Tuesday, February 3, 2015

U.S.President Obama's visit to India:"Yes,We Can!"

येस वुई कॅन!
-रश्मी घटवाई 
तो आला,त्यानं पाहिलं,तो बोलला आणि त्यानं जिंकलं!अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतभेटीला येणारयेणार म्हणून गेले काही दिवसांपासून देशवासियांची उत्सुकता ताणली गेली होती.त्यांच्या देशाच्या,पर्यायानं  विश्वातल्या सर्वोच्च अशा त्यापदाच्या इभ्रतीला आणि इतमामाला साजेशा पद्धतीनं सुरक्षेचं अभेद्य कवच दिल्लीच्याच नव्हेतर आपल्या सबंध देशाच्या भू-जल-आकाशाला गवसणी घालून प्राणपणानं सज्ज झालं होतं.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतभेटीला येण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हतीयाआधीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतभेटीवर आलेले होते. १९५९ सालीं भारतभेटीवर आलेले आयसेनहॉवर(Dwight D. Eisenhower)हे भारताला भेट देणारे सर्वात पहिले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्यानंतर रिचर्ड निक्सन यांनी,कुठल्याही अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी स्वतंत्र भारताला दिलेली अगदी सर्वात कमी अवधीचीअशी एकदिवसीयभेट १९६९ मध्ये भारताला दिली होती. त्यांच्यानंतर जानेवारी १९७८ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर,मार्च २००० मध्ये  राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी भारताला भेट दिली होती.बिल क्लिंटन यांच्या भेटीच्या वेळी दिल्लीची झालेली पराकोटीची स्वच्छता तोंडात बोटे घालायला लावत होती, हे दिल्लीकरांना आजही आठवते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश  ते ३ मार्च २००६ रोजी भारतात आले होते. अमेरिकेचे सध्याचे  राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा याआधी ६ नोव्हेंबर २०१० रोजी भारतभेटीवर आले होते.आता२५ जानेवारी-ते२७ जानेवारी २०१५ ह्या तीन दिवसांच्या भारतभेटीसहराष्ट्राध्यक्षपदाच्याकार्यकाळात भारताला दोनदा भेट देणारे,तसेच भारताच्याप्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ठरले.   (गमतीदार 'योगायोगबघाव्लादिमिर पुतीन यांनीही रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणूनच्या   कार्यकाळात आतापावेतो  भारताला दोनदा भेट दिली आहे आणि २६ जानेवारी २००७ रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते आले होते.)  
ओबामा यांच्या या भेटीनं भारत-अमेरिका यांच्या संबंधात एक नवा अध्याय लिहिला गेला आहे,असं आज अगदी सर्वसामान्य माणसालाही वाटतं आहे.ह्यावेळच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजपथावर झालेल्या सोहोळ्याच्या  नेत्रदीपक प्रदर्शनानं सर्वसामान्य व्यक्तीलाही आपल्या देशाच्या हर्षोत्फुल्ल करणाऱ्याविविधरंगी सांकृतिक ठेव्याबद्दल अभिमान वाटतो आहे. ह्यावेळच्या परेडमध्ये तिन्ही सेनांमधल्या स्त्रीशक्तीच्या दर्शनामुळे मुली आणि स्त्रियांमध्ये उत्साह दुणावला आहे. आपल्या देशानं  मंगलयान धाडलं आणि आता आपण अनेकविध क्षेत्रांत प्रगती करणार हा विश्वास लोकांमध्ये रुजतो आहे. भारताची अर्थव्यवस्था आणखी सशक्त होणार म्हणून विदेशी गुंतवणूकदारांनीसुद्धा भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. त्याचंच प्रतिबिंब शेअर बाजाराच्या इंडेक्समध्ये सुद्धा लगोलग बघायला मिळालं.थोडक्यात,येस वुई कॅनही भावना,हम भी कुछ कम नहीं हा दिलासा मरगळ झटकून टाकण्यासाठी आणि पुढची वाटचाल करण्यासाठी प्रेरक  ठरावा .
आंतरराष्ट्रीय राजकारण हे वरवर दिसतं तितकं साधसुधं नसतं,चांगलंच गुंतागुंतीचं असतं,(शिवाय त्यात 'तेल'पण खोलवर मुरलेलं असतं,) हे सर्वसामान्य माणूसपण जाणून आहे. तसं नसतं तर अमेरिकेचे 'सेक्रेटरी ऑफ स्टेटजॉन केरी इथे भारतात,   गांधीनगरमध्ये 'व्हायब्रंट गुजरात'परिषदेसाठी येतात आणि नंतर पाकिस्तानमध्येपण जातात,एकीकडे दहशतवादाचा बीमोड करण्याबाबत आग्रह धरणारी अमेरिका दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला अर्थसहाय्यसुद्धा करते,राष्ट्राध्यक्ष  जॉर्ज बुश त्यावेळी भारतभेटीनंतर लगोलग पाकिस्तानला सुद्धा जातात,असं घडलं नसतं.जगात जर सर्वत्र शांती नांदली,तर युद्ध कशी होतील आणि मग युद्धसामग्री ,शस्त्रास्त्र कोण कशाला खरेदी करेलत्यामुळे आधी अस्थिरता,अशांती  निर्माण करून मग तिथे स्थैर्य आणि शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नरत व्हायचं.एका देशाशी हातमिळवणी करतेवेळी इतर दोघांना कोपरानं ढोसायची संधी गमवायची नाही,आपली अर्थव्यवस्था पुढे दामटताना इतर अर्थसत्तांना हादरे द्यायचे,असं चित्र आंतरराष्ट्रीय राजकारणात सर्रास दिसतं . 
ज्या अमेरिकेनं पोखरण मध्ये अणुचाचणी केल्याबद्दल भारतावर तीस वर्षं निर्बंध घातलेभारताच्या आण्विक कार्यक्रमावर बहिष्कार घालण्यासाठी इतर देशांना उद्युक्त केलं,तीच अमेरिका भारतासमोर  १-२-३ नावानं ओळखल्या  जाणाऱ्या अणुकराराचा प्रस्ताव ठेवतेत्याबाबत आग्रही पाठपुरावा करते,हे बघितल्यावर  सर्वसामान्य माणूस गोंधळून जावा!,फार कशाला, 'ह्या अणुकरारामुळे नागरी अणुव्यापाराची द्वारं उघडणार आहेत,त्यामुळे अमेरिकेत रोजगाराच्या  संधी निर्माण होतील,अगदी दोन अणुभट्ट्या उभारण्यासाठी जरी अमेरिकी कंपन्यांना कंत्राट मिळाले तरी त्यामुळे अमेरिकेत हजारो रोजगार निर्माण होतील', असं अमेरिकेच्या तत्कालिन 'सेक्रेटरी ऑफ स्टेटकोंडोलिज्जा राईस यांनी 'अवर अपॉर्च्युनिटी विथ इंडिया ' नामक आपल्या वक्तव्यात तेव्हा म्हटलं होतं. इतकी वर्षं रखडलेल्या उभय देशांच्या नागरी अणुकरारामध्ये राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी जातीनं लक्ष्य घालून भारताला जाचक वाटणाऱ्या अटींवर तोडगा काढला आणि अणुकराराचा मार्ग मोकळा झाला. आपल्या वाढत्या लोकसंख्येला आणि विस्तारू पाहणाऱ्या उद्योगजगतालाअर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी  भारताला उर्जेची  गरज आहेचआणि ती ऊर्जाही स्वस्त तसेच स्वच्छ (क्लीन एनर्जी )असायला हवी,त्यामुळे उभय देशाच्या नेत्यांनी उचललेल्या ह्या नव्या पावलानं नवी वाट तयार झाली,जी देशाला प्रगतीपथावर नेईल,असं सर्वसामान्य माणसाला वाटतं आहे.शेअर बाजारात शेअरची विक्री घडताना कसं,एक विकणारा आणि दुसरा खरेदी करणारा असावा लागतो,जेव्हा उभयतांमध्ये खरेदी-विक्री होते,तेव्हा दोघांचाही हेतू सफल होतो,तसंच हेसुद्धा आहे.
जेव्हा ओबामा निवडून आले आणि सर्व देशांनी त्यांना अभिनंदानार्थ दूरध्वनी केले,तेव्हा त्यांनी प्रत्युत्तरादाखल धन्यवाद देणारे फोन इतर देशांना केले,पण भारताला केला नाहीम्हणून आपण हळहळलो होतो.नरेंद्र मोदी ह्यांनाही अमेरिकेने आधी सापत्न वागणूक दिलीमात्र  नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी  आल्यावर ओबामांनी अभिनंदानार्थ दूरध्वनी केलाआणि अमेरिकेच्या मनातली भारताबद्दलची  तेढ मावळत असल्याचे संकेत दिले.अमेरिकेत महत्वाच्या पदांवर भारतीय वंशाच्या व्यक्तींच्या नियुक्त्या होताहेत हा काही निव्वळ योगायोग नाही! अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये व्यापारासह चांगले संबंध दृढ व्हावेत,ह्या हेतूनी उचललेली ती पावले आहेत.आज अमेरिकेत लाखो भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत (त्यातले दोन माझी लेक आणि जावई पण आहेत.)खूप मोठ्या संख्येत भारतीय तिथे कार्यरत आहेत,  अमेरिकेच्या यशात भारतीयांच्या बुद्धिमत्तेचा मोठा वाटा आहे.अमेरिकेत माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तेलगू भाषिक आणि हॉटेल -मॉटेल क्षेत्रात पटेल हे समीकरण आहे. साहजिकच मोदी जेव्हा अमेरिकेत गेले,तेव्हा त्यांची लोकप्रियता किती आहे,ह्याचं प्रत्यंतर अमेरिकेला मॅडिसन स्क्वेअर हॉल मध्ये आलं. नरेंद्र मोदी भारतात आणि अमेरिकेत लोकप्रिय आहेत तसे बराक ओबामा अमेरिकेत  आणि  भारतात लोकप्रिय आहेत. ह्याचं कारण हे दोन्ही नेते अतिशय सामान्य परिस्थितीतून ह्या पदावर पोहोचलेले आहेत आणि त्या पदाची'हवा डोक्यात जाऊ नं देता,पाय जमिनीवर ठेवून तळमळीनं कार्य करणारे आहेत.मोदी-ओबामा हे दोघेही उत्कृष्ट वक्ते आहेत,त्यांची कृत्रिमतेचा  लवलेश नसलेली  भाषणं लोकांच्या हृदयाला भिडतात.ओबामांचा कुटुंबवत्सलपणा  अमेरिकेच्या लोकांना भावतो.अमेरिकेतले सर्व वर्णाचे लोक ओबामांवर तितकेच प्रेम करतात.मात्र आर्थिकदृष्ट्यासामान्य असलेल्या अमेरिकेतल्या लोकांना ओबामा ह्यांनी "ओबामाकेअर"च्या रूपानं नवसंजीवनी दिली आहे. लेखासाठी माझ्या अमेरिकी मैत्रिणीशी त्या ओबामाकेअरबद्दल मी संवाद साधला.तिचा स्वत:चा पुस्तके   डिझाईन करण्याचा,पुस्तकनिर्मितीचा व्यवसाय आहे.हे विनापत्य  अमेरिकी दाम्पत्य व्हर्जिनियात इस्कॉनशी संबंधित आहे आणि युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनियामध्ये दोघे भगवद्गीता तसंच भक्तियोग  शिकवतात,ते विशुद्ध शाकाहारी आहेत आणि सनातन धर्माचे आचरण करतात.त्यांच्याकडे येणारे,कृष्णवर्णीयांसह सर्व वर्णाचे त्यांचे कृष्ण-भक्त शिष्य जणू त्यांची मुलेबाळेच आहेत.त्यांनी आपली नावेदेखील भारतीय ठेवून घेतली आहेत. एवढ्यात मायाप्रिया लॉंंग माझ्या ह्या अमेरिकी मैत्रिणीचे,तिच्या 'लेक-लेकी'सह आठवडाभर माझ्याकडे वास्तव्य होते,त्यावेळी तिनं  ओबामाकेअरबद्दल सांगितलं होतं.
"अमेरिकेत बहुतेक सर्व अमेरिकी नागरिकांना,ते जिथे नोकरी करतात,   त्या त्यांच्या मालकांकडून,कंपन्यांकडून नि:शुल्क अथवा नाममात्र शुल्क आकारून  हेल्थ इन्श्युरन्स अथवा आरोग्यविमा दिला जातो.मात्र आम्ही पती-पत्नी सेल्फ-एम्प्लोयिड,  स्वरोजगार मिळवणारे असल्यामुळे आम्हाला आमचा  आरोग्यविमा विकत घ्यावा लागतो. पण अमेरिकेत आरोग्यविमा खूपच महाग असल्यामुळे आमच्यासारख्या सामान्य आर्थिक उत्पन्न असलेल्यांना खूपच कठीण जात होतं. दर वर्षाला दहा हजार डॉलर्स खर्चआम्हाला दर महिन्याला दरडोई सहाशे डॉलर्स  ही आरोग्यविम्याची रक्कम भरावी लागे.आमचा दर वर्षाचा औषध-पाण्याचा खर्च दहा हजार डॉलर्स कधी नव्हताच,आम्हाला विनाकारण हा भुर्दंड सोसावा लागत होता,त्यातून काही हशील पण होत नव्हतं,त्यामुळे खूप ओढाताण पण व्हायची.पण ओबामाकेअर अस्तित्वात आल्यानंतर आम्हाला आता  आरोग्यविम्यासाठी दर महिन्याला केवळ ८६ डॉलर्स एवढीच रक्कम भरावी लागते ज्यात डॉक्टरच्या व्हिजिट्स,औषधांच्या किमतींवर भरपूर सूट इत्यादी समाविष्ट आहे.आमच्यासारख्या अन्य सर्वांनाचज्यांना  आरोग्यविम्याचा मासिक हफ्ता म्हणजे प्रचंड आर्थिक बोजा वाटत असेओबामाकेअरमुळे खूप दिलासा मिळाला आहे."चौसष्ट वर्षीय मायाप्रिया लॉंंंग सांगते.
आत्ता अमेरिकेतसुद्धा ओबामांची भारतभेट अमेरिकी लोकांच्या औत्सुक्याचा आणि जिव्हाळ्याचा विषय ठरली आहे.ह्या भेटीनं  भारत -अमेरिकेच्या लोकांमध्ये  आणखी अच्छे दिन येण्याची आस निर्माण झाली आहे.    

मायाप्रिया लॉंंंग 

Monday, January 12, 2015

अब दिल्ली दूर नही
- रश्मी घटवाई 

नवी दिल्ली ही देशाची राजधानी भलेही असेल;पण हिंदी सिनेसाम्राज्याची राजधानी अर्थातच मुंबई आहे.हिंदी सिनेसृष्टीनं "ये है बॉम्बे मेरी जान " म्हणत तिला मोठं मानाचं स्थान गाण्यांतून... अगदी चित्रपटांतूनही दिलंय."ई है बम्बई नगरिया,सोनेचांदी की डगरिया..."वगैरे तिची स्तुतीस्तोत्रे अगणित नी त्यांचं  नित्यनेमानं  पठण करणारेही अगणित!बम्बईचं स्थानमहात्म्य काय वर्णावं?बम्बईसे आलेल्या दोस्तालासुद्धा सामान्यजनांनी सलाम करावा, इतकी तिची राजमान्यता!सलाम बॉम्बे...दिल्लीला कोण पुसतं?दिल्ली का ठग...मात्र बम्बई का बाबू!बॉम्बे टू  गोवा काय, बॉम्बे टू बँकॉक काय !इथे दिल्लीतून एकदाच कधी नव्हे ते चांदनी चौक टू चायना गेले,खूप झालं! हिंदी सिनेसृष्टीत दिल्ली बिचारी  गाण्यांतूनही उपेक्षित राहिली. दिल्ली का कुतुबमिनार बघण्याचा सल्ला देणारा गीतकार लगोलग बम्बई शहर की बहार बघण्याचा आग्रह धरतो,म्हणजे बघा!
नाही म्हणायला दिल्ली का कुतुबमिनार आपल्याला प्रथम भेटतो,तो प्रेमातली आर्तता, शुचिता, पवित्रता, सहजसुंदरता,अवखळपणा,माधुर्य आणि संयम व्यक्त करीत दिल का भंवर प्यार का राग आळवतो,तेव्हा!इतके बहारदार गाणे दुसरे नसावे!सोज्वळ नूतन आणि देव आनंद,नितांतसुंदर Black &White चित्रण-देव करो नी कुणाला त्याला रंगीत करायची दुर्बुद्धी नं होवो!आणि साक्षीला कुतुबुद्दीन ऐबक आणि नंतर इल्तुत्मिश ह्यानं बांधलेला कुतुबमिनार! ४ डिसेंबर १९८१ रोजी ४५ शाळकरी विद्यार्थी त्या अरुंद पायऱ्या  उतरताना चेंगराचेंगरीत चिरडून मृत्युमुखी पडल्यानं नंतर पर्यटकांसाठी कुतुबमिनार मध्ये आत पायऱ्या चढून वर जाण्यावर प्रतिबंध घालण्यात आला.(जामा मस्जिद च्या पायऱ्याही अर्थात अशाच पद्धतीच्या आहेत.)पण ते कालसाक्षेपी गाणे त्या वास्तूचे सोने करीत त्यातले सौंदर्य उलगडून दाखवते.कुतुबमिनारा जवळचा-वर गरुड असलेला, ब्राम्ही लिपीत संस्कृत वचने कोरलेला विष्णूध्वज हा  लोहस्तंभ धातुशास्त्रातला (Metallurgy ) चमत्कार आहे.त्या लोह्स्तंभाला दोन्ही हात पाठीमागे करून विळखा घालू शकलेल्याची मनोकामना पूरी होत असल्याचा प्रवाद  जनमानसात इतकं बिंबला की घामामुळे चवथ्या शतकातल्या त्या लोह्स्तंभाला धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली, तिथे शेवटी संरक्षक चबुतरा उभारून तो वाचवण्याची खबरदारी घेतली जातेय.
तसं बघितलं तर आताआतापावेतो हिंदी सिनेमांतून जरा बेताबेतानंच  दिल्लीदर्शन घडत होतं.मात्र अचानक,जणू हिंदी चित्रपटसृष्टीला ' अब दिल्ली दूर नहीं ' असा साक्षात्कार झाला, बघताबघता अनेक हिंदी सिनेमांतून दिल्लीदर्शन  घडवण्याची लाटच आली.अलीकडच्या कितीएक सिनेमातून मग दिल्ली दिसू लागली.कुतुब मिनाराचं अल्पसं राजसदर्शन  'तेरे घर के सामने'नं  " दिल का भंवर" मध्ये घडवलं होतं ;'फना 'नं "चांद सिफारिश" गाण्यातून कुतुब मिनाराचं  समग्र दर्शन घडवलं ,कुतुब मिनाराजवळच्या त्या लोह्स्तंभाला दोन्ही हात पाठीमागे करून विळखा घालू शकलेल्याची मनोकामना पूरी होत असल्याच्या प्रवादाचा आधार घेत 'चीनी कम'नं आपला climax रंगवला.
 'अब दिल्ली दूर नहीं ' मध्ये,आईच्या खुनाबद्दल फाशीची शिक्षा झालेले  आपले वडील निर्दोष असल्याचं सांगण्यासाठी दिल्लीला थेट पंतप्रधानांकडे  निघालेला मुलगा...त्या काळच्या यमुना,दरियागंज,इंडियागेटच्या दृष्यांव्यतिरिक्त तीन मूर्ती भवनातून बाहेर निघालेले पंतप्रधान नेहरू हेही दृश्य त्यात होतं.मुलगा पंतप्रधानांना भेटतो,हा climax वास्तवदर्शी व्हावा म्हणून आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल नी त्यांच्या सरकारबद्दल लोकांच्या मनात आत्मीयता निर्माण होईल असं सांगून राज कपूरनी पंतप्रधान नेहरू ह्यांना प्रत्यक्ष काम करण्याची गळ घातली होती,त्यांनी त्याला होकार दिला होता,पण शेवटी ऐनवेळी तो योग आला नाही,असाही एक किस्सा ह्या चित्रपटाबाबत ऐकवला जातो.
देव आनंदच्या 'तेरे घर के सामने'ची स्टोरी लाईन दिल्लीतली होती.' नौ-दो-ग्यारह 'मधला देव आनंद दिल्लीत रहात असतो...तो आपला सरळ उठून ट्रक घेऊन "हम है राही प्यार के "गात इंडिया गेटवरून फतेहपुर सिक्री..आग्र्याचा ताजमहाल वगैरे गाठत मजल दरमजल करीत मुंबईत जातो.आता इंडिया गेट अनेक हिंदी सिनेमात बघायला मिळतं म्हणा!पहिल्या महायुद्धात ब्रिटीश इंडियन सैन्यातल्या ९० हजार सैनिकांनी भारतातल्या ब्रिटीश साम्राज्याच्या रक्षणासाठी आपले प्राण खर्ची घातले.त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ (Sir Edwin Lutyens ) सर एडविन ल्युटेन्सनी साकारलेलं ऑल इंडिया वॉर मेमोरियल म्हणजे इंडिया गेट.त्यावर  हौतात्म्य मिळालेल्या त्या सैनिकांची नावे कोरली आहेत. 'रंग दे बसंती' पासून  तर आता इंडिया गेटवर अन्यायाविरुद्ध 'कॅन्डल लाईट मार्च'सह मूक निदर्शने करण्याचा प्रघात पडला आहे.'नो वन किल्ड जेसिका' मध्येही असा कॅन्डल लाईट मार्च आहे. 'रंग दे बसंती'ची स्टोरीलाईन दिल्लीची होती,त्यातही एअरपोर्टवाल्या नव्या अजस्त्र फ्लायओव्हरपासून ते अनेक स्थलांचं दिल्लीदर्शन घडलं.तसंच अर्थात ओघानं 'नो वन किल्ड जेसिका' ला दिल्लीची पार्श्वभूमी होती,त्यामुळे त्यातही दिल्लीदर्शन घडलं.
.
मधल्या काळातल्या हिंदी सिनेमांपैकी बासू चटर्जी यांच्या रजनीगंधा मध्येही दिल्ली होती.(त्या सिनेमातही दिल्लीतली नायिकाही शेवटी मुंबईतच गेली. लोकांना दिल्लीत चैन पडत नव्हती की काय;कोण जाणे!) सई परांजपे यांच्या चष्मेबद्दूर सिनेमातून दिल्ली दिसली.त्याला स्टोरीलाईन दिल्लीची होती... लोधी गार्डन, बुद्ध जयंती पार्क,इंडिया गेट पण...SRCC  (श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स )चं jacket घालून फिरणारा जोमो.आताच्या बँड बाजा बारात मध्येही दिल्लीतली  कॉलेजेस आहेत...आणि हो दिल्लीतली  ही  कॉलेजेस म्हणजे मोठंच प्रस्थ आहे.म्हणजे काय,तर नाम ही काफी है!बँड बाजा बारात ह्या सिनेमाची कथाही दिल्लीत घडते आहे.
पुरानी दिल्ली-ही दिल्लीच्याच नव्हे,तर भारतभरातल्या व्यापारी जगताचा केंद्रबिंदू आहे...प्राण आहे.त्याचा पिनकोड आहे दिल्ली -६.ह्या नावाचा सिनेमा कसा त्या अजस्त्र व्यापारपेठेसारखा  भारदस्त असायला हवा होता.प्रत्यक्षात आला तो सुमार, टुक्कार चित्रपट.दिल्लीत काही वर्षांपूर्वी गूढ काला बंदर उत्पात घडवत  होता.त्याचं  रहस्य शेवटपर्यंत उलगडलं नाही,पण त्याच्यामुळे लोकांमध्ये कमालीची  घबराट पसरली होती. दिल्ली -६. नं तेही कथानक त्यात घुसडलं... कशाचाच कशाशी संबंध नाही...सुसंगत कथानकाचा पत्ता नाही.त्या दिल्ली -६ मध्ये हिंदू आणि मुस्लीम दोन्ही सुखनैव नांदतात.कहर म्हणजे,तो हिंदू-मुस्लीम सलोखा आणि सर्वधर्मसमभाव दाखवायला दिल्ली -६ च्या दिग्दर्शकानं त्यातल्या हिंदू आणि मुस्लीम पात्रांना शू करताना दाखवलं. हरे राम!दिल्ली -६ च्या दिग्दर्शकाचं धर्माबद्दलचं ते अचाट आकलन पाहून अख्खी दिल्ली-६ झीट येऊन कोसळली असेल.नंतर सावरल्यावर तिथल्याच मोठ्या कचराकुंडीत दिल्ली-६ तल्या लोकांनी ती सिनेकलाकृती टाकली असेल. अलीकडच्या सिनेमांत नाहीतरी युरीनल्स नी एकेकाला शू करताना दाखवायची नवीच प्रथा सुरु झालीये नाही?लगे रहो मुन्नाभाई असू दे,चीनी कम असू दे; नाही तर थ्री इडीयट्स...ज्याला बघावे तो आपला शू च करतोय..
   
जुन्या सिनेमांपैकी 'फिर वही दिल लाया हुं ' मध्ये दिल्ली होती.काही वर्षांपूर्वी आलेल्या ' अब आयेगा मजा' मध्ये गाण्यात दिल्लीतलं रेल म्युझियम होतं, 'मुझे कुछ कहना है'मध्ये  प्रगती मैदान होतं.पा मध्ये दिल्लीदर्शन होतं,थ्री इडीयट्स मध्ये दिल्लीदर्शन होतं.'चक दे इंडिया'लाही दिल्लीची स्टोरी लाईन असल्यानं मेजर ध्यानचंद स्टेडीयम, इंडिया गेट त्यात होतं. दिल से,दस कहानीयां,मॉन्सून वेडिंग, संडे,आहिस्ता-आहिस्ता,खोसला का घोसला , इतकंच काय,आताच्या 'दो दुनी चार','ये साली जिंदगी मध्ये दिल्लीदर्शन होतं.(गम्मत बघा -गाण्यांत म्हणू नका,सिनेमांच्या शीर्षकांमध्ये म्हणू नका... शिव्या च शिव्या ! प्रतिभा इतकी काळवंडू लागलीये?)किंबहुना, केवळ किरकोळ दृश्ये नव्हेत,वा केवळ दिल्लीचा उल्लेख,नी म्हणून त्या अनुषंगाने दिल्लीतली प्रख्यात ठिकाणे नव्हेत;तर हिंदी सिनेसृष्टीनं दिल्लीत घडणाऱ्या कथानकांना आपलंसं केलं.हिंदी सिनेमांमधून दिल्लीही आता राज्य करू लागलीये.
नावांत काय आहे म्हणता म्हणता दिल्ली का ठग अब दिल्ली दूर नहीं म्हणत न्यु देल्ही ला येऊन पोहोचला ,न्यु देल्ही टाईम्स वाचू लागला आणि बघता बघता दिल्लीची स्टोरीलाईन असलेल्या चित्रपटांना सुगीचे दिवस आले. 

बालसंगोपन:बाळाला वाढवताना … बाळाला घडवताना…

बाळाला वाढवताना … बाळाला घडवताना…  

​​(बालसंगोपनाविषयी मार्गदर्शन करणाऱ्या पुस्तकांची माहिती )  

​​-रश्मी घटवाई 
​​
आपलं बाळ सशक्त,निरोगी आणि सुंदर असावं,असं प्रत्येक आईला वाटतं.त्याला चांगला पौष्टिक आहार मिळावा,त्याची निकोप वाढ व्हावी,याची ती काळजी घेते.त्याला छान छान कपडे आणि खेळणी देऊन ती त्याचे लाड पुरवते.आपलं मूल शिकून मोठं व्हावं,त्यानं नावलौकिक मिळवावा आणि सुखी व्हावं म्हणून स्त्री आपल्या बाळासाठी खस्ता खाते,संसारातले कष्ट आनंदानं झेलते. 

जुन्या काळी एकत्र कुटुंबपद्धतीत एका घरात चार पिढ्या सहज रहात होत्या.आई -आजी -पणजी यांच्या कौतुकाच्या वर्षावात आणि संस्कारात नवी पिढी लहानाची मोठी व्हायची.त्या काळात, स्वत:च्या आणि इतरांच्या अनुभवांनी परिपक्व झालेल्या घरातल्या ज्येष्ठ स्त्रिया बाळ-बाळंतिणीच्या आरोग्याची काळजी घ्यायच्या.किरकोळ आजारांवरचे घरगुती उपचार त्यांना माहित असायचे.घराचं घरपण जपत, चांगल्या सवयींचे संस्कार घरातली वडिलधारी मंडळी घरातल्या लहान मुलांवर करीत असत . 

बघता बघता काळ बदलला.कुटुंब आकारानं लहान झालं.कुटुंबाची सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी बदलली.आज कुटुंबात एक किंवा फार तर दोन अपत्यं असतात.मुलींच्या शिक्षणालाही आता प्राधान्य मिळू लागलं आहे.स्त्री सुशिक्षित झाली की ते संपूर्ण घरच सुशिक्षित होतं. आपल्या शिक्षणाचा उपयोग करून स्त्री आता अर्थार्जन करू लागली आहे.कुटुंबाची आर्थिक जबाबदारीसुद्धा खंबीरपणे पेलू लागली आहे.त्याचप्रमाणे आपले निर्णय डोळसपणे घेऊ लागली आहे.साहजिकच आपली मुलं वाढवण्याच्या बाबतीत स्त्री आज अधिक जागरूक झाली आहे. 

पूर्वीच्या काळी बालसंगोपनशास्त्र नव्हतं आणि एक खूळ म्हणून आज ते अचानक अवतरलं आहे,असं नाही.एक तर घरात वडिलधारं कुणी नसतं!शिवाय शास्त्रीय आधार असलेल्या वैद्यकीय सल्ल्याचं पालन करणं केव्हाही चांगलं!त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं काटेकोर नियोजन करणारी आताची पिढी बालसंगोपना च्याबाबत गांभीर्यानं विचार करू लागली आहे.अपत्याच्या जन्माआधीपासून ते त्याच्या जन्मानंतरची पुढची काही वर्षं,इथपर्यंतचा बालसंगोपनाबाबत सखोल विचार करणं ही आता काळाची गरज झाली आहे.  

"दहा गुरूंपेक्षा एक आचार्य श्रेष्ठ,शंभर आचार्यांपेक्षा एक पिता श्रेष्ठ आणि हजार पित्यांपेक्षाही एक आई श्रेष्ठ",असं एक संस्कृत सुभाषित आहे.त्या आईला बालसंगोपनाविषयी सोप्या शब्दांत शास्त्रशुद्ध माहिती देणारी, नामवंत बालरोगतज्ज्ञांची अनेक पुस्तकं मराठीत उपलब्ध आहेत.आजच्या काळातल्या आधुनिक मातांनाही ही पुस्तकं मौलिक मार्गदर्शन करतात. 

शिशुसंगोपनात चिकाटी आणि संयम बाळगणं आवश्यक असतं.पण पूर्वग्रह, बालसंगोपनाविषयीचं अर्धवट पुस्तकी ज्ञान,मैत्रिणी,नातेवाईक यांचे अनुभव ऐकून मनाचा गोंधळ उडतो.तो सरावा,म्हणून 'बाळा,होऊ कशी उतराई' या पुस्तकात डॉ.संजीव कीर्तने यांनी खूप सोप्या भाषेत बालसंगोपनाचं मर्म समजावून सांगितलंय.विवाहाच्या वेळी स्त्रीचं वय १८ ते २७ वर्षं असावं,तर पुरुषाचं वय २४ ते ३० वर्षं असावं.लवकर विवाह झालेल्या जोडप्यानं बाळाचं आगमन लांबवावं;तर उशिरा विवाह झालेल्या जोडप्यानं बाळाच्या आगमनाचा निर्णय लवकर घ्यावा.पती-पत्नीचं रक्ताचं नातं नसावं.मावसभाऊ, मामेबहीण अशा रक्तानं जुळणाऱ्या नात्याच्या व्यक्तीशी लग्न झाल्यास होणाऱ्या बाळात अनुवंशिक रोग उतरण्याची शक्यता जास्त असते.गरोदरपणाचा शेवटचा महिना बाळाची उत्तम वाढ होण्याच्या दृष्टीनं महत्वाचा असतो.त्यात स्त्रीनं पूर्ण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य अनुभवलं,तर बाळ निरोगी आणि सुदृढ होतं. बाळाचं आगमन झाल्यावर त्याचा सुरुवातीचा आहार म्हणजे स्तनपान. यातून आईचं नी बाळाचं निकटचं नातं निर्माण होतं.अंगावरच्या दुधात लोहतत्वाचं प्रमाण जास्ती असतं.त्यात प्रतिकारद्रव्यं आणि 'क 'जीवनसत्त्व असतं,तसंच ते निसर्गत:च जंतुविरहीत असतं,असं त्यांनी त्यात सांगितलंय.बाळाला दूध कसं पाजावं,वरचं दूध का, कसं आणि कधी लावावं याबद्दलची माहितीपण त्यांनी खूप सोप्या शब्दांत सांगितली आहे.बाळाच्या डोळ्यांत काजळ घालू नये,कानात तेल घालू नये,बाळाला धुरी देऊ नये,या सर्वांमुळे अपायच जास्त होतो,असं त्यांनी त्यात सांगितलंय.

"अडगुलं मडगुलं,सोन्याचं कडगुलं,रुप्याचा वाळा,तान्ह्या बाळा,तीटी लावा!"असं बाळाला न्हाऊमाखू घालून झाल्यावर प्रत्येक आई कौतुकानं म्हणते. 'अडगुलं मडगुलं' हे डॉ.श्रीकांत चोरघडे यांनी लिहिलेलं पुस्तकसुद्धा अतिशय उपयुक्त माहिती देतं.अनेक सुशिक्षित मातासुद्धा नवजात शिशुला स्तनपाना ऐवजी बाटलीनं वरचं दूध देण्याचा अट्टाहास धरतात.त्याऐवजी नवजात बालकाला आईनं अंगावरचं दूध पाजणं का आवश्यक आहे हे सांगून त्यांनी त्यात स्तनपानाचं शास्त्रीय महत्व पटवून दिलं आहे.

'माझं बाळ ' या पुस्तकात डॉ.विठ्ठल प्रभू यांनी बाळाच्या जन्मापूर्वीपासून ते बाळाच्या जन्मा पर्यंतच्या घडामोडींबाबतची माहिती दिली आहे.आईचं दूध हे बाळासाठी अमृत असतं असं त्यांनी त्यात म्हटलंय.वरचं दूध,बाळाचा पूरक आहार,बाळाच्या विकासाचे टप्पे, लसीकरण, वजन,उंची, आरोग्य कार्ड या सगळ्यांची माहिती त्यांनी त्यात सोप्या शब्दांत दिली आहे.बाळाची आंघोळ, स्वच्छता,कपडे,जेवण, झोप,दांत येणे असे सगळे विषय त्यांनी त्यात सुसंगतपणे मांडले आहेत.

बारशाच्या दिवशी कौतुक,गर्दी,कुंकवाचे टिळे,नवे कपडे आणि नवजात बाळाचे घेतले जाणारे मुके या सर्वांच्या वर्षावात बाळाची आणि त्याच्या आईची विश्रांती होत नाही की धड जेवण होत नाही. हा  सोहळा शक्य तितक्या साधेपणानं करावा,असा त्यात त्यांनीमनापासून सल्ला दिला आहे.     

जेवण हादेखील बाळाचा एक खेळ असतो.जेवताना ताटलीभोवती शिते सांडल्याबद्दल बाळाला रागावू नये.बाळाला गरज असते ती प्रेमाची आणि सुरक्षिततेची.याला हात लावू नको,हे करू नको,ते करू नको,असं त्याला सतत टोकत राहू नये.बाळाच्या विकासाबाबत घाई करू नये.लहान मुलांना शिक्षा करू नये.फार तर ती सौम्य प्रकारची असावी,शारीरिक इजा होईल अशी नसावी.त्यांना शिक्षेचं कारण समजावून सांगावं. आपण चूक केली,काय चूक केली हे त्यांना त्यातून कळायला हवं.आजच्या चुकीसाठी उद्या शिक्षा करू नये.शिवाय,बाबांनी मुलाला रागवावं आणि आईनं चॉकलेट द्यावं,असं करू नये;तर आई-वडिलांच्या वागण्यात एकवाक्यता असावी. शिक्षेपेक्षा गोडीगुलाबीनं शिस्त लावता आली तर उत्तम,असं ते सांगतात.

अनेकदा मुलं आई-वडिलांना अडचणीत टाकणारे प्रश्न विचारतात आणि पालक 'मला माहीत नाही' वगैरे उत्तरं देतात. 'आई,मी कसा आलो?' वगैरे प्रश्नांवर 'देवानं दिला ' असं सांगण्याऐवजी त्यांना सोपी पण शास्त्रीय बैठक असलेली उत्तरं द्यावीत,असं ते सांगतात.व्यंग घेऊन जन्मलेल्या बाळांच्या आईवडिलांना त्या अपत्याची जबाबदारी आणि सामाजिक कुचेष्टा नी अनाहूत सल्ले अशा माऱ्याला तोंड द्यावं लागतं. त्यासाठीसुद्धा एका स्वतंत्र प्रकरणात 'माझं बाळ ' या पुस्तकात डॉ.विठ्ठल प्रभू यांनी मौलिक माहिती दिली आहे. 

पालकत्व ही प्रक्रिया डोळस असते याचा सुखद अनुभव घेणाऱ्या आईबाबांना 'आपली मुलं आणि आपण ' या पुस्तकात डॉ. मनोज भाटवडेकरांनी पालकत्वाबद्दल सोप्या शब्दांत मार्गदर्शन केलं आहे. मुलांच्या मानसिक समस्यांना 'पालक' नावाचं एक महत्वाचं परिमाण असतं.पालकांनी रंगवलेल्या समस्येच्या चित्रात एक गडद रंगाची छटा असते आणि ती असते त्यांच्या स्वत:च्या व्यक्तिमत्वाची आणि दृष्टीकोनाची.ही छटा अनेकदा मूळ समस्येच्या रंगाला झाकोळून टाकणारी असते.एकत्र कुटुंबाकडून विभक्त कुटुंबपद्धतीकडे वाटचाल करताना कुटुंबात एक दोनच मुलं असतात.ती साहजिकच पालकांच्या विश्वाच्या केंद्रस्थानी असतात.शिक्षण,नोकरी आणि त्यासाठीच्या जीवघेण्या स्पर्धेतून तावून-सुलाखून निघालेल्या दाम्पत्याला मूल पाळणाघरात किंवा नोकरांच्या भरवशावर ठेवावं लागतं , आपण आपल्या मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही ही खंत पालकांना वाटू लागते.त्या अपराधीपणाच्या भावनेतून त्या वेळेची भरपाई मग पालक मुलांना महागडी खेळणी खाऊ, कपडे वगैरे देऊन करतात.मुलांच्या वाढत्या वयाबरोबर पालकत्वही विकसित व्हायला हवं,यादृष्टीनं त्यांनी त्यात मोलाचं मार्गदर्शन केलं आहे.

'छकुलं छान गडे',हे नियती डॉ. नियती बडे-चितलीया यांचं पुस्तक,'जपणूक ' हे डॉ.उल्हास कशाळकर यांचं पुस्तक,'पान्हा' हे डॉ.सौ. सुप्रिया वसंत टिळक यांचं पुस्तक,'आपलं बाळ-बालविकासाचा ज्ञानकोश' हे प्रा. वा.शी.आपटे ,डॉ.शं.चिं.सारंगधर व डॉ.विनीता पाठक यांचं पुस्तक,ही बालसंगोपनाविषयी विस्तृत माहिती देणारी मराठीतली आणखी काही पुस्तकं.   
     
"जन्माला येणारं प्रत्येक मूल हाच संदेश घेऊन येतं की परमेश्वर अजून तरी माणसावर रुसलेला नाही. मूल म्हणजे माणसाला मिळालेली सर्वात सुंदर देणगी," असं रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटलंय.मुलं म्हणजे देवाघरची फुलं! त्या फुलांना तुम्हाला आणखी चांगलं फुलवता लं,तर तुमच्या अंगावर आनंदानी रोमांच फुलणार,की नाही!
--------------------------------------------------------------------------------------------------------
-रश्मी घटवाई  

Wednesday, December 31, 2014

Fitness:The Joy of Laziness:हसत खेळत जगण्याचा मंत्र "द जॉय ऑफ लेझीनेस"

हसत खेळत जगण्याचा मंत्र :"द जॉय ऑफ लेझीनेस"
-रश्मी घटवाई 


उद्यमेन हि सिध्यन्ति कार्यणि  मनोरथै: /न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा://
झोपलेल्या किंवा नुसतं बसून असलेल्या सिंहाच्या तोंडात हरीण काही आपणहून प्रवेश करणार नाही की बाबा रे तुला भूक लागली असेल,तेव्हा आता मला खा!भूक लागल्यावर अगदी वनराज का असेना,त्याला शिकार हेरून तिच्यापाठीमागे धावावेच लागणार,शिकार करावी लागणार...तद्वतच सिंह शिकार करण्यासाठी जर का हरणाच्या मागे लागला असेल,तर आपला जीव वाचवण्यासाठी हरणाला जिवाच्या करारानं धावावं लागणार...जीवो जीवस्य जीवनम हा जसा जंगलाचा कायदा आहे,तसंच थांबला तो संपला हा पण जंगलाचा नियम आहे.त्यामुळे की काय,जंगलात राहणाऱ्या प्राण्यांना आळस काही  परवडणारा नाही.ती मनुष्य प्राण्याची मक्तेदारी! "आलस्य हि मनुष्याणां शरीरस्थो महारिपु:"माणसाच्या शरीरात भिनलेला आळस हाच माणसाचा सगळ्यात मोठ्ठा शत्रू आहे असं आळस ह्या दुर्गुणाबाबतचं एका संस्कृत सुभाषितातलं स्पष्ट मत आहे.
अलसस्य कुतो विद्या,अविद्यस्य कुत: धनं /
अधनस्य कुतो मित्र:,अमित्रस्य कुत: सुखम् //
म्हणजे  आळशी मनुष्याला विद्या कुठून मिळणार,विद्या नसलेल्याला धन कसे मिळणार,धनाचा अभाव असेल,तर त्याला मित्र नसेल आणि ज्याला मित्र नाही,त्याला सुख कसे मिळणार बरे!असं आणखी दुसरं  संस्कृत सुभाषित सांगतं.थोडक्यात काय तर आळस ह्या महाभयंकर दुर्गुणाचा आपण तत्काळ त्याग केला पाहिजे.

एकदा म्हणे एका गावात सगळ्यात आळशी कोण ही स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धकांनी आपणच कसे सर्वात अधिक आळशी हे बसल्या जागेवरून नं हलता,जांभया देत देत पटवून सांगितलं. सरतेशेवटी पारितोषिक घोषित होणार तेवढ्यात कुणीतरी सांगितलं की आंब्याच्या झाडावर झोपलेले म्हातारेबुवाच त्या पारितोषिकाचे योग्य मानकरी ठरतील.लोकांनी त्यावर आक्षेप घेतला,की ज्याअर्थी ते या वयात एवढ्या उंच,डेरेदार आंब्याच्या झाडावर चढून झोपलेत त्याअर्थी ते आळशी नाहीत.त्यावर खुलासा करण्यात आला की त्या माळरानावर आंब्याची कोय पडली होती,तेव्हा त्यावर एक छोटं बाळ झोपलं होतं,पुढे त्या कोयीचा डेरेदार वृक्ष झाला नी ते छोटं बाळ म्हणजेच हे म्हातारेबुवा हे सुज्ञांस सांगणे नं लगे!असो.
आळस झटका हे उपदेश चहूकडून आपल्या कानी आदळत असता जर का "द जॉय ऑफ लेझीनेस"हे एक अतिशय सुंदर पुस्तक पुढ्यात आलं तर काय होईल?समोरच्या उपदेशपांडे यांच्याकडे साफ दुर्लक्ष करून मस्तपैकी रजईत लोळत मनुष्य ते एका बैठकीत-आपलं एका ऐसपैस लोळण्यात वाचून काढेल. 
"The Joy Of Laziness"-द जॉय ऑफ लेझीनेस-हे पुस्तक Peter Axt,PhD -पीटर एक्स्ट व  Michaela Axt-Gadrmann,M.D. -मिशेला एक्स्ट-गाडरमन या दोघांनी लिहिलंय.जर्मनीत राहणारे पीटर एक्स्ट हे हेल्थ सायन्टीस्ट आणि मिशेला एक्स्ट-गाडरमन ह्या मेडीकल डॉक्टर.दोघांनी अनेक  पुस्तके  लिहिली आहेत."Doing nothing actually does a whole lot of good." असं ह्या दोघांनी मेटाबोलिक थिअरी ह्या शास्त्रीय संशोधनावर आधारीत  द जॉय ऑफ लेझीनेस ह्या पुस्तकात म्हटलंय.त्यामुळे 'भेटला बुवा कुणी आपल्या पंथाचा' अशी प्रतिक्रिया सलामीलाच वाचकाच्या मनात येते आणि वाचक पांघरुण आणखी घट्ट गुंडाळून मोठ्या चवीने पुस्तक वाचू लागतो.घरातले अन्य सदस्य त्रासिक चेहऱ्याने त्याच्याकडे बघू लागलेच तर पुस्तकाचे शीर्षक त्यांना दिसेल अशा पद्धतीने पुस्तक धरले की काम भागते.
"ठणठणीत प्रकृती साधे सर्दी पडसे सुद्धा नाही केवळ दोन वेळा जेवायचे,भुकेपेक्षा दोन घास कमीच खावयाचे, मध्ये-अधे चरायचे नाही",असे पाऊणशे वयमानाच्या आजोबांनी नातवंडांना सांगायला सुरुवात केल्यावर काय होईल हे वेगळे सांगायला नको.दीर्घायुष्यासाठी भरपूर व्यायाम करायला हवा,लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे अशी आपल्याकडची शिकवण.ह्या पार्श्वभूमीवर लेखकद्वयी चक्क सांगते की "यू मस्ट डू "नथिंग" इन ऑर्डर टू स्टे हेल्दी अ‍ॅण्ड​ फिट".१९०८ मध्ये जर्मन फिजियोलॉजिस्ट मॅक्स रबनर  यांनी प्रतिपादन केलं की प्रत्येक प्राणीमात्राला विवक्षीत प्रमाणात प्राणशक्ती अथवा  जीव उर्जा(Life Energy )  मिळालेली असते.नंतर विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात रोलंड  प्रिन्झींजर यांनी जीव उर्जा संकल्पनेवर (Life Energy Theory)- या विषयावर संशोधन करून - त्याचंच अधिकृत नाव मेटाबोलिक थिअरी -सांगितलं की सर्व प्राणीमात्रांना त्याच्या शरीराच्या वजनाच्या प्रमाणात एकाच मापात ही प्राणशक्ती वा जीव उर्जा मिळालेली असते-अगदी एका उंदराला ही  एका हत्ती एवढीच जीव उर्जा(प्राणशक्ती) मिळालेली असते.सर्वांना एकसारख्या प्रमाणात मिळालेली ही जीव उर्जा(वा प्राणशक्ती) असते आणि कुठलाही सजीव प्राणी  त्याच्या शरीराच्या वजनाच्या प्रत्येक ग्रॅम मागे २५०० किलोज्युल्स जीव उर्जा (प्राणशक्ती) वापरू  शकतो. तर रॉय वालफोर्ड या अमेरिकन संशोधकाच्या मते इतर प्राण्यांच्या तुलनेत मनुष्यात ही जीव उर्जा दुप्पट असते. लेखकद्वयीच्या मते चयापचयाच्या गतीवर -मेटाबोलिझमच्या स्पीडवर आपली वृद्ध होण्याची,वय वाढण्याची (Ageing) प्रक्रिया अवलंबून असते.जर का आपण चयापचयाची गती कमी करू शकलो,तर आपण सावकाश वृद्ध होऊ.अनेक  anti -aging  तज्ञांच्या मते अनुकूल परिस्थितीत माणसाच्या आयुष्याची आयुर्मर्यादा १२० ते १३० वर्षे आहे.
"Extreme sports,excessive eating  and false ambition  are factors that can steal our energy,cause us to age faster and shorten our lives." असं लेखक लिहितात. एनर्जी कन्झम्प्शन  -उर्जेचा वापर हा मुख्यत्वे आपल्या लाईफ स्टाईलवर -जीवनशैलीवर अवलंबून आहे.वयाच्या  पंचविशीनंतर स्नायूंची प्रतिसाद देण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते,तिशीनंतर एजिंगची-वय वाढण्याची पहिली खूण  डोळ्यांभोवती  दिसू लागते. पस्तीशी, चाळिशी,पंचेचाळिशी,पन्नाशी या टप्प्यांवर काय काय बदल घडून येतात,तसंच ६० ते ७० या वयाच्या टप्प्यात काय काय बदल तीव्रपणे घडून येतात यावर त्यात विस्तृत विवेचन केलंय. "शाळेत शिकलेली कविता तुम्हाला जशीच्या तशी पाठ म्हणून दाखवता येते,मात्र आत्ता आपण गाडीच्या किल्ल्या कुठे ठेवल्यात,हेच बरेचदा विसरायला होतं."ते लिहितात. 

लेखक पेट्रोलवर आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांशी ,फॉर्मुला-१ गाड्यांशी मनुष्याच्या  शरीराची तुलना करतात. फॉर्मुला-१ शर्यतीत अतर्क्य वेगानं धावणाऱ्या गाड्या अवघे दीडशे किलोमीटर अंतर कापल्यावर त्यांच्या सर्व पार्टसची संपूर्ण दुरुस्ती करावी लागते अथवा ते बदलावे लागतात अथवा त्यांना मोडीत काढलं जातं. .काही माणसे  फॉर्मुला-१ शर्यतीत  असल्यासारखी विलक्षण गतीनं आपलं आयुष्य जगतात, त्याबद्दल त्यांचं समाजात कौतुक होतं,कामाच्या झपाट्यानं ते आर्थिक सुबत्ताही मिळवतात.हल्ली लहान मुले ही अशीच  फॉर्मुला-१ शर्यतीत असल्यासारखी विलक्षण गतीनं पळतात.त्यांच्या संपूर्ण दिवसाचं वेळापत्रक कामांनी गच्च भरलेलं असतं. फॉर्मुला-१ शर्यतीत असल्याप्रमाणे पळणाऱ्या  त्यांना कामाच्या ठिकाणी काय किंवा अन्य आघाड्यांवर काय,कायम पहिलं यायचं असतं.कुटुंबीय अथवा मित्रांपेक्षा आपल्या  प्रोफेशनल यशाला ते अधिक महत्व देतात.त्यांना नेहमी अचूकच असायचं  असतं, इतरांना काम विभागून देण्यापेक्षा सगळ्यावर त्यांचंच नियंत्रण असलं पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो.दिवसातला प्रत्येक क्षण हा कामात सत्कारणी लागला पाहिजे,वेळ रिकामा  दवडण्यात हशील नाही असं त्यांना वाटत असतं,त्यांच्याजवळ मुळी रिकामा वेळ नसतो.आपण आपली प्राणशक्ती-life  energy - stress -चिंता,काळजी करण्यात वाया घालवत असतो. मेन्टल स्ट्रेस मुळे फिजिकल  स्ट्रेस निर्माण होतो. लेखकांनी यावर खूप विस्तृत विवेचन दिलंय.प्राणशक्तीचा ऱ्हास करणाऱ्या energy thieves पासून कसं दूर राहता येईल,यावर ते सांगतात.उच्च रक्तदाब, मधुमेह याबद्दल त्यांनी खूपच सोप्या शब्दांत वैद्यकीय ज्ञान दिलंय पण ते इतकं सोप्पं आहे,की डॉक्टर नव्हे,आपला जवळचा मित्रच ते समजावून सांगतोय, असं वाटतं.  
हसत खेळत जगण्याचा मंत्र देणाऱ्या  "द जॉय ऑफ लेझीनेस"पुस्तकाबद्दल "द टाईम्स" नं  आपल्या रिव्ह्यू मध्ये म्हटलं आहे,की डॉक्टर एक्स्ट यांनी आजवर प्रचलित असलेल्या फिटनेस एथिक्सनाच आव्हान दिलंय.हे फिटनेस एथिक्स एका प्रचंड मोठ्या  Service Industry - सेवा उद्योगाचा आत्मा आहेत,ज्याचा प्रभाव व्यायामप्रकारांवर तर दिसतोच दिसतो पण fashion  वर पण दिसतो. धावण्याचे जोडे इत्यादींचा पुरस्कार करण्यासाठी त्यांच्या जाहिरातींवर पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो मात्र hammock (दोरखंडांपासून बनवलेला झुला ज्याच्यात आरामात तासनतास पहुडता येतं.)च्या जाहिरातींवर मात्र काहीच खर्च केला जात नाही.खरं  म्हणजे hammock -  झुला ही दीर्घ आणि निरोगी आयुष्याची  गुरुकिल्ली असू शकते. फिटनेसबद्दलच्या अनेक प्रस्थापित कल्पनांना लेखकद्वयीनं "द जॉय ऑफ लेझीनेस" मध्ये धक्के दिलेले आहेत.Pheidippides हा ग्रीक दूत ख्रिस्तपूर्व  ४०० वर्षे Marathon पासून अथेन्स पर्यंत २६.१६ मैलांचे (४१.८५ किलोमीटर)अंतर धावत गेला आणि तिथे शिरताच अतीव थकव्याने बाजारात कोसळला,गतप्राण झाला.या excessive athleticism वर बरीच चर्चा आतापावेतो झाली,अद्यापही सुरू आहे."Excercise is clearly no guarantee of good health and a long life." असं लेखक अनेक क्रीडापटुंची उदाहरणे आणि  दाखले  देऊन  सांगतात ,
Brisk Walking-धावण्यापेक्षा जलद चालण्याचा व्यायाम  आणि walking meditation
( Peripatetic  meditation )याचा ते पुरस्कार करतात.आहार ,झोप याबद्दलही सांगतात. अनेक प्रस्थापित कल्पनांना धक्का  देणारे भाष्य  करत,आस्वाद घेत,हसत खेळत,मजेत आयुष्य कसं जगायचं याचा मंत्र  "द जॉय ऑफ लेझीनेस" हे पुस्तक देतं.