Monday, April 16, 2012

चाणक्यनीती आणि आधुनिक व्यवस्थापनशास्त्र



Article on "
Corporate Chanakya-Successful Management the Chanakya Way."
चाणक्यनीती आणि आधुनिक व्यवस्थापनशास्त्र
-रश्मी घटवाई

आजच्या जगात management मॅनेजमेंट हा जणू परवलीचा शब्द झालाय, इतकं अपार महत्व ह्या शब्दाला आलंय.मुळात आज कर्मयोगालाच अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालंय.मेहेनत करणाऱ्या,काम करणाऱ्या व्यक्तीला आजच्या घटकेला अनंत संधी उपलब्ध होताहेत,आणि अनेक नव्या वाटा त्याच्या अभिव्यक्तीसाठी निर्माण होताहेत.शिवाय त्याच्या कर्मफलाची प्राप्तीही त्याला लगोलग मिळते आहे.हाती आलेल्या संधीचं सोनं करायला मात्र मनुष्याच्या अंगी धडाडी नी चातुर्यही तसंच असावं लागतं.
मुळात आपल्या कार्यात-मग ते व्यवसायातलं,विपणनाचं असू देत अथवा राज्यशकट हाकण्याचं,ते उत्तमरीत्या कसं करावं,त्यात यश कसं मिळवावं ह्याबाबतचं संपूर्ण ज्ञान असलेली व्यक्ती आपल्या भारतवर्षात होऊन गेली. इसवीसनपूर्व तिसऱ्या शतकात जन्मलेली ती ज्ञानी व्यक्ती म्हणजे आर्य चाणक्य अथवा कौटिल्य अथवा विष्णुगुप्त!
मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन,अर्थशास्त्र,Accounting ,राजकारण,कायदा, नेतृत्व, शासन (Governance ), युद्धशास्त्र,व्यवहारकौशल्य ह्या आणि अन्य एकूण एका गोष्टींबद्दलचं प्रगाढ ज्ञान चाणक्यानं( १५ पुस्तकं,१५० chapters,१८० topics)अर्थशास्त्राच्या ६००० सूत्रांतून आणि चाणक्यनीतीच्या ३३० एकेका ओळीच्या सूत्रांतून सांगितलं आहे.खऱ्या अर्थानं चाणक्य अथवा कौटिल्य हा आद्य मॅनेजमेंट गुरू!महत्वाचं म्हणजे अगदी अख्खाच्या अख्खा देश असो,अथवा एकेकटी व्यक्ती-कौटिल्याच्या अर्थशास्त्र आणि चाणक्यनीती ह्या दोन्हीतून कुणालाही खूप काही शिकता येतं. मनुष्याच्या कर्मफलप्राप्तीला नकळत अध्यात्माचीही डूब लाभते.
मॅनेजमेंट हे शास्त्र म्हणून १९५० मध्ये मान्यता पावलं.Peter Drucker पीटर ड्रकर हे आधुनिक व्यवस्थापनशास्त्राचे जनक मानले जातात.आपल्या देशाला असलेल्या ५००० वर्षांच्या समृद्ध इतिहासात,रामायण,महाभारत, उपनिषदे, यांत व्यवस्थापनशास्त्राचे धडे जागोजागी सापडतात.मात्र बाहेरचे ते सर्वोत्तम, आपल्या देशातले सगळे टाकावू,अशी भारतीयांची पद्धतशीर मानसिकता तयार केली जाते आणि आपल्याच इथल्या तत्वज्ञानाला पाश्चात्य मुलामा देऊन ते आपल्याला पेश केले जाते.
अशाच एका कॉलेजातून मॅनेजमेंटचे शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या आणि त्यायोगे आपल्या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी आसुसलेल्या राधाकृष्णन पिल्लै यांना पाश्चात्य शैलीचं मॅनेजमेंट शिक्षण पुरेसं वाटेना.त्यांनी ऐकीव माहितीच्या आधारावर -कौटिल्याच्या अर्थशास्त्र आणि चाणक्यनीती यांचा आपल्या परीनं अभ्यास केलं,पण त्यांतलं काहीच त्यांना कळलं नाही.त्यांच्या मेंटरनं-मार्गदर्शकानं त्यांना अर्थशास्त्र अभ्यासण्याचा नी ते आपल्या जीवनात आयुष्यभर अंगीकारण्याचा सल्ला दिला.आणखी कुणी सांगितलं की आपले ऋषी हे साधेसुधे नव्हते,किंबहुना विज्ञान,शास्त्र त्यांना चांगलंच अवगत होतं. जर आपण त्यांच्या त्या ज्ञानाचा उपयोग केलं,तर आधुनिक काळातल्या समस्यांवर आपल्याला मात करता येईल.राधाकृष्णन पिल्लै यांना स्वस्थ बसवेना.त्यांनी केरळात जाऊन एक आश्रम शोधून काढला,जिथे ग्रंथ-उपनिषद इत्यादी प्राचीन संस्कृत साहित्य शिकवलं जातं.तिथे गुरु-शिष्य परंपरे अंतर्गत त्यांनी कौटिल्याच्या अर्थशास्त्राचं अध्ययन केलं आणि आपल्या व्यवसायात यशस्वी होतानाच 'Corporate Chanakya-Successful Management the Chanakya Way ' हे पुस्तक लिहिलं.
" Corporate Chanakya is about everyone who wants to practice the principles of Indian Management in their work and wants to be successful....It is the documentation about how to apply Chanakya's practical solutions to solve day-to-day problems in modern businesses. " ते पुस्तकात लिहितात.
अर्थशास्त्रातल्या १५ पुस्तकांपैकी ६ पुस्तकं रणनीतीवर आहेत.
Lust for power -काम,क्रोध,लोभ,अहंकार,(Pride ),मद(arrogance ), हर्ष (over -excitement ) ह्या नकारार्थी भावनांचा -षड्रिपूंचा त्याग करायला आर्य चाणक्य सांगतो.खजिना आणि सैन्यबळ हे त्याच्या मते सर्वात महत्वाचे- म्हणजेच आधुनिक काळातले फायनान्स आणि मनुष्यबळ-right man for the right job !त्याच्या मते एखाद्या कार्याचे नेतृत्व करणाऱ्याच्या ठायी I Am The Doer -हे काम करणारा मीच आहे,हा भाव असता कामा नये,मग तो एका वेळी किती का प्रोजेक्ट्स सांभाळत असेना!
The King,The Minister,The Country,The Fortified City, The Treasury ,The Army, The Ally हे त्याच्या अर्थशास्त्राच्या तत्वज्ञानानुसार राज्याचे,व्यवसायाचे अथवा एखाद्या संस्थेचे सात आधारस्तंभ.आधुनिक काळात ते अनुक्रमे(राजा) सीईओ/डायरेक्टर/चेअरमन,(मंत्री)मॅनेजर्स,(राज्य)मार्केट,ग्राहक,(बालेकिल्ला)हेडऑफिस,(खजिना)फायनान्स,(सेना)टीम,
(मित्र)Consultant कन्सलटनट अशा रूपात असतात.
चाणक्याच्या मते यशाला तीन पदर आहेत.Success is threefold. सल्लागाराच्या उत्कृष्ट सल्ल्यामुळे मिळालेलं यश,बळाच्या वापरामुळे वा बळाच्या आधारे मिळालेलं यश आणि प्रखर इच्छाशक्तीच्या आधारावर मिळवलेलं यश अशी यशाची वर्गवारी करता येईल.बुद्धी-बळ,मनुष्यबळ अर्थबळ, अशा तीन शक्तींच्या सहाय्यानं व्यक्ती,कंपनी अथवा राज्य प्रगती कशी करू शकेल,ह्यावर चाणक्य मार्गदर्शन करतो.
राजाला काय,किंवा एखाद्या कंपनीच्या सीईओला काय,कसंही वागून चालत नाही.आपण कुणाला answerable नाही-कुणी आपल्याला जाब विचारू शकणार नाही,ह्या भ्रमात ते राहिले,तर लवकरच त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटेल.राधाकृष्णन पिल्लै चाणक्याचं तत्वज्ञान सांगतात-प्रत्येकजण स्वत:ला answerable असतो.प्रत्येकानं स्वत:ला प्रश्न विचारायला हवा-की मी माझं कर्तव्य पार पाडलंय की नाही?मी मला जे करणे अभिप्रेत होते,ते करतोय का? "Have I done my duty well?Am I following what I am supposed to do?"
"So be angry with yourself for thinking small ...be bitter about the comfort zone we get into.Push yourself to the next level..."
अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना चाणक्य सांगतो-"जे जे म्हणून वाईट आहे,त्याचा त्याग करा,आळस झटका.मनातला द्वेष काढून टाका.ज्ञानाचा विस्तार करा.आकाशातल्या ग्रहताऱ्यांवर विसंबून राहू नका.तुमच्या व्यवसायातलं तुम्हाला अपेक्षित असलेलं यश अगदी काही पावलांवर येऊन
ठेपलं असेल,पण तोवर ते तुम्हाला नुसतं हुलकावण्याच देत असेल, अपयशच पदरी पडत असेल,अशा वेळी तुम्ही अगदी उद्विग्न झालेले असाल आणि आता काही आपल्याला आर्थिक लाभ होत नाही,म्हणून ज्योतिषी नी तत्सम मंडळींच्या मागे लागाल.ते बिचारे ग्रहतारे त्यात तुमची काय मदत करणार आहेत?तुम्ही एवढा काळ आपला वेळ,मेहनत नी पैसा त्या कार्यात ओतलाय...ते अथकपणे करत रहा.शंभर प्रयत्नांनंतर तरी तुम्हाला यश मिळेलच." राधाकृष्णन पिल्लै madam सी जे.वॉकर या अमेरिकेतल्या प्रथम आफ्रिकी वंशाच्या लक्षाधीश महिलेचं उदाहरण देतात-"माझा उदरनिर्वाह मला स्वत;लाच करावा लागत होता,नी त्यासाठी तरतूद करण्यासाठीची संधीही मला स्वत:लाच निर्माण करावी लागत होती.पण मी ती केली.संधी चालून येण्याची वाट पाहत नुसते बसले राहू नका;उठा नी ती संधी निर्माण करा."

साम,दाम,दंड,भेद ही चाणक्याची बहुचर्चित प्रसिद्ध नीती.हाताखाली काम करणारा प्रत्येक माणूस वेगळा असतो,प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो, त्यामुळे सरसकट सर्वांना एकच न्याय लावता येत नाही.आधुनिक काळातही ह्युमन रिसोर्सेसच्या Motivation साठी हे सर्वार्थाने लागू होते.
साम-consultation - एखादा कर्मचारी नीट काम नसेल करत,तर त्याच्याशी सामोपचाराने बोलून त्यामागचे कारण शोधून काढता येते,त्यावर उपाययोजना करता येते.दाम-reward -कर्मचारी काम करतात,ते पगार मिळवण्याकरता.जर का त्याच्या ह्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले गेले,तर कुठलाही कर्मचारी काय म्हणून काम करील?म्हणून त्यानं केलेल्या चांगल्या कामाची दखल घ्यायची तर त्याला incentive,bonus ,promotionवेतनासह सुटी देणंही आवश्यक आहे. दंड-punishment -कामचुकार कर्मचारी जर अनेकदा सांगून,निरनिराळ्या मार्गानं त्यांच्या चुका निदर्शनास आणून देऊनही बेजबाबदारपणे वागत असतील,तर त्यासाठी कडक सजासुद्धा चाणक्यानं सांगितलीय.ती वेतनकपात,निलंबन,पदावनती अशा स्वरूपांत असू शकते.भेद-split -डोईजड होणाऱ्या वा निष्क्रिय कर्मचाऱ्याला अन्य विभागात हलवणे,प्रसंगी कामावरून कमी करणे अशी उपाययोजना चाणक्य सांगतो.

राजा अथवा एखाद्या कंपनीच्या सीईओनं काय करावं याबद्दल जसं चाणक्य विस्तृतपणे सांगतो,तसंच त्यानं काय करू नये,ह्याबद्दल अधिक विस्तारानं सांगतो.राज्य पैशावर चालतं,त्यामुळे खजिन्याकडे विशेष लक्ष देण्याबद्दल चाणक्याचा सल्ला मोलाचा आहे."मोकाट हत्तींना पकडण्यासाठी हत्तीचीच गरज भासते,तद्वत अधिक संपत्ती मिळवण्यासाठी संपत्तीची गरज असते." पैशाकडेच पैसा जातो ना!"Wealth and power comes from the countryside,which is the source of all activities."राधाकृष्ण पिल्लै चाणक्याचं वचन उद्धृत करतात.आज जेव्हा मोठ्या कंपन्या छोट्या शहरांकडे,छोट्या ग्राहकाकडे वळू लागल्या आहेत, ह्या छोट्या-छोट्या ग्राहकांकडूनही मोठा नफा व्हायची शक्यता आहे हे हेरून -आर्थिकदृष्ट्या छोट्या ग्राहकाला एकदम शंभर रुपयाची शाम्पूची मोठी बाटली घेणं अवघड वाटेल,पण त्याच दर्जेदार कंपनीचा तोच शाम्पू एका वेळची त्याची गरज भागवण्याइतक्या प्रमाणात छोट्याश्या sachet मध्ये २-३ रुपयाला मिळत असताना त्याला तो घेणं परवडतं हे हेरून मोठ्या कंपन्या micro -consumers कडे वळताहेत,तेव्हा त्या चाणक्याच्याच
वाचनाचा आधार घेताहेत.फार कशाला,एकेकाळी रुपेरी पडदा गाजवणारी दिग्गज कलाकार मंडळी टीव्हीच्या छोट्या पडद्याला नावे ठेवीत,तीच आता छोट्या पडद्याकडे वळलीत,कारण छोट्या पडद्याचा गावांत,खेड्यापाड्यात सर्वदूर पोहोचण्याचा आवाका लवकरच त्यांच्या लक्षात आला,त्वरीत लोकप्रियता मिळवण्यासाठी चित्रपटापेक्षा टीव्ही अधिक फायदेशीर आहे हे त्यांना उमगलं.हे सारं अर्थातच चाणक्याचं तत्वज्ञान!पीटर ड्रकर यांच्यामते मार्केटिंगचा उद्देशच मुळात आपल्या ग्राहकांना अंतर्बाह्य ओळखणे,त्यांना नीट समजून घेणे असा आहे ,इतके की product म्हणजे उत्पादन अथवा सेवा अगदी नेमक्या त्यांच्याचसाठी असतील त्यामुळे आपोआपच स्वत:च्या स्वत: विकल्या जातील.

आजच्या घडीला एखादा नवा व्यवसाय सुरू करणे तितकेसे कठीण राहिलेले नाही.कारण अनेक नवनव्या क्षेत्रांत नवनवीन संधी चालून येताहेत.केवळ एखादी कल्पना मानत यायची खोटी.मग मात्र त्या व्यक्तीनं वेळ दवडता कामा नये.हजारो मैलांचा प्रवाससुद्धा पहिल्या पावलानं सुरू होतो.चाणक्याच्या मते एखादा व्यवसाय वा नवीन उपक्रम सुरू करायचा उत्तम मुहूर्त म्हणजे ज्योतिषी वा भटजींनी सांगितलेला नव्हे;तर तो विचार मानत आल्याक्षणीचा. स्वत:चे प्रयत्न -त्या कार्यासाठी लागणारी मनाची तयारी,उर्जा आणि आळस झटकून कामाला लागणे-हे सारे हवेच.शिवाय ते कार्य सुरू करणे म्हणजेच अर्धे काम फत्ते होण्यासारखे आहे.तेव्हा सुरुवात कराच!चाणक्य सांगतो.त्या कामाचा आराखाडा तयार करणे,त्या क्षेत्रातल्या expert - विद्वान्नांचा सल्ला,मार्गदर्शन घेणे,आपल्या प्रोजेक्ट वर प्रत्यक्ष काम करणे ओघाने आलेच.
"Once you start,the help and the required resources will come your way....it is important to complete what you have started to achieve.It is not important how many new things you have started.What is important is how many of them you have completed.Complete what you have started and then start again after you have completed."राधाकृष्णन पिल्लै लिहितात.मात्र अनेक जण चुका होण्याच्या भीतीनं काम करीत नाहीत.चाणक्य त्यावर सांगतो-"चुका करायला भिऊ नका.मात्र त्या चुकांपासून बोध घ्या,त्या चुकांची पुनरावृत्ती होऊ देऊ नका."
"There are three kinds of people-first,those who do not start work because of the fear of obstacles.Second,those who start,but stop when they face obstacles.And third,those who work in spite of obstacles and overcome them." राधाकृष्णन पिल्लै आपल्या corporate Chanakya ह्या पुस्तकात स्वामी चिन्मयानंद यांचं वचन सांगतात.ते पुढे सांगतात- "When you start a business,you will have to struggle hard.The success you finally get will be enjoyed by your children,not you!" त्यांनी अतिशय मुद्देसूदपणे एकेका गोष्टीचा आढावा घेतलाय,चाणक्याच्या सूत्रांना १७५ प्रकरणांतून सोप्या शब्दांत मांडलंय.हे सारे मुळातूनच वाचणे इष्ट.विस्तारभयास्तव त्या सर्वांचा परामर्श घेणे अशक्य आहे.
चाणक्याचं तत्वज्ञान त्या काळी उपयुक्त होतं,आजही आहे.कालसाक्षेपी अशा त्या अर्थशास्त्राच्या आणि चाणक्य नीतीच्या अभ्यासातून कुणी सांगावं,उद्याचा बिल गेट्स अथवा लक्ष्मी मित्तल घडू शकेल!


No comments: