लाईफ ऑफ पाय- ह्याला जीवन ऐसे नाव!
"लाईफ ऑफ पाय" ह्या यान मार्टेल ह्याने लिहिलेल्या कादंबरीला २००२ सालचा 'man booker' पुरस्कार मिळाला. यान मार्टेल ह्या लेखकाचा जन्म स्पेन मध्ये १९६३ मध्ये झाला. आईवडील diplomat होते,त्यामुळे कोस्टा-रिका,फ्रांस,मेक्सिको,अलास्का,कॅनडा ह्या ठिकाणी लहानपणी नी पुढे इराण,टर्की आणि भारत ह्या देशांमध्ये त्यांचं वास्तव्य राहिलं.
कादंबरी लेखनाचा किडा लेखकाच्या डोक्यात वळवळत होताच.मनात बेचैनी होती आणि जवळ कमी पैसे होते. त्यामुळे मनाला शांती भारतातच लाभेल आणि तिथे कमी पैशातही व्यवस्थित भागेल,हे ठाऊक असल्यानं त्यानं माथेरान आणि नंतर पॉन्डेचेरी गाठलं. कॅनडाप्रमाणे तिथेही फ्रेंच राजवटीच्या खुणा आहेत,फ्रेंच बोलली जाते.इंडियन कॉफी हाउस मध्ये लेखक बसला असताना त्याच्यासमोर बसलेल्या व्यक्तीशी लेखकाची ओळख झाली.
" कोणे एके काळी ह्या अमुक ठिकाणी मोठ प्राणीसंग्रहालय होतं.मी तुला जी कहाणी सांगतोय,त्यानं तुझा देवावर विश्वास बसेल.तिची सुरुवात इथेच ह्या पॉन्डेचेरीत झाली. तिचा शेवट,तू ज्या देशातून आला आहेस,तिथे झाली," फ्रान्सिस आदिरुबासामी नावाच्या त्या व्यक्तीनं लेखकाला सांगितलं ,"मी त्याला चांगला ओळखतो.तो मुलगा आता मोठा झालाय. तुला जे विचारायचय, ते तू त्याला कॅनडात गेल्यावर विचारू शकतोस."
कॅनडात परत गेल्यावर टेलिफोन डिरेक्टरीतून असंख्य पटेल नामक व्यक्तींतून लेखकानं Piscine Molitor Patel ला शोधून काढलं. "ती तर बरीच जुनी गोष्ट आहे."त्यानं म्हटलं...
त्याची ती कहाणी ऐकल्यावर फ्रान्सिस आदिरुबासामीनं लेखकाला म्हटल्याप्रमाणे त्याचा देवावर ठाम विश्वास बसला.
Piscine Molitor Patel -पिसीन मॉलीतॉर पटेल- पाय पटेल ह्या व्यक्तीची ही कहाणी लेखकानं त्याच्या तोंडून, प्रथमपुरुषी एकवचनात सांगितली आहे.
फ्रान्सिस आदिरुबासामी पिसीन मॉलीतॉर पटेलच्या वडिलांचे परिचित होते.तो त्यांना मामाजी म्हणत असे. ते दोन वर्ष पॅरीसला शिकायला होते.पण आयफेल टोवरपेक्षा तिथल्या स्विमिंग पूलवर ते तासन तास बोलत. फ्रान्सिस आदिरुबासामी पट्टीचे पोहोणारे होते. पोह्ण्याबद्दल त्यांना विलक्षण असोशी असल्यामुळे त्यांनी आपल्या मित्राच्या मुलाचं नाव फ्रान्समधल्या प्रख्यात "पिसीन मॉलीतॉर" ह्या स्विमिंग पूलच्या नावावरून ठेवलं. फ्रान्सिस आदिरुबासामी ह्यांनी आपल्या मित्राला नी त्याच्या कुटुंबियांना म्हणजे पिसीन मॉलीतॉर पटेलच्या आई-वडिलांना नी भाऊ रवी ह्याला पोहोणे शिकवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र तिघांपैकी कोणालाही त्यात रस नसल्यानं तिघांनाही पोहोणे आले नाही ते नाहीच.पिसीन मॉलीतॉर पटेल मात्र त्यांच्या उलट निघाला. फ्रान्सिस आदिरुबासामी ह्यांनी त्याच्यासाठी पोहोणे शिकण्याचे वय निश्चित केले होते, त्याप्रमाणे तो सात वर्षांचा होताच त्यांनी त्याला पोहोणे शिकवण्यास सुरुवात केली.तेराव्या वर्षी, वाढदिवसाची भेट म्हणून त्यानं स्विमिंग पूलच्या दोन फेऱ्या मारल्या.त्यातच त्याची पुरती दमछाक झाली.त्यामुळे फ्रान्सिस आदिरुबासामी मामाजी एका वेळी स्विमिंग पूलच्या तीस चकरा मारतात ह्याचं त्याला कौतुक होतं.
नांवात काय आहे हा प्रश्न शेक्सपियरनं भलेही विचारला असेल.मात्र नावात काय नसतं; ह्याचा साक्षात्कार पिसीन मॉलीतॉर पटेलला लहान वयात झाला.शाळेत मुले त्याला त्याच्या नावावरून चिडवत . Piscine पिसीन म्हणजे (मीन -मासा)पिसीन पटेलच्याऐवजी त्याला Pissing ( पिसिंग म्हणजे शू करत असलेला) Patel-पिसिंग पटेल म्हणून मुले चिडवत.(पुढे कॅनडा मध्ये Piscine पिसीन म्हणजे पी.सिंग सरदारजी असावा असाही लोकांचा ग्रह होई.)हजेरीच्या वेळी शिक्षकही हसत.तेव्हा मग एके दिवशी त्यानं सरळ उठून " माझे नाव Piscine Molitor Patel पिसीन मॉलीतॉर पटेल आहे .आजपासून मी Pi Patel -पाय(π ) पटेल म्हणून ओळखला जाईन-भूमितीतला π ! π =3 .14 "असे फळ्यावर ठळक लिहिले. पुढे दुसऱ्या शिक्षकांनी हजेरी घेण्याचा प्रसंग आला की तो तेच करी. फळ्यावर तो लिहू लागला की वर्गातली मुलेही घोकू लागत- थ्री ! पॉईंट ! वन ! फोर ! अशा ह्या Pi Patel ची ही अतर्क्य कहाणी-लाईफ ऑफ पाय !
पिसीन मॉलीतॉर पटेलचे वडील - संतोष पटेल ह्यांचे पॉन्डेचेरीला प्राणीसंग्रहालय होते.१ नोव्हेंबर १९५४ रोजी पॉन्डेचेरी भारतात विलीन झालं,तसा हा झू पण भारतात आला.पाय पटेलला आणि त्याच्या भावाला-रवीला ते प्राणीसंग्रहालयात,प्राणीसंग्रहालय लोकांसाठी खुलं व्हायच्या वेळेआधी नेहमी घेऊन जातात.तिथे पायचे जीवशास्त्राचे शिक्षक कुमार हेसुद्धा नेहमी जातात.त्यांच्याबद्दल 'पाय'ला खूप आदर आहे.(किंबहुना पुढे कॅनडामध्ये गेल्यावर युनिव्हर्सिटी ऑफ टोरांटोमध्ये पदवीसाठी जीवशास्त्र विषय घेण्यामागची प्रेरणा त्यांच्याबद्दलच्या आदरभावनेतूनच मिळाली. जीवशास्त्र विषयात त्याने अनेक सुवर्णपदकेही प्राप्त केलीत )कुमार नास्तिक आहेत.
प्राणीसंग्रहालयातल्या प्रचंड मोठ्या जागेत पायचं लहानपण गेलं. एखाद्या राजपुत्राला बागडायला जशी विस्तीर्ण जागा मिळत असेल,तशी विस्तीर्ण जागा पायला बागडायला मिळाली. झोपेतून जागे होण्यासाठी त्यांना वेगळ्या गजराच्या घड्याळाची कधी गरजच भासली नाही.पहाटे पाच-साडेपाचला तिथले सिंह गर्जना करू लागत.नाश्त्याची वेळ दररोज माकडांच्या ओरडण्याने, मैनांच्या आणि काकाकुवांच्या किलबिलाटाने आपोआप कळायची.पाय शाळेत जायला निघायचा, तेव्हा तो नजरेआड होईतो त्याची आईच केवळ बघायची नाही;तर ओरांग- उटान,रानगवे, ओटर, ह्यांच्या नजराही त्याला साथसंगत करीत.
पिसीन मॉलीतॉर पटेलचे वडील - संतोष पटेल ह्यांच्या मालकीचं प्राणीसंग्रहालय होतंच ; पण
त्याहीपेक्षा प्राण्यांची देखभाल करण्याची आवड त्यांच्यात उपजतच होती. कुठल्याही प्राण्याकडे बघून त्याच्या मनात काय आहे,हे त्यांना कळत असे. प्राणीसंग्रहालयातल्या माणसांच्या वावराची तिथल्या प्राण्यांना सवय करवणे हे शास्त्र आणि कला दोन्ही आहे. माणसांच्या अवतीभोवती वावरण्याला जंगली प्राणी रुळले तर आणि तरच त्यांचं तिथलं वास्तव्य सुकर होतं नी त्या प्राण्याची वाढ निकोप होते.त्याचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम रहातं. तो नीट खातो-पितो.सर्वात महत्वाचं म्हणजे प्रजोत्पादन करतो.
प्रत्येक प्राण्याची त्याच्या राहण्याच्या ठिकाणाची त्यानं एक सीमारेखा आखून घेतलेली असते.त्या सीमारेखेच्या आत त्या प्राण्याला सुरक्षित वाटतं.सीमारेषेच्या बाहेर कुणी असलं तरी मग "आपल्याला ह्याच्यापासून धोका आहे,"असं त्या प्राण्याला वाटत नाही.मात्र त्या सीमारेषेच्या किंचितही आत कुणी प्रवेश केला,तर त्या प्राण्याला खूप असुरक्षित वाटू शकतं.कुणी एखादा माणूस चुकून सिंहाच्या पिंजऱ्यात गेला,तर सिंह भुकेला आहे,म्हणून त्याचे लचके तोडणार नाही;तर तो त्याच्या हद्दीत घुसल्याने सिंहाला प्रचंड असुरक्षित वाटून तो त्याच्यावर हल्ला करेल. प्रत्येक प्राणी त्याची सुरक्षेची हद्द निश्चित करतो.
प्रत्येकाची आखीव हद्द-टेरिटरी ह्या प्राण्यांच्या संकल्पनेचा उपयोग सर्कशीतला रिंगमास्तर करतो. रिंगमास्तर जेव्हा वाघ-सिंहांचे खेळ करतो,तेव्हा रिंग ही त्याची हद्द आहे, त्यांची नव्हे,असे, जोरात ओरडून,कडाडणाऱ्या चाबकाच्या आवाजांनी,फटकाऱ्यानी त्यांच्या मनावर बिम्बवतो.रिंगमास्तर वाघ-सिंहापेक्षा बलवान -" सुपर अल्फा नर" असल्याचं त्यांच्या मनावर कोरतो,तेव्हा ते निमुटपणे शेपूट आत वळवून उडी मारतात. रिंगमास्तरचं मुकाट्यानं ऐकणारा सिंह हा सिंहांच्या कळपातला त्यांच्यात सर्वात उपेक्षित असलेला नर (ओमेगा नर )असतो,त्यामुळे रिंगमास्तर कळपातल्या इतर बलवान सिंहां पासून त्याचं रक्षण करेल,अशी सुरक्षितता त्याला वाटते.
लोकांना वाटतं की जंगलात असलेले प्राणी मुक्त असतात,मुक्त जीवन जगतात,नी पिंजऱ्यात असलेले प्राणी बंधनात असतात.वस्तुत:तसं नसतं."Animals in the wild are,in practice,free neither in space nor in time,nor in their personal relations." Piscine Molitor Patel पटेल -पाय( π ) पटेल सांगतो.
"समजा तुम्ही एखाद्या घरात शिरलात आणि तिथल्या लोकांना तुम्ही म्हटलं की आजपासून तुम्ही मुक्त आहात.पक्ष्यासारखा मुक्त संचार करायचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे,तर तुम्हाला काय वाटतं,की ते लोक आनंदानं नाचू-गाऊ लागतील? छे!ते म्हणतील,हे आमचं घर आहे.आम्ही इथेच सुखी आहोत!तसंच प्राण्या-पक्ष्यांचं आहे. त्यांना वर्षानुवर्षे त्यांच्या राहण्याच्या ठिकाणात काडीचाही बदल झालेला खपत नाही.ते जिथे राहताहेत,तिथे त्यांना यत्किंचितही वेगळ आढळलं,तर ते कमालीचे गांगरतात. आपल्याला ह्यापासून धोका आहे,असं त्यांना वाटल्यानं ते चित्र-विचित्र वागू लागतात, हल्ला करतात. प्राणीसंग्रहालयातल्या प्राण्याच्या पिंजऱ्यात समजा एखाद्या शिडीची सावली पडत असेल,पाण्याचं डबकं साचलं असेल,तर त्यांनीही तिथे राहणारा प्राणी गांगरून जातो. त्यामुळे पिंजरयातला करकोचा त्याच्या नेहेमीच्या विशिष्ट स्थानी उभा नसेल,तर निश्चितच पिंजऱ्यात काही क्षुल्लक का असेना ,वेगळ आहे,हे झूकीपरच्या लक्षात यायला हवं. An animal inhabits its space ,whether in the zoo or in the wild ,in the same way chess pieces move about the chessboard-significantly!"पाय पटेल सांगतो.
त्यांच्या प्राणीसंग्रहालयात, तिकीटविक्रीच्या खिडकीशेजारी वडिलांनी ठळक लाल अक्षरांत लिहिलं होतं- तुम्हाला माहीत आहे का,प्राणीसंग्रहालयातला सर्वात धोकादायक प्राणी कुठला आहे?बाजूला दिशादर्शक बाण काढला होता.तिथे पडद्याच्या पाठीमागे मोठा आरसा ठेवलेला होता.
मनुष्यप्राणी हाच इतर प्राण्यांसाठी सर्वात धोकादायक प्राणी आहे.अनेक प्राणीसंग्रहालयात, तिथे भेट देणाऱ्या माणसांनी पिंजरयातल्या प्राण्यांना भयंकर त्रास देऊन ,त्यांना काहीबाही खायला घालून,हाल हाल करून मारलं आहे, अथवा भेट देणारी माणसे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांच्या मृत्यू होण्याचं कारण ठरली आहेत."
पिसीन मॉलीतॉर पटेलचे वडील -संतोष पटेल दोन्ही मुलांना प्राणीसंग्रहालयात घेऊन जात नी एकेका जनावराचा जवळून परिचय करून देत.आपली पत्नी गीता नी रवी नी पिसीन ह्या दोन्ही मुलांना त्यांनी एकदा प्राणीसंग्रहालयात नेलं , महिष ह्या रॉयल बंगाल जातीचा वाघ किती भयंकर असतो नी मुलांनी त्याच्या पिंजऱ्याच्या जवळ जाणही किती धोकादायक असतं त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं.प्राणीसंग्रहालयातल्या प्राण्यांना एक दिवस अन्न दिलं जात नसे. जंगलातल्या उद्भवणाऱ्या परिस्थितीसदृश त्यांना एक दिवस उपाशी ठेवण्यात येई. महिष ह्या वाघाला मुद्दामहून तीन दिवसाचा उपास घडवण्यात आला होता.त्यामुळे भुकेलेला तो वाघ आपल्या पिंजऱ्याची साफसफाई व देखभाल करणाऱ्या माणसावर झडप घालायच्या पावित्र्यात होता.तेव्हा त्याच्यासाठी एक कोकरू बाजूच्या पिंजऱ्यात सोडण्यात आलं.जीवाच्या आकांतानं ते कोकरू ओरडू लागलं, उंचउंच उद्या मारू लागलं.वाघाला त्या पिंजऱ्यात सोडण्यात आलं,तेव्हा ज्या पद्धतीनं वाघानं त्या कोकराचा फडशा पाडला,ते दृश्य त्या तिघांना बघवेना.ते दृश्य पिसीनच्या मनावर कायम कोरलं गेलं.
यान मार्टेल ह्यांनी हा सारा तपशील इतक्या सहजसोप्या भाषेत आणि विलक्षण परिणामकारकरीत्या दिला आहे की वाचकाला हे सारं डोळ्यासमोर प्रत्यक्ष घडतांना दिसू लागतं.
पिसीन मॉलीतॉर पटेल जन्मानं हिंदू होताच,पण लहानपणी चर्चच्या नी मशिदीच्या इमारतीच्या आकर्षणामुळे तो देवळाबरोबरच चर्च नी मशिदीथी जाई.तिथले धर्मगुरू त्याला त्या-त्या धर्माबद्दलची माहिती त्याच्या बालबुद्धीला समजेल,अशा रीतीने सांगत.त्यामुळे पॉन्डीचेरीमधल्या तिन्ही धर्मगुरूंना तो आपल्या धर्माचा आहे,असे वाटे.
आणीबाणीनंतर पिसीनच्या वडिलांनी सहकुटुंब कॅनडा मध्ये स्थायिक होण्याचं ठरवलं.
प्राणीसंग्रहालयातल्या प्राण्यांना त्यांनी जगातल्या इतर प्राणीसंग्रहालयात धाडायचं
ठरवलं. इतर ठिकाणच्या प्राणीसंग्रहालयात प्राण्यांना पाठवायला त्यांना इथल्या सरकारी यंत्रणांना तोंड द्यावं लागलं.इवल्याश्या सशाला पाठवायचं तर हत्ती एव्हढे कागद लागतील,एव्हढा पत्रव्यवहार करावा लागला.
अखेर त्या साऱ्या सव्यापसव्यानंतर कार्गो जहाजनं त्यांची पाठवणी केली गेली. त्या जहाजात पिसीनचे आईवडील ,त्याचा भाऊ रवी नी तो स्वत:असे सर्व चढले.प्राण्यांना ही पिंजऱ्यात ठेवून जहाजात चढवण्यात आलं.
Tsimtsum सिमसुम नावाचं ते जहाज रुद्रभीषण आवाज करीत खवळलेल्या समुद्रात, प्रशांत महासागरात कलंडलं. पिसीनचे आईवडील,त्याचा भाऊ रवी आणि प्राणीसंग्रहालयातले बहुतेक सर्व प्राणी ह्यांना जलसमाधी मिळाली.एकटा पिसीन,त्याला जहाजातल्या कर्मचाऱ्यांनी लाइफबोटवर फेकल्यामुळे कसाबसा वाचला.सोळा वर्षाच्या त्या पोरासाठी हे सारं अतर्क्य होतं.पण त्याहीपेक्षा त्याच्यापुढे जे वाढून ठेवलं होतं, ते महाभयंकर होतं.त्या लाइफबोटीत hyena -तरस,झेब्रा,ओरांगउटान तर होतेच,पण पिसीनच्या प्राणीसंग्रहालयातला रॉयल बंगाल जातीचा वाघ,ज्याचं नाव कारकुनाच्या चुकीमुळे त्याला ज्यानं वाचवून आणलं, त्याचंच नाव दिल्या गेलं होतं-तो रिचर्ड पार्कर समुद्रात गटांगळ्या खात होता.वाघ हा उत्तम पोहोणारा असला,तरी समुद्रात पोहोताना त्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत होती.त्या वाघाला बोटीत घेतलं,तर काय
होईल,ह्या कल्पनेनंच पिसीनचं रक्त गोठलं,समुद्रात बुडून मरायचं की वाघाच्या तोंडी,ह्या विकल्पाला त्यानं त्या क्षणी उत्तर शोधलं आणि वाघाला बोटीत आसरा मिळाला.
प्रत्येक क्षणी जीवाची भीती होती.तरसानं प्रथम हालहाल करून झेब्र्याला खाल्लं,नंतर ओरांगउटानला.त्या तरसाला वाघानं खाल्लं.सरतेशेवटी लाइफबोटीत पिसीन आणि वाघ असे दोघेच उरले. लाइफबोटीत पिसिनला अन्न - पाण्याचा साठा मिळाला.त्यानं तो पुरवून पुरवून वापरला.अर्थात तो पुरेसा नव्हताच.तेव्हा मग रपरप पडणारया पावसाचं पाणी त्यानं डोकं वापरून साठवायला सुरुवात केली.बोटीत ,समुद्राच्या खाऱ्या पाण्याला गोड,पिण्याच पाणी बनवण्यासाठी उपकरणं होती,त्यापासून त्यानं बरंचसं पेयजल साठवलं, शिवाय त्यानं जिवंत राहायचं,तर त्याला रिचर्ड पार्करला जिवंत ठेवण भाग होतं. त्याच्या अन्नाची सोय करायला त्यानं गळाला आमिष लावून,गळ टाकून मोठाले मासे पकडले आणि वाघाच्या अन्नाची तजवीज केली.
बोटीवर जी बिस्कीट होती ती अन्न म्हणून पिसीनसाठी अत्यंत अपुरी होती.त्यामुळे जगायचं,तर उपास घडून चालणार नव्हतं.बघता बघता, इडली-डोसा-वडा-सांबार असं केवळ शाकाहारी अन्न खाणारा पिसीन कच्चे मासे खाऊ लागला.
लेखक यान मार्टेल ह्यानं त्याच्या ह्या जगण्याच्या धडपडीचं वर्णन इतकं काही परिणामकारक केलं आहे,की वाचक श्वास रोखून वाचत राहतो.पुढे काय घडणार ह्याचं औत्सुक्य क्षणोक्षणी वाढत जातं. मात्र हे सगळ वाचताना अपरिहार्यपणे "अर्नेस्ट हेमिंग्वे"ह्यांच्या नोबल पुरस्कार प्राप्त "Old Man and the Sea "या पुस्तकाची सतत आठवण होवू लागते.पिसीनच्या जागी सान्तियागो दिसू लागतो.
"जीवो जीवस्य जीवनम"हे खरे असले,तरी त्यातला बराचसा भाग किळसवाणा आहे. आपल्यासारख्या विशुद्ध शाकाहारी लोकांनी जेवल्यानंतर हे पुस्तक नं वाचलेलं बरं.पोटात प्रचंड ढवळू लागतं आणि वमन होण्याचा धोका संभवतो.
जीव मुठीत धरून पिसीन वावरत होता.कारण लाइफबोटीत त्याला राहायला,वावरायला फार कमी जागा होती.रिचर्ड पार्करनं बाकीची जागा व्यापली होती.त्या भीतीच्या सावटाखाली एकेक क्षण पिसीन कसं काढत होता,त्याचं त्यालाच ठाऊक! तरीही केवळ रिचर्ड पार्कर असल्यामुळे आपल्याला जगण्याची उर्मी वाटते,असं प्रत्येक क्षणी पिसीनला वाटत राहिलं. तो नसता, तर जगण्यात काडीचा अर्थ उरला नसता,असं त्याला वाटे.
अखेर पिसीननं रिंगमास्तरच्या भूमिकेत शिरायचं ठरवलं.वाघ ज्या पद्धतीनं स्वत:ची हद्द आखतो,त्याच पद्धतीनं पिसीननं स्वत:ची हद्द आखली.आपण वाघापेक्षाही "सुपर अल्फा नर" असल्याचं त्याच्या मनावर बिंबवलं.त्यानंतर तो आत्मविश्वासानं त्याच्या स्वत:च्या हद्दीत निर्भयपणे वावरू लागला.
आजूबाजूला केवळ खारं पाणी. जिथे नजर जाईल,तिथे केवळ पाणी!
ते अथांग पाणी कधी शांत तर कधी अपार खवळलेलं.आजूबाजूला भयानक शार्क मासे कुठल्याही क्षणी लाइफबोटीतल्या त्या दोन्ही जीवांचा घास घेतील,अशी शक्यता.होती. कुठल्याही क्षणी मृत्यू झडप घालेल असं वातावरण होतं.अशाच एका क्षणी एका शार्क माशाला अन्न म्हणून पकडून वाघाच्या हद्दीत फेकलं.वाघानं त्याला पंजानं पकडायला जाताच शार्कनं वाघाचा पुढच्या पायाचा पंजा आपल्या जबड्यात धरून जबडा मिटून घेतला .असह्य वेदना होऊ लागताच वाघानं नं भूतो नं भविष्यति अशी जबरदस्त गर्जना केली.त्यानं पिसीन अक्षरश:गर्भगळीत झाला.समुद्रात कितीतरी दूरवर, वाघानं केलेली ती घनघोर गर्जना पोहोचली नी पाणी थरारलं.बऱ्याच झटापटीनंतर वाघानं शार्कचं पोट फाडल्यावर त्यानं आवळलेला जबडा सैल केला,नी त्याच्या तडाख्यातून रिचर्ड पार्करनं आपला जखमी पंजा मोकळा केला.
खवळलेल्या समुद्रानं तर एकदा बोट जवळ-जवळ उलटली.आपल्या दोघांनाही आता जलसमाधी मिळणार ह्याची पिसिनला खात्री पटली.आकाशातून प्रचंड मोठा विजेचा लोळ आला आणि बाजूच्या पाण्यात शिरला.त्यात पिसिनला जणू समुद्राचा तळ स्वचछ दिसला.जणू आकाशातल्या प्रचंड मोठ्या खिडकीची काच खळकन फुटली आणि प्रचंड वेगानं शेजारच्या पाण्यात येऊन आदळली असल्यागत ,कान फुटण्याइतका आवाज झाला.
पिसीनचे कपडे खाऱ्या पाण्यानं विरले.तो नग्नावस्थेत वावरू लागला.सूर्याच्या उष्णतेनं त्याची त्वचा अक्षरश:भाजून निघाली.खायला अन्न उरलं नाही,नी अन्न मिळवण्याइतकी शक्तीही त्याच्या अंगात उरली नाही.वाघ ही रोडावला.त्या दोघांनाही अंधत्व आलं.
२ जुलै १९७७ ला त्याच्या ह्या प्रवासाला सुरुवात झाली होती,तो तब्बल २२७ दिवस असा समुद्रात भरकटला होता.ह्या सगळ्या दिव्यातून जात १४ फेब्रुवारी १९७८ ला त्याचा हा जीवघेणा प्रवास संपला.
पाहिलेपासून हे सारं,नी पुढे काय नी कसं घडलं,हे यान मार्टेल लिखित 'लाईफ ऑफ पाय ' ह्या पुस्तकातून वाचताना वाचकाच्या जीवाचा थरकाप उडतो.मात्र लेखकानं केलेला शेवट मनाचा ठाव घेत नाही.तरीही,पुस्तक संपल्यावर वाचकाच्या मनात एकाच विचार उमटतो-
"ह्याला जीवन ऐसे नाव!"
No comments:
Post a Comment