Tuesday, April 24, 2012

 दा विन्ची कोड
                                                                                             - रश्मी घटवाई
                                                      

लिओनार्दो-द-विन्ची हे नाव उच्चारताच वाचकाच्या डोळ्यापुढे 'मोनालिसा,'द लास्ट सपर'ही जगप्रसिद्ध चित्रे तरळू लागतात.अर्थात इटालियन चित्रकार म्हणून लिओनार्दो-द-विन्चीची ओळख सर्वात अधिक असली तरी तो अत्यंत कुशाग्र बुद्धीचा इंजिनीअर,वस्तूशास्त्रज्ञ,गणितज्ञ, संगीतकार, शास्त्रज्ञ,अनेक कल्पनांचा जनक  म्हणूनही विख्यात होता.लिओनार्दो-द-विन्ची ह्या  एकाच  व्यक्तीमध्ये कितीएक कलागुण एकवटलेले  होते.

१५ एप्रिल १४५२ रोजी इटलीतील विन्ची या   खेड्यात लिओनार्दो जन्मला.त्याची आई सोळा वर्षाची कॅटरीना ही त्याचे वडील सर पिएरो यांच्याकडे नोकर म्हणून कामाला होती.त्यांचा विवाह झाला नव्हता.वडील नोटरी होते.पुढे त्यांचा विवाह अल्बीएरा नावाच्या मुलीशी  झाला नी  कॅटरीनाचा विवाह दुसऱ्या कुणा गरीबाशी.त्यामुळे लिओनार्दोला वडील नी सावत्र आईजवळ राहावे लागले.पुढे ते कुटुंब खेड्यातून फ्लोरेन्स या शहरात स्थलांतरीत झाले.तिथे Verrocchio-वेरोचिओ या त्यावेळच्या विख्यात चित्रकाराकडे कलेचं शिक्षण   लिओनार्दो घेऊ लागला.त्याच्यासारख्या शिकाऊ पोरासोरांना-discepolos  ना  रंग घोटणे,ब्रश तयार करणे,चित्रांसाठी लाकडी panels  तयार करणे अशी कामे करावी लागत.पुढे चित्रकार गुरू चित्र काढी नी त्यात रंग भरायचं  काम शिष्यांना देई. लिओनार्दो हा शिष्य चांगला 'तयार' झाला आहे,हे लक्षात आल्यावर, गुरू वेरोचिओ येशू ख्रिस्तावरचे एक अतिमहत्वाचे चित्र काढत होता,त्यातला एक देवदूत काढून रंगवायचे काम त्यानी लिओनार्दोवर सोपवले.त्याचे पूर्ण झालेले काम गुरूच्या चित्रापेक्षाही अत्यंत सरस झालेले  बघून  गुरूने हे पाणी काही वेगळेच असल्याचे जोखले.
लिओनार्दोने sfumato -स्फूमातो -हे स्वत:चे नवीनच तंत्र चित्रात आणले-त्याचे रंग हळूहळू एकमेकात ब्लेंड होऊन आकार वा प्रतिमा, धुराचा पडदा मध्ये  असल्यागत धूसर  होत जात उत्कृष्ट परिणाम साधत.  chiaroscuro - किअरोस्कूरो हे  स्वत:चे नवीनच तंत्र   लिओनार्दोने चित्रात वापरून छाया-प्रकाशाच्या परिणामानं त्रिमिती (3 - D Effect).साधली. त्यानं चित्रात पर्स्पेक्टीव्ह  आणला-ज्यायोगे लांबवर जाणारी एखादी गोष्ट(उदा.नदी) vanishing spot वर चित्रात लुप्त होताना दिसते.
आपल्या चित्रांमध्ये मानवी शरीर  अचूकपणे  रेखाटलं  जावं, यासाठी मानवी शरीराबद्दल  अंतर्बाह्य माहिती व्हावी म्हणून,तो अंत्यविधी झाल्यानंतर प्रेतांची चिरफाड करून, आतल्या  अवयवांची,स्नायूंची रचना समजावून घेत असे.Vitruvian Man ह्या त्याच्या रेखाचित्रात हात नी पाय पसरून उभ्या असलेल्या पुरुषाच्या दोन सुपरइम्पोझड  प्रतिमा वर्तुळ व चौकोनात  दाखवून मानवी शरीरात प्रत्येक अवयवाचे एक निश्चित प्रमाण असते,हे त्याने दाखवून दिले नी १.६१८  या प्रमाणात मानवी शरीर बद्ध असते हे सिद्ध केलं.
भविष्यातल्या अनेकविध मशीन्सची  रेखाटने त्याने आपल्या वह्यांमध्ये काढून ठेवली होती.त्या  मशीन्स त्याला तयार करून प्रत्यक्षात आणायच्या होत्या.काळाच्या अगदी शेकडो वर्षे तो पुढे होता.तो अतिशय देखणा होता.खेळाडू, उत्तम  घोडेस्वार,तलवारबाज होता. त्याला  दोन्ही  हातांनी  लिहिता  येत  असे,त्याहीपेक्षा  गमतीदार  म्हणजे  त्याला  मिरर-इमेज   मध्ये  लिहिता  येत असे. वाचणाऱ्याला  ते   आरशात धरून  वाचावं  लागे.  त्याला कागदांवर सतत काहीतरी लिहिण्याची,रेखाटणे काढायची सवय होती.असे सुमारे तेरा हजार कागद त्यानं  रेखाटले,टिपण काढून ठेवलेले होते.
 त्यानं नकाशे बनवले.घोड्यांचे तर त्याला अतोनात आकर्षण होते.घोडा धावताना  घोड्याचे स्नायू कशा प्रकारे हलतात,हे चित्रात अचूकपणे रेखाटण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली.त्यानं रणगाड्याची  डिझाइन्स   बनवली, पुढे १९१६ मध्ये पहिला रणगाडा बनला,तो उणा-अधिक   लिओनार्दोच्या  डिझाइन्सनुसार.  अनेक पक्ष्यांचा त्यानं अभ्यास केला.ते उडतात कसे नी का,ह्याचा अभ्यास केला.त्या आधारावर त्यानं उडणाऱ्या मशीन्सची -म्हणजे विमानांची-डिझाइन्स  रेखाटली.
रेनेसाँच्या-Renaissance च्या काळातल्या मायकेल एंजेलो  (Michelangelo),बोतीसेली (Botticelli), ह्यांच्यापेक्षा लिओनार्दो -द-विन्ची  अधिक सरस नी लोकप्रिय आहे. या अद्वितीय चित्रकाराची केवळ २७  चित्रे  जगभरात आहेत.२ मे १५१९ रोजी त्याचा मृत्यू झाला.६७ वर्षाच्या त्याच्या एकट्याच्या  आयुष्यात  तो जणू अनेक व्यक्तींची आयुष्ये समृद्ध्पणे जगला.  

Dan Brown डॅन ब्राऊन ह्या लेखकाचं "The  Da  Vinci Code " -द दा विन्ची कोड हे पुस्तक हाती घेण्यापूर्वी लिओनार्दो -द-विन्ची   ह्या महान व्यक्तिमत्वाची किमान एवढी ओळख वाचकाला असणे नितांत गरजेचे आहे.त्याखेरीज ह्या पुस्तकाचा खरा आस्वाद घेता येणार नाही.मुळात कादंबरीचे हे कथानक वास्तव आहे की काल्पनिक आहे ह्याचा संभ्रम व्हावा इतके त्यातले तपशील वास्तव आहेत.ती प्रचंड वेगवान रहस्यकथा आहे.मात्र गम्मत म्हणजे Jacques Saunière ह्या ख्यातनाम क्युअरेटरचा  खून कोणी केला ते सुरुवातीलाच लेखकानं लिहिलं आहे.त्यातलं रहस्य वेगळ्याच गोष्टींमध्ये आहे.ते जसं-जसं उघड होत जातं,तसा-तसा  वाचक ह्या साऱ्यात कमालीचा गुंतत जातो नी स्वत: तो गुंता सोडवण्यासाठी जणू   सज्ज होतो.आरंभ बिंदुपासून सुरुवात करून अंतिम बिंदूपर्यंत घडलेल्या वर्तुळाच्या या चित्त थरारक प्रवासात वाचक श्वास रोखून आता पुढे काय घडणार या उत्सुकतेनं वाचत जातो.

Jacques Saunière -जाक सौनिएर   ह्या ख्यातनाम क्युअरेटरचा चित्रकलेच्या,संग्रहालयांच्या क्षेत्रात विलक्षण दबदबा  आहे. मोठ्या-मोठ्या चित्रकारांच्या चित्रांचा,त्यांच्या चित्र-शैलींचा तो गाढा अभ्यासक आहे. पॅरीसमधल्या  लूव्र म्युझियम मध्ये त्याच्या आलिशान gallery मध्ये तिथला मास्टरपीस भिंतीवरून ओढून Jacques Saunière -जाक सौनिएरनं म्युझियमला धोक्याचा संदेश दिला आहे.  त्याचा  पांढराधोप  अल्बिनो  मारेकरी  त्याच्यावर बंदूक रोखून, आतापावेतो त्यानं  प्राणपणानं   दडवून ठेवलेलं रहस्य सांगण्यास  बाध्य करतो आहे.अखेर खरं भासेल असं खोटं रहस्य तो त्याला सांगतो."इतर तिघांना मारलं,त्यावेळी त्यांनीही मला हेच सांगितलं." सिलास हा अल्बिनो  मारेकरी  जाक सौनिएरला सांगतो,तेव्हा भीतीची  थंड लहर जाक सौनिएरच्या शरीरभर  पसरते. आपला जीव गमावण्याइतकं  ते रहस्य महत्वाचं आहे का असं सिलास जाक सौनिएरला विचारतो.तुझ्या बरोबरच तुझे  रहस्यही नष्ट होणार असं म्हणून तो त्याच्या पोटात गोळी झाडतो.नी तिथून निघून जातो.रक्तानं माखलेल्या Jacques Saunière-जाक सौनिएरला आपला अंत पंधरा मिनिटात होणार हे कळून चुकतं. " म्युझियमचा अधिकारी वा पोलीस येईपर्यंत किमान वीस मिनीट  लागतील.माझ्याबरोबर माझे रहस्य नष्ट होता कामा नये.ते अन्य लायक व्यक्तीला कळले पाहिजे. "त्या तशा जखमी अवस्थेत  जाक सौनिएर विचार करतो,"आता प्रत्येक सेकंद लाख मोलाचा आहे."

 ह्या साऱ्या मागचा सूत्रधार असलेल्या  टीचरकडे सिलास जातो.सिलास चांगलाच धार्मिक आहे.अर्थातच येशूवर त्याची नितांत श्रद्धा आहे." ग्रॅन्ड मास्टर  नी  त्याचे इतर तिघे सह-अधिकारी-  senechaux -या  चौघांनाही मी  वेगवेगळं संपवलं.Clef de vo^ute - keystone-म्हणजे ज्यात  ते  रहस्य  लपवलय असा एक कळीचा  पत्थर अस्तित्वात असल्याचं नी तो  पॅरीसच्या प्राचीन चर्चमध्ये आहे,असं चौघांनीही मरतेसमयी खात्रीपूर्वक  सांगितलं." सिलास  टीचरला सांगतो."येशू हा देव नाहीच हे सांगणारं  त्यांचं ते रहस्य असलेला दस्तावेज त्यांनी चक्क चर्चमध्ये ठेवून केवढा विरोधाभास  साधलाय.शेवटी मृत्यू समोर  दिसताच  नास्तिकांनाही देव आठवतो म्हणायचा!" टीचर सिलासला  म्हणतो.

Robert  Langdon रॉबर्ट  लान्गडॉन हा अमेरिकेतल्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीत रीलीजियस सिम्बोलोजी (Religious Symbology)म्हणजे संकेत चिन्हांचा,  गूढ सांकेतिक भाषेचा प्रथितयश प्रोफेसर  नी  विख्यात अभ्यासक  फ्रान्समध्ये  पॅरीसमधल्या अमेरिकन  युनिव्हर्सिटीत भाषण देण्यासाठी आलेला होता.भाषणानंतर पेयपानासाठी त्या संध्याकाळी  पॅरीसमध्ये लूव्र म्युझियमचे क्युअरेटर  Jacques Saunière-जाक  सौनिएर बरोबर त्याची भेट ठरली होती.मात्र  जाक  सौनिएर आलाच नाही.
आपले  भाषण आटोपून हॉटेलमध्ये विश्रांती घेत असताना मध्यरात्री फ्रान्सचे ज्युडीशिअल  पोलीस येऊन त्याला एक फोटो दाखवू लागले.त्या फोटोतल्या व्यक्तीची जशी गत झाली होती,तसाच एक फोटो आपण यापूर्वीही पहिला असल्याचं(deja vu)त्याला जाणवलं. ह्या फोटोतल्या व्यक्तीनं जाणीवपूर्वक स्वत:ला तशा पोझिशनमध्ये ठेवून घेऊन मगच अंतिम श्वास घेतला होता. "मला कळत नाहीये कुणी असं का पडून मरेल?" रॉबर्ट  लान्गडॉननं पोलीस अधिकाऱ्याला विचारलं."तुम्हाला कळत नाहीये!श्रीमान जाक  सौनिएर ह्यांनी स्वत:च ह्या विशिष्ट प्रकारे स्वत:चं  शरीर ठेवून मग अंतिम श्वास घेतलाय." पोलीस अधिकाऱ्यानं लान्गडॉनला सांगितलं.फ्रान्सचे ज्युडीशिअल  पोलीस त्याला   लूव्र म्युझियममध्ये घेऊन गेले.
आयफेल टॉवर  पार करून पोलीस रॉबर्ट लान्गडॉनला लूव्र म्युझियमजवळ घेऊन आले. म्युझियमच्या  प्रवेशद्वाराचा परिसर त्या म्युझियमपेक्षाही अधिक प्रेक्षणीय होता.I M.Pei (पेई)  या चीनमध्ये जन्मलेल्या अमेरिकन आर्टीस्टनं बनवलेला  काचेचा,पारदर्शक  ७१ फूट उंच, भव्य पिरामिड  (Pyramid )तिथे उभा होता.मित्रां(फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष  François  Mitterrand)  यांनी तो उभारून घेतल्यानं, ते  इजिप्शियन कला नी वास्तुकलेचे भोक्ते आहेत,म्हणून "स्फिंक्स" म्हणून  त्यांच्यावर कडाडून टीका झाली होती.ते पिरामिड कसले,paris च्या चेहेऱ्यावरचा तो व्रण आहे  ही फ्रेंचांची धारणा होती.
रॉबर्ट लान्गडॉनला आत प्रवेश करण्याची सूचना देण्यात आली.Bezu  Fache -बेझू फाश   हा उंचापुरा,धिप्पाड फ्रेंच पोलीसप्रमुख  रॉबर्ट  लान्गडॉनची तिथे वाट पाहत होता.पिरामिड कसा वाटला,अशी त्यानं रॉबर्ट लान्गडॉनजवळ विचारणा केली. भव्य आहे,असे लान्गडॉनने सांगताच paris च्या चेहेऱ्यावरचा तो व्रण आहे,असे फाश उद्गारला.'हे  पिरामिड ६६६ काचेची तावदाने वापरून बनवलेले आहे-नी ६६६ हा सैतानाचा आकडा आहे,हे ह्याला माहितेय की नाही कोणास ठावूक!' लान्गडॉनने विचार केला.त्याचं लक्ष आतल्या,जरा कमी लोकांना माहीत असलेल्या  La Pyramide Inversée ह्या उलट्या पिरामिड कडे गेलं.
Jacques Saunière-जाक सोनीएर ची नी रॉबर्ट  लान्गडॉनची भेट त्या संध्याकाळी व्हायची होती,ती कशासाठी ठरली,कोणी ठरवली होती,त्यात नेमकी कशाबाबत चर्चा व्हायची होती,त्याबद्दल बेझू फाश रॉबर्ट  लान्गडॉनजवळ मुद्देसूद चौकशी करू लागला. बेझू फाशच्या  टाय-पिनवर जीझस   ख्राइस्ट व त्याचे बारा धर्मदूत -apostles -दर्शवणारा क्रॉस व त्यावर तेरा काळे रत्नाचे खडे होते.ह्या चिन्हाला crux gemmata -क्रूक्स  जेमाटा असं संबोधलं  जाई.फ्रान्सच्या पोलीस-प्रमुखानं  अशा प्रकारे आपल्या धार्मिकतेचं जाहीर प्रदर्शन करावं ह्याचं लान्गडॉनला आश्चर्य वाटलं.
Jacques Saunière-जाक सोनीएरचं संपूर्णपणे विवस्त्र  अचेतन शरीर समोर बघून रॉबर्ट  लान्गडॉनला प्रचंड धक्का बसला.मृत्यू समोर उभा ठाकला असतानाही त्यानं आपल्या जिवंतपणीच्या शेवटच्या क्षणांमध्ये प्रचंड मेहेनत केलेली दिसत होती.पोटात गोळी लागूनसुद्धा एवढ्या लांबवर  ग्रॅन्ड  gallery पर्यंत Jacques Saunièरे-जाक सोनीएर चालत आलेला होता,अंगावरचा एकूण एक कपडा उतरवून,  (लिओनार्दो द विन्चीच्या  vitruvian man प्रमाणे) आपले दोन्ही हात नी दोन्ही पाय पसरून त्यानं स्वत:ला जमिनीवर ठेवून घेतलं होतं.त्याच्या पोटाच्या जखमेतून वाहणाऱ्या रक्ताचा शाई म्हणून वापर करत त्यानं डाव्या हाताच्या बोटानं पोटावरच, पाच रेषा एकमेकींना छेदून  तारा दर्शवणारं  एक चिन्ह काढलं होतं.
"हे pentacle म्हणजे तारा  आहे.पृथ्वीतलावरचं सर्वात प्राचीन चिन्हानपैकीचं एक.ख्रिस्तपूर्व चार हजार  वर्षांपेक्षा जास्त काळापासून ह्याचा  वापर केला  जात आहे."रॉबर्ट  लान्गडॉननं सांगितलं.
"त्याचा अर्थ काय होतो?"बेझू फाशनं विचारलं.
"ते निसर्गपूजेशी निगडीत असलेलं  ख्रिस्तपूर्व काळातलं  पगान धार्मिक  चिन्ह आहे. प्राचीन काळी हे विश्व पुरुष आणि स्त्री अशा  दोन अर्ध्यांमध्ये विभाजित आहे असं मानलं जाई.देव आणि देवी!यिन आणि यांग!जेव्हा निसर्गात स्त्री व पुरुष यांच्या मध्ये समतोल राखलेला असतो, तेव्हा जगात शांती नांदते.जेव्हा असा समतोल नसतो,तेव्हा एकच  गोंधळ  माजतो.  pentacle म्हणजे तारा हा sacred feminismचं-स्त्रीचं प्रतीक आहे.तो व्हीनस देवतेचं प्रतीक आहे.व्हीनस देवतेला स्त्री सौंदर्याची,शृंगाराची देवता मानलं जातं." लान्गडॉननी सांगितलं.व्हीनस  म्हणजे शुक्राची चांदणी. आकाशात  दर आठ वर्षांनी ती अशा जागी येते की अचूक  pentacle -पाच टोके असलेला ताऱ्याचा आकार  तयार होतो.(आपल्या दिवाळीतल्या आकाश कन्दिलासारखा आकार) ग्रीकांनी ह्या शुक्र ताऱ्याचं दर आठ वर्षांनी  नेमानं होणारं आगमन बघून त्यावरून ऑलिम्पिक  खेळ बेतले.ऑलिम्पिकचं  प्रतीकचिन्ह  ही आधी जवळजवळ  पाच  टोकांचा ताराच निश्चित झाला होता.मात्र पगानकालीन प्रतीकचिन्ह  मिटवून  टाकण्यासाठी चर्चनं कंबर कसली. 
हे मात्र  लान्गडॉननी मनात म्हटलं.
Jacques Saunière-जाक सोनीएरनं मृत्युसमयी स्वत:चं शरीर पाच   टोकांच्या ताऱ्याच्या आकारात ठेवलं,पोटावर तसाच तारा-pentacle काढला नी  त्यावरताण  म्हणजे  त्यानं  जमिनीवर  अदृश्य  शाईनं काही  लिहून ठेवलं होतं.त्यावर उजेड पडताच जांभळ्या रंगातली ती अक्षरं दृगोचर झालीत.बेझू फाशनं लान्गडॉनला  तो संदेश दाखवून म्हटलं."हे काय आहे,त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच तुम्हाला इथे   आणण्यात आलंय."
जाक   सोनीएरचा खून  रॉबर्ट  लान्गडॉननंच केला आहे अशी  बेझू फाशला खात्री होती.दोघे संध्याकाळी भेटणार होते आणि जाक सोनीएर मारेकऱ्याला ओळखत होता,हेही उघडपणे कळत होतं.
13-3-2-21-1-1-8-5
O,Draonian devil!
Oh,lame saint!
Jacques Saunière-जाक सोनीएरनं मृत्युसमयी लिहून  ठेवलेला गूढ संदेश  लान्गडॉनला  उलगडायचा   होता."आमचे क्रिप्टोग्राफर(cryptographers)  त्यावर काम करताहेतंच."बेझू फाशनं म्हटलं.लान्गडॉननं त्यावर बरंच डोकं खपवलं,पण त्याला समाधानकारक उत्तर मिळेना.
"ओह!Jacques Saunière-जाक सोनीएरनं स्वत:चं शरीर लिओनार्दो-द-  विन्चीच्या  vitruvian man प्रमाणे ठेवलंय."रॉबर्ट  लान्गडॉनला साक्षात्कार होताच त्याचा वरचा श्वास वर नी खालचा श्वास खाली राहिला.
फ्रेंच पोलिसांच्या क्रिप्टोलोजी विभागातली  Sophie Neveu -सोफी नेव्यू  ही बत्तीस वर्षीय पोलीस युवती सभोवती भरभक्कम पोलीस बंदोबस्त असून नी कुणालाही आत येऊ देण्याची  परवानगी नसताना वादळासारखी तिथे आली.
सिलास हा कैदी म्हणून तुरुंगात शिक्षा भोगत असताना आलेल्या प्रचंड भूकंपात त्याच्या कैद्खान्याच्या वरचं छप्पर कोसळून पडलेल्या खिंडारातून तो पळून गेला.अखंड रात्रभर तो पळत होता.थकव्यानं नी अचानक  मिळालेल्या स्वातंत्र्यानं तो बेशुद्ध झाला.बाहेर, त्याचं पांढरंधोप  शरीर हा त्याच्याविषयीच्या  तिरस्काराचा  नी कुचेष्टेचा विषय होता.त्याचे डोळे उघडले तेव्हा  त्याच्यासमोर   एक ख्रिस्ती मिशनरी  उभा होता. त्यानंच त्याला  सिलास हे नवं नाव नी नवी  ओळख दिली.बायबलमधला उतारा काढून त्याला वाचायला दिला:...'आणि अचानक एकदम जोरदार  धरणीकंप झाला. तुरुंगाच्या  पायव्यासकट सगळी इमारत जोरजोरात  हलू लागली...आणि तुरुंगाची सारी दारे सताड उघडली...'माझं नाव बिशप मॅन्युएल अरीन्गरोसा' ख्रिस्ती धर्मगुरूनं त्याला सांगितलं.
Bishop Manuel Aringarosa -बिशप मॅन्युएल अरीन्गरोसा हा ख्रिस्ती धर्मगुरूOpus  Dei-  ओपस डी ह्या  ultraconservative christian society/catholic  churchचर्च चा सदस्य होता.ओपस डीचे सदस्य असलेले  विवाहित लोकही कौटुंबिक  कर्तव्ये  पार पडत असतानाच  कॅथोलिक प्रथांचं पालन मोठ्या  कट्टरपणे  करतात नी देवाधर्माचं कार्य करतात, असा त्यांचा  दावा होता.ओपस डीला वाटीकन (vatican )चा वरदहस्त होता. 
अरीन्गरोसा टीचरच्या मर्जीतला होता.चर्चला विरोध करणाऱ्या,येशू हा देव नव्हे,सर्वसामान्य माणूस होता ह्या मताच्या 'ब्रदरहूड'च्या  चार  प्रमुखांची  नावे त्याला  कळली होती.मात्र काम पूर्ण होईपर्यंत अरीन्गरोसानं सिलासला ओळख द्यायची नाही की त्याच्याशी बोलायचे नाही, ही अट  टीचरनं अरीन्गरोसाला घातली.  
"हे आकडे म्हणजे कुठला टेलिफोन नंबर वगैरे नसून गणिताचे आकडे आहेत."फ्रेंचमध्ये Sophie Neveu -सोफी नेव्यू बेझू फाशला म्हणाली. मृत्युच्या क्षणी कोण वेड्यासारखी गणिताची आकडेमोड करेल,ह्या कल्पनेनं बेझू फाश चक्रावला.त्यानं तिची कल्पनाच फेटाळून लावली.ती कितीही उच्च दर्जाची  क्रिप्टोग्राफर असली तरी त्या क्षणी ते सारं विसंगत भासत होतं.
" जाक सोनीएरला ठावूक असणार की ह्या आकड्यांकडे नजर जाताच आपल्याला कळेल..." सोफी नेव्यू म्हणाली."ह्याचा अर्थ हा आहे."तिनं काही आकडे कागदावर लिहिले-
१-१-२-३-५-८-१३-२१
"ह्यात काय विशेष आहे?तू  केवळ चढत्या भाजणीत हे आकडे लिहिले आहेत." बेझू फाश कुरकुरला.
"तेच!हा जो नंबर सिक्वेन्स,म्हणजे ठराविक पद्धतीनं चढत्या भाजणीत हे आकडे लिहिलेले आहेत,त्याला अपार महत्व आहे.ह्याला Fibonacci Sequence म्हणतात.विख्यात गणितज्ञ लिओनार्दो  फायबोनाती    ह्यानं तेराव्या शतकात आकड्यांची ही विवक्षित शृंखला तयार केली. त्यात जसजसे पुढे जावे,पहिल्या दोन आकड्यांची बेरीज तिसऱ्या आकड्याएवढी येते.  A progression in which each term is equal to the sum of two proceeding terms" तिनं बेझू फाशला सांगितलं.
"हा खून तूच केल्याचा बेझू फाशला संशय आहे.तुझ्या हालचालींवर त्याची बारीक नजर आहे.तू संकटात आहेस" सोफी नेव्यू रॉबर्ट लान्गडॉनला म्हणाली."  "बेझू फाशनं तुला जमिनीवर लिहिलेल्या गूढ संदेशाच्या उर्वरित ओळी तुझ्यापासून लपवून ठेवल्यात.तू त्या पाहू नयेस म्हणून मिटवून टाकल्यात.मूळ संदेशाचे,खुनाच्या ठिकाणाचे जे फोटो त्यानं  आमच्या  खात्याला  पाठवलेत ते हे बघ." असं म्हणून तिनं तो संदेश त्याला दाखवला- 
13-3-2-21-1-1-8-5
O,Draonian devil!
Oh,lame saint!
P.S.Find Robert Langdon
लान्गडॉनला आपल्या पायाखालची जमीन सरकत असल्याचा भास झाला. जाक सोनीएरनं आपला उल्लेख त्यात का करावा,हेच गूढ त्याला उमगलं नाही.
"मला ठावूक आहे की तू निर्दोष आहेस.पण तुझे नाव त्यात लिहिलेले असल्यामुळे केवळ बेझू फाश तुला यात गोवतो आहे.हा संदेश माझ्यासाठी आहे!"सोफी नेव्यू रॉबर्ट लान्गडॉनला म्हणाली.
"तुझ्यासाठी?"विस्मयचकीत होऊन लान्गडॉन म्हणाला..
"हो.माझ्यासाठी!जाक सोनीएर हे माझे आजोबा होते. मी  गेल्या .दहा वर्षांपासून त्यांच्यापासून वेगळी राहतेय.p.s.म्हणजे प्रिन्सेस सोफी.ते मला ह्याच नावानं संबोधायचे."
सोफी नेव्यू रॉबर्ट लान्गडॉनला बेझू फाशच्या  तावडीतून सोडवण्यासाठी जिवाचं  रान करते.बेझू फाशनं त्याला सर्विलांस मध्ये ठेवलाय.त्याची प्रत्येक हालचाल, बोलण,त्याच्या खिशात गुपचूप सरकावलेला  कॅमेरा टिपतो आहे.अखेरीस सोफी नेव्यू बेझू फाशला हुलकावणी देण्यात यशस्वी होते.
"आजच दुपारी जाक सोनीएर हे माझे आजोबा मला त्यांचं रहस्य सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते,मात्र मी त्यांच्यावर रागावून घर सोडलं होतं,नी ते ह्या ना त्या मार्गानं त्यांचं ऐकावं,म्हणून खूप प्रयत्न करीत होते. मी त्यांना भेटावं,अशी इच्छा व्यक्त करीत होते. मी लहान असताना ते मला अशाच प्रकारची कोडी घालायचे...बघता बघता अशा  गूढ  संदेशांतून,चिन्हांतून,सांकेतिक  भाषेतून मला नेमकं काय,ते अचूक उलगडता  यायला लागलं,नी तो छंद  मोठेपणी चक्क माझं करियर  बनला".सोफी नेव्यू  रॉबर्ट लान्गडॉनला सांगते.
"दा  विन्ची,फायबोनाती  सिक्वेन्स,pentacle -शुक्रतारा,p .s .सोफी हे तिचं नाव SoPHI असं लिहिल्या जाऊ शकतं.PHI -फी हा विश्वातला सर्वात सुंदर आकडा आहे.१.६१८-हे डिव्हाईन प्रपोर्शन आहे. जिथे-तिथे चराचरात हे प्रमाण दिसतं.   मधमाश्यांच्या पोळ्यातल्या  मादी मधमाश्यांच्या संख्येला  नर  मधमाश्यांच्या संख्येनं  भागलं तर उत्तर येतं 1.618 शिंपल्यातल्या प्रत्येक   चक्राकार रेखांचं  त्याच्या पुढल्या  चक्राकार रेखांशी प्रमाण असतं  १.६१८ सूर्यफुलांच्या बिया  ह्याच  प्रमाणात प्रत्येक चक्रात रचलेल्या असतात.  फार कशाला मानवी शरीर रचनेत जिथे-तिथे PHI -फी म्हणजे  १.६१८ प्रमाण आढळतं. ह्याचा अतिसूक्ष्म अभ्यास केला,तो  लिओनार्दो-द-विन्चीनं. आणि  जाक सोनीएर तर  लिओनार्दो-द-विन्चीचा परम भक्त होता.अगदी मरतेसमयीही  त्यानं sacred feminism दर्शवणारा  pentacle-शुक्र- तारा  काढला.  लिओनार्दो-द-विन्चीनं  आपल्या प्रसिद्ध चित्रांमध्ये अगदी उघड दिसू नये या पद्धतीनं sacred feminism,sacred feminine फॉर्म्स रेखाटले  आहेत. "लास्ट  सपर "  ह्या   चित्रात   त्यानं  पवित्र  स्त्रीत्वाला   मानवंदना  दिली  आहे.-"रॉबर्ट  लान्गडॉन विचार करू लागतो. 
O,Draonian devil!
Oh,lame saint!
 रॉबर्ट लान्गडॉन ह्या संदेशातली  ती उलट-सुलट लिहिलेली अक्षरं  सरळ करून बघतो,तर त्याला हर्षवायूच व्हायचा बाकी राहतो. 
Leonardo da Vinci!
The Mona Lisa!
हा  संदेश त्याच्या हाती लागतो.
सोफी नेव्यूचे आजोबा जाक सोनीएर नेहेमी तिला अशा प्रकारचे अनाग्राम किंवा कोडी सोडवायला  द्यायचे. उलटसुलट  लिहिलेल्या  शब्दांमधून अर्थपूर्ण  शब्द, वाक्य तिला शोधायला लावायचे.आताही त्यांनी तेच केलेलं होतं.
मोनालिसाचं  प्रख्यात चित्र दाखवायला तिला आजोबानी लूव्र म्युझीयमच्या ऑफिसमध्ये  बोलावून घेतलं होतं.तिच्या गूढ हास्याबद्दल त्यांनी तिला सांगितलं होतं.तिला ते चित्र धूसर वाटलं होतं.लिओनार्दो-द-विन्चीनं sfumato - स्फूमाटो तंत्र वापरून चित्र रेखाटलं,म्हणून ते तसं धूसर दिसतं,असं  तिला आजोबानी सांगितलं होतं.
"मोनालिसा-फ्रांस मध्ये ते 'ला जोकोंड' ह्या नावानं  ओळखलं जातं-जगातलं सर्वात प्रसिद्ध चित्र आहे. लिओनार्दो-द-विन्ची जिथे जाईल,तिथे सतत स्वत:बरोबर हे चित्र बाळगत असे.ते आपलं सर्वोत्तम चित्र असल्याचं सांगत असे. लिओनार्दो-द-विन्चीनं डावीकडचं दृश्य जरा खाली घेऊन रंगवून   मोनालिसा डावीकडून अधिक मोठी नी उजवीकडून छोटी दिसेल असं चित्र काढलं. प्राचीन संकल्पनेनुसार डावी बाजू  स्त्रीतत्वाची  नी उजवी बाजू पुरुष तत्वाची मानली जाते.  लिओनार्दो-द-विन्ची "  प्रायरी ऑफ सायन" -Priory of Sion ह्या संस्थेचा प्रमुख होता.निसर्गपुजेत पवित्र स्त्रीत्व, ह्या तत्वाची उपासना करणारा,goddess iconology  मानणारा   होता.  त्यामुळे त्याचा   चर्चला विरोध होता. तो स्वत:homosexual होता,पण जोवर पुरुष तत्व नी स्त्री तत्व हे दोन्ही घटक नसतील,तर मनुष्यात्मा  प्रबुद्ध  (enlightened )होणारं नाही,असं तो मानीत असे." रॉबर्ट लान्गडॉननं पूर्वी वर्गात  शिकवत असताना  सांगितलं होतं," एक प्रवाद असा आहे की मोनालिसा हे दस्तुरखुद्द  लिओनार्दो-द-विन्ची ह्याचंच स्त्रीवेषातलं चित्र आहे.मोनालिसा स्त्रीही नव्हती नी पुरुषही नव्हती.  ते दोघांचं फ्युजन आहे-androgynous !iतुम्ही वेटोळेदार शिंगे असलेल्या  मेंढ्याच डोकं असणाऱ्या 'आमोन'  ह्या इजिप्शियन देवाचं नाव ऐकलय का कधी?  ""
"हो तर!God of masculine fertility "एक विद्यार्थी उत्तरला होता. 
"आणि आयसीस-Isis  ही इजिप्शियन goddess ऑफ  fertility ,तिला
L'isa असं ही संबोधलं  जाई.अमोन लिसा -AMON LISA  ...त्या अक्षरांपासून MonaLisa हे नाव आलं .MonaLisa  चा चेहेरा ही androgynous ,नाव ही androgynous -हे सिक्रेट त्या व्यक्तीला ठावूक आहे,म्हणून त्याच्या ओठावर गूढ स्मित उमटलंय." रॉबर्ट लान्गडॉननं सांगितलं होतं.

लिओनार्दो   द  विन्चीचं  आणखी   एक  मौल्यवान  पेंटिंग  लूव्र  म्युझियममध्ये  आहे -madonna   of the rocks .इटलीतल्या,मिलानमधल्या सानफ्रांसेस्को  चर्चमध्ये  लावण्यासाठी  व्हर्जिन  मेरी,बेबी  जॉन -बाप्तीस्त , उरीएल ,बाल  येशू   यांचं 
 चित्र  बनवण्यासाठी  लिओनार्दो - द-विन्चीला  सांगण्यात  आलं.मात्र  त्यानं  जे  चित्र  रेखाटलं ,ते   भयानक  होतं-निळ्या  अंगरख्यातली   व्हर्जिन मेरी  मांडीवर  बाल  येशूला  घेऊन  बसली  होती .तिच्या  समोर  उरीएल   बेबी  जॉन
-बाप्तीस्तला  घेऊन  होता.आणि  नेहेमीच्या  –बाल  येशू  ख्रिस्तानं जॉनबाप्तीस्तला   आशीर्वाद  देण्याच्या  दृष्याऐवजी  त्यात  अगदी 
 उलट  दृश्य -बाल  जॉन -बाप्तीस्त  हा  बाल  येशू    ख्रिस्ताला  आशीर्वाद  देताना  लिओनार्दो  द विन्चीनं दाखवलं होतं !
 So dark the con of the man- ह्या  जाक  सोनिएरनं  लिहिलेल्या  पुढच्या  संदेशातल्या  अक्षरांची   उलटा - पालट  करून  सोफी नेव्यूनं त्यातला  खरा  संदेश  शोधून  काढला- madonna  of the rocks
सोफी नेव्यूला  तिथे  आजोबांनी  तिच्यासाठी   ठेवलेली  एक  अनोखी  किल्ली  मिळते.ती  किल्ली  कशाची  आहे,ते  शोधण्यासाठी  आजोबांनी अशीच  घातलेली   वेगवेगळी  कोडी  सोडवत  अखेर  प्रचंड   उरस्फोड  केल्यावर  सोफी  नेव्यूनी  रॉबर्ट   लान्गडॉनला   तो सर्वात  मौल्यवान   keystone  -कळीचा  दगड  मिळतो.दोघेही   तो  घेऊन  प्रचंड   सव्यापसव्य  करीत  Sir Leigh Teabing -सर  लेह  टीबिंग  कडे  येऊन  पोहोचतात.  
Sir Leigh Teabing -सर  लेह  टीबिंग  ह्या  ब्रिटीश  इतिहासकारानं  आपलं  संपूर्ण   आयुष्य   holy grail  होली  ग्रेलच्या शोधावर  वाहून  घेतलंय . holy grail  होली  ग्रेल हा  या  पृथ्वीतलावरचा  सर्वात  अधिक  शोधला  जाणारा  मौल्यवान  ऐतिहासिक  दस्तावेज  आहे . तो  ज्यात  ठेवलाय ,असा  keystone-कळीचा दगड अस्तित्वात  आहे  ही    त्याची  खात्री   आहे .
 “holy grail  होली  ग्रेल ही  वस्तू  नाही.  बायबल  हे  काही   आभाळातून  आलेलं  नाही . ते  मनुष्यरचित आहे .जिझस  ख्राइस्टच्या  देवत्वाविषयी -divinity of Jesus वर  बरीच  प्रश्नचिन्ह  उठ्लीत,पण  तो  son of god –ईश्वराचा  पुत्र  असल्याचं  मानून   त्यावेळी   Constantine the great-  कॉनस्टनटाइन   ह्या  पगान  धर्म संस्कृतीच्या    रोमन  सम्राटानं  रोमन  साम्राज्य  एका  छत्राखाली  आणण्यासाठी  Christianity  खिश्चन धर्माचा  आधार  घेतला  ,नी  त्या   धर्माला  खूप  महत्व  दिलं .त्यानं  आपला  स्वार्थ   साधण्यासाठी  divinity of Jesus -जिझस  ख्राइस्टच्या  देवत्वाचा  वापर  केला . येशू   ख्रिस्त  हा  कोणी  दैवी  युगपुरुष  नसून  साधासुधा  विवाहित  माणूस  होता  हे  पुराव्यानिशी  सांगणारा   दस्तावेज  म्हणजेच  ते  रहस्यमय  होली  ग्रेल  .साहजिकच   हे  रहस्य  उघड  होऊ  नये  यासाठी  चर्चनं  जीवाचं रान   केलं .” सर  लेह  टीबिंग   सोफी  नेव्यूला  सांगतो ." लिओनार्दो   द   विन्चीला  ठावूक  होतं   की  होली  ग्रेल   कुठे  आहे ,ख्रिस्ताचा  कप ,chalice-चालीस काय आहे."
"The last Supper “ द लास्ट सपर  ह्या लिओनार्दो   द   विन्चीच्या  पेंटिंग  मध्ये  Jesusजिझस आणि  त्याचे  Disciples- शिष्य  दाखवले   असून  त्या क्षणी  जिझस  सांगतोय  की  त्यांच्यापैकी  एकजण  त्याचा  विश्वासघात  करेल !” सोफी   नेव्यू  सांगते.  
“ त्यात  ते  काय  खाताना  दाखवले  आहेत ?” टीबिंग   सोफी  नेव्यूला विचारतो.
“Bread-ब्रेड’सोफी   नेव्यू  सांगते.
“ त्यात   ते  काय पिताना दाखवले  आहेत  ?”
“Wine -वाइन ”
"किती  वाइनग्लास  टेबलवर  आहेत ?"
":एक ..एक  कप.ख्रिस्ताचा कप.चालीस .होली  ग्रेल" .
...तिथे  १३  कप  होते.
"होली  ग्रेल ही  स्त्री  आहे ".टीबिंग   सोफी  नेव्यूला सांगू लागतो."स्त्री  नी  पुरुष  या  दोघांसाठी  प्राचीनकाळी  जी  प्रतीक-चिन्ह   वापरली  जात,ती  ग्रहांच्या  स्वामीसाठीची      खगोलशास्त्रीय प्रतीक-चिन्ह  होत. .पुरुषासाठी  planet- God Mars नी  स्त्रीसाठी  planet- God  Venus.मंगळ नी शुक्र!
^  -हे   .पुरुषासाठीचं  प्रतीक-चिन्ह  म्हणजे  phallus -लिंग  आहे .V हे स्त्रीसाठीचं प्रतीक-चिन्ह  म्हणजे  कपाच्या  आकाराचं -किंबहुना  स्त्रीच्या  गर्भाशयाच्या  आकाराचं  आहे .तिची  निर्मितीची,सृजनाची ,मातृत्वाची शक्ती  अधोरेखित  करणारं  चिन्ह  आहे .प्राचीन  मान्यतेनुसार  होली  ग्रेल  हा  ख्रिस्ताचा  कप ,Chalice -चालीस  आहे .पण  त्यामागच  वास्तव  लपवण्यासाठी  तसं दाखवलं  गेलंय…वस्तुत: त्या   चालीसच्या- कपाच्या  माध्यमातून  त्याही   पलीकडचं  सूचित  केलं  गेलंय. The Holy grail is literally the ancient symbol for womanhood…जे  चर्चला  पूर्णत:  अमान्य आहे.” टीबिंग  सांगतो .
 Dan Brown डॅन ब्राऊन ह्या लेखकाचं "The  Da  Vinci Code " -द दा विन्ची कोड हे पुस्तक  वास्तव आहे की काल्पनिक आहे ह्याचा संभ्रम व्हावा इतके त्यातले तपशील वास्तव आहेत.ती प्रचंड वेगवान रहस्यकथा आहे.ह्यांनी  त्यात  इतका  जीव   ओतलाय .पुढे  काय  होणार  ह्याची   उत्कंठा  क्षणोक्षणी  वाढत  जाते.पुस्तक वाचून संपल्यावर वाचक दोन गोष्टी करतो.एक म्हणजे लिओनार्दो   द  विन्ची ह्या महान व्यक्तीला मनोमन साष्टांग दंडवत घालतो,Dan Brown डॅन ब्राऊन ह्या लेखकाला मनोमन दंडवत घालतो... नी दुसरं म्हणजे लिओनार्दो   द  विन्चीची ती  दोन प्रख्यात चित्र कुठे छापलेली सापडतील..त्यांना  बघायचा दृष्टीकोन घासूनपुसून लख्ख करतो.


No comments: