Monday, April 16, 2012

Article on "Maximum City Bombay lost and found "-A Book Written by Suketu Mehta
मुंबापुरी: भुरळ पाडणारी मायानगरी
-रश्मी घटवाई
मुंबई ह्या स्वप्न-नगरीनं किती जणांना आधार दिलाय,याची गणतीच होऊ शकत नाही.तिनं अनेक हातांना काम दिलं,पोटाला अन्न दिलं,अनेकांना नाव मिळवून दिलं. जिवाची मुंबई करणाऱ्यांसाठी जशी मुंबई आहे,तशीच भाकरीचा चंद्र शोधणारयासाठी मुंबईच मदतीला धावून येते."ई है बम्बई नगरिया, सोनेचांदी की डगरिया..."वगैरे तिची स्तुतीस्तोत्रे अगणित नी त्यांचं नित्यनेमानं पठण करणारेही अगणित!मुंबापुरीत स्वप्न आणि वास्तव दोन्ही, हातात हात घालून वावरतात.म्हणून तर ह्या भव्य-दिव्य मायानगरीची भल्या-भल्यांना भुरळ पडते.
ह्या भव्य-दिव्य मायानगरीचा तितकाच भव्य दिव्य आढावा सुकेतू मेहता ह्यांनी
Maximum City Bombay lost and found मॅक्सीमम सिटी बॉम्बे लॉस्ट अ‍ॅन्ड फाउंड ह्या नितांतसुंदर पुस्तकात अतिशय विस्तृतपणे घेतलेला आहे.मुंबईवर ह्यापेक्षा उत्कृष्ट पुस्तक दुसरे नसावे.आठेक वर्षांच्या अविरत परिश्रमांनंतर आणि मुंबईच्या कानाकोपऱ्यात वावरल्यानंतर अगदी बारीक सारीक तपशिलांसह त्यांनी त्यात सुरेख रंग भरले आहेत.
"मी १९७७ मध्ये बॉम्बे सोडलं,नी २१ वर्षांनी मुंबईला परतलो.आमच्या कुटुंबातला प्रत्येक जण वेगवेगळ्या देशांत आपला व्यवसाय नेईल तिथे स्थिरावला होता.मुंबईतून मी जेव्हा न्युयॉर्कला राहायला लागलो,तेव्हा मला वाटलं,चला,जगातल्या वाईट्ट शाळेतनं आपली सुटका झाली.मात्र न्यूयॉर्क ची शाळा त्याहून वाईट होती.'" सुकेतू मेहता लिहितात.' लिंकन यांनी गुलामांना दास्यातून मुक्त करायलाच नको होतं ',असल्या प्रकारची वर्णभेदी टीका शाळेतली मुले त्यांच्यावर करत, शिक्षक उपेक्षा करत,भारतीय अन्नाचा वास अंगाला येणारा घाणेरडा मुलगा अशी संभावना त्यांच्या वाट्याला येई."मी शरीरानं न्यूयॉर्क मध्ये रहात होतो,मात्र मनानं मुंबईत होतो."ते लिहितात. त्यांच्या लहान मुलाला न्यूयॉर्कच्या प्लेस्कूल मध्ये टाकल्यावर त्यांना तोच अनुभव आला,बाकीची लहान लहान मुले इंग्लिश मध्ये बोलत होती,त्यांचा मुलगा गप्प गप्प होता,कारण त्याला गुजराती भाषा तेवढी येत होती.इतर मुले त्याला खेळायला घेत नव्हती.त्याच्या डब्यातल्या भारतीय अन्नाला नाके मुरडत होती.त्यामुळे दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर भारतात परतण्याची निकड त्यांना वाटू लागली.तेही त्यांचे बहुतेक सर्व नातेवाईक इतर देशांत स्थायिक असताना,भारतात कोणी नातेवाईक उरलेले नसताना!
"ऑस्ट्रेलिया खंडापेक्षा अधिक मुंबईची लोकसंख्या लवकरच होईल.१४० लाख (त्याहूनही जास्त!)लोकसंख्या असलेलं ह्या पृथ्वीतलावरचं सर्वाधिक लोकसंख्येचं शहर आहे.बृहन्मुंबईची लोकसंख्या १९० लाख -जगातल्या १७३ देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.१९९० मध्ये १५,००० माणसे प्रति चौरस किलोमीटर अशी मुंबईची लोकसंख्येची घनता होती,आणि मध्यवर्ती मुंबईत दहा लाख माणसे प्रति चौरस मैलात राहात होती. सिटी ऑफ सेव्हन आयलंड्स -Heptanesia-असं Ptolemy ह्या महान तत्ववेत्त्यानं सन १५० मध्ये मुंबईचं वर्णन केलं. पोर्तुगीजांनी बॉम बहिया ,bombaim (गुड बे)असं तिला संबोधलं. मुंबादेवी, मंबई वगैरे तिची इतर हिंदू नावे."सुकेतू मेहता मुंबईचा संपूर्ण इतिहास सांगतात, "१८६९ मध्ये सुएझ कालव्यामुळे इंग्लंडला जाण्यास केवळ निम्मा वेळ लागू लागला.बॉम्बे हे खऱ्या अर्थानं गेटवे ऑफ इंडिया झालं. कलकत्ता हे भारतातलं सर्वात श्रीमंत शहर झालं."मुंबईची भौगोलिक, ऐतिहासिक आणि सामाजिक माहिती सुकेतू मेहतांनी तपशीलवार दिली आहे.
मुंबईतली जागेची टंचाई,राहत्या जागेत एखाद्याला येणाऱ्या हजार अडचणी, कामाला येणाऱ्या प्लंबर नी इलेकट्रीशियन इत्यादिंबाबतचे मजेदार अनुभव, शेजारी,ओळखी-पाळखीचे लोक ह्यांच्याशी होणारे संवाद,interaction ह्यांच्याविषयी खूप खुसखुशीतपणे त्यांनी लिहिलं आहे."मुंबई ही सोने की चिडिया आहे,"असं झोपडपट्टीत राहणारा, वीज ,पाणी,शौचालायाविना झोपडीत आयुष्य व्यतीत करीत असलेला एक भणंग माणूस मला सांगत होता,की अन्न पाण्याच्या शोधत माणसे का आणि कशी मुंबईत येतात, स्थिरावतात.दुसरा एकजण मला सांगत होता की माणूस इथे कधीच उपाशी मरत नाही.त्याचवेळी इथे हजारो स्लिमिंग सेन्टर्समध्ये फिगर मेन्टेन करण्यासाठी-सडपातळ रहावं म्हणून मॉडेल्स मुद्दामहून उपाशी राहतात,पंचतारांकित हॉटेलांमध्ये मद्यावर पाण्यासारखा पैसा खर्च होत असतो,त्याचवेळी ४० टक्के घरांमध्ये पेयजल येत नाही " हा प्रचंड मोठा विरोधाभास ते दाखवून देतात.
"Bombay is the biggest,fastest,richest city in India. It is Bombay that Krishna could have been describing in the tenth canto of Bhagwad Gita,when the God manifests itself in fullness:
I am all-destroying death.
and the origin of things that are yet to be.
I am the gambling of rogues;
the spendour of the splendid.
It is a maximum city."सुकेतू मेहता सांगतात.

राधाबाई चाळीतला प्रसंग,बाबरी मस्जिद पडल्यानंतर उफाळलेले धार्मिक दंगे,त्यात झालेलं शिरकाण,बॉम्बस्फोट, ह्याबद्दल अतिशय विस्तृतपणे त्यांनी लिहिलंय.मात्र कुठेही भावनिकरीत्या नं गुंतता किंवा कुठल्याही एका धर्माची कड नं घेता अगदी तटस्थ भूमिकेतून त्यांनी हे सारं मांडलंय. ते सगळं वाचून आपल्या पोटात मात्र कालवाकालव होते.
गुन्हेगारी विश्वाचं,गुन्हेगारांचं, टपोरी पोरांचं-underworld चं,तसंच बारबालांच संपूर्ण आयुष्य कसं जातं ह्या परस्पर-पूरक विश्वात काय नी कशा घडामोडी होतात,त्याबाबत त्या विश्वात वावरून,खोलात जाऊन माहिती मिळवत त्यांनी इत्यंभूत गोष्टी कथन केल्या आहेत.
लोकांना नोकऱ्या नाहीत,काम नाही.दिवसभर करण्यासारखे काहीही नाही. बाहेर प्रत्येक गोष्ट महाग,त्यामुळे ती मुले गुन्हेगारीकडे कशी वळतात,त्यांची व्यसनं ,त्यांची मानसिकता,त्यांचे गुन्हे झोपडपट्टीत दादागिरी करणारे लोक आजूबाजूच्या अनेक स्त्रियांचे देह स्वत:ची मालमत्ता असल्यागत उपभोगतात,ह्याबद्दल मेहतांनी कमलपत्रावर पडलेल्या पाण्याच्या थेंबाच्या अलिप्तपणानं जे लिहिलंय ते आपल्या बाळबोध सुसंस्कारित मनाला निश्चितच हादरा देतं.underworld ची टपोरी भाषा नी त्यातली 'शब्दसंपदा'ही मेहता यांनी पुस्तकात त्या अनुषंगाने दिलीय.
ही gangster अथवा गुंड मुले झोपडपट्टीत अथवा चाळींत राहणारी.त्यांचा स्वतंत्र ब्लॉक मुंबईच्या उपनगरांमध्ये असला,तरी त्यांना झोपडी वा चाळ सोडून जाण्याची कल्पनाही करवत नाही."आमच्या मुलांना घरचे जेवण आवडले नाही,तर शेजाऱ्यांकडे हक्काने जावून ती जेवतात.flats मध्ये वा श्रीमंतांच्या वस्तीत तसे नाही. रात्री वेळी अवेळी तुम्ही शेजाऱ्यांच्या दारावर थाप मारून मदतीची याचना करू शकत नाही,जेवू शकत नाही.आमच्याकडे चर्चा होते कुठली सासू कुठल्या सुनेवर पाच जणांसाठी सहा जणांना पुरेल एवढे अन्न शिजवल्यावर करवादली ह्याबद्दल.मोठ्यांच्या श्रीमंत वस्त्यांत एअरकंडीशनरबद्दल चर्चा होते."असं एका गुंड मुलानं त्यांना सांगितलं.त्याला मेहतांच्या flat मध्ये -टॉयलेट मध्ये बादलीनं पाणी ओतावं लागत नाही,flush कसा काम करतो याचं नवल वाटतं. त्या एवढ्या मोठ्या जागेत ते एकटेच राहतात,झोपतात याचं नवल वाटतं.आपण एकटे राहू शकत नाही,अंधाराची भीती वाटते अशी कबुली तो गुंड मेहतांना देतो.

बाळासाहेब ठाकरे ह्यांच्याशी झालेली interaction आणि मुलाखत , शिवसेना ह्याबद्दल विस्तृतपणे मेहतांनी त्यात लिहिलंय.संजय दत्तनी काय प्रताप केले होते,त्याबद्दल त्यांनी लिहिलंय. बॉम्बस्फोटाच्या तपासणी दरम्यानचा मुंबई पोलिसांच्या कामाचा संपूर्ण लेखाजोखा मेहतांनी त्यात मांडलाय.Gangsters आणि gangwars बद्दल त्यांनी इत्यंभूत माहिती दिलीय."Organized crime in the city of Bombay is controlled by two exiles-NRIs.One is in Karachi and one in Malaysia."मेहता लिहितात.पोलिसी खाक्या नी पोलिसी छळाच्या काही काही गोष्टी वाचून अंगारे शहारे येत असले,तरी ती वस्तुस्थिती मेहतांनी अगदी सहजपणे लिहिलीय."Number two after scotland yard ह्या प्रकरणात त्यांनी एका चांगल्या,कडक शिस्तीच्या आणि प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याबद्दल भरभरून लिहिलंय.त्या प्रामाणिक अधिकाऱ्याचं जे स्वप्न आहे,ते मेहता सांगतात." it is not about arresting Dawood Ibrahim ,or accepting a medal,or setting his troops on fire with an inspiring speech."I would go to police headquarters and stand in front of it and abuse all my corrupt seniors,reveal everything.Then I will pee in their direction and turn around and leave the force.'तो अधिकारी मेहतांना म्हणतो.त्या पोलीस अधिकाऱ्याचे वडील फिल्म प्रोड्युसर होते. एका भल्या मोठ्या सुपरस्टारनं नी आणखी एका स्टारनं ठरल्या दिवशी शूटींगला नं येऊन ,परिणामी त्याच्या वडिलांना आर्थिक नुकसान करून अपरिमित छळलं.तेव्हाच त्यानं ठरवलं की आपण पोलीस अधिकारी व्हायचं.
मुंबईतल्या १२ मार्च १९९३ च्या बॉम्बस्फोटांबद्दल आणि त्याहूनही त्याच्या इन्व्हेस्टीगेशनबद्दल मेहतांनी अतिशय चांगली माहिती दिली आहे.त्या प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यानं स्फोटांशी संबंधित अटक झालेल्यांपैकी १६८ लोकांपैकी १६० लोकांना स्वत: अटक केली होती,स्वत: सर्वाची जबानी घेतली होती. one man who can fix Bombay's current crime problem अशी वर्तमानपत्रांनी त्यांची तारीफ केली होती.
"The judicial system is so tilted in favour of the accused that he is not at all afraid.It is very frustrating for the police.Someone is arrested in a murder case,the case comes up in four years,the witness is threatened and turns hostile.and you know the man is going back to kill again.He is operating with absolute impunity and the courts are giving him bail." पोलीस अधिकाऱ्याच्या मते हे असे मारेकरी केवळ encounters ला घाबरतात.
Encounters चं वर्णन ही सुकेतू मेहतांनी केलं आहे.
ह्या पोलीस अधिकाऱ्याची बदली हेतुत;रेल्वेत केली गेली.तिथे त्यांनी रेल्वेत होणाऱ्या चोऱ्यांचा एक ठराविक pattern असल्याचं शोधून काढलं.लांब पल्ल्यांच्या गाड्यांत ह्या चोऱ्या अथवा दरोडे प्रामुख्यानं सांताक्रूझ आणि खार स्थानकांच्या दरम्यान घडत होत्या.इथे लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल ट्रेन्स समांतर धावत असल्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांत चोऱ्या करून चोर लोकल ट्रेन्स मध्ये चढत .त्यामागच्या टोळीलाही त्या अधिकाऱ्यानं पकडलं.
धारावीतल्या प्राण्यांच्या कत्तलींबद्दल तर शाकाहारी सुकेतू मेहतांनी जे वर्णन केलंय ते वाचून पोटात नुसतं ढवळायला लागतं नी जेवायची सुद्धा इच्छा होत नाही,इतकं सगळं किळसवाणं आहे.

वडा-पाव वाल्या ह्या शहराला डान्सबार आणि बारबालांचाही नाद आहे.सुकेतू मेहतांनी त्याबद्दल विस्तृतपणे लिहिलंय. मोनालिसा ही अशीच एक प्रसिद्ध बारबाला आहे.पैशांच्या राशीत लोळणाऱ्या तिच्यामागच्या दु:खांची लडीही मेहतांनी अलगद उलगडून दाखवली आहे.बारबालांच्या सुंदर शरीरामागे त्यांनी स्वत:ला दिलेले पेटत्या सिगरेटचे चटके,मनगटावरच्या शिरेला अनेकवार ब्लेडनं कापल्यामुळे झालेल्या अनेक जखमा,आत्महत्येचे त्यांनी केलेले आणि फसलेले कैक प्रयत्न कुणालाच दिसत नाहीत.त्यातून होणारं त्यांच्या वेदनेचं दर्शन त्यांनी हळुवारपणे वाचकांना घडवलंय.

थोडक्यात, मुंबापुरी नावाच्या मायापुरीतलं चांगल्या वाईटाचं प्रांजळ चित्रण सुकेतू मेहतांनी फार आंतरिक तळमळीनं केलंय.मुंबईवरचं कदाचित ते एकमेव इतकं सुंदर पुस्तक असेल.

No comments: