Sunday, June 1, 2014

लहान रेघ मोठी रेघ

लहान रेघ मोठी रेघ
-रश्मी घटवाई 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंनी संसदेत (तेव्हाची Constituent Assembly )त्यांचं सुप्रसिद्ध "नियतीशी करार "भाषण केलं, तेव्हा त्यांना कल्पना सुद्धा नसेल की जे ते त्या वेळी बोलले,ते अक्षर न अक्षर पुढे १६ व्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या बाबतीत खरं ठरेल,म्हणून! नेहरूंनी त्या  भाषणात म्हटलं होतं,"At the stroke of the midnight hour,when the world sleeps,India will awake to life and freedom.This was a moment which comes but rarely in history when we step out from the old to the new,when an age ends,and when the soul of a nation, long suppressed, finds utterance."
सबंध दशकभरात त्यांच्याच कुटुंबपरंपरेतल्या सत्तासुरानी ह्या देशाच्या आत्म्याला जणू आवळून, जखडून ठेवलं होतं,ह्या देशाची अस्मिता आपल्या सत्ताधुंद पावलांखाली चिरडून टाकली होती. नेहरूंनी सांगितल्याबरहुकुम देशानं ती जुलूमशाही झुगारून दिली आणि सत्तापरिवर्तनाची हाक देत जुलुमी काचातून मोकळ्या झालेल्या राष्ट्रानं  पुन्हा एकदा स्वातंत्र्य अनुभवलं.'जुने जाऊ द्या मरणालागुनि,जाळून किंवा पुरुनि टाका,'म्हणत देशानं त्यांच्याच काँग्रेस पक्षाला दूर भिरकावून दिलं आणि भारतीय जनता पार्टीच्या पदरात भरभरून मतं-दान दिलं. 

सार्वत्रिक निवडणुकांची चाहूल लागली,भाजपानं पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी ह्यांचं नाव घोषित केलं,तेव्हा विरोधक त्यांच्यावर अक्षरश: लांडग्यांनी भक्ष्यावर तुटून पडावं,तसे तुटून पडले, सर्वांगाचे लचके तोडायचा प्रयत्न करू लागले.निवडणुकीच्या निकालानं मात्र विरोधकांचंच अस्तित्व मिटवून टाकलं.एवढंच नव्हे,तर कोणे एके काळी भारत हा देश ज्या लोकांच्या खिजगणतीतही नव्हता, ते देशच काय,पण अवघ्या जगाचं लक्ष भारताकडे लागून राहिलं. किंबहुना महासत्ता बनण्याच्या दिशेनं भारतानं टाकलेलं पाऊल असल्याचा प्रत्यय ह्या निवडणुकीच्या निकालानं जगाला दिला .   


रुडयार्ड किपलिंग ह्या भारतात ब्रिटीश सत्ता असतानाच्या काळात मुंबईत जन्मलेल्या ब्रिटीश लेखक-कवीची "इफ" ही अतिशय प्रसिद्ध कविता आहे. ती त्यानं १९०९ साली आपल्या मुलाला उद्देशून लिहिली होती,तरी ती आज एकशे पाच वर्षांनंतरही तितकीच प्रेरणादायी आहे. ती जणू काही त्यानं नरेंद्र मोदी ह्यांनाही उद्देशून लिहिली असावी किंवा नरेंद्र मोदींनीच ती कविता पुरती आचरणात आणली,असंही म्हणता येईल.इफ मध्ये मला भगवद्गीता दिसते. नरेंद्र मोदींपुढे पण भगवद्गीतेचा आदर्श आहेच,म्हणून असेल कदाचित!(भगवद्गीतेतल्यासारखा)कवितेतला उपदेश असल्यामुळे "यू विल बी अ गॉड ,माय मॅन" असं थट्टेनं विन्स्टन चर्चिल रुडयार्ड किपलिंगला म्हणाले होते.If you can meet with Triumph and Disaster And treat those two impostors just the same ह्या कवितेतल्या ओळी विम्बल्डन मध्ये टेनिस कोर्टवर पण लागलेल्या आहेत. इफ ह्या कवितेच्या प्रेमात पडावं!कविता अशी- 

If—

If you can keep your head when all about you   
    Are losing theirs and blaming it on you,   
If you can trust yourself when all men doubt you,
    But make allowance for their doubting too;   
If you can wait and not be tired by waiting,
    Or being lied about, don’t deal in lies,
Or being hated, don’t give way to hating,
    And yet don’t look too good, nor talk too wise:

If you can dream—and not make dreams your master;   
    If you can think—and not make thoughts your aim;   
If you can meet with Triumph and Disaster
    And treat those two impostors just the same;   
If you can bear to hear the truth you’ve spoken
    Twisted by knaves to make a trap for fools,
Or watch the things you gave your life to, broken,
    And stoop and build ’em up with worn-out tools:

If you can make one heap of all your winnings
    And risk it on one turn of pitch-and-toss,
And lose, and start again at your beginnings
    And never breathe a word about your loss;
If you can force your heart and nerve and sinew
    To serve your turn long after they are gone,   
And so hold on when there is nothing in you
    Except the Will which says to them: ‘Hold on!’

If you can talk with crowds and keep your virtue,   
    Or walk with Kings—nor lose the common touch,
If neither foes nor loving friends can hurt you,
    If all men count with you, but none too much;
If you can fill the unforgiving minute
    With sixty seconds’ worth of distance run,   
Yours is the Earth and everything that’s in it,   
    And—which is more—you’ll be a Man, my son!
(Source: A Choice of Kipling's Verse (1943))    

हाच रुडयार्ड किपलिंग,सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ...जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ...असं कवितेतून  म्हणाला असला तरी भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल आणि भारतात स्वत:चं सरकार असण्याच्या शक्यतेबाबत त्याचा नकारार्थी दृष्टीकोन होता. भारत हा कधीच स्वतंत्र देश असू अशक्णार नाही ह्या मताचा तो पुरस्कर्ता होता. नोव्हेंबर १८९१ मध्ये त्याला एका पत्रकारानं भारतात स्वत:चं सरकार असण्याच्या शक्यतेबाबत विचारणा केली,तेव्हा त्याचं उत्तर होतं , " They are 4000 years old out there,much too old to learn that business.Law and order is what they want and we are there to give it to them straight." (संदर्भ :इंडिया आफ्टर गांधी -लेखक रामचंद्र गुहा) रुडयार्ड किपलिंगला देवपद देऊ करणाऱ्या विन्स्टन चर्चिल प्रभृतींची मतं याच पठडीतली होती. भारताचं स्वातंत्र्य वगैरे तर लांब,भारत हा मुळी कधी देश म्हणून असा नव्हताच आणि भविष्यातही असणार नाही,असे मानणारे अनेक होते,त्यातले एक म्हणजे सर जॉन स्ट्राची(Sir Johnn Strachey).  केम्ब्रिजमध्ये १८८८ मध्ये केलेल्या भाषणात त्यांनी म्हटलं ,"The differences between the countries of Europe are much smaller than those between the countries of India. Scotland is more like Spain than Bengal is like Punjab.The first and most essential thing to learn about India-that there is not and never was an India,or even any country of India possessing any sort of unity,physical,political,social or religious."संदर्भ :इंडिया आफ्टर गांधी -लेखक रामचंद्र गुहा) 

थोडक्यात,भारत हा अनेकांच्या खिजगणतीत नव्हता,अनेकांच्या लेखी अस्तित्वात नव्हता.मात्र अनेकांच्या हौतात्म्यानंतर जेव्हा तो अस्तित्वात आला,तेव्हा भुकेकंगालांचा देश,सापनागांचा, गारुड्यांचा,वाघांचा,हत्तींचा देश असली आपल्या देशाची ओळख पाश्चात्यांच्या मनात निर्माण झाली होती.मोठ्या देशांची वागणूकही आपल्या देशाप्रती उपेक्षेची होती.आपल्या देशातली सत्तेवर विराजमान झालेली नेतेमंडळी जगात देशाची प्रतिमा उंचावण्याऐवजी स्वत:ची प्रतिमा उंचावण्यात निमग्न झालेली होती.त्यांचे कपडे परदेशातून धुवून येत असतील भले,पण ते स्वत: स्वत:ला महान देशभक्त म्हणवून घेत होते आणि पोटातलं पाणीही हलू नं देउनसुद्धा आपली तशी आभासी प्रतिमा निर्माण करण्यात यशस्वीही होत होते.वंशपरंपरेनं मिळालेली सत्ता उपभोगत त्यांच्यानंतरच्या सत्ताधीशांनीही वेगळं काहीच केलं नाही,आधीचा अध्याय केवळ मागच्या पानावरून पुढे सरकवला एवढंच. देशाला उत्तुंग पातळीवर नेऊन ठेवण्याची ह्या नेत्यांना दूरदृष्टी असती तर जे प्रश्न त्यांनी हेतुत: चिघळत ठेवून कठीण करून ठेवले,ते मुळात उद्भवले नसते आणि उद्भवले असते तरी त्याच्यावर वेळीच उपाययोजना केली असती.एक जुनी गोष्ट आठवते. तुपाचा डबा उघडताना एका श्रीमंत माणसाचं बोट कापलं आणि जखम होऊन त्यात तूप शिरलं.वेदना असह्य झाल्यावर त्यानं वैद्याला पाचारण केलं.वैद्यानं जखम बघून त्यावर मलमपट्टी केली आणि जखम बरी होण्यासाठी आणखी काही दिवस मलमपट्टी करण्याची गरज असल्याचं सांगितलं. पुढच्या वेळी वैद्यबुवांना काही कारणानं ऐनवेळी बाहेरगावी जावं लागलं, म्हणून त्यांनी आपल्या मुलाला त्याच्याकडे पाठवलं.आपल्या वडिलांना काहीच कळत नाही,म्हणत त्यानं त्या श्रीमंत माणसाचं बोट गरम पाण्यात बुडवलं आणि त्या किरकोळ जखमेतलं तूप निपटून काढलं. आणि आता यापुढे मलमपट्टीची गरज नसल्याचं सांगितलं.घरी परतलेल्या वैद्यबुवांना जेव्हा मुलानं ही गोष्ट सांगितली,तेव्हा त्या पित्यानं आपल्या कपाळाला हात लावला आणि मुलाला म्हटलं ,हे एवढं मला कळत नव्हतं असं समजू नकोस,मी केवळ आपली पुढची सोय करून ठेवत होतो!तात्पर्य, आपल्या देशातले सत्ताधीश आतापावेतो वैद्यबुवांचाच कित्ता गिरवत होते!स्वत:च्या तुंबड्या भरत पुढच्या पिढ्यांची सोय करण्यासाठी देशाचेच धन, साधन, संसाधन लुबाडण्यात आकंठ बुडून गेले होते.

ह्यावेळी मात्र भारतातल्या जनतेनं रुडयार्ड किपलिंग,जॉन स्ट्राची प्रभृतींना खोटं पाडलं. राजकीय, सामाजिक आणि धार्मिक एकजुटीनं भारतातल्या जनतेनं स्वतंत्र भारतात स्थिर सरकार देणारी भरभक्कम अशी १६ वी लोकसभा जगापुढे आणली आणि सगळं जग अचंबित झालं.   

देशाच्या विकासाऐवजी स्वत:चाच विकास करणाऱ्या,गरिबांची गरीबी हटवण्याऐवजी स्वत:चीच गरीबी हटवणाऱ्या सत्ताधुंद नेत्यांना इसबार जनता माफ नहीं करेगी,असा सज्जड दम आणि इशारा मतदारांनी देऊनसुद्धा नेत्यांनी जनमानसाच्या तीव्र प्रतिक्रियेकडे कानाडोळा केला आणि सव्वाशे वर्षांपेक्षाही जुना असलेल्या काँग्रेस पक्षानं आजवरच्या त्यांच्या लोकसभा निवडणुकांच्या इतिहासात सर्वात कमी ४४ जागा मिळवल्या आणि तरीही संसदेतला दुसऱ्या क्रमांकाचा जास्त जागा मिळवणारा पक्ष ठरला.जनतेनं भरभरून नरेंद्र मोदींना आपली पसंती दिली आणि भाजपाला एकहाती २८२ जागा मिळाल्या.त्यामुळे आता विपक्ष सुद्धा गठबंधन करून तयार करावा लागेल,अशी मजेदार प्रतिक्रिया सर्व थरांतून उमटू लागली. लोकसभेत विरोधी पक्षाचा नेता (लीडर ऑफ अपोझिशन)बनण्यासाठी लोकसभेत त्या पक्षानं एकूण जागांच्या दहा टक्के जिंकलेल्या असायला हव्या,पण काँग्रेसजवळ तेवढ्याही जागा नाहीत.दिल्लीश्वर होण्यासाठीचा रस्ता उत्तर प्रदेशातून जातो कारण उत्तर प्रदेशातल्या लोकसभेतल्या जिंकलेल्या जागांच्या आकडेवारीवर खूप काही अवलंबून असतं.भाजपानं उत्तर प्रदेशात ७२ जागा मिळवून दणदणीत विजय मिळवला.मुस्लिम समाजाचे आपणच काय ते कैवारी म्हणून मुस्लिमांचा पत्कर घेतलेले मुलायम सिंह यांना उत्तर प्रदेशातल्या जनतेनं एकही मुस्लिम उमेदवार निवडून नं देऊन सणसणीत चपराक दिली आहे. त्यांच्या सपाचे अवघे पाच उमेदवार जिंकले आणि बहन सुश्री मायावती ह्यांना उत्तर प्रदेशातल्या जनतेनं नारळ दिला.उत्तर प्रदेशात सगळ्यात केविलवाणी स्थिती काँग्रेसची आहे,तिथे सोनिया गांधी आणि राहुल गांधी ह्यांनाच काय तो विजय मिळाला.

सोनिया गांधी यांच्या विरोधात भाजपानं हेमा मालिनी आणि राहुल गांधी ह्यांच्या विरोधात एखाद्या 'चांगल्या' सिने अभिनेत्याला उतरवलं असतं,तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी ह्यांच्याही जागा भाजपाच्या पारड्यात आल्या असत्या.स्मृती इराणीना मथुरेहून उभं केलं असतं,तर त्या जिंकल्या असत्या.उत्तर प्रदेशातली मानसिकता बघता साधं समीकरण म्हणजे पुरुषाच्या विरोधात पुरुष उमेदवार आणि स्त्री उमेदवाराच्या विरोधात स्त्री उमेदवार उभा करावा. पुढच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अमेठीसाठी आत्तापासून चांगल्या पुरुष उमेदवाराचा-जनमानसावर पकड असलेल्या चांगल्या लोकप्रियसिनेअभिनेत्याचा शोध घेऊन त्याचं ग्रूमिंग भाजपानं केलं,तर "जरा ठिवावं की "असा विचार करून उत्तर प्रदेशातल्या जनतेनं ह्यांना भले आत्ता निवडून दिलं असेल;पुढच्या वेळी सोनिया गांधी आणि राहुल गांधी ह्यांच्या पदरी पराजय निश्चित टाकतील.

मात्र आताच उत्तर प्रदेशातल्या आणि त्यातूनही वाराणसी मधल्या लोकांना नरेंद्र मोदींच्या विजयामुळे अतिशय आनंद झाला आहे ."किसी के कन्धे से कन्धा और किसी को कन्धा दे दिया,मान गये जनता तू सच मे जनार्दन है।"असं उत्तर प्रदेशातल्या लोकांचं म्हणणं आहे.रामधारी सिंह दिनकर यांची कविता प्रतीकात्मक रुपात प्रकटली असल्याचं त्यांना वाटतं आहे.   

"कलम, आज उनकी जय बोल
जो अगणित लघु दीप हमारे
तुफानों में एक किनारे
जल-जलाकर बुझ गए किसी दिन
मांगा नहीं स्नेह मुंह खोल
कलम, आज उनकी जय बोल
पीकर जिनकी लाल शिखाएं
उगल रही लपट दिशाएं
जिनके सिंहनाद से सहमी
धरती रही अभी तक डोल
कलम, आज उनकी जय बोल "

"वो आया और संसद के सेंट्रल हॉल से दहाड़ के सारी दुनिया को सन्देश दे गया, भारतवर्ष हमारे लिए एक भूमि का टुकड़ा नहीं हमारी माँ है,भारत माता को परम वैभव के शिखर पर ले के जाने वाले महानायक का आगमन हो चुका है. सबसे ज़्यादा ख़ुशी तो इस बात की है कि मोदी जी के आने के बाद गुजरात की तरह बनारस मेँ भी मद्य-निषेध लागू हो जायेगा." असं वाराणसी मधला युवावर्ग मानतो.  

आपली रेघ दुसऱ्यापेक्षा मोठी कशी करायची,तर दुसऱ्यानं ओढलेली रेघ नं पुसता त्यानं ओढलेल्या रेघेपुढे आपण आपली मोठी रेघ ओढायची असते.आधीच्या नेत्यांनी ओढलेल्या रेघेपुढे नरेंद्र मोदी आणखी मोठी रेघ ओढतील तर भारताची रेघ इतर देशापेक्षाही निश्चितच मोठी होईल!
-------- 
रश्मी घटवाई 
०९८७१२४९०४७   

Thursday, May 15, 2014

My article published in Tarun Bharat on Why Nations fail.

देश श्रीमंत अथवा गरीब का होतात… 
-रश्मी घटवाई 

जगातले काही देश अतिश्रीमंत आहेत,तर काही अति गरीब आहेत. ही दरी का,ह्याची व्यापक कारण मीमांसा "Why Nations Fail .The Origins of Power,Prosperity and Poverty" ह्या पुस्तकात Daron Acemoglu आणि James A. Robinson ह्या लेखक द्वयीनं केली आहे.  देश श्रीमंत-गरीब का होतात,हे लेखक द्वयीनं अनेक उदाहरणे आणि देशांचा इतिहास,भूगोल आणि राजकीय परिस्थिती यांचे सखोल विश्लेषण करून आपली स्वतंत्र संकल्पना मांडली आहे. 

जगातले काही देश अतिश्रीमंत आहेत,तर काही अति गरीब आहेत.देशांमध्ये ही प्रचंड आर्थिक विषमता का,ह्याची व्यापक कारणमीमांसा "Why Nations Fail .The Origins of Power, Prosperity and Poverty" ह्या पुस्तकात Daron Acemoglu आणि James A. Robinson ह्या लेखक द्वयीनं केली आहे.देश श्रीमंत-गरीब का होतात,याबाबत अर्थशास्त्रातल्या आधी मांडल्या गेलेल्या आणि स्वीकृत असलेल्या अनेक संकल्पना -थिअरीज ह्या संपूर्णपणे का खऱ्या ठरत नाहीत,हे लेखक द्वयीनं अनेक उदाहरणे देऊन आणि देशांचा इतिहास,भूगोल आणि राजकीय परिस्थिती यांचे सखोल विश्लेषण करून सांगून आपली स्वतंत्र संकल्पना मांडली आहे.  "While economic institutions are critical for determining whether a country is poor or prosperous,it is politics and political institutions that determine what economic institutions a country has...Our theory for world inequality shows how political and economic institutions interact in causing poverty or prosperity." असं पुस्तकात लेखकद्वयीनं म्हटलं आहे.त्यांच्या मते देश प्रगतीपथावर जाईल की गरीब होईल हे त्या देशातल्या पॉलिटीकल इंस्टीटयूशन्स  आणि इकॉनॉमिक इंस्टीटयूशन्स यांच्या कार्याच्या संयुक्त प्रभावावर अवलंबून असते.त्यांनी मांडलेले बहुसंख्य मुद्दे अर्थात आपल्या देशाबाबतसुद्धा खरे आहेत.प्रस्तुत पुस्तकात लेखकद्वयीनं उत्तर आणि दक्षिण कोरिआ यांची तुलना करीत उत्तर कोरिआमध्ये युवकांना शिक्षण,आर्थिक उन्नती वगैरेसाठी कुठलंच प्रेरणादायी चित्र नाही आणि दक्षिण कोरिआत तरुणाईला शिक्षण,आर्थिक उन्नती साधण्यासाठी केवढे पोषक वातावरण आहे,हे विस्तृतपणे सांगितले आहे. तीच गोष्ट मेक्सिको आणि अमेरिकेची्. " It should therefore be no surprise that it was U.S.society,not Mexico or Peru,that produced Thomas Edison,and  that it was South Korea,not North Korea,that today produces technologically innovative companies such as Samsung and Hyundai. " Daron Acemoglu आणि James A. Robinson ह्या लेखकद्वयीनं लिहिलेल्या ह्या वाक्यावर तर आपल्याकडे खूप चिंतन-मनन घडावं. 

जगातल्या अनेक देशांत आज जनमानसात प्रचंड प्रक्षोभ उसळलेला दिसतो आहे.तरुणाईच्या मनात असंतोषाचा उद्रेक होताना दिसतो आहे. सर्वत्र अशांती,असंतोष यांचा हा तप्त ज्वालारस खदखदत असताना कुठल्याही देशाचे आरोग्य कसे असेल ह्याचा आपल्याला सहज अंदाज बांधता येतो.हे असे का,याचं मार्मिक विश्लेषण लेखकांनी एका समर्पक वाक्यात केलंय -"The roots of discontent in these countries lie in their poverty."
तहरीर चौकात निदर्शने करणाऱ्या तरुणाईनं सरकारचा भ्रष्टाचार,दर्जेदार शिक्षणाची वानवा आणि योग्य संधीचा अभाव यांच्या विरोधात आवाज उठवला होता,अजूनही तो आवाज घुमतो आहे.       

शिक्षण हा एक महत्वाचा घटक प्रस्तुत पुस्तकात चर्चिला गेला आहे."The low education level of poor countries is caused by economic institutions that fail to create incentives for parents to educate their children....the price these nations pay for low education is high." प्रस्तुत लेखकद्वयीनं लिहिलंय.ह्यावर आपल्याला गंभीरपणे विचार करायला हवा. आपल्याकडे नंदन निलेकणी ह्यांनीही शिक्षण ह्या मुद्द्यावर "Imagining India"  (इमॅजिनिंग इंडिया)ह्या पुस्तकात खूप विस्तृत चर्चा केली आहे:भारतात जगात द्वितीय स्थानावरच्या संख्येत आपल्याकडे दरवर्षी इन्जीनीअर्स तयार होतात,तसंच दरवर्षी शाळा सोडून  जाणारी मुले सर्वाधिक संख्येत आहेत,दिल्लीतल्या रामकृष्णपुरम ह्या उच्चभ्रु वस्तीत देशातली सर्वोत्तम अशी शाळा आहे,तिथल्याच झोपडपट्टीतल्या लोकांना जेमतेम दाटीवाटीने बसता येईल,इतपत,एका खोलीच्या सरकारी शाळेवर समाधान मानावे लागते.रस्त्याअलीकडच्या त्या उच्चभ्रू शाळेत फळा वेगळ्या कारणाने वापरला जात नाहीत्याऐवजी कॉम्प्युटर्स,व्हाईट बोर्डस्मार्ट बोर्ड तिथे वापरले जातात. रस्त्यापलीकडच्या गरीब शाळेत वेगळ्या कारणाने फळा वापरला जात नाही,असा विरोधाभास पाहायला मिळतो.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या वर्षांत Defence expenditure -संरक्षणावरच्या खर्चासाठी बजेट मध्ये शिक्षणासाठीच्या खर्चापेक्षा अधिक तरतूद होती.आपले  शिक्षणविषयक धोरण असायला हवे,तसे नाही,ह्याचं भान आपल्याला रस्त्यावर चौकांत पुस्तके विकणारी मुलंआई-वडिलांना मोलमजुरीच्या कामात मदत करताना दिसणारी मुलं दिसली,की येतं!आपल्या सरकारी शाळा शिक्षणाची नी शिकू इच्छिणाऱ्यांची मागणी पुरवण्यास सपशेल पराभूत झाल्या." ते पुढे लिहितात,"दरवर्षी २० लाख इंग्रजी बोलू शकणारे पदवीधर,१५ हजार कायद्याचे पदवीधर,९ हजार PhD मिळवलेले विद्यार्थी इथे निर्माण होतात,सध्या  करोड  १० लाख  ्जीनिअर्स   असून दरवर्षी त्यात ३० हजार  इन्जीनिअर्सची भर पडते आहे."
मात्र "८३ % इन्जीनिअरिंग ग्रॅज्युएट अनफिट फॉर एमप्लोंयमेन्ट,""वीसपैकी एकोणीस इन्जीनिअरिंग ग्रॅज्युएट नोकरीसाठी अयोग्य असल्याचेही एका सर्वेक्षणात आढळून आले होते,याचा विसर पडू देत कामा नये.बरं,इतक्या मोठ्या संख्येनं इन्जीनिअर्स तयार होऊनही त्या प्रमाणात इंडस्ट्री उभी राहतेय असं चित्र तर काही दिसत नाही.प्रशिक्षित कुशल कामगार हवे असतील तर तसं शिक्षणही दिलं गेलं पाहिजे.निलकेणी यांनी लिहिलंय,"भारताचा  कुशल कामगारवर्ग आताच जगातल्या  सर्वाधिक  दुसऱ्या क्रमांकाच्या संख्येत येतो. २०२० मध्ये भारतात जवळजवळ सबंध जगाला पुरेल एवढा वर्कफोर्स-कामगार असतील." हा अर्थातच निलेकणी ह्यांच्या योग्यतेच्या व्यक्तीचा भाबडा आशावाद असणार नाही.मात्र त्यादृष्टीनी आपण पावले टाकतो आहोत का,हा कळीचा मुद्दा आहे.
देश सपशेल अपयशी ठरण्यामागे असते तिथली शोषणकर्ती व्यवस्था,कारण शासन -यंत्रणा,अनिर्बंध सत्ता आणि संपत्ती शोषक राज्यकर्त्यांच्या हाती  एकवटलेली असते. "Countries become failed states not because of their geography or their culture,but because the legacy of extractive institutions,which concentrate power and wealth in the hands of those controlling the state,opening the way for  unrest ,strife and civil war." "Why Nations Fail .The Origins of Power,Prosperity and Poverty" ह्या पुस्तकात लेखकद्वयीनं जागोजागी अधोरेखित करून लिहिलंय,ते आपल्या बाबतीत शब्दन शब्द खरे आहे. मात्र त्यांच्याच मते, चांगले शासनकर्ते निवडून देण्याचा अधिकार सर्वसामान्यांना असणे ही एक फार मोठी सशक्त व्यवस्था आपल्या देशाच्या घटनेने आपल्याला दिलेली असल्यामुळे निदान आपण जागरूक नागरिकांनी तरी आपला देश गरिबीच्या खाईत लोटला जाणार नाही,तो प्रगतीपथावर राहील ह्याची काळजी घ्यायला हवी. 

This article of mine was published in Tarun Bharat asamant supplement on  19th July 2013.

Monday, May 12, 2014

प्रबुद्ध हो
-रश्मी घटवाई 

ह्या संसारचक्रात गुरफटलेल्या जीवांना जरा-मरण, दु:खांपासून मुक्ती देण्यासाठीचं,संसार-तापांपासून मुक्ती मिळवण्यासाठीचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी,आपला नवजात शिशु राहुल आणि पत्नी यशोधरा ह्यांचा त्याग करून,सिंहासनाचा लोभ-मोह त्यागून राजपुत्र सिद्धार्थ तपश्चर्येसाठी जंगलात निघून गेला. शाक्य -नरेश शुद्धोधन आणि त्याला जन्म देऊन मृत्यू पावलेली त्याची माता महामाया ह्यांचं वैशाख पौर्णिमेच्या दिवशी जन्मलेलं अपत्य प्रबुद्ध साधू -परिव्राजक होईल असं भाकीतही त्याच्या नामकरणाच्या वेळी करण्यात आलं होतं.ज्ञान प्राप्त करण्यासाठी सिद्धार्थ गौतमानं कठोर तपश्चर्या केली. वैशाख पौर्णिमेच्या रात्री,वटवृक्षाखाली ध्यान लावून बसलेल्या सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्ती झाली,बोध प्राप्त झाला.बोध झालेला,म्हणून तो बुद्ध म्हणवला गेला. ज्या वृक्षाखाली त्याला बोध प्राप्त झाला,तो बोधी वृक्ष म्हणवला गेला.ज्या स्थानी त्याला बोध प्राप्त झाला,ते गया ह्या स्थानाच्या समीपवर्ती स्थान बोधगया म्हणून ओळखलं गेलं .शाक्यांची राजधानी कपिलवस्तूपासून जवळ असलेलं,इसवी सनपूर्व ५६३ वर्षे ते इसवी सनपूर्व ४८३ वर्षे ( 563 BCE- 483 BCE)-ह्याबद्दल मतभिन्नता आहे - ह्या काळात गौतम बुद्धाचा जन्म जिथे झाला ते स्थान लुम्बिनी (जे नेपाळमध्ये आहे ), ज्या स्थानी त्याला बोध प्राप्त झाला,ते स्थान बोधगया, बोधप्राप्ती नंतर गौतम बुद्धानं जिथे आपल्या पाच अनुयायांना धर्माची शिकवण दिली ,ते स्थान सारनाथ आणि इसवी सनपूर्व ४८३ वर्षे(483 BCE)  किंवाइसवी सनपूर्व ४११-४०० वर्षे -( 411 BCE  - 400 BCE )ह्याबद्दल मतभिन्नता आहे -ह्या काळात,ऐंशी वर्षे वयाच्या गौतम बुद्धाचं जिथे महानिर्वाण झालं,ते स्थान कुशीनगर ही चार ठिकाणं गौतम बुद्धाबद्दल,बुद्धाच्या शिकवणुकीबद्दल, बुद्धधर्माबद्दल आस्था असलेल्या जगभरातल्या लोकांसाठी परमश्रद्धेय आहेत.  

गौतम बुद्धानं बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त केल्यानंतर बोधीवृक्षाखाली चार आठवडे धर्माच्या स्वरूपाबद्दल चिंतन -मनन केल्यानंतर बुद्धधर्माच्या प्रचार-प्रसारार्थ प्रस्थान केलं.आषाढ पौर्णिमेला काशीनगरीजवळ मृगदाव(आताचं सारनाथ )ह्या स्थानी येऊन पोहोचल्यानंतर गौतम बुद्धानं तिथेच मृग उद्यानातल्या पिंपळाच्या झाडाखाली आपल्या पाच भिक्षु अनुयायांना धर्माची शिकवण दिली.त्यानंतरच्या काळात त्यांना धर्माच्या प्रचार-प्रसारार्थ पाठवलं.गौतम बुद्धाने दिलेला हा पहिला धर्मोपदेश म्हणूनच 'सारनाथ' ह्या स्थानानं जणू आजही निज हृदयी धारण केलेला आहे. 

मार्च महिन्यामध्ये मी वैयक्तिक कारणाने वाराणसीला गेले होते,तेव्हा सारनाथ मधल्या रिझॉर्टमध्ये पाच दिवस माझा मुक्काम होता.वाराणसी आणि सारनाथ म्हणजे दिल्ली आणि नोएडा अथवा हैद्राबाद आणि सिकंदराबाद सारखी जोड-शहरं(ट्विन सिटीज् )आहेत. अनंतहस्ते कमलाकराने देता किती घे घेशील दो करांनी तशी माझी गत झाली,इतकं काही वाराणसी आणि सारनाथ ह्या दोन ठिकाणांंजवळ आहे . दोन्ही स्थानांचं महात्म्य अपरंपार!

धर्मचक्र प्रवर्तन सूत्र (पाली मध्ये Dhammacakkappavattana Sutta- धम्मचक्क पवत्तन सुत्त) हा पूर्वी सोडून गेलेल्या आपल्या पाच सहयोगी संन्यासी अनुयायांना सारनाथ येथील इषिपतनच्या मृगदायवनात गौतम बुद्धाने दिलेला पहिला धर्मोपदेश!गौतम बुद्धाने त्या पाच परिव्राजकांना भिक्खु असं संबोधलं.जगामध्ये दु:ख आहे,हे दु:ख नाहीसे कसे होईल,ह्याचे विवेचन करताना गौतम बुद्धाने सदाचाराचा मार्ग अष्टांग मार्ग सांगितला. १. सम्यक दृष्टी २. सम्यक  संकल्प ३. सम्यक वाचा ४. सम्यक कर्म ५. सम्यक  आजीविका ६. सम्यक व्यायाम ७. सम्यक स्मृती व ८. सम्यक समाधी  ही ती  आठ सदाचाराची साधने.हा अष्टांग मार्ग म्हणजेच मध्यम मार्ग.आत्यंतिक सुखभोगाचे जीवन किंवा आत्यंतिक आत्म्क्लेशाचे जीवन अशी दोन्ही आत्यंतिक टोके नाकारून गौतम बुद्धाने मध्यम मार्ग अनुसरण्यास सांगितले.चांगल्या जीवनाचे  अनुसरण करण्यासाठी जीवनाची पाच तत्वे म्हणजे पंचशील अंगी बाणवली पाहिजेत,ती म्हणजे १. अहिंसा -कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा  न  करणे २. चोरी न करणे किंवा दुसरयाची वस्तू न बळकावणे ३. व्यभिचार न करणे ४. असत्य न बोलणे आणि ५. अपेयपान न करणे म्हणजे मादक पेय न ग्रहण करणे

गौतम बुद्धाने दिलेली ही शिकवण खरे म्हणजे बुद्धधर्माचा पाया आहे. काही सन्माननीय अपवाद वगळता बुद्धधर्माचे पाईक दुर्दैवानी ही शिकवण अंगी बाणवताना आढळत नाहीत. "यः धारयति , स: धर्म:।" धर्म हा अंगी बाणवण्याची,आचरणात आणण्याची गोष्ट आहे,एवढे जरी लक्षात आले, तरी मनुष्य प्रबुद्ध झाला,असे समजायला हरकत नसावी . 
---------------
रश्मी घटवाई
०९८७१२४९०४७ 




Sunday, May 4, 2014

"कोळसा … उगाळावा तितका काळाच !

-रश्मी घटवाई 

कडू कारलं,तुपात तळलं,साखरेत घोळलं;तरी कडू ते कडूच असतं!काँग्रेसचंही तसंच आहे.केंद्रात दहा वर्षे काँग्रेसप्रणित सरकारचं राज्य म्हटल्यावर भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांशिवाय अधिक वेगळं घडणार तरी काय होतं म्हणा!काँग्रेसचे नेते -मग ते गल्ली-बोळातले असू देत अथवा दिल्लीतले, ह्या एका बाबतीत त्यांचं मतैक्य दिसतं.शिवाय चतुर काँग्रेसी नेते सगळ्या चांगल्या कामांचं श्रेय काम नं करता राहुल गांधींना द्यायला आणि अपयशाचं खापर डॉ.मनमोहन सिंह ह्यांच्यावर फोडायला आतुर-उत्सुक!
  
"If the Congress had lost,the blame for the defeat would have been placed squarely on the PM's shoulder....Now that the party was back in office,and that too with more numbers than anyone in the party had forecast,the credit would go to the party's 'first family.'To the scion and future leader.It was Rahul's victory,not Manmohan's." असं "द अ‍ॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर" ह्या आपल्या पुस्तकात संजय बारू ह्यांनी लिहिलं आहेच. भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांबाबत आणि त्यातही 'कोल-ब्लॉक वाटपा'त झालेल्या घोटाळ्याबद्दल बारूंनी लिहिलंय ,"The scandal relating to the allocation of coal blocks during the period when Dr. Manmohan Singh handled the coal portfolio further tarnished the prime minister's image.Here too, he was charged,not with corruption,but with turning a blind eye to the corruption of others."

बारूंचं हे भाष्य ज्या सुरावर थांबलं,तोच सूर पकडून आणखी एका माजी  प्रशासकीय अधिकाऱ्यानं कोळसा घोटाळा नक्की काय आणि कसा झाला ह्यावर खूप विस्तृतपणे माहिती देणारं पुस्तक लिहिलं ."क्रूसेडर ऑर कॉन्स्पिरेटर ?कोलगेट अ‍ॅण्ड द अदर ट्रूथस" (CRUSADER OR CONSPIRATOR?COALGATE AND THE OTHER TRUTHS BY P.C.PARAKH) हे माजी सनदी अधिकारी पी सी पारख लिखित पुस्तक काँग्रेसच्या एकूण  अस्तित्वावरच पूर्णविराम देणारं ठरावं.( last nail in the coffin ह्या अर्थानं.) "द अ‍ॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर" आणि "क्रूसेडर ऑर कॉन्स्पिरेटर ?कोलगेट  अ‍ॅण्ड द अदर ट्रूथस" ही केंद्रातल्या काँग्रेसप्रणित सरकारच्या भ्रष्टाचाराचा लेखा-जोखा मांडणारी आवळी-जावळी दोन्ही पुस्तकं ऐन निवडणुकीच्या काळात महत्वाच्या टप्प्यावर आल्यावर लोकांना आधीच ठाऊक असलेलं काँग्रेसचं खरं स्वरूप आणि केंद्रातलं सत्ताकेंद्र ह्यावर शिक्का -मोर्तब झालं  'ह्या टोपीखाली दडलंय काय 'हे उघड करणारे दोन्ही पुस्तकांचे लेखक हैद्राबाद,आंध्र प्रदेशातले हाही एक योगायोग.आंध्र प्रदेश केडरचे सनदी अधिकारी  प्रकाशचंद्र पारख पुढे कोळसा मंत्रालयाचे सचिव झाले. 
        
दिसतं तसं नसतं,म्हणून तर जग फसतं. ते कसं;हे पी सी पारख ह्यांनी "क्रूसेडर ऑर कॉन्स्पिरेटर ?कोलगेट अ‍ॅण्ड  द अदर ट्रूथस" ह्या पुस्तकात सांगितलंय.
 
ममता बॅनर्जी ह्यांचा साधेपणा प्रथमदर्शनी लोकांना भावतो.पण त्याची दुसरी बाजूही ते दाखवतात: 
 "Ms Banerjee had commendable simplicity and there is no doubt about her personal integrity.But she was not immune to misuse of her office for her party's interests. " पारख ह्यांनी लिहिलं आहे.ममता बॅनर्जी ह्यांनी कोळसा मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारताच 'कोल इंडिया लिमिटेड" Coal India Limited(CIL)चे प्रभारी चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर(acting CMD ) ह्यांना पन्नासेक तृणमूल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना ,त्यांची कुठलीही परीक्षा वा इंटरव्ह्यू नं घेता, त्याबद्दलची कुठलीही जाहिरात नं प्रसिद्ध करता ,कुठलीही अधिकृत कार्यपद्धती नं अवलंबिता थेट पॉइन्टमेन्ट लेटर देऊन  'कोल इंडिया लिमिटेड" मध्ये नोकरीवर घेण्याची सक्ती केली. 
 "Soon after Ms Banerjee took charge of the ministry,she forced the acting CMD of Coal India Limited(CIL) to appoint 50 odd TMC workers as trainees....No procedure was followed in their selection:no advertisement,no tests and no interviews.A list of names was handed over to him and he was told to issue appointment orders...None of these persons attended training.They used to simply mark their attendance and attend to Ms Banerje's party work.There was already huge surplus and unproductive manpower in Coal India  which was being reduced through a voluntary retirement scheme.(VRS) The government had banned new appointments in Coal India.But the ban was relaxed to facilitate  recruitment of TMC workers.....she also pressurised the Coal India chairman to make large donations to several NGO's of her choice."अर्थात इतर कोळसा मंत्र्यांनीही आपापल्या काळात उण्याअधिक फरकानं हेच केलं म्हणून पारख लिहितात . सकृतदर्शनी निरुपद्रवी दिसणाऱ्या कोळसा मंत्री शिबू सोरेन ह्यांनी आणि त्यांचे राज्यमंत्री दासारी नारायण राव ह्या दोघांनी 'कोल इंडिया लिमिटेड"मध्ये २००४ साली चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्या पदावर नियुक्त होणारया अधिकाऱ्याकडून,एकरकमी ५० लाख रुपये आणि नंतर दर महिन्याला १० लाख रुपयांची अपेक्षा करत कसा छळवाद केला,ते पारख ह्यांनी पुस्तकात लिहिलंय.   
"...before he resigned as coal minister to take over as Chief minister of Jharkhand,he ordered that no further e-auction be conducted.A proposal to bring transparency in coal marketing was thus nipped in the bud"पारख पुढे लिहितात.

"भारताची अर्थव्यवस्था  सशक्त अर्थव्यवस्था म्हणून वाटचाल करते आहे आणि २०५० सालामध्ये ती जगातली प्रथम क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून गणली जाईल ,असं अनेकाचं अनुमान आहे .त्यामुळे वाढत्या अर्थव्यवस्थेला ऊर्जेची वाढीव गरज भासते आहे. भारताच्या ऊर्जेची दोन तृतीयांश गरज कोळसा भागवतो.भविष्यकाळातसुद्धा भारतात कोळसा हेच ऊर्जेची गरज भागवण्याचं मुख्य साधन असणार आहे. भारतात कोळशाचे साठे विपुल आहेत आणि कोळशाचं खननसुद्धा विपुल प्रमाणात होतं.कोळशाच्या साठ्यांच्या आणि उत्पादनाच्या बाबतीत भारत जगात अग्रक्रमी आहे.असे असले तरी कोळशाची टंचाई भेडसावते.मागणी-पुरवठ्याच्या व्यस्त प्रमाणामुळे कोळशाचा होणारा काळाबाजार आणि कोळसा माफिया हीच सर्वात मोठी समस्या आहे.वस्तुत: कोळसा हे खनिज भारताच्या जनतेच्या मालकीचं आहे,मात्र मूठभर धनदांडग्यांच्या मिरासदारीनं कोळशाळा आपल्या ताब्यात जखडून ठेवलं आहे. कोळसा माफियांनी बोगस कंपन्या स्थापन केल्या.त्यांना रीतसर कोळसा वाटप होऊन त्यांनी तो कोळसा काळ्याबाजारात विकला. वर्षानुवर्षे हे सगळं जराही वाच्यता नं  होता बिनबोभाटपणे सुरू होतं. मात्र  देशात कोळशाची भीषण टंचाई उद्भवली.औष्णिक विद्युत ऊर्जा निर्माण करणाऱ्या केंद्रांमध्ये कोळशाच्या साठ्यानं अतिगंभीर अशी खालची पातळी गाठल्यामुळे आणीबाणीची वेळ आली. कोळशाच्या उत्पादनासाठी,खननासाठी,कोल ब्लॉक्सच्या वाटपासाठी पारदर्शीपणे जाहीर लिलाव होणे आवश्यक होते. मात्र ज्या पद्धतीने खाजगी कंपन्यांना कोल ब्लॉक्सचे वाटप झाले,त्यात काळेबेरे असल्याचे निष्पन्न झाले.कोल ब्लॉक्सचे वाटप झाले,तेव्हा कोळसा मंत्रालयाचे खाते स्वत: पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह सांभाळत होते.शिबू सोरेन वेगवेगळ्या कारणांनी कोळसा मंत्र्याच्या पदावरून दूर होत होते.पण आघाडीच्या सरकारात त्यांचा झारखंड मुक्ती मोर्चा हा पक्षही सामील असल्यामुळे अपरिहार्यपणे हे सगळे विदुषकी चाळेपंतप्रधान सहन करीत होते. भ्रष्टाचार आणि तोंड दाबून बुक्क्यांचा मार त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यामुळे त्यांनी जणु डोळे मिटून घेतले होते. भ्रष्टाचार आणि घोटाळयांकडे कानाडोळा करीत कमालीची स्थितप्रज्ञता त्यांनी अंगी बाणवून घेतली होती. 

"कॅग(The Comptroller and Auditor General of India)-CAG  नी हा घोटाळा उघडकीला आणला .कोल ब्लॉक्स वाटप अपारदर्शीपणे घडल्याचं आणि लिलावात  असलेल्या पारदर्शीपणाच्या अभावामुळे खाजगी कंपन्यांना  १.८६ लाख करोड (1.86 lakh crore) रुपयांचा फायदा झाला,असं कॅगच्या लक्षात आल्यावर एकच हलकल्लोळ माजला. कोल ब्लॉक्स वाटप प्रकरणातल्या घोटाळ्याला कोल-गेट असं संबोधलं जाऊ लागलं .ह्या सगळ्या कोलगेट प्रकरणाचं इंगित दडलं आहे,ते हा कोल ब्लॉक्सचा लिलाव खुल्या पद्धतीनं ,e -auction प्रकाराने नं झाल्यामुळे, e -auction पद्धत कोल ब्लॉक्स वाटपासाठी अंगिकारली जाऊ नये म्हणून आटापिटा करणाऱ्या मंत्र्यांमध्ये आणि अर्थातच कोल माफिया आणि राजकारणी नेते ह्यांच्यातल्या साट्या-लोट्या मध्ये. " पारख ह्यांनी अगदी सहज-सोप्या शब्दांत कोळसा घोटाळ्याबद्दल विस्तृतपणे लिहिलंय .कोळसा खाण-coal mine  आणि coal block -ह्यात फरक असल्याचं त्यांनी पुस्तकात सांगितलं आहे. ते स्वत:देखील कोळसा घोटाळ्यातल्या एका प्रकरणात आरोपी आहेत. 
  
"The Comptroller and Auditor General of India-CAG ,Mr.Vinod Rai did an excellent job of bringing the huge coal allocation scandal into the public domain....The CAG observed that the Screening Committee did not follow a transparent  and objective method....The CAG said that on account of abnormal delay of more than eight years in implementing a policy that the government itself had formulated,there was an undue financial gain of about 1.86 lakh crore to private parties.The gain was obviously at the cost of the exchequer... Open bidding for allocation of this resource was proposed way back in 2004.It does not require great intelligence to understand why it took over eight years to implement a transparent bidding system.The reason is simple and obvious:the entire political class of India was opposed to it."पारख लिहितात.

आपली पापं अशी चव्हाट्यावर येताना पाहून राजकारण्यांची फौजची फौज त्यावर वाद घालायला आणि एका पैशाचीही अफरातफर झाली नसल्याचं ठासून सांगायला पुढे सरसावली. 

"टीव्हीवरच्या एका मुलाखतीत आणि वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तत्कालीन कायदे मंत्री  सलमान खुर्शीद उलट कॅगच्या त्या मुद्द्यावरच प्रश्न उपस्थित करू लागले की कॅग म्हणताहेत त्या  १.८६ लाख करोड (1.86 lakh crore)रुपयांपैकी सरकारला किती रुपये मिळाले असते ?"पारख लिहितात,"मुद्दा खरे तर तो नाहीच; कॅगच्या अनुमानाच्या अगदी पन्नास टक्के जरी असता,तरी सरकारी तिजोरीला झालेला  तोटा खूप होता. नक्की तोटा किती,त्या आकड्यापेक्षाही;घोटाळ्याची व्याप्ती ,पारदर्शीपणाचा अभाव आणि भ्रष्टाचाराला वाव असणारी पद्धत हा मुद्दा महत्वाचा आहे .टीव्हीवरच्या आणखी  एका मुलाखतीत खासदार नवीन जिंदल ह्यांनी वाद घातला होता की जगभर खाणी (mining properties ) विनामूल्य दिल्या जातात आणि सरकारच्या तिजोरीत महसूल येतो, तो (त्यावरच्या) रॉयल्टी आणि करांच्या माध्यमातून. पण कुठल्याच देशात विकसित केलेल्या क्षेत्रातल्या खाणी विनामूल्य दिल्या जात नाहीत. What are being given free are virgin areas with minimal geological information where large amounts of money has to be sunk as risk capital in carrying out exploration,which may or may not result in commercially minable discovery.Even such properties in most countries are not given free." पारख लिहितात,"टीव्हीवरच्या आणखी एका मुलाखतीत कोळसा मंत्री श्रीप्रकाश जायस्वाल कोळसा खाण वाटपात कुठल्याही प्रकारे विशिष्ट लोकांना झुकते माप दिले गेले नसल्याचा, दबाव आणला नसल्याचा दावा करीत होते. आपल्या कार्यकाळात कोणतेच कोळसा खाण वाटप झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले.मग मला समजत नाही; की जर श्रीप्रकाश जायस्वाल ह्यांच्या कार्यकाळात जर कोळसा खाण वाटप झालेच नाही ,तर मग  दबाव आणला गेला नसल्याचं किंवा कुणाला झुकते माप दिले गेले नसल्याचं त्यांना कसं कळलं ?" पारख विचारतात.

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह ह्यांच्याबद्दल पण पारख ह्यांनी विस्तृतपणे ह्या संदर्भात लिहिलं आहे .पुढे अन्य राजकारणी नेत्यांनी अपरिमित मानहानी केल्याबद्दल व्यथित होऊन पारख जेव्हा राजीनामा द्यायला  पंतप्रधानांकडे गेले तेव्हा असले मानापमान तर त्यांच्या वाट्याला रोजच येत असतात, तेव्हा  असल्या छोट्या छोट्या गोष्टींवरून राजीनामा देणं राष्ट्रहिताचं नाही, असं म्हणून  पंतप्रधान डॉ.   मनमोहन सिंह ह्यांनी पारख ह्यांना धीर दिला होता,हे सांगून पारख लिहितात," By continuing to head a government in which he had little political authority,his image has been seriously dented by 2G and Coalgate although he has had a spotless record of personal integrity." 
   
"...I have come to terms with this.There cannot be two centres of power.I have to accept that the party president is the centre of power." असं पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह ह्यांनी म्हटल्याचं "द अ‍ॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर" ह्या आपल्या पुस्तकात संजय बारू ह्यांनी लिहिलं आहेच. तेव्हा घोटाळ्यांच्यामागचा चेहरा अगोचर असल्याचं मानण्याचं काहीच कारण नाही .