम होतं.हसानचं मन इतकं निरागस नी नितळ स्वचछ होतं,की अमिर आगानं त्याच्यावर चिडचिड केली,त्याला तो टाकून बोलला,तरी तो मनाला लावून घेत नसे. अली आणि हसान या दोघा बाप-लेकांना तर त्यांचा जन्मच जणू आगासाहेब आणि अमिरची सेवा करण्यासाठी झाला आहे,अशी खात्री असल्यागत ते दोघे अतीव निष्ठेनं नी आदरानं त्यांच्यासाठी झिजत
बराच वेळ झाला ,तरी हसान पतंगीसह आला नाही,तेव्हा अमिर त्याला शोधायला गल्लीबोळांतून निघाला.निळी पतंग हाती असलेल्या एखाद्या लहान मुलाला पाहिलं का म्हणून लोकांना विचारू लागला.अखेर एका वृद्ध इसमानं असा एक हझारा मुलगा त्या दिशेनं गेल्याचं नी त्याच्या मागे टवाळखोर तीन मुले गेल्याचं सांगितलं. त्यानं सांगितल्याप्रमाणे अमिर गेला नी त्याचे पाय जमिनीला खिळले.मुळात अमिर हा कमालीचा भित्रा नी मुखदुर्बळ.समोर असिफ नी त्याचे इतर दोघे गुंड साथीदार हसान च्या समोर उभे होते."आज तुझी गोफण कुठे आहे,"असे उपहासाने विचारात होते.ती निळी पतंग आम्हाला दिलीस तर आम्ही तुला सोडून देऊ असे ते कुत्सितपणे हसानला सांगत होते.पण ती अमूल्य चीज त्याच्या आमिरची आहे,स्पर्धेतली त्यानं कापलेली मौल्यवान शेवटची पतंग आहे,असे सांगून त्यानं ती देण्यास नकार दिला."ठीक आहे.ठेव ती निळी पतंग तुझ्याचजवळ.पण त्याची किंमत तुला चुकवावी लागेल...ती तुझ्या कायम स्मरणात राहील"असे म्हणत असिफ त्या कोवळ्य,निरागस हसानवर लैंगिक अत्याचार करून स्वत:ची वासना पुरी करतो..त्याविरुद्ध उभं ठाकायचं सोडून अमिर शुंभासारखा सर्व बघत राहतो. त्या निळ्या पतंगीची किंमत अशा रीतीनं हसान स्वत:वरचा बलात्कार झेलून चुकवतो. मात्र आमिरच्या ठायी असलेली त्याची निष्ठा काही ढळत नाही.
हे सारं लेखक खालिद होसैनी यांनी अशा शब्दांत लिहिलंय की आपला जीव हसानसाठी कळवळत राहतो. किंबहुना आमिरच्या ऐवजी आपण स्वत: जावं नी त्याच्यावर होणारा अत्याचार थांबवावा अशी अनिवार,प्रबळ उर्मी वाचकाच्या मनात दाटून येते.
हसानवर होत असलेला अत्याचार पाहून नंतर तो तिथून पळाला होता.,त्याबद्दल अमिरला त्याचं मन सतत खात रहातं. त्या प्रसंगानंतर हसान अमिरसमोर विशेष येईनासा झाला.त्याच्यासमोर तो त्याचे इस्त्री केलेले कपडे सज्ज ठेवी,टेबलवर नाश्ता जय्यत तयार ठेवी.मात्र त्याच्या नजरेला नजर देणं तो टाळू लागला.हसान विलक्षण चुपचाप राहू लागला,एकलकोंडा झाला,पटापट कामे उरकून तो पांघरून ओढून झोपला राही,एरवीचा त्याचा उत्साह पार लोपला होता त्यामागचं कारण अली आमिरला खोदूनखोदून विचारीत असे.त्यावर अमिर त्याला ,आपल्याला काय माहीत,म्हणून चिडचिड करीत असे.खरी गोम अशी होती,की स्वत:च्या
पळपुटेपणाची आमिरला चीड येत होती,त्यावर तो काही करू शकत नाही,याचीही त्याला जाणीव होती,ती चीड त्या बापलेकांवर निघत होती,इतकंच! "I saw Hassan get raped!" तो म्हणत राही.ते सत्य इतरांपासून दडवून ठेवताना त्याला मात्र ते क्षणोक्षणी कुरतडत होतं. नकळत त्याच्यात नी हसानमध्ये एक दरी निर्माण होऊ लागली होती.
हसाननं मात्र धीरानं त्या साऱ्या प्रसंगातून बाहेर यायचं ठरवलं. अमिर नी त्याच्यात निर्माण झालेली दरी बुजवून टाकण्यासाठी तो जाणीवपूर्वक प्रयत्न करू लागला.एक दिवस अमिर आपल्या खोलीत पुस्तक वाचत असताना हसाननं दारावर टकटक केली. "बेकरीत नान आणायला जातो आहे, चलतोस का ,बाहेर एकदम प्रसन्न वातावरण आहे,"त्यानं आमिरला विचारलं,त्यावर,तू एकटाच जा म्हणून त्यानं तुसडेपणानं त्याला झटकून टाकलं."मला वाटलं तू येशील.मी असं काय केलंय अमिर आगा?माझं काय चुकलं?मला वाटला मला सांगशील तरी!मला माहीत नाही आजकाल तू माझ्याशी खेळत का नाहीस ते! तुला मी काय करायला हवंय?तू मला सांग, मी तसं वागणार नाही! "हसान कळवळून म्हणाला.त्यानं उदवेगानं दारावर डोकं आपटून घेतलं. अमिरनं गुढघ्यात डोकं खुपसलं.स्वत:चं डोकं गुढघ्यानं वेड्यासारखं दाबत तो हसानला म्हणाला-"मी सांगतो -तू काय करू नकोस ते!माझा हा असा छळवाद करणं थांबव!जा,चालता हो!"तो खेकसला.थोड्या वेळानं अमिरनं बघितलं. हसान निघून गेलेला होता.
अमिरला हसान डोळ्यांसमोर नकोसा झालेला होता."आपण नवीन नोकर ठेवूयात का?"त्यानं आपल्या वडिलांना एक दिवस सुचवलं." मला दिसतंय तुझ्यात नी हसान मध्ये काहीतरी बेबनाव झाला आहे.पण ते तुझं तुलाच बघायचंय.मी स्वत:अलीबरोबर लहानाचा मोठा झालो.माझ्या वडिलांनी अलीला आणलं नी स्वत:च्यामुलासारखं वाढवलं. हसान या घरातून कुठेही जाणार नाही. पुन्हा म्हणून त्याला बाहेर काढण्याबद्दल म्हणशील तर याद राख!" वडील कडक शब्दांत त्याला म्हणाले.
पतंगीच्या स्पर्धेतल्या आमिरच्या यशानंतर त्याच्या वडिलांनी त्याच्या वाढदिवसाची जंगी पार्टी दिली.अमिरनी नी हसाननं त्याला नवंकोरं पुस्तक भेट दिलं.असिफ त्या पार्टीला होता,दुसरा गुंड मित्र ही होता. हसान पेय सर्व्ह करीत असताना असिफनं त्याच्या छातीवर आपल्या अन्गुलीत्राणानं प्रहार केला.मात्र त्याच्या तोंडातून अन्यायाबद्दल एक शब्द सुद्धा आला नाही.
अमिरनं वाढदिवसाच्या भेटीदाखल मिळालेले पैसे असलेले लिफाफे नी नवं घड्याळ गुपचूप हसानच्या खोलीत उशीखाली ठेवून दिलं.साळसूदपणे त्यानं वडिलांना म्हटलं-नवीन घड्याळ दिसत नाही.हसानवर त्यानं चोरीचा आळ घेतला.वडिलांनी हसानला विचारलं ,तर हसाननं गुन्हा कबूल केला.अली नी हसान आगसाहेबांचं घर सोडून गेले.
एप्रिल १९७८,डिसेंबर १९७९ मध्ये रशियन रणगाडे अफगाणिस्तानच्या रस्त्यांवरून धावू लागले.अशांत अफगाणिस्तानातून अमिर नी आगासाहेब पाकिस्तानात एका ट्रकमधून निघून जातात.इतरही अनेक जण असतात.त्यात एक स्त्री आपल्या तान्हुल्याबरोबर नी नवऱ्याबरोबर असते.रस्त्यात एक रशियन सैनिक ट्रक थांबवून लाच उकळतो.तेवढ्यात त्याचं लक्ष त्या स्त्रीकडे जातं.तो निर्लज्जपणे तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करतो.ती स्त्री नी नवरा दिन्ग्मूढ होतात. त्या अन्यायाविरुद्ध आगासाहेब उभे ठाकतात. रशियन सैनिक त्यांच्या अंगावर बंदुकीच्या गोळ्या झाडण्याची धमकी देतो,त्यालाही ते धूप घालत नाहीत. तेवढ्यात एक वरिष्ठ अधिकारी येतो,नी त्या सर्वांची च्या प्रसंगातून सुटका होते.
अशांत अफगाणिस्तानातून अमिर नी आगासाहेब पाकिस्तानात नी नंतर अमेरिकेत कालीफोर्नियात स्थायिक होतात.कालांतरानं अमिर आगाचा विवाह अफगाणिस्तानातून आलेल्या आर्मीतल्या जनरल ताहेरी यांच्या मुलीशी -सोरेयाजानशी होतो.कालांतरानं आगासाहेबांचं निधन होतं.
लेखक खालिद होसैनी यांनी हृदयभेदी शब्दांत अफगाणिस्तानाची तबाही,विध्वंस मांडला आहे.ते वाचणेही अशक्य होते,तर ज्यांनी तो सारा छळवाद नी अत्याचार सहन केला असेल,त्यांची गत काय झाली असेल,ह्या जाणीवेनं वाचकाच्या अंगावर शहारे येतात.
तालिबान्यांनी अफगाणिस्तानातल्या तरुण पुरुषांना वेचून वेचून ठार केलं. अफगाणिस्तानात उरल्या त्या केवळ त्यांच्या विधवा स्त्रिया नी लहान मुले.त्यांचे पालनपोषण करणेसुद्धा त्या मातांना शक्य होत नाहीये.काहींच्या आई-वडिलांना दोघांनाही तालिबान्यांनी ठार केल्यामुळे अफगाणिस्तानात नुसती अनाथ मुले उरली होती.त्यांना सामावून घ्यायला,त्यांचा प्रतिपाळ करायला अनाथालयेही अपुरी पडत होती.
रहीमखान ह्या आगासाहेबांच्या वृद्ध मित्राला भेटायला अमिर पाकिस्तानात जातो .तिथे त्याला एक नवं सत्य समजतं. तिथून तो अफगाणिस्तानात जातो.तिथल्या त्या अनाथालयांमध्ये हसानच्या अनाथ मुलाला शोधायला अमिर जंगजंग पछाडतो.तिथे त्याला कळतं, निर्दयी तालिबानी तिथल्या एकेका कोवळ्या मुलाला घेऊन जा ऊन आपली वासना पुरी करत.त्याबदल्यात अनाथालयांना थोडेफार अन्नधान्य मिळत असे.अशा प्रकारे अनेक लहान बालकांना बलात्कार,लैंगिक अत्याचार झेलावे लागत होते. धास्तावून अमिर हसानच्या मुलाला-सोहराबला शोधून काढतो. त्याला तालिबानी असिफनं आपल्या मनोरंजनासाठी स्त्रैण बनवलं होतं.त्याला वाचवायला गेलेल्या आमिरला असिफ ओळखतो.तो त्याला मारणार...एव्हढ्यात हसानचा मु लगा सोहराब असिफवर गुल्लेर ताणून नेम धरतो...डाव्या डोळ्यावर नेम धरून त्याचा डोळाच फोडतो!जणू असिफनं त्याच्या वडिलांवर केलेल्या अत्याचारांचा त्यानं बदला घेतला असतो .
ही कहाणी लहान मुलांवरच्या अत्याचाराची आहे, मनोव्यापाराची आहे.पतंगीच्या खेळानं वेडावलेल्या हसानच्या आयुष्याची गतही कापलेल्या,भिरभिरणाऱ्या पतंगीसारखीच झाली होती.त्याची ती वेदनामय गाथा विलक्षण अस्वस्थ करते. अफगाणिस्तानातली परिस्थिती तर मनाला घायाळ करते.तरीही "काईट रनर" ह्या कादंबरीतला एक सकारात्मक धागा जगातल्या चांगुलपणाच्या पतंगाला आकाशात उंच उंच घेऊन जातो.
No comments:
Post a Comment