Monday, April 16, 2012

आनंदयात्रा

आनंदयात्रा
- रश्मी घटवाई

घरातलं लहानगं बाळ पालथं पडण्याच्या टप्प्यापासून पुढचे टप्पे पार करू लागलं,की त्याला चालता येईपर्यंत घरच्यांनाच त्याच्या चालण्याची कोण घाई झालेली असते.बाळ ज्या क्षणी पहिलं पाऊल टाकतं,त्या क्षणापासून सुरू झालेली ही "चाली चाली" खरं तर आयुष्यभर एक आनंदयात्रा ठरू शकते,मात्र त्यासाठी ते त्या आनंदयात्रीनं मनावर तेवढ घ्यायला हवं!चालण्यासारखा व्यायाम नाही!त्याहूनही महत्वाचं म्हणजे चालण्यातल्यासारखा आनंद नाही. पायबीय मुरगळला म्हणजे चालण्यात काय आणि किती आनंद दडलेला आहे,हे उमगतं.व्यायाम म्हणून चालणं असू दे,स्वत:शी संवाद साधत,निसर्गाच्या सान्निध्यात हिरवाईत मनाला रुंजी घालू देत,भोवतालच्या प्रसन्नतेचे तुषार अंगावर झेलत, रमत गमत चालणं असू दे- ते शरीराला नी मनाला एकदम फिट- तंदुरुस्त राखणारच!
नॉएडा खरे तर हिरवाईचे शहर! हिरव्या रंगछटेनं थकलेले डोळेही निवावेत आणि नाना प्रकारच्या पक्ष्यांच्या मधुर सुरावटीनी कान तृप्त व्हावेत.सकाळचे नॉएडा स्टेडियम मधले दृश्य अगदी अनुपम.सगळे जण खेळण्यात नाहीतर व्यायाम करण्यात व्यग्र! एकीकडे भान हरपून फूटबाल खेळणारे,रंगीबेरंगी कपडयातले तरूण, दुसरीकडे मार्शल आर्ट- तायक्वांडो,कराटे नाहीतर जुडो शिकणारी मुले ,तिसरीकडे ध्यानस्थ ज्येष्ठ नागरिक.धावणारयानमध्ये तर वयाचं जणू परिमाणच नसावं,अशी तल्लीनता! तिथे चालतांना दुतरफा आपल्यावर हिरव्या चवरया ढाळणारी घनदाट राई. चालणारयानं एखाद्या सम्राटासारखं-सम्राज्ञीसारखं तिथे चालावं!मी त्या भारलेल्या वातावरणात रोज सकाळी पाच आणि सवड असेल तेव्हा सातेक किलोमीटर चालते,तेव्हा मला तर स्वर्गसुख लाभतं.त्यातही एक गम्मत आहे-मन एकाग्र करून आपल्याच शरीराला चालताना विचारात राहायचं,की चालताना आत्ता नेमक्या कुठल्या भागाला सर्वाधिक आनंद होतोय-आपल्याला चक्क उत्तर मिळतं-पाऊल...पोटऱ्या...त्या त्या जागी मन एकाग्र केल्यावर तर आनंदविभोर तनामनाला विलक्षण अनुभूती होते.सर्वात शेवटी उत्तर येतं-सबंध शरीर...डोळे.. मन...आपलं संपूर्ण अस्तित्व!
ही आपली माझी पद्धत!पण त्याहीपेक्षा एक नितांतसुंदर आनंदयात्रा झेनगुरू
Thich Nhat Hanh "Walking Meditation" ह्या पुस्तकातून आपल्याला घडवतात.
Nguyễn Xuân Bảo हे त्यांचं जन्मनाव.वयाच्या सोळाव्या वर्षी ते त्यांच्या देशात व्हिएत्नाममधल्या झेन monastry मध्ये-बुद्धविहारात गेले.तेवीस वर्षे वयाचे असताना त्यांना धर्मगुरू उपाधी मिळाली,तेव्हा त्यांनी थिच न्हात हान- Thich Nhat Hanh हे धर्मनाव धारण केलं.शाक्यमुनी बुद्ध ह्या एका विवक्षित गुरूकुल शाखेतले गुरू,म्हणून थिच हे गुरूकुलनाम.पुढे उच्च शिक्षणासाठी नी नंतर प्राध्यापक म्हणून ते अमेरिकेत राहिले. व्हिएत्नाम युद्धाच्या वेळी क्षतिग्रस्त झालेल्या परिसराला नी बेघर-अनाथ झालेल्या लोकांना सावरण्यासाठी त्यांनी कार्य केलं, अमेरिकेनं व्हिएत्नाममधून माघाघ्यावी म्हणून थिच न्हात हान ह्यांनी मार्टीन ल्युथर किंग यांना व्हिएत्नामयुद्ध थांबवण्याची विनंती केली.मार्टीन ल्युथर किंग ह्यांनी जानेवारी १९६७ मध्ये नोबेल शांतता पुरस्कारासाठी त्यांची शिफारीस केली. व्हिएत्नाम सरकारनं मात्र त्यांना देशात येण्यास बंदी घातली,म्हणून त्यांनी फ्रान्स मध्ये अज्ञातवास पत्करला.तिथेच त्यांनी वास्तव्य केलं,बुद्धधर्माच्या प्रसारकार्याला वाहून घेतलं, अनेक कार्यशाळा आयोजित केल्या,शंभराच्यावर पुस्तकं लिहिली.काही चित्रपटातून,डॉक्युमेंटरींतून त्यांचं दर्शनही घडलं.चार दशकांहूनही अधिक काळ ते Walking Meditation ची दीक्षा लोकांना देताहेत नी आजवर हजारो लोकांनी Walking Meditation करण्याचे तंत्र त्यांच्याकडून अवगत केले आहे.
"जगात दू:ख आहे ही बुद्धाची पहिली शिकवण.दू:खाच्या अस्तित्वाची जाणीव झाली,की करूणा उपजते आणि करूणा उपजली की दू:खावर उतारा शोधण्याचा मार्ग सापडवण्याची प्रबळ इच्छा निर्माण होते.मी फ्रान्समध्ये आलो,त्याआधी अनेक व्हिएत्नामी निर्वासितांना अनन्वित अत्याचारांना बळी पडताना पाहिलं, त्यांच्यावर बलात्कार झाले,त्यांची संपत्ती लुटली गेली,त्यांना ठार केलं गेलं. त्याउलट पॅरीसमध्ये दुकानं अनेक जिनसांनी भरलेली होती. सगळ्या गोष्टींची रेलचेल होती.लोक आरामात कॉफी पीत होते.ते सारं स्वप्नवत होतं.एकीकडे इतकी सुबत्ता,दुसरीकडे इतक्या व्यथा-वेदना ही अशी दरी कशी?जगातल्या दू:खाची खोली,व्याप्ती जाणवल्यावर आयुष्य उथळपणे जगायचं नाही,असा मी निर्धार केला."ते पुस्तकात लिहितात.

Thich Nhat Hanh चालण्यालाच ध्यानाचं प्रतिरूप देतात आणि त्यातून आलेल्या अनुभूतीतून आपण एक आगळा आनंदसोहोळा साजरा करतो.
"Our walk is a peace walk. Our walk is a happiness walk.Then we learn that there is no peace walk;that peace is the walk; that there is no happiness walk; that happiness is the walk." ते सांगतात.
"To meditate is to learn how to stop being carried away by our regrets about the past,our anger or despair in the present or our worries about the future." Conscious Breathing-श्वासावर लक्ष केंद्रित करण्याबद्दल,अशा प्रकारे मनाची एकाग्रता कशी वाढवायची ह्याबद्दल ते विस्तृतपणे सांगतात.चालणे एन्जॉय करत मन एकाग्र करून सावकाश चालताना नक्की काय करायचे,ते सांगतात."When we walk in mindfulness,each step creates a fresh breeze of peace,joy and harmony."ते सांगतात,अनवाणी पावलांनी चालण्याबाबत मार्गदर्शन करतात. समुद्राचं पाणी आणि त्यावर उसळणाऱ्या लाटा यांच्याशी जीवन आणि मृत्यूची
सांगड घालून सांगतात-"On the ocean surface there are many waves-some high,some low,some beautiful and some less beautiful.All of them have a beginning and an end....from the point of view of the water,there is no beginning,no end,no up,no down, no birth,no death."
हे सगळं तत्वज्ञान अर्थातच भगवद्गीतेतलं आहे.ज्ञानेश्वरीतलं आहे.-
"हे उपजे आणि नाशे/ते मायावशे दिसे//
येऱ्ह्व्ही तत्वता वस्तु जे असे/ते अविनाशचि//(५)
जैसे पवने तोय हलविले/आणि तरंगाकार जाहले/तरी कवण के जन्मले/म्हणोये तेथ//(६)
तेंचि वायूचे स्फुरण ठेले/आणि उदक सपाट जाहले/तरी आता काय निमाले/विचारी पां//(७)( -ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा.)
उत्पत्ती किंवा नाश जे दिसतात,ते मायेच्या योगाने,एरव्ही खरोखर आत्मा अविनाशीच आहे.(५)पाणी हलून त्याजवर बुडबुडे दृष्टीस पडतात,तेव्हा त्या ठिकाणी पाण्याशिवाय काय उत्पन्न झाले म्हणावे?(६)वाऱ्याचे वाहणे नाहीसे झाल्यावर पाणी स्थिर झाले असता त्या ठिकाणी पाण्याशिवाय काय लयास गेले याचा विचार कर.(७)
आसपासच्या छोट्या छोट्या घटनांमध्ये,गोष्टींमध्ये जीवनातला आनंद सामावलेला आहे.मात्र प्रत्येकजण आनंदाचा एकदम मोठ्ठा ठेवा मिळवण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे ह्या आनंदकणिका त्याला दिसतच नाही. आपल्या वाट्याला फारसे आनंदाचे क्षणच येत नाहीत म्हणून मनुष्य आयुष्यभर उसासत राहतो.त्याला अपेक्षा असते आनंदाच्या जलप्रपाताची;त्या नादात त्याच्या सभोवताल होणाऱ्या आनंदाच्या तुषारांच्या वर्षावाकडे त्याचे पार दुर्लक्ष होते. आजूबाजूला फुललेली रंगीबेरंगी फुलं,त्यांचा सुगंध,त्याभोवती उडणारी फुलपाखरं,आभाळाचे विविध रंग,उगवणारा,मावळणारा सूर्य,वाऱ्याची अलवार झुळूक,मातीचा,वाळूचा स्पर्श,पहिल्या पावसानंतरचा मृदगंध ...एक ना दोन आपल्या परिचयाची ही आनंदाची कारंजी आजूबाजूला थुईथुई उसळत असताना आपण करंटेपणा का करावा?
निसर्गाच्या संगतीत चालायचं कसं,walking meditation करताना- दू:खं दूर करता येत नाहीत-पण त्यांना सहज कसं झेलता येतं,संकटांशी सामना करण्या चं बळ कसं येतं त्याचंही सहजसुंदर विवेचन थिच न्हात हान यांनी "Walking Meditation "मध्ये केलेलं आहे.पण प्रत्येकानं अप्पलपोटेपणाने स्वत:पुरतं चालणं त्यांना अभिप्रेत नाहीच-"We walk for ourselves and we walk for those who cannot walk.We walk for all living beings-past,present and future." झेनगुरू सांगतात.नकळत आपलीही पावलं मग आपल्याला आनंदयात्रा घडवून देतात.

No comments: