मी,यंत्र-मानव!
शंभरेक वर्षांपूर्वीचं मनुष्यजीवन बरंच खडतर होतं.त्या पूर्वीचा एक काळ असा होता,की साधा निरोप सांगण्यासाठी माणसाला पायी चालत जाऊन निरोप सांगावा लागे.भविष्यात मोबाईल,संगणक,इंटरनेट,इमेल्स याद्वारे ते सारं इतकं सुकर होईल,यावर तेव्हा कुणाचा विश्वास बसला नसता.प्रत्येक काम शारीरिक मेहेनत करून उरकावं लागे. आता अक्षरश:सुईत दोरा ओवण्यापासून ते पार दूर देशांतल्या रुग्णांवर बसल्या जागेवरून शस्त्रक्रिया करण्यासाठी Robot -रोबो निर्माण केले जात आहेत. त्यामुळे यानंतरचं शंभर वर्षांनंतरचं जग कसं असेल,याची उत्सुकता कुणालाही वाटणे स्वाभाविक आहे.अशक्यप्राय वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी आणि कामे रोबो चुटकीसरशी करून टाकेल. अंतराळात, परग्रहांवर यानांतून रोबो पाठवून तिथली परिस्थिती इथे बसून अभ्यासता येईल.नोकरी करणाऱ्या जोडप्यांना रोबोच्या भरवशावर घरी लहान मुलांना निर्धास्तपणे ठेवता येईल.
जे नं देखे रवी,ते देखे कवी...ह्या उक्ती प्रमाणे आयझाक असिमोव Isaac Asimov ह्या सायन्स फिक्शन लिहिणाऱ्या प्रसिद्ध लेखकानं शंभर वर्षांनंतरचं रोबो असलेलं जग आधीच पाहिलं नी "I Robot" ह्या पुस्तकातून सुमारे साठ वर्षांपूर्वीच साकारलं.अर्थात सायन्स फिक्शनच्या क्षेत्रात आयझाक असिमोव ह्यांच्या नावाचा प्रचंड मोठा दबदबा आहे.त्यांची "फौंडेशन " सिरीज आणि "आय,रोबो","द केव्ह्ज ऑफ स्टील", "द नेकेड सन"(The Naked Sun),"The Robots of Dawn " ह्या सायन्स फिक्शननी वाचकांच्या बुद्धीला खाद्य पुरवलं ,तशीच त्यांच्या बुद्धीची भूकही वाढवली.
आयझाक असिमोव ह्यांची गणना असामान्य लेखकांमध्ये होते. २ जानेवारी १९२० रोजी रशियन आई-वडिलांच्या पोटी,रशियात जन्मलेले आयझाक युदोविच असिमोव, तीन वर्षाचे असताना आई-वडील अमेरिकेत कायमचे स्थायिक झाल्यानं अमेरिकन झाले.त्यांनी असंख्य लघुकथा लिहिल्या,५०० च्या वर पुस्तकाचं संपादन केलं,अनेक पुस्तके लिहिली.अमेरिकेत बोस्टन युनिव्हर्सिटीत बायोकेमेस्ट्रीचे ते प्रोफेसर होते. लहानपणी न्युयॉर्कच्या सबवेस्टेशन जवळ आपला पुस्तकांचा stall असावा हे त्यांचं स्वप्न होतं,त्याच आयझाक असिमोव ह्यांचे प्रचंड मोठे हस्तलिखित साहित्य बोस्टन युनिव्हर्सिटीत जतन केलेले आहेत.गम्मत म्हणजे लेखांतून अंतराळात भरारी मारणाऱ्या आयझाक असिमोव ह्यांना विमानप्रवासाची प्रचंड भीती वाटायची. अपवाद वगळता
विमानानं त्यांनी प्रवास केला नाही. ६ एप्रिल १९९२ रोजी न्युयॉर्क इथे त्यांनी इहलोकाचा निरोप घेतला.
१९५० मध्ये प्रसिद्ध झालेला "I, ROBOT" -"आय,रोबो' हा आयझाक असिमोव ह्यांनी लिहिलेल्या आणि १९४०-१९५० या काळात अमेरिकन मासिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या ९ कथांचा संग्रह आहे.लेखक काळाच्या किती पुढे होता,हे त्यावरून आपल्याला कळतं.त्या कथा स्वतंत्र आहेत,तसंच त्यांचं समान सूत्र आहे, त्यामुळे ती तशी लघु-कादंबरी सुद्धा आहे.
डॉ.सुसान केल्विन ह्या U.S. Robots and Mechanical Men च्या रोबो-सायकॉलोजिस्ट आहेत.डॉ.सुसान केल्विन ह्यांच्यावर "इंटर प्लानेटरी प्रेस"मध्ये काही लेख लिहिण्यासाठी आलेला रिपोर्टर हाच ह्या कथानकाचा narrator -सूत्रधार आहे. सबंध सूर्यमालेमध्ये इंटर प्लानेटरी प्रेसची व्याप्ती आणि मोठा वाचकवर्ग आहे. रिपोर्टरजवळ त्यांच्या प्रोफेशनल कारकीर्दीबद्दलचे सर्व पेपर्स आणि माहिती आहे. इ.स.१९८२ मध्ये जन्मलेल्या (पुढे डॉ.सुसान केल्विन ह्यांनी वयाला 82 वर्षे पूर्ण होऊन जगाचा निरोप घेतला.) आणि आता ७५ वर्षांच्या असलेल्या डॉ.सुसान केल्विन ह्यांनी २००३ मध्ये "सायबरनेटीक्स" मध्ये ग्राज्युएशन करून २००८ मध्ये पीएच. डी. मिळवली आणि "युनायटेड स्टेट रोबो अॅन्ड मेकॅनिकल मेन" मध्ये रोबो-सायकॉलोजिस्ट म्हणून त्या रुजू झाल्या.आधीच्या ठोकळेबाज रोबोंमध्ये "पॉझीट्रॉन ब्रेन" प्लाटीनम-इरिडीयमचा मानवी मेंदूच्या आकाराचा त्याचसदृश्य गोल टाकून, त्यांच्या काळात चालणारे-बोलणारे रोबो निर्माण झाले.त्या पन्नास वर्षांच्या काळात मानवानंही प्रगतीची दिशा बदलून उत्तुंग झेप घेतली,त्याला, एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू असलेल्या युनायटेड स्टेट रोबो अॅन्ड मेकॅनिकल मेन नी डॉ.सुसान केल्विन साक्षी होत्या.
डॉ.सुसान केल्विननी रिपोर्टरला त्याचं वय विचारलं.बत्तीस वर्ष असं रिपोर्टरनं सांगताच त्या म्हणाल्या- "मग तर रोबोरहित जग तुला माहिती असणार नाही.एक काळ असा होता की ह्या विश्वात मानवजमात एकटीच होती.तिला कुणी मित्र नव्हता.त्यानंतर त्याला त्याच्यापेक्षा बलवान,विश्वासू,निष्ठावान,अत्यंत उपयोगी असे (रोबो)मिळाले. तुझ्यालेखी रोबो म्हणजे निव्वळ धातू,गिअर्स,इलेकट्रीसिटी आणि पॉझीट्रॉन असतील कदाचित, पण मनुष्यप्राण्यापेक्षा खूप बरे आहेत.आधी केवळ पृथ्वीवर जेव्हा ते वापरले जात होते,तेव्हा त्यांना बोलता येत नव्हतं...हे अर्थात आमच्या वेळेच्या आधी होतं म्हणा;पण नंतर ते खूपच मानवीय झाले.त्यांना भावना व्यक्त करता येऊ लागल्या. रॉबीचंच उदाहरण घे!मी इथे आले, तेव्हा रॉबीला dismantle करण्यात आलेलं होतं. रॉबी हा नॉनव्होकल रोबो होता."डॉ.सुसान केल्विन त्याला सांगू लागतात...
रॉबीला ग्लोरियाचा Nursemaid म्हणजे सांभाळ करणारा म्हणून गेल्या दोन वर्षांपासून वेस्टन कुटुंबात आणण्यात आलंय.ग्लोरियाला रॉबीचा अतोनात लळा लागलाय.त्याच्यावाचून तिला क्षणभरही करमत नाही.त्याला धावता येत नाही,बोलता येत नाही,तरीही ग्लोरियाचा रॉबीशी एकतर्फी संवाद सुरू असतो.संध्याकाळी ती त्याच्याशी लपाछपी खेळते.त्याच्याशी तिचं अतिशय गहिरं,जीवाभावाचं नातं जडलेलं आहे.
सिंड्रेलाची कथा रोबोला ग्लोरीयाकडून ऐकायला प्रचंड आवडते नी कितीदाही पूर्वी तिनं ती सांगितली असली तरी ती पुन्हा-पुन्हा सांगण्याचा त्याचा आग्रह असल्यानं, "तुला कंटाळा कसं येत नाही रे सारखी तीच-तीच गोष्ट ऐकून?अरे ती लहान मुलांची गोष्ट आहे!"असे कृतक-कोपाने म्हणत ग्लोरीया ती त्याला मोठ्या उत्साहानं ऐकवते.
ग्लोरीया सदानकदा रोबोच्या संगतीत असते नी रॉबी तिच्या चिमुकल्या भाव-विश्वातला जिवलग सवंगडी आहे, नेमकी याच गोष्टीची तिच्या आईला चीड आहे. आजूबाजूला राहणारी तिच्या वयाची अनेक मुले-मुली असतानान ग्लोरीया मात्र त्यांच्यात मिसळत नाही,त्यांच्याशी खेळत नाही,आजूबाजूचे लोक ह्या रोबोला घाबरतात,आपल्याला त्यावरून नावे ठेवतात,म्हणून त्याला जिथून आणला,तिथे एकदाचं नेऊन पोहोचवा, म्हणून तिनं. ग्लोरीयाच्या बाबांच्या मागे लकडा लावलाय.
"मानवी nursemaid मुले सांभाळणाऱ्यापेक्षा रोबो नर्समेड केव्हाही अधिक विश्वासू आहे.लहानग्यांचा सांभाळ करण्यासाठी रॉबीची निर्मिती करण्यात आलीये.त्याचा "स्वभाव"सुद्धा त्याचं हिशेबानं प्रेमळ,विश्वासू करण्यात आलंय.तो मशीन-मेड आहे.रॉबी पासून आपल्या ग्लोरियाला कसलाही धोका नाहीये!रोबोटिक्सच्या पहिल्या नियमानुसार कुठलाही रोबो कुठल्याही मनुष्याला इजा पोहोचवू शकत नाही! " ग्लोरीयाच्या बाबांनी ग्लोरीयाच्या आईला अनेकवार सांगून पाहिलं.पण तिची भुणभुण कायम होती.
त्या दिवशी ग्लोरीयाला खोलीतच नव्हे,संपूर्ण घरात ,बाहेर रॉबी आढळला नाही,तेव्हा ग्लोरीयानं गोंधळ घातला.तिनं रॉबीला विसरावं म्हणून आईनं कुत्र्याचं पिल्लू आणलं होतं,त्याकडे ग्लोरियानं लक्षही दिलं नाही.मला माझा रॉबी हवा...हा एकंच धोशा तिनं लावला. "ते मशीन पुन्हा घरात आणलं,तर खबरदार!त्याच्याकडे मशीन म्हणून पाहण्याऐवजी त्याला ती व्यक्ती समजते,म्हणून सगळा घोळ होतोय!"आईनं तक्रार केली.
अखेरीस रोबोच्या कारखान्यात ग्लोरीयाला घेऊन जायचं नी रोबो हे लोखंडाचे निर्जीव यंत्र, यंत्र-मानव आहे हे तिला समजावून सांगायचं असं पती-पत्नीनं ठरवलं.त्यानुसार ते युनायटेड स्टेट रोबोजच्या कारखान्यात ग्लोरीयाला घेऊन गेले.तिथे वेगवेगळे रोबो बघताना ग्लोरीयाची नजर रॉबीला शोधत असते.अचानक तिथे एका अपघातात ग्लोरीया सापडणार...मृत्युमुखी पडणार,तोच एक रोबो चपळाईनं येऊन तिला आश्चर्यकारकरीत्या वाचवतो.त्याची दृष्टभेट होताच ग्लोरिया आनंदानं चीत्कारते..."रॉबी!"
आपल्या मुलीचा जीव वाचवल्याबद्दल" गंजेपर्यंत रॉबी आपल्याकडे राहील" अशी घोषणा ग्लोरीयाची आई करते.
"अर्थात तो काही गंजला नाही.पण आम्ही नंतर चालणाऱ्या-बोलणाऱ्या रोबोंची मॉडेल्स आणल्यामुळे नं बोलणाऱ्या रोबोंची मॉडेल्स आपसूकच निकालात काढली गेली.नंतर पृथ्वीवरच्या सरकारांनी नॉन-सायंटिफिक कामांव्यतिरिक्त अन्य गोष्टींसाठी रोबोंच्या वापरावर बंदीच घातली."डॉ.सुसान केल्विन रिपोर्टरला सांगू लागतात.
"आम्ही चालणारी-बोलणारी,बारा फूट उंचीची धिप्पाड रोबोंची मॉडेल्स बनवली,ती आम्ही मंगळावर खाणींच्या उत्खननासाठी पाठवली.मला वाटतं इ.स.२०१५ मध्ये आम्ही मंगळावरची दुसरी मोहीम सुरु केली होती.त्यात ग्रेगरी पॉवेल,मायकेल डोनोवन नी नवीन प्रकारचे रोबो होते.मंगळावरची पहिली मोहीम सपशेल आपटल्यानंतर मंगळावरची दुसरी मोहीम हाती घेण्यात आलेली होती.त्या पहिल्या मोहिमेतले सहा रोबो इथेच सोडून देण्यात आले होते नी या नव्या मोहिमेत स्पीडी नावाचा आधुनिक रोबो तेव्हढा आणण्यात आला होता.डॉ.सुसान केल्विन सांगू लागल्या...
"रोबोटिक्सच्या तीन नियमांचं पालन रोबो काटेकोरपणे करीत असतात.म्हणजे त्यांना तसंच "घडवलं जातं.त्यांच्या positron brains मध्ये खोलवर हे मुलभूत नियम ठसवले जातात.पहिला नियम म्हणजे रोबो कुठल्याही मनुष्यप्राण्याला इजा करणार नाही किंवा कुणी मनुष्य संकटात सापडून त्याला इजा होणार असेल,तर केवळ स्वत:च्या निष्क्रियतेमुळे त्याला इजा होईल,असा वागणार नाही.(थोडक्यात,रोबो मनुष्याचा जीव धोक्यात घालणार नाही,तर त्याला वाचवेल.) दुसरा नियम म्हणजे मनुष्यानं रोबोला दिलेल्या आज्ञेचं तो पालन करेल.मात्र मनुष्यानं रोबोला दिलेल्या आज्ञा पहिल्या नियमाला प्रतिकूल ठरणाऱ्या असतील,तर मात्र तो त्या आज्ञानचं पालन करणार नाही. तिसरा नियम म्हणजे रोबोनं स्वत:ला वाचवायचं,नष्ट होऊ द्यायचं नाही. अर्थात त्यामुळे पहिला व दुसरा नियम मोडला जाता कामा नये.स्वत:ला वाचवायच्या प्रयत्नामुळे जर मनुष्याला धोका असेल,तर अर्थात त्या रोबोनं बलिदान करायचं. रोबोला दिलेल्या सूचनांनुसार मनुष्याला वाचवण्याची त्याची सर्वात महत्वाची जबाबदारी!" ग्रेगरी पॉवेल,मायकेल डोनोवनना विस्तृतपणे सांगतात,"म्हणजे कसं की ह्या तीनही नियमांचा आपसात परस्परविरोधी घोळ निर्माण झाल्यास तो हाताळण्याची व्यवस्था रोबोच्या positron पॉझीट्रॉन ब्रेन्समध्ये वेगवेगळ्या positron पॉझीट्रॉन पातळ्यांवर केलेली आहे.समजा एखादा रोबो एखाद्या धोक्याच्या ठिकाणी चालत जातोय नी ते त्याला ठावूकही आहे.नियम क्रमांक तीनची त्याची स्वयंचलित यंत्रणा त्याला माघारी फिरवते. पण तुम्ही त्याला त्या धोक्याच्या ठिकाणी जाण्याची आज्ञा देता.अशावेळी मग रोबोला दिलेल्या आज्ञेचं तो पालन करेल,त्यावेळी दुसऱ्या नियमाची positron ची प्रती- पातळी(Counter Potential) आपोआप कार्यान्वित होऊन आधीच्या नियमाच्या पातळीच्यावर जाईल आणि समोर धोका दिसत असूनही रोबो त्या ठिकाणी जाईल." ग्रेगरी पॉवेल,मायकेल डोनोवनना शोध घेता-घेता सांगतात. मंगळावरच्या सबस्टेशनमध्ये ग्रेगरी पॉवेल,मायकेल डोनोवन रेडियोलहरींनी "स्पीडी " नावाच्या हरवलेल्या रोबोचा शोध घेताहेत.मंगळावर ते अलट्रावेव्ह इक्वीपमेंट फार दूरवर नीट कामही करत नाहीये.शोर्टवेव्हमधून त्यांना त्याचं ठिपक्या-ठिपक्यातलं अस्पष्ट अस्तित्व कळलं.नकाशात.त्या जागी सेलेनियमचा तलाव होता.त्याच्याभोवती
त्यानं चारवेळा प्रदक्षिणा घातल्याचं कळत होतं.त्यांच्या तिथल्या अस्तित्वासाठी उर्जा पुरवणारे फोटो-सेल्सचे भांडार रिकामे झाले होते,नी केवळ सेलेनियमच त्यांचा बचाव करू शकणार होतं.सेलेनियम केवळ स्पीडी आणू शकत होता.स्पीडी नाही,म्हणजे सेलेनियम नाही,सेलेनियम नाही,तर फोटो-सेल्स नाहीत,उर्जा नाही,त्यामुळे मृत्यू अटळ अशी परिस्थिती उद्भवली होती. त्यांचे स्पेस सूट्स तिथल्या भयंकर उष्णतेला नी थेट येणाऱ्या सूर्यकिरणांना २० मिनिटांपेक्षा अधिक काळ सहन करू शकले नसते. मग
अपयशी ठरलेल्या पहिल्या मोहिमेतल्या सहा अवाढव्य रोबोजना त्या दोघांनी कामाला लावलं पण ते कार्यान्वित व्हायला ग्रेगरी पॉवेल,मायकेल डोनोवन या दोघांनाही जुन्या रोबोमध्ये बसावं लागलं.सेलेनियम तर आणायचं होतंच;स्पीडीचा शोध घेऊन तो असा चमत्कारिक का "वागला",ह्याचं गूढ उकलायचं होतं,त्याला परत आणायचं होतं,स्वत:चा जीव वाचवायचा होता.
मंगळावर,मंगळाच्या सूर्याच्या प्रखरतम उष्णतेत,ग्रेगरी पॉवेल,मायकेल डोनोवन हे सारे कसे साधतात,काही शहाणे रोबोजसुद्धा ताळ सोडून वागू लागतात.तेव्हा काय होतं, त्यांना तळ्यावर कसं आणलं जातं,हे "आय,रोबो" ह्या मूळ पुस्तकातून वाचणे अधिक रोमहर्षक आहे. २००४ मध्ये "आय,रोबो"वर त्याचं नावाचा हॉलिवूडपट निर्माण झाला, त्यात विल स्मिथ नायक होता
पन्नास वर्षांनंतर, अंतराळात रोबो गेले असतील,ही कल्पना प्रत्यक्षात उतरलेली आढळेल. पण साठ वर्षांपूर्वीच आयझाक असिमोवनं ती कल्पना लोकांसमोर ठेवली,तेव्हा ते सारं किती अदभूत वाटलं असेल. रोबोला मानवी रूप दिलं जातंय, त्यालाही भावना, इमोशन्स व्यक्त करता येणार आहेत म्हटल्यावर माणूस आणि रोबो याच्यात फरक तो काय उरणार आहे?मात्र अलीकडचा मनुष्यस्वभावातला वाढत चाललेला कोरडेपणा बघता माणसापरीस रोबो बरा असे म्हणायची वेळ तर आपल्यावर येणार नाही ना?
No comments:
Post a Comment